Friday, April 1, 2011

पंचीकरण

पंचीकरण म्हणजे काय ?

पंचीकरण म्हणजे तत्वांचा निरास .आपले शरीर ८२ तत्वाचे बनलेले आहे .यातील प्रत्येक तत्व म्हणजे मी नाही असे सिद्ध करणे म्हणजे त्या तत्वांचा निरास करणे .तत्वांचा निरास झाला की

तत्वांचे गाठोडे शरीर |याचा पाहातां विचार | येक आत्मा निरंतर | आपण नाही || ६-२-३३ ||

तत्वांचे गाठोडे म्हणजे आपण स्वत;चे खरे अस्तित्व समजतो .पण ही तत्वे नश्वर आहेत .ती तत्वे म्हणजे मी नाही, आत्मा मी आहे हे पटणे म्हणजे पंचीकरण !

आपली ज्ञानेंद्रिये ५ : त्वचा ,कान नाक , जीभ ,आणि डोळे . कर्मेंद्रिये ५ : हात ,पाय ,गुद ,जननेद्रीय ,वाणी ,ही आहेत .यातील प्रत्येक ईंद्रीयाचा विचार केला तर ते ईंद्रीय म्हणजे मी नाही असे म्हणता येईल कारण यातील कोणत्याही ईंद्रिया मध्ये वैगुण्य असेल तरी माणूस जगू शकतो .उदाहरण द्यायचे झाले तर असे म्हणता येईल की कानाने कमी ऐकू आले ,डोळ्यांनी दिसले नाही ,हात तुटला ,पाय तुटला तरी माणूस मारत नाही .नवीन डोळा बसवता येतो .याचा अर्थ चर्मचक्षुनी आपण बघत नाही ..बघणारा वेगळा आहे .ऐकणारा वेगळा आहे .म्हणजे ज्ञानेंद्रिय ,कर्मेंद्रिय म्हणजे मी नाही .

आपला हा स्थूल देह पंचमहाभूतांचा बनला आहे .मग ही पंचमहाभूते म्हणजे मी आहे का असा विचार केला तर कळते की आपले शरीर जड आहे .जडत्व आपल्या शरीरातले पृथ्वी तत्व आहे :.हाड ,मांस ,त्वचा ,रोम ,नाडी या सर्वांना आकार आहे ,वजन आहे ,म्हणजे ह्या सर्व गोष्टी माझ्यातले पृथ्वी तत्व आहे .पण या कुणालाच स्वतंत्र अस्तित्व नाही .चेतना नाही .म्हणजे शरीरातले पृथ्वी तत्व म्हणजे मी नाही .

शरीरातली रक्त ,लाळ ,मूत्र ,घाम रेत हे आप तत्व आहे .पण आप तत्वाला स्वतंत्र अस्तित्व नाही .म्हणून आप तत्व माझे रूप नाही .

शरीरातील भूक ,तहान ,आळस झोप ,मैथून हे तेज तत्व आहे .पण तेज तत्व माझे खरे रूप नाही .त्या तत्वाची स्वतंत्र चेतना नाही .

शरीरातील चलन ,वळण ,प्रसारण ,निरोध ,आकुंचन हे वायू तत्व आहे वायू सूक्ष्म असला तरी त्याला जडत्व आहे .त्याला स्वतंत्र अस्तित्व नाही ,जाणीव नाही ,म्हणून वायू माझे खरे रूप नाही .

शरीरात असलेली पोकळी म्हणजे आकाश् तत्व आहे या आकाश तत्वाने शरीरातील रक्ताभिसरण होते .काम ,क्रोध ,शोक ,मोह भयं या वृत्ती चे तरंग अंत:करणात उमटतात .पण या आकाश तत्वाला स्वतंत्र अस्तित्व नाही .,चेतना नाही ,जाणीव नाही .म्हणजे आकाश तत्व म्हणजे मी नाही .

५ ज्ञानेद्रीय व ५ कर्मेंद्रिय या द्वारे शब्द ,स्पर्श रूप ,रस गंध हे पाच विषय माणसाला शरीर व जग यांच्याशी जोडतात .हे पाच विषय सतत बदलतात जस जसे आपण मोठे होतो तसे विषय बदलतात .म्हणजे हे विषयही आपले खरे रूप नसतात .

अशा प्रकारे हे विषय म्हणजे मी नाही असे दाखवणे म्हणजे पंचीकरण !

आपल्या शरीरातील तत्वे

तत्व निरुपण

अंत:करण पंचक

अंत:करण

मन

बुद्धी

चित्त

अहंकार

निर्विकल्प स्फुरण

संकल्प विकल्प

निश्चयात्मक बुद्धी

कार्याचे चिंतन

कार्य करण्याचा

अभिमान

प्राण पंचक

पाच प्राण हे वायूचे विभाग आहेत .

व्यान

समान

उदान

अपान

प्राण

सर्वांगाला व्यापून

नाभी च्या ठिकाणी

कंठाशी

गुद्स्थानी

तोंडात व नाकात

ज्ञानेंद्रिय पंचक

कान

त्वचा

डोळे

जीभ

नाक

कर्मेंद्रिय पंचक

वाणी

हात

पाय

जननेंद्रिय

गुद

पाच विषय

शब्द

स्पर्ष

रूप

रस

गंध

अशी ही पाच पंचकांची प्रत्येकी पाच तत्वे म्हणजे २५ तत्वांचा सूक्ष्म देह बनतो .ही तत्वे पंचमहाभूतात सामावलेली असतात .

अंत:करण ,व्यान ,कान ,वाणी ,शब्द यांचा आकाश या महाभूताशी संबंध असतो .

मन ,समान ,त्वचा ,हात ,स्पर्ष यांचा वायू या महाभूताशी संबंध असतो .

बुद्धी ,उदान ,डोळे ,पाय रूप यांचा तेजाशी संबंध असतो .

चित्त ,अपान ,जीभ ,जननेंद्रिय ,रस यांचा आपाशी संबंध असतो .

अहंकार ,प्राण ,नाक ,गुद ,गंध यांचा पृथ्वीशी ,या तत्वाशी संबंध असतो .

पंचमहाभूते स्थूलात कोणत्या गुणांनी व्यक्त होतात ?

पंचमहाभूते गुण

आकाश काम ,क्रोध ,शोक ,मोह ,भयं

वायू चळण ,वळण ,प्रसारण ,निरोध ,आकुंचन .

तेज भूक ,तहान ,आळस ,झोप ,मैथून .

पाणी रेत ,रक्त ,लाळ ,मूत्र ,घाम .

पृथ्वी हाडे ,मांस ,त्वचा ,नाडी ,रोम

पंचमहाभूतांच्या २५ तत्वांनी स्थूल देह बनतो ।

अंत:करण पंचकाची म्हणजे सूक्ष्म देहाची २५ तत्वे असतात .

कारण देह ,अज्ञान रूप असतो .महाकारण देह ज्ञान रूप असतो .समर्थ म्हणतात :

विचारे चौदेहा वेगळे केले | मीपण तत्वासरीसे गेले | अनन्य आत्मनिवेदन जाले | परब्रह्मी ||१७-८-३१ ||

विवेके चुकला जन्ममृत्यू | नरदेही साधले महत्कृत्य | भक्तियोगे कृतकृत्य | सार्थक जाले ||१७-८-३२ ||

विचाराने चारही देह वेगळे झाले की तत्वांबरोबर मीपण नाहीसे होते .आत्मनिवेदन साधते .आत्मानात्म विवेकाने जन्म मृत्युच्या चक्रातून सुटका होते .भक्तीने कृतकृत्यता येते .जन्माची सार्थकता येते .यालाच पंचीकरण म्हणतात .

तत्व निरूपण

तत्व निरूपण

श्रोत्यांनी समर्थांना तत्वांबद्दल स्पष्टीकरण करण्याची विनंती केली ,तेव्हा समर्थांनी प्रथम चार वाणी सांगीतल्या .समर्थ म्हणतात :

नाभीपासून उन्मेष वृत्ती | तेची परा जाणिजे श्रोती | ध्वनी रूप पश्यंती | हृदइ वसे ||१७-८-१ ||

कंठा पासून नाद झाला | मध्यमा वाचा बोलिजे त्याला | उच्चार होता अक्षराला | वैखरी बोलिजे ||१७-८-२ ||

नाभी स्थानी परा वाचा | तोचि ठाव अंत:करणाचा |अंत:करण पंचकाचा| निवाडा ऐसा ||१७-८-३ ||

हृदयामधील ध्वनी कंठात येउन नादाचे रूप धारण करतो .त्याला मध्यमा वाणी म्हणतात .जिभेने नादाचा शब्दरूप उच्चार होतो .तेव्हा त्याला वैखरी वाणी म्हणतात .

शारदा ईश्वराची ज्ञानमय महाशक्ती केवल स्फुरण रूप असते .ती ओंकार रूपाने नाभिस्थानी वास करते .तिला परावाणी म्हणतात .ती जाणीव रूप असते .

जाणीव रूप असलेली परावाणी ज्यावेळेस अर्थाचा आकार घेते तेव्हा तिला पश्यन्ति म्हणतात .आपल्या अनुभवात येणा-या वस्तूंचा ,घटनांचा प्रसंगांचा अर्थ ती पहाते म्हणून तिला पश्यंती म्हणतात .तिचे स्थान हृदयात असते .

पश्यंती ने पाहिलेल्या एखाद्या घटनेचा अर्थ जी स्थूल जगत आणि सूक्ष्म अर्थ यांना जोडते तिला मध्यमा म्हणतात .तिचे स्थान कंठात असते .मध्यमेतली भाषा मनातल्या मनात बोलली जाते .आपण मनातल्या मनात जे बोलतो ते मध्यमा वाणीने बोलतो .आपले चिंतन नेहमी मध्यमेत चालते ..

चौथी वाणी वैखरी .ती सूक्ष्म परावाणीला स्थूल व ईद्रीयगोचर रूप देते .मौन भाषा जेव्हा स्वररूपाने शब्द बनून तोंडावाटे बाहेर पडते तेव्हा तिला वैखरी म्हणतात .

वाणी

परा

पश्यति

मध्यमा

वैखरी

स्थान

नाभी

हृदय

कंठ

तोंड

कार्य

स्फुरण रूप

ध्वनी रूप

नादरूप

शब्द रूप

आपण नामसाधना करतो तेव्हा वैखरीने नाम घ्यायला सुरुवात करतो .नामजपात जेव्हा वैखरी वाणी रमते ,तेव्हा नामाची शक्ती जागी होते .त्या शक्तीने भगवंत आहे अशी भावना निर्माण होते .मी देह आहे हे भान कमी कमी व्हायला लागते .देहातून ईद्रीयातून आनंद घेण्याची वासना कमी होते .त्यामुळे नामाला सूक्ष्मता येते .नाम आतल्या आत सहज पणे चालते .तेव्हा ते मध्यमेत चालते .मध्यमा वाणी एकीकडे देहाशी म्हणजे मेंदूशी जोडलेली असते तर दुसरीकडे मन बुद्धीशी जोडलेली असते .मेंदू व मन बुद्धीला ही वाणी जोडते म्हणून तिला मध्यमा म्हणतात .मध्यमे मध्ये जीभेची हालचाल होत नाही .पण स्वर यंत्रात स्फुरण येते .मध्यमेत नाम स्थिर झाले की ते अंत:करणाला व्यापते .अंत:करण व्यापते म्हणजे मनन व निदिध्यास लागतो .मग नाम पश्यंती मध्ये जाते .पश्यंती मध्ये नाम चालू झाले की माणूस ईद्रीय सुखाकडे वळत नाही ..विकार सगळे क्षीण होतात .त्याला फक्त भगवंताची आठवण असते .त्याच्या बद्दलच्या विचारांची ,,कल्पनांची .पश्यंती मध्ये नाम चालू झाले की भगवंता बद्दल प्रेम भावना निर्माण होते .त्यात माणूस स्वत:ला विसरतो .व त्याला भगवंताचे दर्शन होते

अंत:करणपंचक

निर्विकल्प जे स्फुरण | उगेची असता आठवण | ते जाणावे अंत:कर्ण | जाणती कळा ||१७-८-४ ||

अंत:कर्ण आठवले | पुढे होय नव्हेसी गमले | करूं न करूं ऐसे वाटले | तेची मन ||१७-८-५ ||

संकल्प विकल्प तेची मन |जेणे करितां अनुमान | पुढे निश्चयो तो जाण | रूप बुद्धीचे ||१७-८-६ ||

करीनचि अथवा न करी | ऐसा निश्चयोचि करी | तेची बुद्धी हे अंतरी | विवेके जाणावी ||१७-८-७ ||

जो वस्तूचा निश्चये केला | पुढे तेची चिंतू लागला | ते चित्त यथार्थ बलिल्या बोला | यथार्थ मानावे ||१७-८-८ ||

पुढे कार्याचा अभिमान धरणे |हे कार्ये तो अगत्य करणे | ऐस्या कार्यास प्रवर्तणे |तोचि अहंकारू ||१७-- ||

आपण जेव्हा नुसते बसलेले असतो ,तेव्हा एखादी आठवण येते ,एखादी गोष्ट सुचते,ते अंत:करण असते .त्यालाच जाणीव ,जागृती कला म्हणतात .जाणीव जेव्हा स्वच्छ रूपात असते तेव्हा तिला अंत:करण म्हणतात .

आपल्याला जे सहज आठवते ,ती गोष्ट करावी की नाही,ती गोष्ट होईल की नाही अशी स्थिती येते तेव्हा ते मन असते .म्हणजेच संकल्प विकल्प करणारी जाणीव तेच मन

मन एखादी गोष्ट घडेल की नाही ,करावी की नाही असा विचार करताना मी ही गोष्ट करीन किंवा करणार नाही असा निश्चय होतो .तीच बुद्धी असते .

बुद्धीने एखादी गोष्ट करायची असे ठरवले की ती कशी करायची ,काय करायचे असे चिंतन सुरु होते .त्या चिंतनाला चित्त म्हणतात .

एखादी गोष्ट करायची असे ठरवले की हे कार्य मी नक्की चांगले करीन असे म्हणून कामाला सुरुवात करणे याला अहंकार म्हणतात .

ऐसे अंत:कर्ण पंचक |पंचवृत्ती मिळोन एक | कार्यभागे प्रकार पंचक | वेगळाले ||१७-८-१० ||

मूळ अंत:करण एकच आहे .पण निरनिराळ्या कार्यामुळे एकाच अंत:करणाची पांच रूपे आढळतात .प्रत्येक रूपाला वृत्ती म्हणतात .

संगती चा परिणाम कसा असतो ?

संगतीचा परिणाम

अंतरात्मा स्वच्छ व शुध्द असला तरी त्याला देहाच्या सगतीने अनेक सुख दुख भोगावी लागतात .तसेच माणसाचे असते .जशी संगत लाभेल तसा माणूस घडतो .आपला आपण शत्रू बनतो .नाहीतर मित्र ! जशी संगती लाभते तसा माणूस घडतो .त्या व्यक्तीला गती किंवा अधोगती प्राप्त होते .समर्थ उदाहरण देतात :मुळी उदक निवळ असते | नाना वल्ली मध्ये जाते | संगदोषे तैसे होते |आंब्ल तीक्ष्ण कडवट ||

१७-७-१ ||

आत्मा आत्मपणे असतो | देहसंगे विकारतो |साभिमाने भरी भरतो | भलतीकडे ||१७-७-२||

पाणी मुळचे स्वच्छ असले तरी ज्या प्रकारच्या वेलीं ,वनस्पतींमध्ये ते शिरते त्याच्या संगतीचा दोष त्या पाण्याला लागतो व ते तिखट ,आंबट ,कडू ,गोड होते .तसा आत्मा मुळात आत्मरूपाने शुध्द असला तरी देहाच्या संगतीने त्याचे शुध्दपण नाहीसे होउन त्याच्यात विकार उत्पन्न होतात .

पाण्याला उसाच्या सगतीने गोडवा येतो .विषारी वेलीने पाण्याचा प्राणघातक रस तयार होतो .तसे अंतरात्म्याला निरनिराळ्या देहांच्या सगतीने निरनिराळे गुण आढळतात .

त्यामध्ये कोणी भले |ते संतसंगे निघाले | देहाभिमान सांडून गेले | विवेकबळे || १७-७-५ ||

उदकाचा नाशचि होतो | आत्मा विवेके निघतो | देहाभिमान सांडून गेले | विवेक बळे ||१७-७-६ ||

देहात जे चांगले असतात ते संतसंगतीत काळ घालवतात .त्यामुळे निर्माण होणारा विवेक त्यांना तरून नेतो .देहाभिमान नाहीसा होतो .देहबुद्धी नष्ट होते .पण जेव्हा पाण्याचा नाश होतो ,अंतरात्मा बाहेर पडतो

आपला आपण करी कुडावा | तो आपला मित्र जाणावा | आपला नाश करी तो समजावा | वैरी ऐसा ||

१७-७-८ ||

जो स्वत:ला सांभाळतो ,तो स्वत:चा मित्र असतो .जो स्वत:च स्वत:चा नाश करतो तो स्वत:चा वैरी असतो .

जो आपला आपण घातकी | तो आत्महत्यारा पातकी | याकारणे विवेकी |धन्य साधू ||१७-७-१० ||

पुण्यवंता सत्संगती | पापीष्टां असत्संगती | गती आणि अवगती |संगतीयोगे ||१७-७-११ ||

उत्तम संगती धरावी | आपली आपण चिंता करावी | अंतरी बरीत विवरावी | बुद्धी जाण तयाची ||१७-७-१२ ||

इहलोक आणि परलोक | जाणता तो सुखदायेक |नेणत्याकरितां अविवेक |प्राप्त होतो || १७-७-१३ ||

जाणता देवाचा अंश |नेणता म्हणिजे तो राक्षस | यामध्ये जे विशेष |जाणोन घ्यावे ||१७-७-१४ ||

जो स्वत: आपला घात करून घेतो ,तो आत्महत्यारा पातकी समजावा .पुण्यवान पुरुष सत्संगती धरतो तर पापी वाईट सगतीत रहातो .त्यामुळे एकाला गती मिळते तर दुसरा अधोगतीला जातो .म्हणून माणसाने उत्तम संगती धरावी .जाणत्याचे विचार समजावून घेउन त्याचे मनन चिंतन करावे .त्यामुळे इहलोकी व परलोकी सुख लाभते .तर वाईट संगतीत गुंतलेला नेणता अविवेकाने वागतो .जाणता देवाचा अंश असतो तर नेणता राक्षस ! जाणता सर्वांना मान्य होतो तर नेणता अमान्य .समर्थ म्हणतात :

उत्तम संगतीचे फळ सुख | अध्दम संगतीचे फळ दु:ख | आनंद सांडूनिया शोक | कैसा घ्यावा ||१७-७-१७ ||

उद्योगी व शहाण्या माणसाच्या संगतीने आपण उद्योगी व शहाणे बनतो .आळशी व मूर्ख माणसाच्या संगतीने आपण आळशी व मूर्ख बनतो .म्हणून नेहमी सत्संगती धरावी .