Tuesday, August 30, 2011

देहाचे महत्व

देहाचे महत्व काय ?

शिष्य चर्चा करत होते की माणसाचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन कसा असावा ? प्रवृत्तिपर किंवा निवृत्तिपर .प्रवृत्तिपर दृष्टीकोन असणारे शिष्य देहाला ,या दृश्य विश्वाला महत्व देत होते .देह सर्वस्व आहे असे म्हणत होते .तर निवृत्तिपर विचाराचे शिष्य शुध्द जाणीव असणारा आत्मा महत्वाचा मानत होते .त्यांच्या दृष्टीने देह क:पदार्थ होता .अंतरात्मा परमार्थ साधनेचा प्राण आहे ,त्याची साधना आवश्यक आहे असे मानत होते . ही चर्चा चालू असताना श्री समर्थ रामदास स्वामी तेथे येतात आणि सांगू लागतात .

परी त्या सकळांचे हि कारण | मुळी पहावे स्मरण | तया स्मरणाचे अंश जाण | नाना देवते || १९-५-५ ||

दगड माती ,सोने ,अनेक धातूंचे देव असतात .शालीग्राम ,,स्फटिकाचे देव ,सूर्यकांत ,सोमकांत ,,तांदळे ,नर्मदे ,चक्रांकित दगड सर्वच देव मानले जातात .पण या सगळ्या देवांचे कारण हे मुळात झालेले स्मरण रूप संकल्प आहेत .मूळ संकल्प म्हणजे मूळमाया .,तिने त्रिगुण निर्माण केले .त्रिगुणांचे स्वामी ब्रह्मा ,विष्णू ,महेश हे देव निर्माण झाले .त्यांची प्रतीके आपण बनवतो .त्यांची पूजा करतो .

देवांची भक्ती ,पूजा करण्यासाठी देहाची आवश्यकता असते

.देह्यावेगळी भक्ती फावेना | देह्यावेगळा देव पावेना | याकारणे मूळ भजना | देहचि आहे || १९-५-७ ||

देहाशिवाय ,देहाने केलेल्या साधनेशिवाय देव पावत नाही .देह नसेल तर भजन ,पूजन ,देवाचा महोत्सव कसा करणार ? देवाच्या पूजेतील गंध ,अत्तर ,प्पात्र ,पुष्प ,फळ तांबूल ,धूप ,दीप असे पूजेचे सोपस्कार कसे करणार ? म्हणजेच देहानेच देवाचे भजन पूजन होऊ शकते .

हिंदू धर्मात ३३ कोटी देव मानले आहेत .त्या प्रत्येक देवतेचे सामर्थ्य वेगवेगळे असते .मूळ अंतरात्म्याचे सामर्थ्य कमी अधिक प्रमाणात ह्या देवतांमध्ये प्रगट होते .कोणत्याही देवाचे केलेले भजन हे मूळ अंतरात्म्याला च जाऊन पोहोचते .

नाना देवी भजन केले | ते मूळ पुरुषासी पावले | याकारणे सन्मानिले | पाहिजे सकळ काही || १९-५-१४ ||

ज्याप्रमाणे आकाशातून पडलेले पाणी सागराला जाऊन मिळते ,त्याप्रमाणे कोणत्याही देवाचे केलेले भजन मूळ पुरुषाला जाऊन मिळते . त्यांमुळे सर्व देवदेवतांना योग्य तो मान द्यावा .तसेच अंतरात्म्यामध्ये असलेली जाणीव अंश रूपाने प्रत्येक देहात प्रगट झालेली असते .म्हणूनच समर्थ म्हणतात

म्हणोनी येळील न करावे | पाहाणे ते येथेची पाहावे | ताळां पडता राहावे |समाधाने || १९-५-१६ ||

अंतरात्मा पहायचा असेल तर याच देहात पहाता यावा यासाठी प्रयत्न करायला हवा .माणसे देवाला शोधण्यासाठी नाना तीर्थयात्रा करतात ,कोणी अवतारांना मानतात . क्षेत्रातील देव ,अवतार हे ,ब्रह्मा ,विष्णू ,महेश या त्रिमूर्तीची प्रतीकात्मक रूपे असतात .सर्व अवतार आपली कार्ये संपवून त्रिगुणातीत असलेल्या परमात्म्यात विलीन झालेली असतात .म्हणून मुख्य देव जो परमात्मा त्याच्या पर्यंत जाऊन पोचायला हवे ,हा विचार मांडताना श्रीसमर्थ म्हणतात :

भूमंडळी देव नाना | त्यांची भीड उलंघेना | मुख्य देव तो कळेना | काहीं केल्या || १९-५-२३ ||

अनेक प्रकारचे देव मानव निर्मित आहेत .त्यांना निर्भय पणे जो बाजूला सारतो व खं-या देवाचा शोध घेतो ,त्यालाच त्रिगुणातीत देव सापडतो .

खरा देव कसा शोधावा याचे मार्गदर्शन करताना समर्थ म्हणतात :

कर्तुत्व वेगळे करावे | मग त्या देवासी पाहावे | तरीच काही येक पडे ठावे | गौप्यगुह्य ||१९-५-२४ ||

ते दिसेना ना भासेना |कल्पांतीही नासेना | सुकृतावेगळे विश्वासेना | तेथे मन || १९-५-२५ ||

म्हणोनि कल्पनारहित | तेचि वस्तू शाश्वत | अंत नाही म्हणोनी अनंत | बोलिजे तया ||१९-५-२७ ||

हे ज्ञान दृष्टीने पहावे | पाहोनी तेथेची राहावे | निजध्यासे तद्रूप व्हावे | संगत्यागे || १९-५ २८ ||

नाना लीळा नाना लाघवे | ते काय जाणिजे बापुड्या जीवे | संतसंगे स्वानुभावे | स्थिती बाणे || १९-५-२९ ||

ऐसी सूक्ष्म स्थिती गती | कळतां चुके अधोगती | सद्गुरुचेनी सद्गती | तत्काळ होते ||१९-५-३० ||

समर्थ सांगतात : माणसात देहबुद्धीचे प्राबल्य असल्याने मी कर्ता ,मी भोक्ता अशी धारणा असते ,त्यामुळे खं-या देवा पर्यंत माणूस पोहोचू शकत नाही .जेव्हा तो त्याची देहबुद्धी बाजूला सारतो ,मी कर्ता ही भावना ,,हा अहंकार दूर सारतो ,तेव्हाच तो खं-या देवाला जाणण्यास योग्य होतो .

खरा देव म्हणजे परमात्मा ,परब्रह्म ! तो कल्पनातीत आहे .कल्पना तेथे पोहोचू शकत नाही ,मायेन त्याचे वर्णन करता येत नाही .त्याला बघण्यासाठी ज्ञान दृष्टीच हवी ,निदिध्यास हवा .तरच त्याला पाहाता येते .आपले मन जोपर्यंत आहे ,त्यातून विचार येत आहेत ,कल्पना स्फुरत आहेत ,तोपर्यंत आपण अंतरात्म्याला जाणू शकत नाही .कर्तेपण दूर सारले तरच अंतरात्म्याचे गुप्त रहस्य जाणता येते .

कल्पना रहित असलेले तत्व ,अंत नसलेले तत्व ,तीच शाश्वत वस्तू असते .तिला जाण तद्रूप ण्यासाठी नि:संग व्हावे लागते .संगत्याग घडावा लागतो .संगत्याग म्हणजे देहबुद्धीचा त्याग ,देहबुद्धीचा ,कर्तेपणाचा त्याग केला तरच त्या शाश्वत सद्वस्तूशी होता येते .त्यासाठी संतसंग हवा . सत्संगाने व स्वत:च्या अनुभवाने त्रिगुणातीत ,शाश्वत सद्वस्तूशी तादात्म्य पावता येते .सद्गुरूची कृपा झाली तर ही अवस्था लवकर येते .


भाग्यवान पुरुष कसा ओळखावा ?

भाग्यवान पुरुषाची लक्षणे कोणती ?

श्री समर्थांनी १९-३ या समासात करंट्याची लक्षणे सांगितल्यावर शिष्य विचारतात : भाग्यवान पुरुषाची लक्षणे कोणती ? तेव्हा श्री समर्थ सांगतात :

उपजत गुण शरीरी | परोपकारी नानापरी | आवडे सर्वांचे अंतरी | सर्वकाळ || १९-४-२ ||

नाना उत्तम गुण सत्पात्र | तेचि मनुष्य जगमित्र | प्रगट कीर्ती स्वतंत्र | पराधेन नाही || १९-४-६ ||

राखे सकळांचे अंतर | उदंड करी पाठांतर | नेमस्तपणाचा विसर | पडणार नाही || १९-४-७ ||

ज्यांचे अंगी काही गुण उपजतच असतात ,तो अनेक मार्गांनी परोपकार करतो .तो सर्वांना नेहमीच आवडतो .तो सदेव ,भाग्यवान होय .तो कोणाचे मन मोडत नाही .चांगल्याची संगत सोडत नाही .तो सर्वांना हवाहवासा वाटतो .जेथे तो जातो तेथे तेथे तो नवीनपणे लोकांना हवाहवासा वाटतो .अनेक उत्तम गुण त्याच्या जवळ असतात त्यामुळे तो सत्पात्र असतो .त्यामुळे तो जगमित्र असतो .तो सर्वांचे अंत:करण सांभाळतो .त्याचे पाठांतर खूप असते .तो नित्य नियमित आचरण करत असतो .तो अविरत परोपकार करतो .त्यामुळे तो सर्वांना हवाहवासा वाटतो .सर्व जण त्याची वाट पहात असतात .कारण तो प्रत्येकाच्या अडचणीच्या वेळेस मदतीला उभा असतो .त्याच्या जवळ १४ विद्या ६४ कला असतात .तो संगीत जाणतो ,स्वत: गातो .न्याय नीती भजन मर्यादा सांभाळून तो आपला काळ सार्थकी लावतो .त्यामुळे अशा उत्तम गुणांनी ज्याचे अंत:करण शृंघारले असते .असा पुरुष सर्व पुरुषात शोभून दिसते .

प्रपंची जाणे राजकारण | परमार्थी साकल्य विवरण | सर्वांमध्ये उत्तम गुण | त्यांचा भोक्ता ||१९-४-१७ ||

मागे येक पुढे येक | ऐसा कदापी नाही दंडक | सर्वत्रांसी अलौकिक | तया पुरुषाची ||१९-४-१८ ||

कर्मवीधी उपासनाविधी |ज्ञानविधी वैराग्यविधी | विशाळ ज्ञातृत्वाची बुद्धी |चळेल कैसी || १९-४-२० ||

उत्तम पुरुष प्रपंचात राजकारण म्हणजे व्यवहारचातुर्य जाणतो .परमार्थात आत्मानात्म विवेक व सारासार विचार जाणतो . सगळ्यात जे उत्तम असतो त्यांचा तो रसिक असतो ..तो मागे एक पुढे एक असे दुटप्पेपणे असे वागत नाही . तो कोणाचे अंत:करण दुखवत नाही . कर्म ,उपासना ,न्यान आणि वैराग्य ह्या चारही गोष्टी त्याच्या जवळ योग्य पध्दतीने आढळतात .

दुस-याच्या दु:खे दुखवे | दुस-याच्या सुखे सुखावे | अवघेची सुखी असावे |ऐसी वासना || १९-४-२३ ||

त्याला दुस-याच्या दु:खाने दु:ख होते .दुस-याच्या सुखाने तो सुखी होतो .सर्वजण सुखी असावे असे त्याला वाटते . त्यासाठी तो प्रयत्नही करतो .त्याला कोणाचे उणे सहन होत नाही . त्याला पैशाची अभिलाषा नसते .कोणी त्यांचा धिक्कार केला तरी तो मनात अस्वस्थ होत नाही .त्यांचा तोल तो ढळू देत नाही कारण तो आपल्या शरीराला मिथ्या समजत असतो .कोणी त्याची निंदा केली तरी ती देहापुरती आहे अशी त्याची खात्री पटते ..तो खरा ज्ञाता असतो .त्यामुळे त्याच्या जवळ देहबुद्धी नसते .

हे अवघे अवलक्षण | ज्ञाता देही विलक्षण | काही तऱ्ही उत्तम गुण | जनी दाखवावे || १९-४-२७ ||

लोकी अत्यंत क्षमा करिती | आलिया लोकांचे प्रचीती | मग ते लोक पाठी राखिती | नाना प्रकारे || १९-४-२९ ||

देहबुद्धी असणे हे अवलक्षण आहे .ज्ञाता पुरुष देहात असला तरी तो देह मिथ्या आहे हे तो जाणतो .त्याच्या जवळ देहबुद्धी नसते देहात असून तो विदेहीपणे राहतो .उत्तम गुणांमुळे लोक त्याच्या कडे आकर्षिले जातात .उत्तम गुणांची जोपासना करण्या साठी ज्ञानी पुरुषाला तीक्ष्ण व सूक्ष्म बुद्धी लागते .ती भाग्यवान पुरुषाचे अंगी असते .म्हणून तो लोकांचे अन्याय व अपराध क्षमा करतो .तो क्षमाशील असतो .असा महापुरुष सदैव धीर ,उदार ,गंभीर असतो .जेव्हडे उत्तम गुण आहेत ते समर्थ पुरुषाची लक्षणे आहेत .



करंटा भाग्यवान होईल का ? कसा ?

करंटा भाग्यवान कसा बनतो ?

करंटा भाग्यवान कसा बनेल ते सांगताना समर्थ म्हणतात :

कांही नेमकपण आपुले | बहुत जनास कळो आले | तेचि मनुष्य मान्य जाले |भूमंडळा|| १९-३-२३ ||

झिजल्यावाचून कीर्ती कैची | मान्यता नव्हे की फुकाची | जिकडे तिकडे होते ची ची | अवलक्षणें ||१९-३-२४ ||

भल्याची संगत धरीना | आपणासी शहाणे करीना | तों आपलाची वैरी जाणा |स्वहित नेणे || १९-३-२५ ||

जेथे नाही उत्तम गुण | ते करंटपणाचे लक्षण | बहुतांसी न माने ते अवलक्षण |सहजची आले || १९-३-२७ ||

तन मन धनाने झिजल्याशिवाय जगात कीर्ती मिळत नाही .ज्याच्या जवळ कुलक्षणें असतात त्याची सर्वत्र छी थू होते .जो माणूस चांगल्याची संगत धरत नाही तो स्वत:ला शहाणा करत नाही .जो स्वत:चे हित जाणत नाही तो स्वत:चा वैरी होतो .ज्याच्या जवळ एकही उत्तम गुण नाही तो करंटा समजावा .तो पुष्कळांना आवडत नाही .तेच त्याचे कुलक्षण समजावे .

याकारणे अवगुण त्यागावे | उत्तम गुण समजोन घ्यावे | तेणे मनासारखे फावे |सकळ काही ||१९-३-३० ||

म्हणून करंट्याने आपले अवगुण त्यागावे .उत्तम गुण समजून अभ्यासावे .म्हणजे सर्व काही मनासारखे होते .

करंटा कोणाला म्हणावे ?

करंट्याची लक्षणे कोणती ?

श्री समर्थ लोकांचे दोन गटात विभाजन करतात .१ भाग्यवान माणसे २ भाग्यहीन माणसे म्हणजेच करंटी माणसे .विवेकाचा अभाव व कष्ट करण्याचा अभाव या दोन कुलक्षणां मुळे माणूस करंटा बनतो .असे श्री समर्थ १९-३ या करंटलक्षण निरुपण या समासात सांगतात .ही लक्षणे सांगण्याचा उद्देश हा की त्या लक्षणांचा त्याग केल्याने माणूस भाग्यवान होतो .पापाचे आचरण केल्याने दारिद्र प्राप्त होते .दारिद्र्याने पाप साठते .दारिद्र्य येते .आळसाने ,प्रयत्न करणे न आवडल्याने प्रथम आळस सोडावा .करंट्याची वासना अधर्मात वावरते म्हणून वाईट गोष्टी कराव्याश्या वाटतात .

करंटा नेहमी भ्रमिष्ठ ,झोपाळू असतो .अव्वाच्या सव्वा बोलतो .कोणाच्या अंत:करणाची तो पर्वा करत नाही .त्याला लिहिणे ,वाचणे ,जमाखर्च ,व्यापारात लागणारे देणेघेणे कांहीच येत नाही .तो वस्तू हरवतो ,मोडतो पाडतो ,फोडतो विसरतो ,चुकतो ,चांगल्या माणसांची संगत तो धरत नाही .दुष्ट नष्ट चोरटे ,पापी मित्र जोडतो .तो प्रत्येकाशी भांडतो .,तो चोरटा असतो .दुस-याचा घात करणारा असतो .वाटमार करणारा असतो .

दीर्घ सूचना सुचेचिना | न्याय नीती हे सुचेना | परअभिळासी वासना |निरंतर ||१९-३-१० ||

आळसे शरीर पाळी | अखंड कुंसी कांडोळी | निद्रा पाडी सुकाळी | आपणासी || १९-३-१२ ||

शब्द सांभाळून बोलेना| आंवरता आवरेना | कोणीयेकासी मानेना | बोलणे त्याचे ||१९-३-१६ ||

दूरदर्शीपणा त्याला सुचत नाही ,नीती न्याय रुचत नाही .दुस-याला लुबाडण्याची वासना असते .करंटा आप्पले शरीर आळसाने पाळतो .कालांतराने त्याला खायला मिळत नाही .पांघरायला मिळत नाही .असा आळशी माणूस सतत कुशी खाजवतो .नाहीतर झोपून राहतो .सर्वांना कठोर ,झोंबणारे शब्द बोलतो .पवित्र लोकांमध्ये मिसळत नाही .अपवित्र ,घाणेरड्या लोकांमध्ये नि:शंक पणे मिसळतो .समाजाला निंद्य वाटाणा-या गोष्टी तो सहज करतो .आपल्याला स्वत:ला काही कळत नाही ,कोणी शिकवले तर ऐकत नाही .खूप मोठ्या कल्पना करतो पण पदरात कांहीच पडत नाही .त्यामुळे कायम कल्पनेच्या जाळ्यात अडकतो .त्याच्या जवळ निश्चय नसल्याने अनुमानाने त्यांचा नाश होतो .

समाजनेता कसा असावा ?

समाजनेत्याच्या अंगी कोणते गुण असावे ?

समाजनेता विद्वान असायला हवा .त्याने वेगवेगळ्या ग्रंथांचा अभ्यास केलेला असावा .ग्रंथातील शब्द ,शब्दांचा वाच्यार्थ ,लक्षणार्थ ,गूढार्थ हे सर्व माहिती असायला हवे . त्याला काव्यांचे प्रकार ,निरनिराळ्या शब्दांचे निरनिराळे अर्थ माहिती असायला हवेत .त्याला वेगवेगळ्या शंका ,त्यांची उत्तरे माहिती असायला हवी .

नाना पूर्वपक्ष सिध्दांत |प्रत्ययो पहावा नेमस्त | अनुमानाचे खस्तवेस्त |बोलोची नये || १९-२-४ ||

प्रवृत्ती अथवा निवृत्ती | प्रचीतीविण अवघी भ्रांति | गळग्यामधील जगज्जोती |चेतेल कोठे ||१९-२-५ ||

त्याला अनेक प्रकारच्या पूर्वपक्ष व सिध्दांतांचा अनुभव असावा .अनुभव नसेल तर लोकांना ठासून सांगता येत नाही .अनुमानाने बोलले तर त्यात सत्य असत नाही .समाज नेत्याने अनुमानाने बोलू नये .

प्रवृत्ती ,निवृत्ती ,प्रपंच ,परमार्थ सर्वत्र अनुभवाच्या समाजनेत्याने सांगाव्या .नाहीतर सर्वत्र भ्रम होतो .लोकांना अनुभवाविण सांगितले तर लोकांचे समाधान होत नाही .श्रोत्यांच्या अंत:करणाला जाऊन ते भिडत नाही .लोकांच्या अंत:करणातील जगज्जोती चेतणार नाही .लोकांचा अंतरात्मा जागा होत नाही .म्हणून समाज नेत्याचे बोलणे प्रत्ययाचे अनुभवाचे असावे .

समाज नेत्याचे अंगी वक्तृत्वकला असावी .कारण त्याशिवाय लोकांच्या मनाची पकड त्याला घेता येत नाही .त्याने आपल्याकडे लीनता घेऊन वागायला हवे .दुस-याचे मन ओळखून बोलायला हवे .लोकांच्या मनातले ओळखायला हवे .त्याने अजाणतेपण सोडू नये .जाणतेपणा चा ताठा धरू नये .

प्रसंग जाणावा नेटका | बहुतांसी जाझू घेऊ नका | खरे असतांची नासका |फड होतो || १९-२-११ ||

उत्तम गुण प्रगटवावे | मग भलत्यासी बोलतां फावे | भले पाहोन करावे | शोधून मित्र ||१९-२-१५ ||

उपासनेसारीखे बोलावे | सर्व जनासी तोषवावे | सगट बरेपण राखावे | कोण्हीयेकासी ||१९-२-१६ ||

जगामध्ये जगमित्र | जिव्हेपाशी आहे सूत्र | कोठेतर्ही सत्पात्र | शोधून काढावे ||१९-२-१९ ||

धूर्तपणे सकळ जाणावे | अंतरी अंतर बाणावे | समजल्याविण सिणावे | कासयासी ||१९-२-२० ||

प्रसंग ओळखावा ,त्यामुळे फार लोकांशी हुज्जत घालू नये,कारण आपले म्हणणे खरे असूनही लोकांना पटत नाही .समाजात बदनामी होते . भ्रष्ट लोकांमध्ये बसू नये ,कोणावर खोटे आरोप करू नये .दु:खी लोकांचे दु:ख दूर करावे .सभेत बसू नये .यात्रा अनुश्ठानांच्या उद्यापनांना जाउ नये कारण त्याने जीवनात मिंधेपणा येतो .

आपल्या अंगचे उत्तम गुण प्रगट करावे .सज्जन लोकांशी स्नेह जोडून आपल्या उपासनेला शोभेल असे बोलावे .सरसगट सगळ्या लोकांशी चांगले संबंध ठेवावे .आपल्याकडे आलेल्या लोकांमध्ये श्रेष्ठ कनिष्ठ असे भेद करू नये .सगळ्यांचे अंत:करण शांत करावे . सूर्यास्त झाल्यावर उगाच कोठेतरी जाउ नये .

जगात जगमित्र बनायचे असेल तर त्याचे वर्म आपल्या जिभेजवळ आहे .आपले बोलणे जितके गोड ,तितके लोक आपल्या जवळ येतात .कोठेही गेले तरी उत्तम माणसे शोधून काढावी .कथा होत असेल तर सामान्य माणसासारखे दूर् बसावे .

श्रवण सर्वात उत्तम .श्रवणा पेक्षा मनन श्रेष्ठ असते .मननाने लोकांचे समाधान करता येते .दुस-याचे अंत:करण समजून असावे .असे अनेक गुण लोकनेत्यात असावे असे श्री समर्थ १९-२ या समासात सांगतात .

ग्रंथ कसा लिहावा ?

श्री समर्थांचे मठ म्हणजे विद्यापीठेच होती .त्यांच्या या मठांमध्ये अनेक ग्रंथाच्या नकली शिष्य करत असत .त्यांना समर्थांनी द १९ स १ मध्ये ग्रंथ कसा लिहावा या विषयी मार्गदर्शन केले आहे .ते आजही उपयोगी पडणारे आहे .

ब्राह्मणे बाळबोध अक्षर | घडसून करावे सुंदर | ते देखताची चतुर | समाधान पावती ||१९-१-१ ||

वाटोळे सरळे मोकळे | वोतले मसीचे काळे | कुळकुळीत वळी चालिल्या ढाले | मुक्तमाळा जैशा || १९-१-२ ||

अक्षरमात्र तितुके नीट | नेमस्त पैस काणे नीट | आडव्या मात्रा त्या हि नीट | आर्कुली वेलांट्या ||१९-१-३ ||

पहिले अक्षर जे काढिले | ग्रंथ संपेतो पाहात गेले | एका टाकेची लिहिले | ऐसे वाटे ||१९-१-४ ||

अक्षराचे काळेपण | टाकांचे ठोसरपण |तैसेची वळण वांकाण | सारखेची ||१९-१-५ ||

वोळीस वोळ लागेना | आर्कुली मात्रा भेदिना | खालीले वोळीस स्पर्षेना | अथवा लम्बाक्षर ||१९-१-६ ||

पान शिशाने रेखाटावे | त्यावरी नेमकचि लिहावे | दुरी जवळी न व्हावे | अंतर वोळीचे ||१९-१७ ||

कोठे शोधासी अडेना | चुकी पाहातां सापडेना | गरज केली हे घडेना | लेखकापासूनी ||१९-१-८ ||

श्रीसमर्थ म्हणतात :ब्राम्ह्णाने बाळबोध अक्षर घोटून सुंदर करावे .ते अक्षर पाहून सर्वांना आनंद व्हावा .अक्षर वाटोळे ,मोकळे ,सरळ असावे . काळ्या शाईने काळे कुळकुळीत असावे .मोत्यांच्या माळांसारख्या ओळी असाव्या ,प्रत्येक अक्षर नीट लिहिलेले असावे .प्रत्येक शब्दातील अंतर सारखे असावे .काने ,आडव्या मात्रा ,नीट असाव्या .रफार व वेलांट्या नीट असाव्या .ग्रंथ आरंभ करताना जे अक्षराचे वळण असेल तेच ग्रंथाच्या शेवटी असावे .ग्रंथ जणू काही एकाच टाकाने लिहिला आहे असे वाटावे .

ग्रंथाच्या अक्षरांचा काळेपणा ,टाकाचा टणकपणा ,अक्षरांची वळणे ,वाकणे आरंभापासून शेवट पर्यंत सारखी असावी .ओळीला ओळ लागू नये .रफाराने मात्रे छेदू नयेत .अक्षरांचा खालच्या ओळीला स्पर्श करू नये .अक्षर लांबट असू नये .शिसाने पानावर रेघा मारून त्यावर ठरलेली शब्द संख्या लिहावी .सर्व ओळीतले अंतर सारखे असावे .लिहिण्यात चूक सापडू नये .लहान वयात जपून लिहावे .आपण लिहिलेले पाहण्याचा लोकांना मोह होईल असे लिहावे ..अक्षर मध्यम आकाराचे असावे .लिहिलेल्या मजकुराच्या भोवती मोकळी जागा ठेवावी . मध्ये छान ,स्पष्ट ,ठसठशीत लिहावे .कालांतराने कागद झडला तरी अक्षरे सुरक्षित राहतील .ग्रंथ जपून लिहावा . कोणी लिहिला आहे ,त्याला पाहण्याची लोकांना उत्सुकता वाटावी ,असा सुंदर ग्रंथ लिहावा .

श्रवण का करावे ?

श्रवणाचे महत्व काय ?

दृश्याचे किंवा अदृश्य सूक्ष्म आत्म्याचे ज्ञान प्राप्त करून घ्यायचे असेल तर श्रवण करावे लागते .श्रवणासाठी मन व शरीर दोन्ही तयार लागतात .मनाची एकाग्रता व शरीराचे स्वास्थ्य दोन्ही लागते .या दोन्ही गोष्टी नसतील तर श्रवण नीट होत नाही .

एकाग्र चित्ताने होणारे श्रवण व त्यावरील चिंतन परमार्थ साधना होते .पण यात कसा अडथळा येतो ते द १८-१० या समासात समर्थ सांगतात .

श्रवण म्हणिजे ऐकावे | मनन म्हणिजे मनी धरावे | येणे उपाये स्वभावे | त्रैलोक्य चाले ||१८-१०-८ ||

श्रवण म्हणजे ऐकणे .मनन म्हणजे मनात धरणे .मनन म्हणजे धारणा .श्रवण व मननानेच या त्रेलोक्यामध्येच ज्ञान व्यवहार चालला आहे .उत्तम श्रवण घडण्यासाठी शरीर व मन तत्पर नसतील तर कोणत्या अडचणी येतात त्याचे वर्णन समर्थ करतात .

श्रवणी लोक बैसले | बोलतां बोलतां येकाग्र जाले | त्याउपरी जे नूतन आले | ते येकाग्र नव्हेती ||१८-१०-१० ||

मनुष्य बाहेर हिंडोनी आले | नाना प्रकारीचे ऐकिले | उदंड गलबलू लागले | उगे असेना ||१८-१० -११ ||

जेव्हा वक्ता बोलत असतो तेव्हा श्रोते रंगून जातात,एकाग्र होतात ,पण उशीरा येणारे श्रोते एकाग्रतेचा भंग करतात .लोकांनी अनेकांची प्रवचने ऐकलेली असतात .फार ऐकल्याने श्रोता गोंधळतो .नक्की खरे कोणते याचा संभ्रम होतो .एकां जागी बसून ,दाटीवाटीत बसून शरीर अवघडते .झोप यायला लागते .,जांभया यायला लागतात .

एखादा मन एकाग्र करून श्रवणाला बसला ,तरी त्याने ऐकलेलेच वक्ता सांगत असतो .त्यामुळे त्याचे लक्ष उडते .

तत्पर केले शरीर | परी मनामध्ये आणिक विचार | कल्पना कल्पि तो विस्तार |किती म्हणून सांगावा ||१८-१०-१५ ||

जे जे काही श्रवणी पडिले | तितुके समजोन विवरले | तरीच काही सार्थक जाले | निरूपणी ||१८-१०-१६ ||

शरीर आवरून श्रवणाला बसले तरी श्रवणात मन लागत नाही .दुसरेच विचार मनात येतात .एकामागून एक कल्पना येत असतात .जे जे काही आपण ऐकतो ,त्याचे आपण मनन केले तरच निरुपणाने सार्थक झाले असे म्हणावे लागते ..

निरूपणी येउन बैसला | परी तो उदंड जेऊनि आला | बैसताच कासावीस जाला |तृषाकांत ||१८-१०-१८ ||

आधी उदक आणविले | घळघळा उदंड घेतले |तेणे मळमळू लागले | उठोन गेला || १८-१०-१९ ||

कर्पट ढेंकर उचक्या देती | वारा सरतां मोठी फजिती | क्षणक्षण उठोनी जाती | लघुशंकेसी || १८-१०-२० ||

दिशेने कासावीस केला | आवघेची सांडून धाविला | निरुपण प्रसंगी निघोन गेला | अखंड ऐसा || १८-१०-२१ ||

खूप जेउन माणसे निरुपणाला बसतात .मग त्यांना तहान लागते ,मळमळते .मग उठून जावे लागते .कर्पट ढेकरा येतात .उचक्या येतात .मोठ्याने वारा सुटून फजिती होते ।मग तो निरुपण चालू झाले की उठून जातो ।मध्येच शौच्यास लागल्याने अस्वस्थ होतो ,श्रवण होत नाही .सगळे सोडून निघून जातो .पोटात कळ येते ,पाठीत उसण भरते सांधे धरतात .,पायाच्या बोटात चिखल्या होतात .बसायच्या जागी पुळी होते .अशा अनेक गोष्टींनी माणूस निरुपणाला बसू शकत नाही .काम वासनेने लडबडलेले लोक स्त्रीयांकडेच बघत बसतात .एखादा चोर श्रोत्यांची पादत्राणे चोरून नेतो .

काही लोक श्रावणाला बसून आपापसात बोलतात .वक्त्याला कमीपणा देउन आपले श्रेष्ठत्व दाखविण्यासाठी विद्वान श्रोते बोलत राहतात .

ह्या सर्व गोष्टींनी श्रवण साधत नाही .म्हणून समर्थ सांगतात : आपले मन आपणच आवरायला हवे .कारण एकाग्र चित्ताने श्रवण आणि त्यावरील चिंतन हाच परमार्थ साधण्याचा राजमार्ग आहे .

Thursday, August 18, 2011

खरा देव कोणता ?

३३ कोटी देव मानणा-या हिंदू धर्मात खरा देव कोणता ,त्याला कसे शोधायचे याविषयी संभ्रम आहेत .श्रीसमर्थ या विषयी मार्गदर्शन करतात .

देवाचा ठावचि लागेना | येक देव नेमस्त कळेना | बहुत देवी अनुमानेना | येक देव ||१८-८-१ ||

देव कोणता ते नक्की कळत नाही .अनेक देवांमधून मुख्य देव कोणता ते कळत नाही .तीर्थक्षेत्रात देवाची मूर्ती पाहिली की तशीच मूर्ती पाषाणाची ,धातूची ,चित्ररूपाने केली जाते .तीर्थक्षेत्रातील मूर्ती कोठून आली असा विचार केला तर आपण अवतारांपर्यंत पोहोचतो .प्रभू श्रीराम ,भगवान श्रीकृष्ण हे देवांचे अवतार ! त्यांनी देह धारण केले .कार्य केले आणि निजाधामाने गेले .पण अवतारांची मूळ शोधू लागलो तर ब्रह्मा ,विष्णू ,महेश या त्रिगुणांचे स्वामी असलेल्या देवांपर्यंत विचार करावा लागतो .ह्या देवांना कोणी निर्माण केले याचा विचार केला ,तर लक्षात येते की या देवांवर अंतरात्म्याची सत्ता चालते .तो खरा कर्ता व भोक्ता असतो .

तींही देवांस ज्याची सत्ता | तो अंतरात्माचि तत्वता | कर्ता भोक्ता तत्वता |प्रत्यक्ष आहे || १८-८-८ ||

अंतरात्मा कोण ? याचा विचार केला तर माणसातले चैतन्य ,माणसातील शुध्द जाणीव म्हणजे अंतरात्मा ! परब्रह्माचा विचार केला तर तीन पाया-यां मध्ये करावा लागतो .आत्मा ,अंतरात्मा ,परमात्मा .आपल्या देहात जो वास करतो तो आत्मा ,विश्वात ,चराचरात वास करतो तो अंतरात्मा ,विश्वाला पुरून उरतो तो परमात्मा .विश्वात असणा-या असंख्य जीवप्राण्यांना चालवतो तो अंतरात्मा ..

तो अंतरात्मा सकळांचा | देवदानव मानवांचा | चत्वार खाणी चत्वार वाणींचा | प्रवर्तकु || ११-८-३ ||

सर्व प्राण्यांच्या देहात तोच वास करतो .देव दानव मानव चारी खाणी ,चारी वाणी ,या सर्वांचा प्रवर्तक अंतरात्मा आहे .तोच प्राण्यांच्या देहात वास करतो .निरनिराळ्या तऱ्हेने वागायला प्रेरणा देतो .

तो अंतर्देव चुकती | धावा घेउन तीर्था जाती | प्राणी बापुडे कष्टती | देवास नेणता || १८-८-१० ||

अशा आंतर्देवाला लोक मुकतात ,तीर्थाकडे धाव घेतात .खरा देव त्यांना भेटत नाही .मग कळते की तीर्थात धोंडा पाणी याशिवाय दुसरे कांहीच नाही . वणवण हिंडून काही उपयोग नाही .मग सत्संगाकडे वळतात .

मग विचारती अंत:करणी | जेथे तेथे धोंडा पाणी | उगेची वणवण हिंडोनी | काय होते || १८-८-१२ ||

ऐसा ज्यासी विचार कळला | तेणे सत्संग धरिला | सत्संगे देव सापडला | बहुत जनासी ||१८-८-१३ ||

ऐसी हे विचाराची कामे | विवेके जाणतील नेमे | अविवेकी भुलले भ्रमे | त्यांसी हे कळेना || १८-८-१४ ||

सत्संग करताना ज्यांच्याशी संग करायचा आहे त्यांच्या मनाचा वेध घेणे आवश्यक ज्यांना आपण सद्गुरू मानणार आहोत तो खरोखरच सद्गुरू आहे का हे तपासून पाहाणे आवश्यक आहे. विवेक न पाहता श्रद्धा ठेवली जाते ती एक प्रकारे अश्रध्दाच असते असे समर्थ म्हणतात .सद्गुरुवचन पाळणे हाच परमार्थ असतो .त्यामुळे सद्गुरू विवेकाने अंतर्यामी पाहायला शिकतात .आणि निर्मळ अशा ब्रह्मापर्यंत पोहोचवतात .

सगुणाची उपासना कशासाठी ?

परब्रह्मापर्यंत पोचायचे म्हणजे दृश्य ,सगुण ओलांडून सूक्ष्मात जायचे .आपल्याला देहबुद्धी असते .म्हणजे आपण सगुण असतो .सगुण सगुणाचीच उपासना करू शकतो .

कर्मावेगळे न व्हावे | तरी देवास कासया भजावे | विवेकी जाणती स्वभावे | मूर्ख नेणे || १८-८-२१ ||

काही अनुमानले विचारे | देव आहे जगदांतरे | सगुणाकरितां निर्धारे | निर्गुण पाविजे || १८-८ २२ ||

सगुण पाहातां मुळास गेला | सहजची निर्गुण पावला | संगत्यागे मोकळा जाला | वस्तुरूप || १८-८-२३ ||

परमेश्वरी अनुसंधान | लाविता होईजे पावन | मुख्य ज्ञानेचि विज्ञान | पाविजेते ||१८-८ -२४ ||

सगुणोपासना करून मी पणा क्षीण होतो .मी पणा क्षीण झाला की निर्गुणात प्रवेश करता येतो .निर्गुणाची प्राप्ती निश्चित होते .नामरूपात्मक सगुणाचा शोध घेत गेले की उपासकाला मूळमायेपर्यंत पोहोचता येते .उपासनेने मी पणा संपूर्ण नाहीसा होतो .मी पणा नाहीसा होणे म्हणजे संगत्याग ! संगत्यागाने तो मोकळा होतो ,ब्रह्मरूप होतो .म्हणून अंतरात्म्याचे अखंड अनुसंधान लावायला समर्थ सांगतात .अखंड अनुसंधानाने मनुष्य पावन होतो .आत्मज्ञानी होतो .अनुसंधान म्हणजे भगवंतावाचून अन्य स्मरण न उरणे .त्यासाठी अंत:करण एकाग्र करून विवेक करायला हवा .नित्यानित्यविवेकाचे श्रवण करायला हवे म्हणूनच सगुणोपासना हवी .




करंट लक्षण

करंटा कोण ?

मनुष्य भाग्यहीन किंवा करंटा का होतो ?

उत्तम लक्षणे सांगितल्यावर श्रीसमर्थांनी करंट्याची लक्षणे सांगितली .समर्थ म्हणतात :

जनाचा लालची स्वभाव | आरंभीच म्हणती देव | म्हणिजे मला काही देव | ऐसी वासना || १८-७-१ ||

सामान्य जनांचा स्वभाव लालची असतो .देवांनी मला काही द्यावे या हेतूने ते देव हा शब्द उच्चारतात .त्यांची देवावर भक्ती नसते .पण देव आपल्यावर प्रसन्न व्हावा ,त्याने आपल्याला पाहिजे ते द्यावे अशी अपेक्षा करतात .

कष्टेवीण फळ नाही | कष्टेवीण राज्य नाही | केल्याविण होत नाही | साध्य जनी ||१८-७-३ ||

आळसे काम नासते | हे तो प्रत्ययास येते | कष्टाकडे चुकाविते |हीन जन ||१८-७-४ |

कष्टाशिवाय फळ मिळत नाही .राज्य मिळत नाही .कोणतीच गोष्ट मिळत नाही .पण लोक आळशी असतात .आळशीपणाने कार्य सिद्धीला जात नाही .तरी हीन प्रतिचे लोक कष्ट करत नाहीत .

देवाचे कर्तृत्व आणि देव | कळला पाहिजे अभिप्राव | कळल्याविण कितेक जीव |उगेच बोलती ||

१८-७-१४ ||

उगेच बोलती मूर्खपणे | शाहाणपण वाढाया कारणे | तृप्तीवीण उपाव करणे | ऐसे जाले ||१८-७-१५ ||

जेंही उदंड कष्ट केले | ते भाग्य भोगून ठेले | येर ते बोलतचि राहिले | करंटे जन ||१८-७-१६ ||

करंट्याचे उत्तम लक्षण | समजोन जाती विचक्षण | भल्याचे उत्तम लक्षण | करंट्यास कळेना ||१८-७-१७ ||

त्याची पैसावली कुबुद्धी | तेथे कैचीं असेल शुद्धी | कुबुद्धी तेचि सुबुद्धी | ऐसी वाटे ||१८-७-१८ ||

मनुष्य शुद्धीस सांडावे | त्याचे काय खरे मानावे | जेथे विचाराच्या नावे |शून्याकार ||१८-७-१९ ||

देवाचे स्वरूप आणि देवाचे कर्तुत्व समजावून न घेता लोक बोलतात .आपला शहाणपणा दाखविण्याकरितां देवाबद्दल व त्याच्या कर्तुत्वपणा बद्दल बोलतात .,ते करंटे असतात .

कष्ट न करता नुसते बडबड करणारे करंटे असतात .कुबुध्दीचे प्राबल्य असलेला ,शुद्धी नसलेला ,कुबुध्दिला अवगुणांना सुबुद्धी ,गुण समजतो तो करंटा असतो .

शुद्धीवर नसलेला ,ज्याचे बोलणे खरे मानता येणार नाही असा ,विचार नसणारा करंटा असतो .

उत्तम पुरुष

शिवरायांचे शब्दचित्र रेखाटणारा समास : उत्तमपुरुष निरुपण [१८-६ ]

शिवरायांचे बहुजन हिताय बहुजन सुखाय असे ब्रीद होते .त्यांनी समाजाच्या जीवन पद्धतीत अमुलाग्र बदल केला .नवीन मूल्ये ,नवीन ध्येये ,नवे कर्तुत्व ,नवे साहस उदयास आणले .समाज गतीमान केला .यालाच श्रीसमर्थ धर्मस्थापना म्हणतात .शिवरायांचे शब्द वर्णनच त्यांनी या १८ -६ या समासात केले आहे .

बरे ईश्वर आहे साभिमानी | विशेष तुळजाभवानी | परंतु विचार पाहोनी | कार्य करणे || १८-६-९ ||

नाना वस्त्रे नाना भूषणे |येणे शरीर श्रुंघारणे | विवेके विचारे राजकारणे | अंतर शृंघारीजे || १८-६-१ ||

वस्त्र आभूषणांनी शरीर शोभिवंत होते .शरीर नुसते शोभिवंत असून चालत नाही .तर विवेक ,विचार ,राजकारण यांनी अंतर्याम शोभिवंत करावे लागते . अंतर्मन शुध्द असावे लागते ,विवेकी विचारी असावे लागते तरच ती व्यक्ती न्यायाने राजकारण करू शकते .म्हणून उत्तम पुरुषाने काय करावे ते श्रीसमर्थ सांगतात :

सकळ कर्ता तो ईश्वरू | तेणे केला अंगीकारू | तया पुरुषाचा विचारू | विरुळा जाणे || १८-६-१३ ||

न्याय नीती विवेक विचार |नाना प्रसंगप्रकार | परीक्षिणे परांतर |देणे ईश्वराचे || १८-६-१४ ||

माहायेत्न सावधपणे | समईं धारिष्ट धरणे |अद्भूतचि कार्य करणे |देणे ईश्वराचे ||१८-६-१५ ||

येश कीर्ती प्रताप महिमा | उत्तम गुणांसी नाही सीमा | नाही दुसरी उपमा |देणे ईश्वराचे ||१८-६-१६ ||

देव ब्राह्मण आचार विचार | कितेक जनासी आधार | सदा घडे परोपकार | देणे ईश्वराचे ||१८-६-१७ ||

येहलोक परलोक पाहाणे |अखंड सावधपणे राहाणे \बहुत जनाचे साहाणे | देणे ईश्वराचे || १८-६-१८ ||

देवाचा कैपक्ष घेणे | ब्राम्हणाची चिंता वाहाणे | बहु जनासी पाळणे |देणे ईश्वराचे ||१८-६-१९ ||

उत्तम गुणांचा ग्राहिक | तर्क तीक्ष्ण विवेक |धर्मवासना पुण्यश्लोक | देणे ईश्वराचे || १८-६-२१ ||

या सर्व ओव्या श्रीसमर्थांनी शिवारायांसाठीच लिहिल्या आहेत .शिवारायांचेच वर्णन या ओव्यांमध्ये लिहिले आहे असे वाटते .

श्रीसमर्थ म्हणतात : एक गोष्ट चांगली आहे की परमेश्वराला आपला अभिमान आहे .त्याने आपल्याला आपले म्हटले आहे .तुळजाभवानीची आपल्यावर विशेष कृपा आहे .ईश्वर खरा कर्ता आहे .ईश्वर ज्याचा अंगीकार करतो ,ज्याच्यावर कृपा करतो ,त्या पुरुषाचे जीवन एखाद्याला कळते .न्याय ,नीती ,विवेक ,विवेक ,अनेक प्रसंगांना तोंड देणे ,दुस-याच्या अंत:करणाची बरोबर परीक्षा होणे या गोष्टी ज्या पुरुषाच्या ठिकाणी आढळतात ,त्याच्यावर ईश्वराची कृपा झालेली असते .खबरदारीने केलेला मोठा प्रयत्न ,कठीण प्रसंगी धरलेला मोठा धीर ,अद्भूत कार्ये घडवून आणणे ही ईश्वरी कृपेची लक्षणे आहेत .ज्याच्या यश कीर्ती ,प्रताप महिमा ,उत्तम गुणांना सीमा राहत नाही त्याच्यावर ईश्वरी कृपा झालेली असते .

जो देव ब्राह्मण यांना मानतो ,आचार विचार सांभाळतो ,पुष्कळ लोकांना आधार देतो ,ज्यांच्या हातून परोपकार घडतो ,त्याच्यावर ईश्वरी कृपा झालेली असते .

ज्याचे प्रपंच व परमार्थाकडे योग्य लक्ष असते ,जो सावधपणे राहतो ,पुष्कळांचे पुष्कळ सोसतो , त्याच्यावर ईश्वराची कृपा असते .

धर्मस्थापना करणारे पुरुष ईश्वराचे अवतार असतात .

उत्तम गुणांचा चाहता असणारा ,तीव्र बुद्धी असणारा ,विवेकशक्ती असणारा ,शुभवासना असणारा ,अमाप पुण्यकर्म करणारा ,ईश्वरी कृपेचे फळ असतो .

हे सर्व वर्णन शिवरायांना तंतोतंत लागू पडते .समासाच्या शेवटी समर्थ म्हणतात :

सकळ गुणांमध्ये सार | तजविजा विवेक विचार | जेणे पाविजे पैलपार | अरत्रपरत्रींचा ||१८-६-२२ ||

विवेक ,विचार ,योजना या सर्व गुणांचे सार आहे .त्यानेच प्रपंच व परमार्थ [अरत्र व परत्र ] दोन्ही नीट पार पडतात .

मानव देह

मानव देहाने काय काय साधते ?

माणसाने त्याच्या देह वं बुद्धी यांच्या संयोगाने ,अफाट सामर्थ्याने अनेक चांगल्या वाईट गोष्टी केल्या .मानव देहाने गणेश पूजन ,शारदा वंदन करता येते .मानव देहाने गुरु संत सज्जन ,श्रोते असतात .कवित्व करता येते ,अध्ययन अध्यापन करता येते .अनेक विद्यांचा अभ्यास करता येतो .ग्रंथ लेखन करता येते .मानव देहातच महाज्ञानी ,सिद्ध ,साधू मुनी होतात ..मानव देहातच तीर्थाटन करता येते .श्रवण मनन करता येते .मुख्य परमात्मा आपलासा करता येतो .कर्ममार्ग ,उपासनामार्ग ,ज्ञानमार्ग आचरणात आणता येतो .योगी ,विरक्त ,तपस्वी देहाने अनेक कष्ट घेतात .देहातूनच आत्मा प्रगट होतो .इहलोक ,परलोकात सार्थक होते .पुरश्चरणे ,अनुष्ठाने ,गोरांजने ,धूम्रपाने ,शीतोष्ण ,पंचाग्नीसाधने ,ही सारी देहाने होतात .देहानेच तो पुण्यशील होतो ,पापी होतो .स्वैराचारी ,सदाचारी होतो .देहानेच अवतार होतात .अनेक बंड पाखंडे होतात .विषयभोग घेता येतात .विषयांचा त्यागही करता येतो .देहालाच रोग होतात ,रोग बरेही होतात .देहानेच नवविधा भक्ती करता येते .चारी मुक्ती साधता येतात .दानधर्म करता येतो .अनेक रहस्य उलगडतात .अनेक वस्तू प्राप्त करून घेता येतात .देहानेच मनुष्य वाया जातो ,किंवा धन्य होतो .

देहानेच कला शिकता येतात .देहानेच भक्तीमार्गाचा जिव्हाळा उत्पन्न होतो .सन्मार्गाची साधने साध्य होतात .बंधने तुटतात .आत्मनिवेदन भक्ती साधते .मोक्ष मिळतो .देहानेच कीर्ती मिळते ,अपकीर्तीही होते .अनेक भ्रम ,अनेक मोह उत्पन्न होतात .अति उत्तम पदांचा उपभोग घेता येतो .देह परमार्थाचे तारू आहे .अनेक गुणांचे आश्रयस्थान आहे .

देहानेच अनेक कला शिकता येतात .अंतर्यामी वास करणारी जीवनकला देहानेच मिळते .

आत्म्याकरिता देहे जाला | देह्याकरिता आत्मा लागला | उभययोगे उदंड चालिला | कार्यभाग || १८-४-३२ ||

आत्मा धारण करण्यासाठीच देह जन्मतो .देहानेच आत्मा तागतो ,राहू शकतो .देह आणि आत्मा या दोघांच्या संयोगाने जगात मोठे क्कार्य घडते .गुप्तपणे ,चोरून आप्पण काही केले तर ते अंतरात्म्याला कळते .सगळे कर्तुत्व अन्तरात्म्याचेच आहे

देहामध्ये आत्मा असतो |देहे पूजिता आत्मा तोषतो | देहे पिडीता ,आत्मा क्षोभतो | प्रत्यक्ष आता || १८-४ ३४ ||

आत्मा देहात राहतो .देहाची पूजा केली की आत्मा संतोष पावतो .देहाला दु:ख दिले की आत्मा क्षोभ पावतो .देहाच्या अभावी आत्म्याची पूजा होत नाही ,म्हणजे देह आत्म्याशिवाय आणि आत्मा देहाशिवाय काही करू शकत नाही .

Wednesday, August 10, 2011

जानता कोण ?

जाणता कोण ? त्याच्या कडून काय शिकावे ?

जाणता येक अंतरात्मा | त्याचा काये सांगावा महिमा | विद्या कळागुणसीमा |कोणे करावी ||१८-२-२३ ||

अंतरात्मा खरा जाणता असतो ।त्याला जो ओळखतो तो जाणता होतो .तोच आत्मज्ञानी असतो .जाणता पुरुष होतो .त्याच्या कडून काही शिकण्यासाठी त्याची संगत धरावी .त्याची सेवा करावी .त्याची सद्बुद्धी घ्यावी .सद्बुद्धी म्हणजे ज्ञान दृष्टीने अंतरात्मा पाहण्याची बुद्धीची स्थिती . बुद्धीची ही स्थिती येण्यासाठी जाणता विचार कसा करतो ते पाहावे ,त्याच्या संगतीत भजन करून ,दुस-यासाठी झिजून श्रवण ,मनन करून मनाला प्रसन्न करावे । समर्थ म्हणतात :

जाणता बोलेल तसे बोलावे | जाणता सांगेल तैसे चालावे | जाणत्याचे ध्यान घ्यावे | नाना प्रकारी || १८-२-९ ||

जाणता बोलतो तसे बोलायला शिकावे ।तो ध्यान करतो तसे ध्यान करायला शिकावे ।जाणत्यावर जसे प्रसंग येतात तेव्हा तो कसा वागतो ते पहावे .जाणता कशा युक्तीने वागतो ते पहावे .तो पेच कसे घालतो ते पहावे .तो लोकांना कसे खुश ठेवतो ते पहावे .

जाणत्याचा साक्षेप घ्यावा | जाणत्याचा तर्क जाणावा | जाणत्याचा उल्लेख समजावा | न बोलतांचि || १८-२ १३ ||

जाणत्याचा प्रयत्न करण्याचा स्वभाव घ्यावा .त्याची विचारपध्दती समजावून घ्यावी .त्याच्या शब्दांवरून त्याच्या बोलण्याचा मतितार्थ समजावून घ्यावा .त्याचे धूर्तपण ,राजकारण ,निरूपण ऐकावे .त्याची मधुर वचने लक्षात ठेवावी .

जाणत्याची तीक्षणता | जाणत्याची सहिष्णता | जाणत्याची उदारता | समजोन घ्यावी ||१८-२-१७ ||

जाणत्याची तीक्ष्णबुद्धी ,त्याची सहनशीलता ,त्याची उदारता समजावून घ्यावी .त्यातून आपल्याला त्याच्या अनेक कल्पना ,त्याची दीर्घ सूचना ,विवंचना समजतात .तो आपला काळ सार्थकी कसा लावतो ,अध्यात्माचा विवेक कसा करतो ,तो भक्तीमार्गाने कसा जातो ,तो त्याचे वैराग्य कसे जपतो ,ते समजावून घेता येते .

जाणत्याचे पाहावे ज्ञान | जाणत्याचे सिकावे ध्यान | जाणत्याचे सूक्ष्म चिन्ह | समजोन घ्यावे || १८-२-२१ ||

जाणत्याचे अलिप्तपण | जाणत्याचे विदेहलक्षण | जाणत्याचे ब्रह्मविवरण | समजोन घ्यावे || १८-२-२२ ||

जाणत्याचे ज्ञान पहावे ,तो ध्यान कसे करतो ते शिकावे ,त्याच्या ज्या सूक्ष्म खुणा आहेत त्या समजावून घ्याव्या .त्याचा अलिप्तपणा कसा आहे, त्याचा विदेहीपणा कसा आहे ,म्हणजे त्याची देहबुद्धी नष्ट झालेली कशी दिसते याचे निरीक्षण करावे .

खरा जाणता कोण याचे उत्तर समर्थ आत्ता देतात ।

जाणता येक अंतरात्मा | त्याचा काये सांगावा महिमा | विद्याकळागुणसीमा | कोणे करावी ||१८-२-२३ ||

अंतरात्मा खरा जाणता आहे .त्याचा महिमा सांगता येत नाही .तो सत्य ,ज्ञानमय ,अनंत आहे त्याच्या सत्तेनेच जग चालते .त्याला जो ओळखतो तोच जाणता होतो .

ध्यान धरीना तो अभक्त | ध्यान करील तो भक्त | संसारापासुनी मुक्त | भक्तांस करी || १८-२२९ ||

उपासने सेवटी | देवां भक्तां अखंड भेटी | अनुभवी जाणेल गोष्टी |प्रत्ययाची ||१८-२-३० ||

अंतरात्मा जाणून घेउन जाणता बनायचे असेल तर अंतरात्म्याचे अखंड ध्यान लावावे लागते .त्याचे अखंड ध्यान लागले तरच साधक भक्त होतो नाहीतर अभक्त होतो .भक्ताला अंतरात्मा संसारापासून मोकळा करतो .आणि देवाची आणि भक्ताची अखंड भेटी होते .

शरीरातील पंचमहाभूते

स्थूल शरीर कशाचे बनलेले असते ?

स्थूल शरीर पंच महाभूतांचे बनलेले असते .पंचमहाभूते आहेत पृथ्वी ,आप तेज ,वायू ,आकाश .

अस्थी मांस त्वचा नाडी रोम | हे पाचही पृथ्वीचे गुणधर्म | प्रत्यक्ष शरीरी हे वर्म | शोधून पहावे || १७-९-१२ ||

शुक्लीत श्रोणीत लाळ मूत्र स्वेद | हे आपाचे पंचक भेद | तत्वे समजोन विषद |करून घावी ||१७-९-१३ ||

क्षुधा तृषा आलस्य निद्रा मैथून | हे पांचही तेजाचे गुण | या तत्वांचे निरुपण |केलेची करावे ||१७-८-१४ ||

चळण वळण प्रासारण | निरोध आणि आकोचन | हे पाचही वायोचे गुण | श्रोती जाणावे ||१७-९-१५ ||

काम क्रोध शोक मोहो भये | हा आकाशाचा परियाये |हे विवरल्याविण काये |समजो जाणे ||१७-९-१६ ||

आपल्या शरीरात अस्थी ,त्वचा ,मांस ,नाडी ,रोम यातून पृथ्वी तत्व दाखवले जाते .

रेत ,रक्त ,लाळ ,मूत्र ,स्वेद यात पाण्याचा अंश दिसतो .

भूक ,तहान ,आळस ,निद्रा ,मैथून यातून तेजतत्व दिसते .

चलन ,वळण ,प्रासारण ,निरोध आकुंचन यात वायू तत्व दिसते .

काम ,क्रोध ,शोक ,मोह ,भयं यातून आकाश तत्व दिसते .

सूक्ष्म देहात पंचमहाभूते कोणत्या रूपात दिसतात ?

अंत:कर्ण मन बुद्धी चित्त अहंकार | आकाश पंचकाचा विचार | पुढे वायो निरंतर | होऊनि ऐका || १७-९-१८ ||

व्यान समान उदान |प्राण आणि अपान | ऐसे हे पाचही गुण | वायो तत्वांचे ||१७-९-१९||

श्रोत्र त्वचा चक्षु जिव्हा घ्राण | हे पांचही तेजाचे गुण |आता आप सावधान |होऊन ऐका || १७-९-२० ||

वाचा पाणी पाद शिस्न गुद | हे आपाचे गुण प्रसिध्द | आता पृथ्वी विशद | निरोपिली || १७-९-२१ ||

शब्द स्पर्श रूप रस गंध |हे पृथ्वीचे गुण विशद | ऐसे हे पंचवीस तत्वभेद | सूक्ष्म देहाचे ||१७-९-२२ ||

अंत:करण मन बुद्धी चित्त अहंकार हे आकाश पंचक आहे .

व्यान समान उदान अपान प्राण हे वायूचे गुण आहेत .

कान त्वचा डोळे जीभ नाक हे तेजाचे गुण आहेत .

वाणी हात पाय जननेंद्रिय गुद हे पाण्याचे गुण आहेत .

शब्द स्पर्श रूप रस गंध हे पृथ्वीचे गुण आहेत .