
भक्ती मार्ग ईश्वरचरणापर्यंत जाण्यासाठी जीवाला जी वाटचाल करावी लागते तो भक्तीपंथ. मनुष्याचा आत्मज्ञाना पर्यंत जाण्याचा जो मार्ग तो भक्तीपंथ .मी पणाने पाहणारा व जाणणारा द्रष्टा व तू पणाने असणारे दृश्य यात जेव्हा द्रष्टा दृश्यात विलीन होतो तो भक्तिमार्ग . जे जे अनुभवात शिरते त्या सगळ्यात भगवंत पाहता पाहता तो स्वत :त दिसू लागतो तो भक्ती मार्ग ! दशक २ समास ५ मध्ये समर्थ म्हणतात -
काया वाचा आणि मने । पत्रे पुष्पे फळे जीवने । ईश्वरी अर्पूनिया मने । सार्थक करावे । । २ -५ -३७ । ।
यथानुशक्ती दानपुण्य । परी भगवंती अनन्य । सुखदु:खे परी चिंतन । देवाचेचि करावे । । २ -५ -३८ । ।
आदिअन्ती येक देव । मध्येचि लाविली माव । म्हणोनिया पूर्ण भाव । भगवंती असावा । । २ -५ -३९ । ।
कायेने भगवंताची सेवा करायची ,देउळ स्वच्छ ठेवायचे .देह हे देउळच! त्या देहाची केवळ बाह्य स्वच्छता ठेवायची नाही तर मन स्वच्छ ,शुद्ध ठेवायचे . कोणत्याही प्रकारचे वाईट विचार मनात येत असतील तर ते बाजूला सारायचे .मनात फक्त भगवंत आठवायचा ,भगवंताचे चिंतन करायचे ,रामचि कर्ता असा विचार करून शरीराने विहित कर्म करायचे पण कर्तेपणाचा अभिमान धरायचा नाही ,वाचेने केवळ भगवंताचे नाम घ्यायचे ,त्याच्या नामाचा घोष करीत त्यात रंगून जायचे म्हणजे काया वाचा मनाने भगवंताला अर्पण व्हायचे . पत्रे पुष्पे फळे जीवने यातही लक्षणार्थ आहे .पत्र म्हणजे कमल पत्र .आपले जीवन कमलपत्रा प्रमाणे असावे म्हणजे प्रपंचात असून अलिप्त असावे .पुष्प म्हणजे आपल्या जीवनाचे पुष्प ,ते भगवंताला अर्पण करावे .म्हणजे जीवनात केलेली कर्म मी करत नाही ,तर भगवंत माझ्या कडून करवून घेतो आहे असे मानणे .भगवंत कर्म करवून घेणार ,तोच फळ देणार ,तोच भोगणार असा भाव धरणे. तोय म्हणजे जीवन म्हणजे भक्तीचे पाणी ते सुध्दा निर्मळ ते भगवंताला द्यायचे .संस्कृति राजाचा पुत्र रतिदेव उपवासाने इतका कृष झाला होता की त्याला उठण्याचे सामर्थ्य नव्हते .घोटभर पाणी त्याला पिण्यासाठी आणले ,परमेश्वर त्याच्या पुढे अन्त्यज रूपाने आला आणि त्याने पाणी मागितले .रतिदेवाने ते दिले .परमेश्वर त्याला प्रसन्न झाला .त्याची काया तेज :पुंज झाली . पदार्थ कोणताही ,कितीही दिला तरी तो देण्यामागचा भाव महत्वाचा असतो .भाव जितका विशुद्ध तितका परमेश्वर लवकर पावतो .भाव म्हणजे त्याच्या अस्तित्वाविषयी संशय नसला पाहीजे .एक भगवंत सत्य आहे असा द्रुढ निश्चय हवा ,त्यातून भक्ती जन्म घेते .त्यातून भगवंताची अखंड स्मृती रहाते .त्याने भगवंताचे सानिध्य लाभते , तदाकारता राहते .त्यातून स्थिर आत्मीयता निर्माण होते .त्यातून निर्माण झालेली भक्ती अमृतमय ,रसमय ,अनंत आनंदमय असते .यथानुशक्ती दान करायला समर्थ सांगतात .दान करताना 'मी दान केल' हा भाव न ठेवता ते रामचि कर्ता हा भाव ठेवायला सांगतात .या शिवाय ते अनन्य व्हायला सांगतात .अनन्यता कशी असावी हे मुंडक उपनिषदात सांगितले आहे .जसे नद्या सारख्या वहात राहून शेवटी सागराला जावून मिळतात ,तेव्हा त्यांचे नाव रूप त्या सोडून देतात ,तसे माणसाने भगवंताशी अनन्य व्हावे .
अनन्य कसे व्हावे या विषयी गीतेत ११ व्या अध्यायात ५५ व्या श्लोकात सांगितले आहे .
मत्कर्मकृत्मात्परमो मद्भक्त: संड्गवर्जित : । निर्वैर : सर्व भूतेषु य: स मामेति पांडव । । ११ -५५ । ।
मत्कर्म कृत - माझ्यासाठी सर्व कर्म अर्पण कर .'मी कर्म करतो असे म्हणू नकोस .
मत्परमो - ईश्वरपरायण हो .मीच तुझा परम आश्रय आहे व परम गती आहे .माझ्या प्राप्ती करीता तत्पर रहा.
मद्भक्त :-माझा भक्त हो .नवविधा भक्तीचे निष्काम भावाने आचरण कर ।
संड्गवर्जित :- प्रपंचातील ,संसारातील कोणतीही आसक्ती ठेवू नकोस ।
निर्वैर :- या सर्व गोष्टी करणा-याच्या मनात वैर शिल्लक रहात नाही .
माणूस साधारणपणे दु:खात् परमेश्वराला आठवतो .त्याला चांगले दिवस असताना ,सुख असताना परमेश्वर आठवत नाही .म्हणून समर्थ सांगतात की सुखातही परमेश्वर आठवा .
जो भगवद भजनेवीण । जावू नेदी एक क्षण । सर्व काळ अंत :करण । भक्तीरंगी रंगले । । १४ -३ -२४ । ।
भगवद भजनावीण जो एक क्षण ही जावू देत नाही त्याचे अंत:करण भक्तीरंगात रंगून जाते .मीराबाई हरी भजनात इतक्या रंगून जात की राणाने पठविलेला विषाचा प्याला त्या सहज प्यायल्या.भागवत धर्माचे कळस असलेले तुकाराम महाराज म्हणतात - तुटो हे मस्तक ,तुटो हे शरीर । नामाचा गजर सोडू नये । नामाचा गजर करायला तुकाराम महाराजांसारख्या सांसारिक संतानी सांगितले आहे .श्री समर्थ सर्व आश्रमात गृहस्थाश्रम श्रेष्ठ आहे असे म्हणतात .फक्त त्यात स्वधर्माचे आचरण व भूतदया करायला सांगतात .
त्याहिमध्ये अलौकिक । तो हा भक्तिमार्ग । । १४ -७ -६ । । ज्या गृहस्थाश्रमात अलौकिक असा भक्ती मार्ग आढळतो तो हा गृहस्थाश्रम धन्य आहे असे समर्थ म्हणतात .तो धन्य तेव्हा होतो जेव्हा तेथे शरीराने ,वाणीने , प्राणपणाने भगवंतासाठी कष्ट केले जातात .असा भगवंताचा भक्त आतून विरक्त असतो ,अलिप्त असतो .वृती उदासीन असते .अंतर्यामी स्वानुभवाने विवेक जागृत होतो .त्यामुळे आत्मसाक्षात्कार होतो .त्याच्या दर्शनाने लोकांना समाधानाची प्राप्ती होते । असा माणूस ओळखायचा कसा ? -जो उपास्यदेवतेच्या ध्यानात तरी गुंतलेला असतो ,आत्मस्वरूपाच्या अनुसंधानात लीन असतो किंवा श्रवण मनन यात गुंतलेला असतो .आशा माणसाला प्रचितीचे ज्ञान असते .असा प्रचितीने युक्त असलेला भक्त कसा असतो ते दशक ३ समास १ मध्ये समर्थ सांगतात - जो भगवंताचा भक्त । जो जन्मापासूनि मुक्त । ज्ञानाबले विरक्त । सर्व काळ । । ३ -१ -५२ । ।