
ज्ञाने दृश्य मिथ्या झाले । तरी का पाहिजे भजन केले । तेणे काये प्राप्त झाले । मज निरोपावे।।६ -७ -१।।
ज्ञानाहून श्रेष्ठ असेना । तरी पाहिजे का उपासना । उपासनेने जना। काय प्राप्त । । ६ -७ -२ । ।
मुख्य सार ते निर्गुण । तेथे दिसेचिना सगुण । भजन केलियाचा गुण। मज निरोपावा । । ६ -७ -३ । ।
जे समस्त नाशिवंत । त्यासी भजावे किंनिमित्य । सत्य सांडूनी असत्य । कोणे भजावे । । ६ -७ -४ । ।
असत्याचा प्रत्यय आला । तरी मग नेम का लागला । सत्य सांडून गलबला कासया करावा । । ६ -७ -५ । । निर्गुणाने मोक्ष होतो । प्रत्यक्ष प्रत्यया येतो । सगुणे काय देऊ । सांगा स्वामी । । ६ -७ -६ । ।
सगुण नाशिवंत ऐसे सांगता । पुन्हा भजन करावे म्हणता। तरी काशासाठी आतां । भजन करू।६ -७-७। श्रोते समर्थांना विचारतात ,ज्ञानाने दृश्य मिथ्या ठरले ,मग भजन का करायला हवे ?ज्ञानाहून दुसरे काही श्रेष्ठ नाही तर मग ज्ञान प्राप्त झाल्यावर उपासना कशाला करायची ?उपासना केल्याने काय प्राप्त होत? मुख्य सार आहे ते निर्गूण आहे .तेथे सगुण नाही तर मग सगुणाचे भजन केल्याने काय प्राप्त होते ? जे जे दिसते ते ते नाशिवंत असते तर मग भजन का करावे ? निर्गुणाने मोक्ष मिळतो याचा प्रत्यक्ष प्रत्यय येतो ,सगुणामुळे काय मिळते?सगुण नाशिवंत आहे म्हणता आणि पुन्हा भजन करावे असे कसे म्हणता ?
समर्थ उत्तर देतात :गुरू जे सांगेल त्यावर पूर्ण विश्वास ठेऊन त्याप्रमाणे वागणेहे परमार्थाचे मुख्य लक्षण
आहे .गुरुवचन मोडले तर भलतच काहीतरी घडत .श्रोता पुन्हा प्रश्न विचारतो ,सगुण भजन करण्यात हेतू
कोणता ?सगुण उपासनेत साक्षात्कार होतो का ? प्रारब्ध्दात लिहिलेले असते ते पुसले जाते का ?मग सगुणाची उपासना का करायची ?
या सर्व प्रश्नांवर समर्थ आता उत्तर देत आहेत ,
ज्ञानविवेके मिथ्या जाले । परंतु अवघे नाही टाकले। तरी मग भजनेचि काय केले। सांग बापा। ।
६-७ -१८ । ।
'तू आत्मज्ञानाच्या लक्षणांचा विचार कर .आत्मज्ञान झाले तरी ज्ञानी माणसाला सामान्य माणसासारख्या सर्व क्रिया कराव्याच लागतात .त्याला त्याच्या प्राथमिक गरजा भागवाव्याच लागतात .दैनंदिन लोकव्यवहार करावाच लागतो .तसे तुलाही जेवावे लागते ,पाणी प्यावे लागते ,झोपावे लागते ,मलमूत्र त्याग करावे लागते ,आपल्या संबंधित लोकांचे बरे चालावे असे तुला वाटते ,हे सर्व तू करतोस तर सगुणाच्या भजनाने काय केले ?भजन करायला तुला काय त्रास आहे ?
हरिहर ब्रह्मादिक । जे जयाचे आज्ञाधारक । तू येक मानवी रंक । भाजेसिना तरी काय गेले । । ६ -७-२० ।
ब्रह्मा विष्णू महेश हे देव सुध्दा ईश्वराच्या आज्ञेत वागतात तर तू तर एक साधारण मानव आहेस ,तर तू भजन केले तर काय झाले ?
समर्थ स्वत :चा दाखला देतात :
आमचे कुळी रघुनाथ । रघुनाथे आमुचा परमार्थ । जो समर्थांचा ही समर्थ । देवा सोडविता। । ६ -७ -२१ । ।
त्याचे आम्ही सेवकजन । सेवेकरिता जाले ज्ञान । तेथे अभाव धरिता पतन । पाविजेल की । । ६-७-२२ । ।
आमुच्या कुलाचे रघुनाथ दैवत आहे ,श्रीरामाच्या कृपेने आमचा परमार्थ चालतो .रावणाच्या बंदिवासात असलेल्या देवांनाही सोडविले .तो समर्थांचा ही समर्थ आहे .त्या रघुवीरांचा मी सेवक आहे .रघुनाथांच्या सेवेनेच देहबुध्दी जाऊन आत्मबुध्दी आली .त्यावरून तू सगुण भजन करणे सोडू नकोस .सद्गुरु जे सांगतील त्यावर विश्वास ठेव .
असे सांगितल्यावर समर्थ सगुण भजनाने काय त्यांना काय प्राप्त झाले ते सांगतात :
रघुनाथ भजनाने न चळणारे,न संपणारे ,नाहिसे न होणारे ज्ञान मिळते.रघुनाथावर विश्वास असल्याने जे जे चांगले करणे मनात असते ते ते पूर्ण होताना दिसते .विघ्ने आली तरी त्यांचा नाश होतो .म्हणून रघुनाथाला स्मरून केलेले कार्य यशस्वी होते .कारण तेथे देहाभिमान गळून गेलेला असतो. मी कर्ता असा भाव न ठेवता राम [परब्रह्म ] कर्ता हा भाव रहातो .अंहकार मोडतो ,संपूर्ण शरणागत भाव असतो .
जेव्हा कर्ता राम आहे मी नाही असा विचार असतो तेव्हा त्याला सगुण आत्मनिवेदन म्हणतात .तर निर्गुणाशी अनन्यता येते तेव्हा निर्गुण आत्मनिवेदन होते .समर्थ पुन्हा इशारा देतात की 'मी कर्ता 'असे तू म्हणतोस तेव्हा ते कार्य यशस्वी न झाल्यास दु:ख होते .राम कर्ता म्हणतोस तेव्हा यश कीर्ती ,प्रताप प्राप्त होतो .रामभजनाने भक्ती जसजशी भक्ताच्या अंत :करणात स्थिरावते तसतशी भक्ताच्या मनात विवेक जागृती होते .विवेकाने
' देह म्हणजे मी ' हा भाव मावळतो .देह्नुध्दी जाऊन आत्मबुध्द्दी वाढते .देहाने भगवंताचे भजन ,मनाने स्वस्वरूपाचे अनुसंधान अशी स्थिती येते .त्यामुळे दृश्य मिथ्या आहे अशी प्रचिती येते .
No comments:
Post a Comment