
सृष्टीची उभारणी व संहारणी कशी होते असा प्रश्न श्रोत्यांनी विचारल्यावर समर्थ सांगतात :
आकाशापासून वायो होतो । हा तों प्रत्यया येतो । वायोपासून अग्नी जो तो । सावध ऐका। । ११-१-१ । ।
वायोची कठीण घासणी । तेथे निर्माण जाला वन्ही । मंद वायो सीतळ पाणी । तेथुनि जाले। । ११-१-२ । ।
आपापासून जाली पृथ्वी । ते नाना बीजरूप जाणावी।
बीजापासून उत्पत्ति व्हावी । हा स्वभावची आहे । । ११-१-३ । ।
मुळीं सृष्टी कल्पनेची । कल्पना आहे मुळींची । जयेपासून देवत्रयाची काया जाली । । ११-१-४ । ।
निश्चळामध्ये चंचळ । ते ची कल्पना केवळ । अष्टधा प्रकृतीचे मूळ । कल्पनारूप । । ११-१-५ । ।
कल्पना तेची अष्टधा प्रकृती । अष्टधा तेची कल्पनामूर्ती । मूळाग्रापासून उत्पत्ती । अष्टधा जाणावी । । ११-१-६ । ।
पांच भूते तीन गुण । आठ जाली दोनी मिळून । म्हणोनि अष्टधा प्रकृति जाण । बोलिजेते । । ११-१-७ । ।
मुळी कल्पनारूप जाली । पुढे तेचि फाफावली। केवळ जडत्वास आली । सृष्टीरूपे । । ११-१-८ । ।
आकाशापासून वायू निर्माण होतो हा आपल्याला प्रत्यय येतो .वायू मधील कठीण घासणी मुळे अग्नी निर्माण
होतो .मंद वायूपासून पाणी तयार होते .पाणी आळून पृथ्वी तयार होते .पृथ्वीवर अनेक प्रकाराची बीजे साठवलेली असतात .त्या बीजांपासून प्राणी ,वनस्पती तयार होतात .
निर्गुण निराकार ,त्रिगुणातीत परब्रह्मामध्ये जे स्फुरण झाले '-एको हं बहुस्याम ''' मी एक आहे ,अनेक व्हावे '' हे स्फुरण म्हणजे मूळमाया !तिच्यामध्ये तीन गुण निर्माण झाले म्हणून ती गुणमाया झाली .तिच्यापासून
सत्व ,रज,तम हे त्रिगुण निर्माण झाले .या तीनही गुणांचे स्वामी असलेले ब्रह्मा ,विष्णू ,महेश हे देहधारी देव निर्माण झाले .रजोगुणाचा स्वामी ब्रह्मा ,सत्वगुणाचा स्वामी विष्णू ,व तमोगुणाचा स्वामी महेश निर्माण
झाले .तमोगुणापासून पृथ्वी आप तेज वायू आकाश ही पंचमहाभूते निर्माण झाली .पंचमहाभूते व त्रिगुण यापासून अष्टधा प्रकृती निर्माण झाली .मूळात ही मूळमाया ही सूक्ष्म कल्पना ,अष्टधा प्रकृतीच्या रूपाने फाफावली ,विस्तार पावली ,दृश्य विश्व निर्माण झाले .चार खाणी,चार वाणी ,८४ लक्ष जीवयोनी निर्माण झाल्या .
अशा प्रकारे सृष्टीची उभारणी सांगुन झाल्यावर श्रीसमर्थ संहारणी सांगतात :
शत वरुषे अनावृष्टी । तेथे आटेल जीवसृष्टी । ऐशा कल्पांताच्या गोष्टी । शास्त्री निरोपिल्या । । ११-१-१३ । ।
बाराकळी तपे सूर्य । तेणे पृथ्वीची रक्षा होये । मग ते रक्षा विरोन जाये। जळांतरी । । ११-१ -१४ । ।
ते जळ शोषी वैश्वानरू । वन्ही झडपी समीरू । समीर वितुळे निराकारू । जैसे तैसे । । ११-१-१५ । ।
शंभर वर्षे पाऊस न पडल्यामुळे पृथ्वी वरील सर्व जीवांचा नाश होइल .बारा प्रकाराच्या किरणांनी सूर्य तापेल .पृथ्वी जळून राख होइल .राख पाण्यात विरघळेल.अग्नी पाणी शोषेल.अग्नीला वायू विझवेल.वायू नाहीसा
होइल .निराकार ब्रह्म शिल्लक राहील .