
स्वरूपा भरता कल्पना । तेथे कैची उरेल कामना । म्हणोनिया साधूजना । कामचि नाही । । ८ -९ -२४ । । साधूंची ची लक्षणे सांगताना समर्थ सांगतात की साधूच्या कल्पनेमध्ये केवळ स्वस्वरूपच असते त्यामुळे त्याच्या मनात कोणत्याही इच्छा ,कामना ,वासना नसतात .तो निष्काम असतो . कल्पिला विषयो हातींचा जावा । तेणे गुणे क्रोध यावा । साधुजनाचा अक्षय ठेवा । जाणार नाही । । ८ -९ -२५ । । जर एखाद्याला काही मिळावे अशी इच्छा असली आणि ती गोष्ट त्याला मिळाली नाही तर त्याला क्रोध येतो .पण साधूचा अक्षय ठेवा स्वस्वरूप असतो ,आणि हा ठेवा साधूकडून कधीच जात नाही .म्हणून तो क्रोधरहित असतो .त्याला कधी क्रोध येत नाही . म्हणोनि जे क्रोधरहित । जाणती स्वरुप संत । नासिवंत हे पदार्थ । सांडूनिया । । ८ -९ -२६ । । दृश्य पदार्थ पंचभूतिक आहेत ,नाश पावणारे आहेत .याचा ठाम निश्चय साधूच्या मनात असतो .तो या दृश्य वस्तूंना बाजूला सारतो .दृश्य वस्तूची अभिलाषा मनात बाळगत नाही .शाश्वत अशा स्वस्वरूपाला साधू जाणतो .स्वस्वरूपाच्या दर्शनाने आत्मस्वरूप मीच सर्वत्र व्यापून आहे असा त्यांचा अनुभव असतो .मीच सगळीकडे असल्याने माझ्याशिवाय या जगात दुसरे कोणी नाही ,प्रत्येक प्राणीमात्रात मीच व्यापून आहे ,हे विश्वची माझे घर आहे अशी साधूची भूमिका असते ,मग रागवायचे कोणावर ?असा प्रश्न येतो त्यामुळे साधू क्रोधरहित असतो . आपुला आपण स्वानंद । कोणावरी करावा मद । याकारणे वादवेवाद। तुटोनी गेला । । ८-९-२८ । । स्वस्वरूप स्वानंद स्वरुप ,आनंद रूप आहे .आनंदाशिवाय तेथे दुसरे काही नाही .त्या आनंदात साधू रममाण असतो साधू च सर्वत्र व्यापून आहे असा त्याचा अनुभव असल्याने वाद कोणाबरोबर घालणार ?त्यामुळे वादविवादाला त्याच्या जवळ स्थान नसते . साधू स्वरुप निर्विकार । तेथे कैचा तिरस्कार । आपला आपण मत्सर । कोणावरी करावा । । ८ -९ -२९ । । स्वस्वरूप निर्विकार असते .साधू स्वस्वरूपात विलीन झालेला असतो .त्यामुळे साधू निर्विकार असतो .आनंद , दु:ख ,तिरस्कार ,मत्सर हे कोणतेही विकार त्याच्या जवळ नसतात .साधूच सर्वत्र व्यापून असल्याने मत्सर कोणाचा करणार ? जेणे दृश्य केले विसंच । तयास कैसा हो प्रपंच । याकारणे नि :प्रपंच । साधू जाणावा । । ८-९-३२ । । साधूने हे दृश्य मिथ्या आहे याचा ठाम निश्चय केलेला असतो .साधू स्वस्वरूपाकार झालेला असल्याने दृश्य त्याच्या साठी नाहीसे झालेले असते .त्यामुळे त्याला प्रपंच उरत नाही . अवघे ब्रह्मांड त्याचे घर । पंचभूतिक हा जोजार । मिथ्या जाणोंन सत्वर । त्याग केला । । ८ -९ -३३ । । हे अवघे ब्रह्मांड त्याचे घर असल्याने पंचभूतांचा हा गुंता ,विस्तार खोटा आहे हे त्याला कळलेले असते त्यामुळे तो त्याचा त्याग करतो .म्हणूनच त्याला कशाचा ही लोभ नसतो .त्याची वासना फक्त शुध्द स्वरूपाशी असते . दृश्य सांडून नासिवंत । स्वरुप सेविले शाश्वत । याकारणे शोकरहित । साधू जाणावा । । ८ -९ -३५ । । सर्व दृश्य ,प्रपंच नाश पावणारा आहे हे जाणून तो फक्त स्वरूपाची इच्छा धरतो .भौतिक कोणत्याही त्याला इच्छा त्याला रहात नाहीत .म्हणून भौतिकातल्या कोणत्याही गोष्टी त्याला मिळाल्या नाहीत तरी त्याला शोक होत नाही .तो शोक रहित असतो . मोहे झळंबावे मन । तरी ते झाले उन्मन । याकारणे साधुजन । मोहातीत । । ८ -९ -३८ । । मनाचा एक गुणधर्म असा की मन ताबडतोब मोहग्रस्त होते .पण साधूचे मन उन्मन झालेले असते .त्याला मोहाचा विळखा कधीच पडत नाही .कारण त्याचे मन निवृत्त झालेले असते .म्हणून साधू मोहातीत असतो। मोहाच्या पलिकडे गेलेला असतो . साधू वस्तू अद्वये । तेथे कैचे वाटेल भये । परब्रह्म ते निर्भये । तोचि साधू । । ८ -९ -३९ । । साधूने सद्वस्तूशी एकरूपता साधलेली असते .सद्वस्तूच्या ठिकाणी भय नसते त्यामुळे साधू निर्भय असतो . आपण येकला ठाईचा। स्वार्थ करावा कोणाचा । दृश्य नसता स्वार्थाचा । ठावचि नाही । । ८ -९ -४३ । । साधू आपणचि येक। तेथे कैचा दु :ख शोक । दुजेविण अविवेक । येणार नाही । । ८ -९ -४५ । । आशा धारिता परमार्थाची । दुराशा तुटली स्वार्थाची । म्हणोन नैराशता साधुची । वोळखण। । ८ -९ -४६ । । मृदपणे जैसे गगन । तैसे साधूचे लक्षण। याकारणे साधूवचन। कठीण नाही । । ८ -९ -४७ । । स्थिती बाणती स्वरूपाची । चिंता सोडिली देहाची । याकारणे होणाराची । चिंता नसे । । ८ -९ -४९ । । सकळ धर्मांमध्ये धर्म । स्वरूपी राहाणे हा स्वधर्म । हेचि जाणिजे मुख्य वर्म । साधू लक्षणाचे । । ८ -९ -५४ । । साधू सर्वत्र तो एकटाच आहे ,सर्वत्र व्यापून आहे असे जाणतो त्यामुळे त्याला दु :ख नसते ,शोक नसतो .अविवेक नसतो .त्याने परमार्था ची आशा धरलेली असते त्यामुळे त्याच्या कड़े स्वार्थ नसतो .म्हणून कोणताही मोह नसतो ,कोणतीही वस्तू न मिळाल्याने निराशा येत नाही .हीच साधूची ओळखण असते .आकाश जसे मृदु असते तसा साधू मृदु असतो म्हणून तो कधीही कठीण शब्द बोलत नाही .साधू स्वस्वरूपाशी एकरूप झालेला असल्याने तो देहाची चिंता करत नाही .त्यामुळे पुढे काय घडेल याची चिंता तो करत नाही .सगळ्या धर्मात स्वधर्म म्हणजे स्वस्वरूपाशी लीन होऊन राहणे असे साधू मानतो त्यामुळे स्वस्वरूपाशी त्याचे सतत अनुसंधान राखलेले असते .तेच साधू लक्षणाचे वर्म आहे.
No comments:
Post a Comment