Monday, November 29, 2010

अखंड ध्यान म्हणजे काय ?

आपण आपल्या डोळ्याने दुस-याचा डोळा पाहतो .मनाने दुस-याचा मनाचा शोध घेतो .तसेच आपल्या अंतरात्म्याच्या सहाय्याने दुस-याच्यात असलेला अंतरात्मा पाहता येतो .अंतरात्माच सर्व काही घडवून आणत असतो .त्याच्या शिवाय देह काहीच करू शकत नाही .आपण जी हालचाल करतो ,ती हालचालही अंतरात्माच आपल्याकडून करवून घेत असतो .त्यामुळे अंतरात्मा जाणून घेण्यासाठी त्याचे अखंड ध्यान करायला हवे .समर्थ म्हणतात :
अखंड ध्यानाचे लक्षण । अखंड देवाचे स्मरण । याचे कळता विवरण । सहजचि घड़े । । १४-८-२४
सहज सांडून सायास । हाचि कोणी येक दोष । आत्मा सांडून अनात्म्यास । ध्यानी धरती । । १४-८-२५
परि ते धरीताही धरेना । ध्यानी येती वेक्ती नाना । उगेची कष्टती मना । कासाविस करुनी । । १४-८-२६
अखंड ध्यानाचे लक्षण म्हणजे देवाचे अखंड स्मरण ! ध्यान आणि स्मरण यांचा एकमेकांशी घनिष्ठ संबंध आहे .देवाचे सतत स्मरण केले की देवाशी सतत अनुसंधान रहाते .मग ते स्मरणच ध्यान होते .बरेच वेळा मुद्दाम जेव्हा ध्यानाचा प्रयत्न केला जातो तेव्हा ध्यान करणारा मी व ज्याचे ध्यान करायचे तो असे वेगळे होते मग ते ध्यान अनात्म्याचे होते .प्रयत्न करूनही ध्यान टिकत नाही ,कारण ध्यानात अनेक नको त्या गोष्टी येतात ,अनेक व्यक्ती येतात ,मग मन कासाविस होते .एखाद्या मूर्तीचे ध्यान करू लागले तर ती मूर्ती न दिसता वेगळेच दिसते .जे भासायला नको ते भासते .त्यासाठी आपली श्रध्दा नक्की कोठे आहे ते ओळखायला शिकायला हवे .तरच ध्यान साधते ।
ध्यान साधण्यासाठी साधकाचे मन एकाग्र असायला हवे ,एके ठिकाणी गोळा व्हायला हवे .मनात विचारांचा गोँधळ असेल ,अनेक विचार मनात असतील तर ध्यान नीट लागत नाही .समर्थ म्हणतात :
ध्यान धरिते ते कोण । ध्यानी आठवते ते कोण । दोनी मध्ये अनन्य लक्षण । असिले पाहिजे । । १४-८-३८
अनन्य सहजचि आहे । साधक शोधून न पाहे । ज्ञानी तो विवरोन राहे समाधाने १४-८-३९
ध्यान करताना जो ध्यान करतो तो ,ज्याचे ध्यान करायचे आहे तो ,असे दोघे असताना त्यांच्यात समरसता होणे ,त्यांची अखंडता न लोपणे ,दोन्ही अनन्य होणे हे अखंड ध्यानाचे लक्षण आहे .समर्थ म्हणतात ;
ध्यान करणारा व अंतरात्मा दोघेही मुळातच अनन्य आहेत .ही गोष्ट सामान्यांच्या लक्षात येत नाही .परन्तु ज्ञानी मात्र त्याचा शोध घेतो ,दोन्ही एकच असल्याची ,दोन्ही अनन्य असल्याची अनुभूती तो घेतो .म्हणून परंपरागत पध्दतीने ध्यान करणे हे ध्यानाचे लक्षण नसून अवलक्षण आहे .

No comments: