Friday, April 1, 2011

तत्व निरूपण

तत्व निरूपण

श्रोत्यांनी समर्थांना तत्वांबद्दल स्पष्टीकरण करण्याची विनंती केली ,तेव्हा समर्थांनी प्रथम चार वाणी सांगीतल्या .समर्थ म्हणतात :

नाभीपासून उन्मेष वृत्ती | तेची परा जाणिजे श्रोती | ध्वनी रूप पश्यंती | हृदइ वसे ||१७-८-१ ||

कंठा पासून नाद झाला | मध्यमा वाचा बोलिजे त्याला | उच्चार होता अक्षराला | वैखरी बोलिजे ||१७-८-२ ||

नाभी स्थानी परा वाचा | तोचि ठाव अंत:करणाचा |अंत:करण पंचकाचा| निवाडा ऐसा ||१७-८-३ ||

हृदयामधील ध्वनी कंठात येउन नादाचे रूप धारण करतो .त्याला मध्यमा वाणी म्हणतात .जिभेने नादाचा शब्दरूप उच्चार होतो .तेव्हा त्याला वैखरी वाणी म्हणतात .

शारदा ईश्वराची ज्ञानमय महाशक्ती केवल स्फुरण रूप असते .ती ओंकार रूपाने नाभिस्थानी वास करते .तिला परावाणी म्हणतात .ती जाणीव रूप असते .

जाणीव रूप असलेली परावाणी ज्यावेळेस अर्थाचा आकार घेते तेव्हा तिला पश्यन्ति म्हणतात .आपल्या अनुभवात येणा-या वस्तूंचा ,घटनांचा प्रसंगांचा अर्थ ती पहाते म्हणून तिला पश्यंती म्हणतात .तिचे स्थान हृदयात असते .

पश्यंती ने पाहिलेल्या एखाद्या घटनेचा अर्थ जी स्थूल जगत आणि सूक्ष्म अर्थ यांना जोडते तिला मध्यमा म्हणतात .तिचे स्थान कंठात असते .मध्यमेतली भाषा मनातल्या मनात बोलली जाते .आपण मनातल्या मनात जे बोलतो ते मध्यमा वाणीने बोलतो .आपले चिंतन नेहमी मध्यमेत चालते ..

चौथी वाणी वैखरी .ती सूक्ष्म परावाणीला स्थूल व ईद्रीयगोचर रूप देते .मौन भाषा जेव्हा स्वररूपाने शब्द बनून तोंडावाटे बाहेर पडते तेव्हा तिला वैखरी म्हणतात .

वाणी

परा

पश्यति

मध्यमा

वैखरी

स्थान

नाभी

हृदय

कंठ

तोंड

कार्य

स्फुरण रूप

ध्वनी रूप

नादरूप

शब्द रूप

आपण नामसाधना करतो तेव्हा वैखरीने नाम घ्यायला सुरुवात करतो .नामजपात जेव्हा वैखरी वाणी रमते ,तेव्हा नामाची शक्ती जागी होते .त्या शक्तीने भगवंत आहे अशी भावना निर्माण होते .मी देह आहे हे भान कमी कमी व्हायला लागते .देहातून ईद्रीयातून आनंद घेण्याची वासना कमी होते .त्यामुळे नामाला सूक्ष्मता येते .नाम आतल्या आत सहज पणे चालते .तेव्हा ते मध्यमेत चालते .मध्यमा वाणी एकीकडे देहाशी म्हणजे मेंदूशी जोडलेली असते तर दुसरीकडे मन बुद्धीशी जोडलेली असते .मेंदू व मन बुद्धीला ही वाणी जोडते म्हणून तिला मध्यमा म्हणतात .मध्यमे मध्ये जीभेची हालचाल होत नाही .पण स्वर यंत्रात स्फुरण येते .मध्यमेत नाम स्थिर झाले की ते अंत:करणाला व्यापते .अंत:करण व्यापते म्हणजे मनन व निदिध्यास लागतो .मग नाम पश्यंती मध्ये जाते .पश्यंती मध्ये नाम चालू झाले की माणूस ईद्रीय सुखाकडे वळत नाही ..विकार सगळे क्षीण होतात .त्याला फक्त भगवंताची आठवण असते .त्याच्या बद्दलच्या विचारांची ,,कल्पनांची .पश्यंती मध्ये नाम चालू झाले की भगवंता बद्दल प्रेम भावना निर्माण होते .त्यात माणूस स्वत:ला विसरतो .व त्याला भगवंताचे दर्शन होते

अंत:करणपंचक

निर्विकल्प जे स्फुरण | उगेची असता आठवण | ते जाणावे अंत:कर्ण | जाणती कळा ||१७-८-४ ||

अंत:कर्ण आठवले | पुढे होय नव्हेसी गमले | करूं न करूं ऐसे वाटले | तेची मन ||१७-८-५ ||

संकल्प विकल्प तेची मन |जेणे करितां अनुमान | पुढे निश्चयो तो जाण | रूप बुद्धीचे ||१७-८-६ ||

करीनचि अथवा न करी | ऐसा निश्चयोचि करी | तेची बुद्धी हे अंतरी | विवेके जाणावी ||१७-८-७ ||

जो वस्तूचा निश्चये केला | पुढे तेची चिंतू लागला | ते चित्त यथार्थ बलिल्या बोला | यथार्थ मानावे ||१७-८-८ ||

पुढे कार्याचा अभिमान धरणे |हे कार्ये तो अगत्य करणे | ऐस्या कार्यास प्रवर्तणे |तोचि अहंकारू ||१७-- ||

आपण जेव्हा नुसते बसलेले असतो ,तेव्हा एखादी आठवण येते ,एखादी गोष्ट सुचते,ते अंत:करण असते .त्यालाच जाणीव ,जागृती कला म्हणतात .जाणीव जेव्हा स्वच्छ रूपात असते तेव्हा तिला अंत:करण म्हणतात .

आपल्याला जे सहज आठवते ,ती गोष्ट करावी की नाही,ती गोष्ट होईल की नाही अशी स्थिती येते तेव्हा ते मन असते .म्हणजेच संकल्प विकल्प करणारी जाणीव तेच मन

मन एखादी गोष्ट घडेल की नाही ,करावी की नाही असा विचार करताना मी ही गोष्ट करीन किंवा करणार नाही असा निश्चय होतो .तीच बुद्धी असते .

बुद्धीने एखादी गोष्ट करायची असे ठरवले की ती कशी करायची ,काय करायचे असे चिंतन सुरु होते .त्या चिंतनाला चित्त म्हणतात .

एखादी गोष्ट करायची असे ठरवले की हे कार्य मी नक्की चांगले करीन असे म्हणून कामाला सुरुवात करणे याला अहंकार म्हणतात .

ऐसे अंत:कर्ण पंचक |पंचवृत्ती मिळोन एक | कार्यभागे प्रकार पंचक | वेगळाले ||१७-८-१० ||

मूळ अंत:करण एकच आहे .पण निरनिराळ्या कार्यामुळे एकाच अंत:करणाची पांच रूपे आढळतात .प्रत्येक रूपाला वृत्ती म्हणतात .

No comments: