Tuesday, November 10, 2009

चौदा ब्रह्म


चौदा ब्रह्मांची लक्षणे
तो विश्रांतीचा विश्राम आदिपुरुष आत्माराम ते येकचि परब्रह्म दुसरे नाही - -५३
तेचि कळावया कारणे चौदा ब्रम्हांची लक्षणे सांगिजेती तेणे श्रवणे निश्चयो बाणे - -५४
परब्रह्म एकच आहे हे कळण्यासाठी समर्थ दशक ७ समास ३ मध्ये १४ ब्रह्मांची लक्षणे सांगितली आहेत .
पाहिले ते शब्दब्रह्म दूजे मितिकाक्षर ब्रह्म तिसरे खंब्रह्म बोलिली श्रुती - -
चौथे जाण सर्वब्रह्म पाचवे चैतन्य ब्रह्म सहावे सत्ताब्रह्म साक्षब्रह्म सातवे - -
आठवे सगुण ब्रह्म नववे निर्गुण ब्रह्म दाहावे वाच्यब्रह्म जाणावे पैं - -
अनुभव ते अक्रावे आनंदब्रह्म ते बारावे तदाकार तेरावे चौदावे अनुर्वाच्य - -
ब्रह्म कसे असेल याचा विचार केला तर चौदा प्रकारे याचा विचार करता येतो .जे सूक्ष्म व अतींद्रिय आहे ,ते समजावून देण्यासाठी दृश्य पदार्थ खूण म्हणून घ्यावा लागतो .त्यासाठी हे चौदा ब्रह्म सांगितले आहेत .त्यातील दोष दाखवून चौदा ब्रह्म बाजूला सारली आहेत .
समर्थांनी प्रत्येक ब्रह्माची व्याख्या करून त्यातील मिथ्यापण दाखवले आहे .
.अनुभवेविण भ्रम या नाव शब्दब्रह्म --११ स्वरूपाचा अनुभव नाही पण शब्दाने ते असे आहे ,तसे आहे असे सांगणे म्हणजे शब्दब्रह्म ! पण हे ब्रह्म परब्रह्माच्या दृष्टीने कमी आहे कारण येथे परब्रह्माबद्दल प्रत्यक्ष अनुभव नसतो .नुसते शब्दपांडित्य असते .शाश्वताचा विचार नसतो .जी सदवस्तू शब्दांनी सांगता येत नाही तिचे वर्णन करण्याचा प्रयत्न असतो -शब्दांच्या करामती करून ! सांगणा-याला मी ब्रह्माचे वर्णन सांगतो याचा अभिमान
असतो . असे असले तरी त्याला प्रत्यक्ष अनुभवाचा ओलावा नसतो .त्यामुळे ते मिथ्या असते .
. आता मितिकाक्षर ब्रह्म ते येकाक्षर - -११ ओंकार म्हणजे एकाक्षर ब्रह्म ,मितिकाक्षर ब्रह्म ! सदवस्तू विनाशी नाही. अक्षर ही मानवी कल्पना आहे त्यामुळे शाश्वताचा विचार तेथे नसतो .त्यामुळे मितिकाक्षर ब्रह्म ही मिथ्या कल्पना आहे .
.खंशब्दे आकाशब्रह्म ।। - - १२ खं शब्दाने आकाश असा अर्थ दाखवतो .खंब्रह्म म्हणजे आकाशब्रह्म जे सर्वव्यापक आहे .सर्व ब्रह्मांड ज्या पोकळीत रहाते ते महदाकाश .ते ही प्रलय काळी नाहीसे होते .कारण ते पंचमहाभूत आहे .पंचमहाभूत नश्वर आहे म्हणून खं ब्रह्म अशाश्वत आहे .
.पंचभूतांचे कुवाडे जे जे तत्व दृष्टीस पड़े ते ते ब्रह्मचि चोखडे बोलिजेत आहे - - १३
सर्वब्रह्म :विश्व हेच सर्वब्रह्म असे मानले तर दृश्य नाशिवंत आहे .सर्वब्रह्म विश्वाबरोबर लय पावते .ब्रह्मदेवाची रात्र सुरु झाली की भूलोकांपर्यंत सर्व पंचमहाभूते विरायला लागतात .यात शाश्वत परब्रह्माला चंचलपणा ,
अस्थिरपणा ,लावला जातो .जे जे भूत आहे ,निर्माण झाले आहे ते ते पंचभूतात्म विश्व नाशवंत आहे म्हणून सर्व ब्रह्मही नाशवंत आहे .
चैतन्य ब्रह्म :
पंचाभूतादी मायेते चैतन्यचि चेतविते म्हणुनी त्या चैतन्याते चैतन्य ब्रह्म बोलिजे - -१५
दृश्य विश्वाला चैतन्य जिवंत ठेवते .जे विश्व नाश पावते त्याबरोबर चैतन्य ही नाश पावते .
सत्ता ब्रह्म :चैतन्यास ज्याची सत्ता ते सत्ता ब्रह्म तत्वता - -१६ चैतन्य वस्तूवर ज्याची सत्ता चालते ते सत्ता ब्रह्म ! वरिष्ठ कनिष्ठावर सत्ता चालवतो .तेथे वरिष्ठ कनिष्ठ असा भेद असतो .परब्रह्म भेदातीत
असते
.तेथे मालक -नोकर ,स्त्री -पुरूष ,वरिष्ठ -कनिष्ठ असा भेद नसतो त्यामुळे सत्ता ब्रह्म ही कल्पनाच !
.साक्षब्रह्म : तये सत्तेस जाणता या नाव साक्षब्रह्म - -१६
सत्ता ब्रह्माला जे जाणते,ते साक्ष ब्रह्म .त्रयस्थ दृष्टीने एखाद्या वस्तूकडे पहाणे म्हणजे साक्षत्वाने पहाणे .परब्रह्मामध्ये पदार्थ नसल्याने पाहाणार कोणाला असा प्रश्न आहे .त्यामुळे तेथे साक्षित्वाला वाव नाही .म्हणून साक्षब्रह्म खरे
नाही .
.सगुण ब्रह्म :साक्षत्व जयापासूनी ते ही आकळले गुणी सगुण ब्रह्म हे वाणी तयासी वदे - -१७
सगुण जे जे गुणमय आहे ते ते नाशिवंत आहे .म्हणून सगुण ब्रह्म नाशिवंत आहे निर्गुणा पासून माया उत्पन्न झाल्यावर निर्गुण साक्षित्वाच्या गुणात सापडले .जाणणे,व्यापणे,पहाणे हे गुण निर्माण झाले .त्या गुणांमुळे निर्गुण ब्रह्माला सगुण ब्रह्म म्हणतात .पण सगुण नाशिवंत असते म्हणून सगुण ब्रह्म खरे नाही .
.निर्गुण ब्रह्म :जेथे नाही गुण वार्ता ते निर्गुण ब्रह्म तत्वता - -१८
गुणमय दृश्य विश्व ज्या मायेने निर्माण झाले ,जे मृगजळा प्रमाणे असते .हे दृश्य विश्व निर्माण झालेली कल्पना आहे .ते खरे अस्तित्वात नाही .त्या गुणांना ओलांडून राहणारे निर्गुण ब्रह्म ही खरे नाही .
१० .वाच्य ब्रह्म :जे वाचे बोलता आले ते वाच्य ब्रह्म बोलिले - -१९
गुण रहित ब्रह्माला ओळखण्यासाठी जी नावे दिली जातात त्यांना वाच्य ब्रह्म म्हणतात .जे वाचेने बोलता येते ते वाच्य ब्रह्म ! वाच्यांशाने अनुभवात प्रवेश करता येत नाही .म्हणून वाच्य ब्रह्म ही कल्पना च लटकी आहे .
११ .अनुभव ब्रह्म १२ . आनंद ब्रह्म :
अनुभवासी कथिलेनवचे सर्वथाया नाव अनुभव ब्रह्म । । - -१९ । ।
ऐसे हे आनंद ब्रह्म । । - -२० । ।
सुखाचा आनंदाचा अनुभव घेताना अनुभव घेताना अनुभव घेणारा मी ,ज्याचा अनुभव घ्यायचा तो आनंद ,प्रत्यक्ष अनुभव असे तीन घटक असतात .आनंद व अनुभव ह्या माणसाच्या वृती असतात .त्यामुळे ही ब्रह्म वृत्तीँबरोबर नाश पावतात .
१३ .तदाकार ब्रह्म :तदाकार ते अभेद । । - -२१ । । जेव्हा ब्रह्माशी तदाकारता होते तेव्हा कोणतीही वृत्ती तेथे रहात नाही .जोपर्यंत तदाकारता येत नाही तोपर्यंत अविद्या नाहीशी होत नाही .तोपर्यंत वृत्ती पुन्हा पुन्हा खाले
येते .म्हणून तदाकार ब्रह्म ही परब्रह्म नाही .
१४ अनिर्वाच्य ब्रह्म :अनुर्वाच्यी संवादतुटोनी गेला । । - -२० । ।
अनिर्वाच्य म्हणजे ज्या बद्दल बोलता येत नाही .ब्रह्म अनिर्वाच्य आहे असे आपण म्हणतो तेव्हा वृत्ती च्या अनुरोधाने खूण म्हणून शब्द्द वापरला जातो .जेव्हा ब्रह्माशी तदाकारता येते तेव्हा वृत्ती उरत नाही वृती उरत नाही तेव्हा वाच्यता नसते .जे वाच्य नाही ते अनिर्वाच्य .पण अनिर्वाच्य शब्दही वृत्तीच्या संबंधाने योजला
जातो .म्हणून अनिर्वाच्य ब्रह्म म्हणने ही गौण च !


No comments: