Monday, March 22, 2010

चराचर कसे निर्माण झाले ?

मागा श्रोती क्षेपिले ते पाहिजे निरोपिले
निरावेवी कैसे जाले चराचर - -
दशक समास मध्ये शिष्यानी शंका काढली की निर्गुण ब्रह्मात चराचर कसे निर्माण झाले ?
त्याचे उत्तर समर्थ देतात :
याचे ऐसे प्रतिवचन ब्रह्म जे का सनातन तेथे माया मिथ्याभान विवर्तरूप भासे - -
ब्रह्म सनातन आहे .फार पूर्वी पासून आहे .त्या ब्रह्मा मध्ये माया निर्माण झाली .पण ती विवर्तरूप आहे ,म्हणजे भास
आहे .जसा अंधारात दोरी पाहून सापाचा भास होतो ,तशी ही माया भ्रम आहे .मी आत्मा आहे हे विसरून मी देह आहे अशी भावना होते कारण अविद्या ,अज्ञान ! सर्वत्र भरून राहिलेले परमात्मस्वरुप माया झाकते , तेथे दृश्य अशाश्वत विश्व दिसू लागते .
आदि येक परब्रह्म नित्यमुक्त अक्रिय परम तेथे अव्याकृत सूक्ष्म जाली मूळमाया - -
मूळ एक परब्रह्म तेव्हडे नेहमी मुक्त ,निष्क्रिय ,सर्वश्रेष्ठ असते .त्याच्या ठिकाणी कोणतेही विकार नसलेली अत्यंत सूक्ष्म अशी मूळमाया उत्पन्न झाली .हे विवेचन झाल्यावर श्रोते विचारतात :
येक ब्रह्म निराकार मुक्त अक्रिये निर्विकार तेथे माया वोडंबर कोठून जाली --
सर्वात आधी सनातन नित्यमुक्त ,निष्क्रिय ,सर्वश्रेष्ठ परब्रह्म आहे .ते निर्विकार आहे .त्याच्यात बदल
होत नाही .त्यात अत्यंत सूक्ष्म माया उत्पन्न होते .तिच्यात बीज रूपाने जीव असतो .म्हणून श्रोता विचारतो :या निर्गुण ,निराकार परब्रह्मात सगुण ,साकार ,सक्रीय ,सविकार माया कशी उत्पन्न झाली ?निर्गुण सगुण झाले असे म्हटले ब्रह्म नित्य ,अविकारी राहणार नाही .हे दृश्य विश्व कसे उत्पन्न झाले यावर अनेक मते
मतांतरे आहेत .कोणी म्हणतात की खरा देव निराकार ,करून अकर्ता आहे .कोणी म्हणतात तो परम
आत्मा आहे .त्याचा महिमा अगाध आहे .तो कोणाला कळणार नाही .कोणी म्हणते मूळ परब्रह्मात काही करावे अशी उर्मी नसते त्यामुळे तो करून अकर्ता आहे असे म्हणता येत नाही .कोणी म्हणते निर्गुणात कर्तेपणाचा ,कर्म करण्याचा भाव असत नाही ,त्यामुळे विश्व राचावे अशी त्यात इच्छा उत्पन्न होत नाही कारण इच्छा फक्त सगुणात उत्पन्न होते ,त्यामुळे परमेश्वराची इच्छा म्हणून दृश्य विश्व रचले असे होऊ शकत नाही .ह्या सर्व
क्षेपांमुळे अनेक प्रश्न उत्पन्न होतात :
तरी हे दृश्य कोणे केले किंवा आपणची जाले देवेविण उभारले कोणेपरी - -१४
हे एव्हडे विश्व कोणी केले ?का ते आपोआपच रचले गेले ?देव त्याचा कर्ता नाही तर ते उभारले कसे गेले ?पुन्हा प्रश्न असा येतो की देवाशिवाय जर विश्व उभारले गेले तर देवाला अस्तित्व उरत नाही देव विश्वरचनेचा कर्ता मानला तर सगुण म्हणावा लागतो ,देव निर्गुण मानला तर विश्वाचा कर्ता कोण याचे उत्तर मिळत नाही .
माया स्वतंत्र आहे ,ती कोणी केली नाही तिने विश्व रचले असे म्हटले तर ते विपरीत दिसते .सगळे कर्तेपण मायेकडे दिले तर भक्तांचा उध्दार करणारा देव म्हणून कोणी आहे की नाही असा संदेह निर्माण होतो .देवाची सत्ता मायेवर चालत असेल तर तो भक्तांना सांभाळेल नाही तर नाही .त्यामुळे माया स्वतंत्र आहे हां विचार योग्य होणार नाही .म्हणून मायेला निर्माण करणारा आवरणारा परमेश्वर आहे असे मानावे लागते .ब्रह्मज्ञानी पुरुषाला सर्वत्र ब्रह्म दिसते तर अज्ञानाला जगाची प्रचिती येते .ब्रह्मज्ञानी पुरुषाचा अनुभव सर्वश्रेष्ठ आहे म्हणून . . मध्ये समर्थ म्हणतात :
अरे जे जालेचि नाही त्याची वार्ता पुससी काई तथापि सांगो जेणे काही संशय नुरे - -
परब्रह्म आहे तसेच आहे .त्यात काही उत्पन्न झाले नाही ,नाश पावले नाही ही ज्ञानाची प्रतीति आहे .पण अज्ञानी माणसाला ते पटत नाही .म्हणून त्यासाठी विवर्तवादाचा आधार घ्यावा लागतो .विवर्तवाद म्हणजे एक असते आणि दिसते दुसरेच ! दोरी ऐवजी साप दिसतो ,पाण्यावर लाटांचा भास् होतो .सूर्यामुळे मृगजळ दिसते .समर्थ म्हणतात :
भासाकरिता भास् भासेदृश्याकरिता अदृश्य दिसेअदृश्यास उपमा नसेम्हणोनि निरोपम । । - - । ।
मूळपुरूष जो ईश्वर त्याच्या ठिकाणी अनंत शक्ती आहेत .मूळमाया ही त्याचीच शक्ती आहे .तिच्यामुळेच हे विलक्षण दृश्य अवतरते .आपल्यावर असलेल्या अज्ञानाच्या आवरणाने जे मुळात नाही ते दिसते .जे दिसते तो
भ्रम असतो .दृश्य विश्व आपल्या अनुभवास येते .म्हणून अदृश्याचा विचार करता येतो शोध घेता येतो .















No comments: