Friday, March 19, 2010

ब्रह्मांडाचा कर्ता कोण ?


ब्रह्मांड कर्ता कवण। कैसी त्याची ओळखण
देव सगुण किं निर्गुण मज निरोपावे - -५५
निर्गुण ब्रह्मात चराचर कसे निर्माण झाले असा प्रश्न श्रोत्यांनी विचारला तेव्हा समर्थ म्हणतात :
ब्रह्म जे का सनातन तेथे माया मिथ्याभान विवर्त रूप भासे - -
सनातन ब्रह्माच्या ठिकाणी विवर्त रूप माया उत्पन्न झाली .ती खरी नसून खरे पणाने भासू लागली .उदा.अंधारात खोलीत पडलेली दोरी ,दोरी भासता साप आहे असे वाटणे,तसे मी आत्मा आहे हे विसरून मी देह आहे अशी भावना होते त्याला विवर्त म्हणतात .अविद्येने हे सर्व घडते .मूळ नित्यमुक्त ,निष्क्रिय ,परब्रह्म होते .त्याच्या ठिकाणी अव्याकृत -विकार नसलेली ,अत्यंत सूक्ष्म मूळमाया उत्पन्न झाली .
या निराकार ,मुक्त ,निर्विकार ब्रह्मात मूळमाया कोठून उत्पन्न झाली यासंबंधी अनेक मते सांगितली जातात :
निर्गुंणचि गुणा आले ऐसे जरी अनुवादिले लागो पाहे येणे बोले मूर्खपण --
निर्गुण परब्रह्मच सगुण रूपात आले असे म्हटले तर ते मूर्खपणाचे होते कारण असे झाले तर ब्रह्म नित्य अविकारी राहणार नाही .
येक म्हणती निरावेव करूनी अकर्ता तो देव त्याची लीला बापुडे जीव काये जाणती --
देव निराकार ,निरावेव आहे .त्याची लीला विलक्षण आहे .गरीब बिचारे जीव त्याची लीला काय जाणणार?
एक जण म्हणतो तो परम आत्मा आहे .त्याचा महिमा अगाध आहे .काही जण ब्रह्माला करून अकर्ता
म्हणतात ,पण ते ही खोटे आहे कारण ब्रह्मात काही करावे अशी उर्मी नसते .
इच्छा परमेश्वराची ऐसी युक्ती बहुतेकांची परी त्या निर्गुणास इच्छा कैसीं हे कळेना - -१३
काही जण म्हणतात ही देवाची इच्छा ,पण ते खरे नाही कारण मुळात जे निर्गुण आहे ,तेथे कर्तेपणाचा ,कर्म करण्याचा भाव असत नाही .मग असा प्रश्न येतो की :
देवेविण झाले सर्व मग देवास कैचा ठाव - -१५ मग देवाशिवाय सर्व झाले असे म्हटले तर देव नाहीच असे म्हणावे लागेल .
देव म्हणो सृष्टीकर्ता तरी येवं पाहे सगुणता निर्गुणपणाची वार्ता देवाची बुडाली - -१६
देव सृष्टीकर्ता आहे असे म्हटले तर त्याला सगुणता येते मग देव निर्गुण आहे हा सिध्दांत लोपतो .मग या विश्वाचा कर्ता कोण हा प्रश्न अनुत्तरित राहतो .जर माया स्वतंत्र आहे असे म्हटले तर ते विपरीत दिसते .देव निर्गुण
आहे ,त्याचा मायेशी काही संबंध नाही असे म्हणावे लागते .मग तेथे द्वैत निर्माण होते, ते अद्वैताच्या
विरुध्द आहे .एकच एक पणे असणा-या परब्रह्मात अनेकत्व कसे निर्माण झाले असा प्रश्न उरतो .माया स्वतंत्र मानली तर द्वैत स्वीकारावे लागते .ते अद्वैताच्या मूळावर घाव घालते .
माया कोणी नाही केली ते आपणची विस्तारिली ऐसे बोलता बुडाली देवाची वार्ता - -१९
मायेकडे सर्व कर्तेपण दिले तर भक्तांचा उध्दार करणारा कोणी देव आहे की नाही अशी शंका येइल .देव असून त्याची सत्ता मायेवर चालत नसेल तर अज्ञानी जीवांना मायेपासून कोण वाचवणार ?म्हणून माया स्वतंत्र आहे हे म्हणणे चुकीचे होईल .मायेला निर्माण करणारा परमेश्वर आहे .माया मिथ्या आहे ,खोटी आहे तरी ब्रह्मात कशी आली असा विचार करताना समर्थ म्हणतात :
अरे जे जालेचि नाही त्याची वार्ता पुससी काई
जे उत्पन्न झालेच नाही त्या विश्वाबद्दल काय सांगावे ?ज्याप्रमाणे पाण्यावर लाटांचा भास् होतो ,सूर्यामुळे मृगजळ दिसते ,सोन्यावर दागिने भासता ,डोळ्यातील बाहुली मुळे पदार्थ दिसतो .आपल्यावर अज्ञानाचे आवरण असल्यामुळे जे मुळात नाही ते दिसते ,त्यामुळे भ्रमरूप विश्व भासते ,आपल्या अनुभवाला येते .अदृश्य स्वरूपाचे
साम्य असणारी दूसरी वस्तू नसल्याने हजारो तोंडाच्या शेषाला सुध्दा त्याचे वर्णन करता येत नाही .
परमात्मा परमेश्वरू सर्वकर्ता तो ईश्वरू तयापासूनि विस्तारू सकळ जाणा --१२
मूळमाया तोचि मूळपुरुष तोचि सर्वांचा ईश अनंतनामी जगदीश तयासीचि बोलिजे - -२०
मूळ आत्मस्वरूप चैतन्य एकच आहे अविद्येच्या आवरणाने त्याला जीव म्हणतात .तो देहात राहतो .विद्या अविद्या यांनी संपन्न मायेच्या सहवासाने त्याच चैतन्यास शिव म्हणतात .तो विश्वात राहतो केवल
ज्ञानमय ,शक्तिमय असतो .त्या चैतन्याच्या ज्ञानमय अंगास मूळपुरूष शक्तिमय अंगास मूळमाया म्हणतात .या विश्वात सर्वत्र मायेचा विस्तार आहे .पण ती सर्वस्वी खरी नाही .म्हणून तिला अनुर्वाच्य म्हणतात .ते जाणण्या साठी स्वानुभव लागतो .संत संगतीने तिचे आकलन होते .

No comments: