Monday, October 11, 2010

प्राण्यांमध्ये ,माणसांमध्ये भेद का आढळतो?

जशा सर्व प्रकाराच्या माळांमध्ये मणी दो-यात ओवलेले असल्यामुळे मणी एकत्र राहतात ,त्याप्रमाणे आत्मा सर्व प्राण्यांमध्ये सर्व वस्तूंमध्ये असतो .परन्तु दोरा व प्राणी यात सारखेपणा नाही .जसे दोरा मण्याला व्यापत नाही ,परन्तु आत्मा सर्व देहाला व्यापतो .आत्म्याच्या ठिकाणी चेतना असते ,तशी देहाच्या ठिकाणी नसते .सर्व वस्तुत आत्मा असतो पण तो सगळीकड़े सारख्या प्रमाणात नसतो .त्यामुळे वस्तू व प्राणी यांच्यात कमी जास्त पणा ,उंच नीच पणा आढळतो .ही गोष्ट स्पष्ट करण्या साठी समर्थांनी काही उदाहरणे दिली आहेत :
वेलींमध्ये रस असतो ,पण प्रत्येकाची चव वेगळीअसते .उसाताही रस असतो .तो रस आणि रसहीन उसाची चिपाडे सारखी नसतात .तसे राजा पासून रंका पर्यंत अनेक प्रकाराचे लोक येथे राहतात पण ते सरसकट सारख्या दर्जाचे नसतात .समर्थ म्हणतात :
येकांशे जग चाले । परी सामर्थ्य वेगळाले । येकासंगे मुक्त केले । येकासंगे रवरव । । १३-१०-१०
साकर माती पृथ्वी होये । परी ते माती खाता न ये । गरळ आप नव्हे काये । परी ते खोटे । । १३-१०-११
पुण्यात्मा आणि पापात्मा । दोहींकड़े अंतरात्मा । साधू भोंदू सीमा । सांडूच नये । । १३-१०-१२
ईश्वराच्या एकाच अंशाने जग चालले आहे .तरी प्रत्येक वस्तूचे सामर्थ्य वेगवेगळे असते .जसे एकाच्या संगतीने मोक्ष मिळतो,तर एकाच्या संगतीने नरकात जावे लागते .माती व साखर प्रुथ्वीचीच रूपे असली तरी माती खाता येत नाही .सापाचे विष व पाणी पाण्याची रूपे असली तरी सापाचे विष पिऊन चालत नाही .तसे पुण्यवान माणूस व पापी माणूस यांच्यात अंतरात्मा एकच असला तरी ते दोघे सारखे नसतात .ज्याप्रमाणे विद्वान् व वात्रट मुले सारखी नसतात ,तसे गंगेचे पाणी ,मोरीतले पाणी ,कपडे धुतलेले पाणी जरी पाणीच असेल तरी सारखे नसते .तसे शुध्द विचार ,शुध्द आचार असलेला ,अनासक्त मनाचा माणूस इतरांपेक्षा श्रेष्ठ असतो .पाण्यापासून अन्न होते व अन्नाची उलटी होते ,म्हणून वांतीचे भोजन करता येत नाही .म्हणूनच माणसा माणसां मध्ये भेद आढळतो .

No comments: