Monday, October 11, 2010

सुख दू:खाचा भोक्ता कोण ?

तवं श्रोता करी प्रश्न । देही सुखदु :खाचा भोक्ता कोण । पुढे हेचि निरूपण । बोलिले असे । । १३-८-३८
श्रोता प्रश्न करतो की या देहात सुखदु :खा चा भोक्ता कोण आहे ?
देह व आत्मा ,एकाशिवाय दूसरा काही करू शकत नाही .ही गोष्ट पटविण्यासाठी अनेक उदाहरणे दिली आहेत .उदा:
आत्मयास शरीरयोगे । उद्वेग चिंता करणे लागे । शरीरयोगे आत्मा जगे । हे तो प्रगटची असे । । १३-९-१
देह अन्नचि खायेना । तरी आत्मा कदापि जगेना । आत्म्याविण चेतना । देहास कैंची । । १३-९-२
शरीराशी संबंध आल्याने जीवात्मा दु :ख ,चिंता करतो .शरीराच्या सहाय्याने आत्मा जगतो .देहाने अन्न खाल्ले नाही तर आत्मा जगत नाही .जीवात्मा नसेल तर देह मरतो .जीव व देह यांच्या सहाय्याने ,संयोगाने मानवी जीवनात कार्य घडतात .समर्थ म्हणतात :
उत्तम द्रव्य देह खातो । देह योगे आत्मा भुलतो । विस्मरणे शुध्दी सांडितो । सकळ काही । । १३-९-७
देह मादक पदार्थ सेवन करतो ,जीवात्मा भ्रमतो ,त्याचे भान नाहीसे होते .सगळी शुध्दी लोपते .देहाने विष घेतले तर जीवात्मा देह सोडतो .अनेक उदाहरणे देउन समर्थांनी पटवून दिले आहे की देहामुळे जीवात्म्याला सुख दु :ख भोगावे लागते .जे जे उपचार देहाला केले जातात ते जीवात्म्याला पावतात .देहाला मिळालेले सुग्रास भोजन ,थंडीच्या दिवसात मिळालेले उबदार कपडे ,थंडी वारा उन पाऊस या पासून मिळालेला निवारा ,हे सर्व देहासाठी होत असेल तरी समाधान मात्र जीवात्मा भोगतो .समर्थांनी उदाहरणात म्हटले आहे :
तृषेने शोकले शरीर । आत्म्यास कळे हा विचार । मग उठवून शरीर । चालवी उदाकाकडे । । १३-९-१४
उदक मागे शब्द बोलवी । मार्ग पाहोन शरीर चालवी । शरीर अवघेची हालवी । प्रसंगानुसार । । १३-९-१५
तहान लागली ,शोष पडला की जीवात्म्याला समजते ,मग शरीराला उठवून जीवात्मा पाण्याकडे नेतो ,मला पाणी पाहिजे ,असे शब्द शरीराकडून बोलावतो ,रस्ता बघून शरीराला चालवतो ,प्रसंगाप्रमाणे हालचाल करवतो.अशा प्रकारे देहात आत्मा राहतो ,देहाच्या द्वारे अनेक सुख दु :ख भोगतो .देहात राहणारा ,सुख दु :खे भोगणारा,जीवात्माच असतो .शरीरातून जीवात्मा निघून जातो तेव्हा देह प्रेत बनतो .

No comments: