Tuesday, October 12, 2010

श्री समर्थांची भिक्षेबद्दलची संकल्पना

भिक्षा मागोन जो जेविला । तो निराहारी बोलिला । प्रतिग्रहा वेगळा जाला । भिक्षा मागता । । १४-२-२
श्री समर्थांना भिका-याने मागितलेली भिक्षा अभिप्रेत नाही । लाचारी ,दीनपणा त्यात त्यांना अपेक्षित नाही .पैसे कष्टाने मिळवून पोट भरण्याची ताकद असूनही जर एखादा भगवंत प्राप्ती साठी,आपल्या ध्येयासाठी दारिद्र्य पत्करत असेल तर लोकांकडे मागुन खाल्लेल्या अन्नाला भिक्षा असे नाव समर्थ देतात .समर्थ म्हणतात :
ऐसा भिक्षेचा महिमा । भिक्षा माने सर्वोत्तमा । ईश्वराचा अगाध महिमा । तोहि भिक्षा मागे । । १४-२-४
दत्त गोरक्ष आदिकरूनी । सिध्द भिक्षा मागती जनी । निस्पृहता भिक्षेपासूनि । प्रगट होये । । १४-२-५
दत्त ,गोरक्ष ,समर्थ यांसारखे साधनी लोक ध्यान धारणेत रमायला लागल्यावर त्यांना त्यांच्या देहाचाही विसर पडतो .अशा वेळेस देहापुरते अन्न मागण्यास ,आत्मसाक्षात्कारासाठी साधना करणा-या संन्याशाला भिक्षा मागण्याचा अधिकार शास्त्र देते .समर्थ म्हणतात :

नित्य नूतन हिंडावे । उदंड देशाटन करावे । तरीच भिक्षा मागतां बरवे । श्लाघ्य वाणे । । १४-२-८
अखंड भिक्षेचा अभ्यास । तयास वाटेना परदेस । जिकडे तिकडे स्वदेस । भुवनत्रैं । । १४-२-९
जेव्हा साधकाला आपल्याला भगवंत सांभाळतो ,असा दृढ़ विश्वास असतो ,तेव्हा त्याला कशाचीच चिंता उरत नाही .तो सतत हिंडतो ,देशाटन करतो ,त्याला तो कोठेही गेला तरी त्याला 'हे विश्वची माझे घर 'असे वाटते .आणि त्यातून त्याचे वैराग्य फुलत जाते .म्हणून समर्थ म्हणतात :
भिक्षे ऐसे नाही वैराग्य । वैराग्यापरते नाही भाग्य । वैराग्य नस्तां अभाग्य । येकदेसी । । १४-२-१९
श्री समर्थानी भिक्षेतून अनेक गोष्टी साधल्या .समर्थ म्हणतात :
भिक्षा म्हणिजे कामधेनू । सदा फळ नव्हे सामान्यु । भिक्षेस करी जो अमान्यु । तो करंटा जोगी । । १४-२- १२
भिक्षेने वोळखी होती । भिक्षेने भरम चुकती । सामान्य भिक्षा मान्य करिती । सकळ प्राणी । । १४-२-१३
भिक्षा म्हणजे निर्भय स्थिती । भिक्षेने प्रगटे महंती । स्वतंत्रता ईश्वरप्राप्ती । भिक्षा गुणे । । १४-२-१४
भिक्षेस नाही आडथळा । भिक्षाहारी मोकळा । भिक्षेकरता सार्थक वेळा । काळ जातो । । १४-२-१५
भिक्षा म्हणजे अमरवल्ली । जिकडे तिकडे लगडली । अवकाळी फळ दायेनी जाली । निर्ल्लजासी । । १४-२-१६
समर्थांच्या मते भिक्षा म्हणजे कामधेनू च ! हवे ते फळ देणारी ! भिक्षेने नव्या ओळखी होतात ,चुकीच्या कल्पना नाहिशा होतात .भिक्षा मागणारा निर्भय असतो .अध्यात्मिक पुढारी पण प्रगट होते .त्याच्यावर कोणतेही बंधन नसते .म्हणून भिक्षेला समर्थ अमरवल्ली म्हणतात .कारण ती फळ दायिनी आहे .

No comments: