Thursday, October 14, 2010

श्री समर्थांनी सांगितलेली चातुर्य लक्षणे

चातुर्य लक्षणे सांगताना श्री समर्थ म्हणतात :
रूप लावण्य अभ्यासिता न ये । सहजगुणास न चले उपाये । काही तरी धरावी सोये । अगांतुक गुणांची । । १४-६-
काळे माणूस गोरे होयेना । वनाळास यत्न चालेना । मुक्यास वाचा फुटेना । हा सहजगुण । । १४-६-२
आंधळे डोळस होयेना । बधिर ते ऐकेना । पांगुळ पाये घेईना । हा सहजगुण । । १४-६-३
आईवडीलांकडून मिळालेल्या शरीराचे रूप आपल्याला पालटता येत नाही कारण ते जन्म जात असते .म्हणून अभ्यासाने मिळवता येणारे अगांतुक गुण माणसाने आत्मसात करायला हवे असे समर्थ सांगतात .अवगुण सोडता येतात .उत्तम गुण आभ्यासाने मिळवता येतात ।
अवगुण सोडिता जाती । उत्तम गुण अभ्यासिता येती । कुविद्या सांडूनी सिकती । शहाणे विद्या । । १४-६-५
उत्तम गुणांचे महत्व सांगतांना समर्थ म्हणतात :
देहे नेटके शृंघारिले । परी चातुर्येविण नासले । गुणेविण साजिरे केले । बाष्कळ जैसे । । १४-६-९
अंतर्कळा शृंघारावी । नानापरी उमजावावी । संपदा मेळवूनी भोगावी । सावकास । । १४-६-१०
जर शरीराला शृंघारिले पण अंगी चातुर्य नसेल ,शहाणपण नसेल तर ते वाया जाते .म्हणून माणसाने आपले अंतर्मन उत्तम गुणांनी सजवावे .ते ज्ञानाने भरावे ,शहाणपण ने भरावे ,त्या गुणांच्या जोरावर समाजात मान मिळवावा .उत्तम गुणांनी युक्त असल्याने संपत्तीही मागून येते ।
चतुर माणसाला माहीत असते की दुस-या बरोबर कसे बोलावे ,कसे वागावे ,कारण आपण दुस-याला त्रास दिला तर आपल्यालाही त्रास सोसावा लागतो .त्याला माहीत असते की जी गोष्ट अनेकांना पसंत पड़ते ,तिचा प्रसार अनेकां मध्ये होतो । दुस -याला समाधान दिले तर आपल्याला समाधान होते .कारण आपण दुस-याला अरे म्हटले तर दूसरा कारे म्हणणारच ! मग कसे वागावे ते समर्थ सांगतात :
तने मने झिजावे । तेणे भले म्हणोंन घ्यावे । उगेची कल्पिता सिणावे । लागेल पुढे । । १४-६-२१
शरीराने मनाने लोकांसाठी झिजले तर भलेपणा मिळतो .लोकांचे कार्य अडून राहिल्यास त्यांना मदत केली तर लोक त्याच्या कड़े येतात .चतुर माणसाला कळते की जो दुस -याला सुखी ठेवतो ,तो सुखी होतो .जो दुस-याला सुखी ठेवतो तो सुखी होतो .आळसाने काय होते ते समर्थ सांगतात :
आळसे कार्यभाग नासतो । साक्षेप होत होत जातो । दिसते गोष्टी कळेना । शहाणा कैसा । । १४-६-२७
मित्री करिता होते कृत्य । वैर करिता होतो मृत्य । बोलिले हे सत्य की असत्य । वोळखावे । । १४-६-२८
आपणास शहाणे करू नेणे । आपले हित आपण नेणे । जनी मित्री राखो नेणे । वैर करी । । १४-६-२९
ऐसे प्रकारीचे जन । त्यांस म्हणावे अज्ञान । तयापासीँ समाधान । कोण पावे । । १४-६-३०
जेव्हडा व्याप तेव्हडे वैभव असते ,म्हणून कोणतेही कार्य आळशीपणाने केले तर ते नासते .पण प्रयत्न चालू ठेवले तर हळूहळू कार्य सिध्दीस जाते .मैत्री केल्याने कार्य सिध्दीस जाते ,वैर केल्याने नाही .जर लोकांशी स्नेह राखता आला नाही ,तर अशा लोकांना समर्थ अज्ञानी म्हणतात .त्यांच्या जवळ समाधान रहात नाही .तो एकटा एक राहतो .तो सर्वांशी भांडला तर त्याला यश मिळत नाही .म्हणून समर्थ म्हणतात :
बहुतांचे मुखी उरावे । बहुतांचे अंतरी भरावे । उत्तम गुणी विवरावे । प्राणीमात्रासी । । १४-६-३२
शाहाणे करावे जन । पतित करावे पावन । सृष्टीमध्ये भगवत भजन । वाढवावे । । १४-६-३३


No comments: