Thursday, October 14, 2010

हरिकथा कैसी करावी ?

मागां हरिकथेचे लक्षण । श्रोती केला होता प्रश्न । सावध होउन विचक्षण । परिसोत आता । । १४-५-१
हरिकथा कैसी करावी । रंगे कैसी भरावी । जेणे पाविजे पदवी । रघुनाथ कृपेची । । १४-५-२
हरिकथेचे लक्षण कोणते असा श्रोत्यांनी प्रश्न केला होता .त्याला उत्तर देतांना समर्थ म्हणतात :
हरिकथा कशी करावी ,तिच्यात रंग कसा भरावा ,म्हणजे त्या कथेने भगवंताची कृपा संपादन करता येईल ,तशी योग्यता प्राप्त होईल ते आता सांगतो .जसा सोन्याला सुगंध प्राप्त झाला ,उसाला गोड मधुर फळे लागली तर अपूर्व योग येईल त्याप्रमाणे :
तैसा हरिदास आणि विरक्त । ज्ञाता आणि प्रेमळ भक्त । वित्पन्न आणि वादरहित । तरी ते ही अपूर्वता । । १४-५-४
रागज्ञानी ताळज्ञानी । सकळकळा ब्रह्मज्ञानी । निराभिमानाने वर्ते जनी । तरी ते ही अपूर्वता । । १४-५ -५
हरिदास असून विरक्त ,मोठा ज्ञानी असून प्रेमळ भक्त ,,मोठा विद्वान् ,उत्तम रागज्ञान ,वाद शून्य कीर्तनकार ,उत्तम तालज्ञान ,सर्व कलांचे उत्तम ज्ञान असून अंगी ब्रह्मज्ञान असलेला लोकांशी वागताना निराभिमानी असणारा हरिदास असेल तर तो अपूर्व योग असतो .याशिवाय :
मछर नाही जयासी । जो अत्यंत प्रिये सज्जनासी । चतुरांग जाणे मानसी । अंतर्निष्ठ । । १४-५-६
ज्याला द्वेष ,मत्सर नसतो ,संतांना जो अत्यंत प्रिय असतो ,,ज्याच्या अंगी चौफेर ज्ञान असते ,भगवंतावर पूर्ण निष्ठा असते ,असा हरिदास उत्तम असतो ।
उत्तम हरिकथा कशी करावी ते समर्थ सांगतात :
कथा रचायाची खूण । सगुणी जाणावे निर्गुण । न बोलावे दोष गुण । पुढिलांचे कदा । । १४-५-१४
देवाचे वर्णावे वैभव । नाना प्रकारे महत्त्व । सगुणी ठेवूनिया भाव । हरिकथा करावी । । १४-५-१५
लाज सांडून जनाची । आस्था सांडून धनाची । नीच नवी कीर्तनाची । आवडी धरावी । । १४-५-१६
येकांची कीर्ती येकापुढे । वर्णिता साहित्य न पड़े । म्हणोनिया निवाडे । जेथील तेथे । । १४-५-१८
मूर्ती नस्तां सगुण । श्रवणी बैसले साधूजन । तरी अद्वैत निरूपण । अवश्य करावे । । १४-५- १९
नाही मूर्ती नाही सज्जन । श्रवणी बैसले भाविक जन । तरी करावे कीर्तन । प्रास्ताविक वैराग्य । । १४-५-२०
सगुण सांगताना निर्गुण आणू नये.श्रोत्यांचे गुण दोष काढू नये .देवाचे वैभव वर्णन करावे .देवाचे महत्त्व वर्णन करावे .सगुणाचा भाव ठेवून हरिकथा करावी .लोकांची लाज सोडून ,धनाबद्दल प्रेम न बाळगता ,नवनवीन विषयांवर कीर्तने करावी .एका देवापुढे दुस-याचे महत्त्व सांगू नये .रामाच्या देवळात कृष्ण कथा सांगू नये .निर्गुण साधना करणारे साधू समोर असताना सगुण न सांगता अद्वैताचे निरूपण करावे .भाविकांसमोर प्रपंचा बद्दल अनुताप व वैराग्य सांगावे ।
हरिदासाने काय करू नये ?
कीर्तनात स्त्रियांच्या सौंदर्या विषयी बोलू नये .नाहीतर श्रोत्यांच्या मनात कामवासना निर्माण होते व त्यांचा संयम सुटतो .साधकाला जे बाधते ,ते ते हरिदासाने टाळावे .हरिदासाला जरी रागज्ञान ,स्वरज्ञान चांगले असेल तरी त्या नादात जर तो भगवंताला विसरत असेल तर ते त्याच्या कथेत आलेले विघ्न आहे असे मानता येते ।
शेवटी हरिदास केव्हा धन्य समजावा ते समर्थ सांगतात :
मन ठेवूनी ईश्वरी । जो कोणी हरिकथा करी । तोचि ये संसारी । धन्य जाणावा । । १४-५-३७
जो मनामध्ये ईश्वरा विषयी भाव ठेवून हरिकथा करतो तो धन्य समजावा .नित्य नवीन कथा लोकाना ऐकवण्याची त्याला आवड असते .जेथे जेथे हरिकथा चालू असते तेथे तो धावून जातो .असा हरिदास धन्य असतो .

No comments: