Thursday, September 30, 2010

कर्ता कोण ?

श्रोता म्हणे वक्तयासी । कोण कर्ता निश्चयेसी । सकळ सृष्टी ब्रह्मांडासी । कोणे केले । । १३-८-१
श्रोता वक्त्याला विचारतो की या सृष्टीचा कर्ता कोण आहे .वक्ता त्यांना अनेक मते सांगतो .वेगवेगळ्या लोकांची वेगळी मते वक्ता सांगताना श्रोते संभ्रमात पडतात .तेव्हा समर्थ सांगतात :
जे जे कर्तयाने केले । ते ते त्या उपरी जाले । कर्त्यापूर्वी आडळले । न पाहिजे की । । १३-८ -२६
केले ते पंचभूतिक । आणि पंचभूतिक ब्रह्मादिक । तरी भूतांशे पंचभूतिक । केले ते घडेना। । १३-८-२७
पंचभूतास वेगळे करावे । मग कर्त्यास वोळखावे । पंचभूतिक ते स्वभावे । कर्त्यात आले । । १३-८-२८
कर्ता जे जे निर्माण करतो ,ते त्यांच्या नंतर झालेले असते .कर्त्याच्या आधी ते अस्तित्वात नसते ।
आपल्या अनुभवाला येणारे सारे विश्व ,ब्रह्मादिक देव ,पंचभूतिक आहेत .म्हणून देवांनी हे पंचभूतिक विश्व निर्माण केले नाही ।
पंचभूतांवेगळे निर्गुण ।तेथे नाही कर्तेपण । निर्विकारास विकार कोण । लाऊँ शके । । १३-८-२९
निर्गुणास कर्तव्य न घड़े । सगुण जात्यांत सापडे । आतां कर्तव्यता कोणे कड़े । बरे पहा । । १३-८-३०
पंचभूते वेगळी केली ,फक्त निर्गुण उरते .निर्गुणाला कर्तेपण नाही .मग या दृश्य विश्वाचा कर्ता कोण ? असा प्रश्न येतो .समर्थ म्हणतात :
लटिक्याचा कर्ता कोण । हे पुसणेचि अप्रमाण । म्हणोनि हेचि प्रमाण । जे स्वभावेचि जाले । । १३-८-३१
ब्रह्मवस्तूच्या दृष्टीने विचार केला तर सारे दृश्य विश्व लटके आहे ,भ्रम आहे .जे मूळातच नाही त्याचा कर्ता कोण हा प्रश्नच गैर आहे .म्हणून हे दृश्य विश्व स्वत :च तैयार झाले असे म्हणावे लागते ।
सगुणे सगुण केले। तरी ते पूर्वीच आहे जाले । निर्गुणास कर्तव्य लाविले । नवचे कीं कदा । । १३-८-३३
येथे कर्ताच दिसेना । प्रत्यये आणावा अनुमाना दृश्य सत्यत्वे असेना । म्हणोनिया । । १३-८-३४
सगुणाने सगुण निर्माण केले असे म्हणावे ,तर सगुण आधीच निर्माण झाले आहे .म्हणजे सगुणाचा कर्ता सगुणाच्या आधीच आहे ।
निर्गुण निर्विकारी असल्या मुळे त्यास कर्तेपणाचा विकार स्पर्श करत नाही .सृष्टीचा कर्ता कोणी नाही .म्हणजे दृश्य विश्व खरे नाही .

आत्मा कसा जाणावा ?

आत्मा जाणण्यास कठीण आहे .तो ओळखायचा असेल तर संत सज्जनांकडे जावे असे समर्थ म्हणतात .आत्म्याला जन्मही नाही व मरणही नाही .हे कळण्यासाठी संत आपल्याला नित्यानित्य विचार व सारासार विचार शिकवतात .नित्यानित्य विचाराने खरा मी कोण हे कळते ,तर सारासार विचाराने खरा कर्ता कोण हे कळते .समर्थ म्हणतात :
विचारिता सज्जनासी । ते म्हणती की अविनासी । जन्म मृत्यु आत्मयासी । बोलोंची नये । । १३-६-१३
निराकारी भासे आकार । आणी आकारे भासे निराकार । निराकार आणि आकार । विवेके वोळखावा । । १३-६-१४
निराकारात आकाराचा भास् होतो .म्हणजे निर्गुण निराकाराच्या एका भागावर या दृश्य विश्वाचा ,म्हणजे आकाराचा भास होतो .या दृश्य विश्वात आकाशाच्या रूपाने निराकाराचा भास् होतो .दोन्ही एकमेकात मिसळलेले असतात .म्हणून निराकार आणि आकार एकमेकांपासून दूर केले व त्यांना जाणणे म्हणजे नित्यानित्य विचार !
पंचभूतापासून निर्माण झालेले सगळे मायिक आहे .जसे दिसते तसे नसते .ते एकही नाही .अनेक दिसते .त्याउलट आत्मा एकच आहे .तो सर्व विश्व व्यापून आहे .आकाश आपल्याला भासते .इंद्रिय गोचर होते .स्थल कालाच्या उपाधीने आवरलेले असते .असे असले तरी ते अतींद्रिय ,निरुपाधी ,निराभासी ,अविनाशी गगनासारखे आहे .ब्रह्मस्वरुप आहे .परन्तु जे मायिक आहे ,ते नाशिवंत आहे ,तसे ब्रह्माचे नसते .ब्रह्म स्वरुप सद्गुरु कृपा ,मनन ,निदिध्यासन ,करून आपल्या अनुभवाच्या कक्षेत आणता येते .परमात्म स्वरुप निराकार आहे हाच सारासार विचार आहे ।
परमात्मा तो निराकार । जाणिजे हा विचार सार । आणि आपण कोण हा विचार । पाहिला पाहिजे । । १३-६-२१
देहाचा अंत होतो तेव्हा वायु देह सोडून जातो .वायूने देह सोडला तर ते शरीर मढे होते .ते शरीर काहीही करू शकत नाही .म्हणजे ते शरीर म्हणजे मी नाही हे कळते .जेव्हा आपण मी कर्ता असे म्हणतो ,तेव्हा आपण म्हणू ते व्हायला हवे .पण तसे होते असे नाही .म्हणजे मी कर्ता असे म्हणता येत नाही .

Saturday, September 25, 2010

विश्वाची उत्पत्ती व संहार

विश्वाची उत्पत्ती व संहार [कहाणी रूपाने ]
श्रोता पुसे वक्तयासी । कहाणी सांगा जी बरवीसी । वक्ता म्हणे श्रोतयासी । सावध ऐके । । १३-५-२
येके स्त्री पुरुषे होती । उभयेतां मध्ये बहु प्रीती । येके रूपेची वर्तती । भिन्न नाही । । १३-५-३
ऐसा काही एक काळ लोटला । तयांस एक पुत्र झाला । कार्यकर्ता आणि भला । सर्व विषीँ । । १३-५-४
पुढे त्यासही जाला कुमर । तो पित्याहून आतुर । कांही तदर्थ चतुर । व्यापकपणे । । १३-५-५
तेणे व्याप उदंड केला । बहुत कन्या पुत्र व्याला । उदंड लोक संचिला । नानाप्रकारे । । १३-५-६
त्याचा पुत्र ज्येष्ठ । तो अज्ञान आणि रागीट । अथवा चुकता नीट । संहार करी । । १३-५-७
विश्वाची उत्पत्ती व संहार श्री समर्थांनी कहाणी रूपाने सांगितली आहे .प्रकृती व पुरुष एक प्रेमळ जोडपे आहे । विष्णू किंवा सत्वगुण हा त्यांचा मुलगा ,,विष्णूचा मुलगा ब्रह्मदेव किंवा रजोगुण ! तो जाणीव व नेणीवेचे मिश्रण असते .त्यामुळे तो उतावीळ असतो ,तो खूप प्रजा वाढवतो .व्याप वाढवतो .ब्रह्मदेवाचा मुलगा रूद्र किंवा तमोगुण म्हणजेच रूद्र !तो नेणता असतो ,रागीट असतो .कोणाचे चुकले की संहार करतो ।
मूळपुरुष शिव हा पिता व मूळशक्ती म्हणजे प्रकृती त्यांचा मुलगा म्हणजे विष्णू ,विष्णूचा मुलगा ब्रह्मदेव शिवाचा नातू ,ब्रह्मदेवाचा मुलगा रूद्र हा पणतू ,असे हे कुटुंब ! वंश खूप वाढल्यावर सर्व परस्परांशी खूप भांडू लागले .वडीलांना कोणी ऐकेनासे झाले .अशी कहाणी आपण आजही घडताना पाहतो । समर्थांनी ही कहाणी सांगण्याचा एकच उद्देश की ही कहाणी समजावून घ्यावी ,तिचे मनन करावे , अनुभव घ्यावा ,नि :संदेह व्हावे !
ऐसी कहाणी जो विवरला । तो जन्मापासून सुटला । श्रोता वक्ता धन्य जाला । प्रचितीने । । १३-५ -१६
अशा कहाणीचे मनन करणारा जन्म मरणाच्या चक्रातून मुक्त होतो .धन्य होतो .

सारासार विवेक

सारासार विवेक म्हणजे काय ?
दिसेल ते नासेल । आणि येइल ते जाईल । जे असतचि असेल । तेचि सार । । १३-२-२
जे दिसते ते नासते ,जे येते ते जाते ,ते असार असते .तर जे सदैव असतेच ,ते सार असते ।
आत्मानात्म विवेकात अनात्मा बाजूला सारून आत्मा जाणता येतो .त्यासाठी मूळारंभा पर्यंत म्हणजे मूळमाये पर्यंत जाता येते .त्यासाठी वृत्ती निवृत्त व्हावी लागते .त्यासाठी सारासार विचार करावा लागतो ।
नित्यानित्य विवेक केला । आत्मा नित्यसा निवडला । निवृत्ती रूपे हेत उरला । निराकारी । । १३-२-५
हेत म्हणिजे तो चंचळ । निर्गुण म्हणिजे निश्चळ । सारासार विचारे चंचळ । होऊन जाते । । १३-२-६
नित्यानित्य विवेकाने अंतरात्मा नित्य आहे अशी निवड होते .पण अंतरात्मा चंचळ आहे ,त्या पलिकडेही आपल्याला जायचे आहे अशी जाणीव आपल्याला होते तेव्हा निर्गुण निराकारात जाण्याचा हेतू शिल्लक रहातो .पण हेतू अशाश्वत असतो ,निर्गुण स्वरुप शाश्वत असते .तेव्हा सारासार विचारानेच ते समजते .समर्थ म्हणतात :
चळे म्हणोनि ते चंचळ । न चळे म्हणोनि ते निश्चळ । निश्चळीं उडे चंचळ । निश्चयेसी । । १३-२-७
ज्ञान आणि उपासना । दोनी एकेचि पहाना । उपासनेकरिता जना । जगोध्दार । । १३-२-८
चळते म्हणोनि ते चंचळ असते .चळत नाही म्हणून त्याला निश्चळ म्हणतात .निश्चळात चंचळाला वाव नसतो .अंतरात्म्याचा अनुभव आला तरी तेथे मी म्हणजे चंचळ असतो .त्यामुळे त्याला जरी ज्ञान झाले तरी ते पक्के नसते ,कारण त्या ज्ञानाचे विज्ञान झालेले नसते .विज्ञान होणे म्हणजे संपूर्ण वृत्ती रहित अवस्था येऊन सर्व जाणतेपण विरते .सगळे चंचळ नाहीसे होते तेव्हा ज्ञानाचे विज्ञान होते ।
निर्शता अवघेचि निर्शले । चंचळ तितुके निघोन गेले । निश्चळ परब्रह्म उरले । तेचि सार । । १३-२-१८
असाराचे निरसन करताना असार बाजूला सारले,तर जेवढे अशाश्वत होते तेव्हडे नाहीसे झाले .फक्त निश्चळ परब्रह्म उरते तेच सार असते .जेव्हा मूळप्रकृतीच्या चार पिंडांच्या चार व ब्रह्मांडाच्या चार देहांचा पसारा बाजूला होतो ,तेव्हा शून्य पुढे येते .आणि तेव्हा :
सोहं हंसा तत्वमसी । ते ब्रह्म तूं आहेसी । विचार पाहता स्थिती ऐसी । सहजचि येते । । १३-२-२०
सोहं म्हणजे मी तो आहे .हंसा म्हणजे मी तो आहे .तत्वमसी म्हणजे ते तूच आहेस .अशी स्थिती सारासार विचाराने अनुभवास येते .समर्थ म्हणतात :
साधक असोन ब्रह्म उरले । तेणे वृत्तीसुन्य जाले । सारासार विचारले । येणे प्रकारे । । १३-२-२१
साधकपणे राहून संपूर्ण संगत्याग केला की केवल ब्रह्म उरते .साधकाची अवस्था वृत्तीशून्य होते .सारासार विचाराने हेच साधते .

Thursday, September 23, 2010

आत्मानात्म विवेक

आत्मा कोण अनात्मा कोण । त्याचे करावे विवरण । तेचि आता निरूपण । सावध ऐका । । १३ -१-२
च्यारी खाणी च्यारी वाणी । चौ-यासी लक्ष जीवप्राणी । संख्या बोलिली पुराणी । वर्तती आता । । १३-१-३
चार खाणी ,चार वाणी ,चौ-यांशी प्रकारच्या जीव प्राण्यात श्री समर्थ आत्मा पहायला सांगतात :
दृष्टी मध्ये पाहातो । श्रवणामध्ये ऐकतो । रसने मध्ये स्वाद घेतो । प्रत्यक्ष आता । । १३-१-५
घ्राणामध्ये वास घेतो । सर्वांगी तो स्पर्शतो । वाचेमध्ये बोलवितो । जाणोनी शब्द । । १३-१-६
पाये चालवी हात चालवी । भृकुटी पालवी डोळा घालवी । संकेत खुणा बोलवी । तोचि आत्मा । । १३-१-७
धिटाई लाजवी खाजवी । खोकवी वोकवी थुंकवी। अन्न जेवूनी उदक सेवी । तोचि आत्मा । । १३-१-८
मळमूत्र त्याग करी । शरीर मात्र सावरी । प्रवृती निवृत्ती विवरी । तोचि आत्मा । । १३-१ -९
ऐके देखे हुंगे चाखे । नाना प्रकारे वोळखे । संतोष पावे आणि धाके । तोचि आत्मा । । १३-१ -१०
प्रा.प्र .के .बेलसरे म्हणतात :शरीराला जीवंत ठेवणारी ,ईंद्रियांना चेतना देणारी ,मनाच्या व्यापारांना चालना देणारी ,बुध्दीला विचार करायला लावणारी ,जीवपणे नाना दु:ख भोगणारी ,उद्वेग ,चिंता ,माया ,ममता अनुभवणारी ,जी सूक्ष्म चित्कला ती आत्मा !
जो देहात राहून डोळ्यातून पहातो ,कानाने ऐकतो ,जीभेने स्वाद घेतो ,नाकाने वास घेतो ,त्वचेने स्पर्श ओळखतो ,वाणीने बोलतो ,पायाला चालवतो ,हात हालवतो ,भुवया खाली वर करवतो ,डोळे मिटतो ,खोकायला,हुंगायला,थुंकायला लावतो ,संकेत खुणा करून आपले हेतू स्पष्ट करतो .तोच धीट होतो ,तोच लाजवतो ,मळमूत्राचा त्याग करवतो ,शरीराला सावरतो ,प्रवृती निवृती यांचे विवरण करतो ,तोच आत्मा ! तोच आत्मा ऐकतो ,पाहतो ,हुंगतो ,चाखतो ,आनंद घेतो ,घाबरतो .आनंद ,उद्वेग ,चिंता या सर्वांचा अनुभव घेतो .देहाबद्दल
खरे पणाचा भ्रम निर्माण करतो ।
अनेक पदार्थांबद्दल आसक्ती धरतो ,बरी वाईट कामे देहाकडून करवून घेतो ,तो आत्मा देहात येतो ,राहतो ,देहातून जातो .तोच हसतो ,रडतो ,पश्चात्ताप पावतो ,शेवटी कर्मानुसार तोच भाग्यवान किंवा भाग्यहीन ठरतो .तोच आत्मा धीर ,उदार ,वेडा,शहाणा ,सहनशील होतो ।
आत्मा नस्ता देहांतरी । मग ते प्रेत सचराचरी । देह्संगे आत्मा करी । सर्व काही । । १३-१-२१
येकेविण येक काये । कामा नये वाया जाये । म्हणोनी हा उपाये । देह्योगे । । १३-१-२२
देहात आत्मा नसेल तर देह प्रेत बनते.देहाच्या माध्यमातून आत्मा सर्व काही करतो .दोन्ही पैकी एक नसेल तर दोन्ही वाया जाते .आत्म्या शिवाय देह चालत नाही तर देहा शिवाय आत्मा काही करू शकत नाही .समर्थ म्हणतात :
देह अनित्य आत्मा नित्य । हाचि विवेक नित्यानित्य । । १३-१-२३
पिंडी देह्धर्ता जीव । ब्रह्मांडी देह्धर्ता शिव । ईश्वर तनुचतुष्टये सर्व । ईश्वर धर्ता । । १३-१-२४
त्रिगुणापर्ता जो ईश्वर । अर्धनारी नटेश्वर । सकळ स्रृष्टीचा विचार । तेथून जाला । । १३-१-२५
पिंडाच्या दृष्टीने देह धारण करणारा आत्मा जीव असतो .तर ब्रह्मांडाच्या दृष्टीने विश्व धारण करणारा आत्मा शिव असतो .निर्विकार ब्रह्मात संकल्प उठला,तो स्फुरण रूप असतो ,त्याचे पंचभूतात्मक ,त्रिगुणात्मक अंग ती मूलप्रकृती ,तिच्यातील शुध्द जाणीव तो अंतरात्मा ! यावरून असा निष्कर्ष असा निघतो की :
जड़ तितुके अनित्य । आणि सूक्ष्म तितुके आनित्य । । १३-१-२८

Tuesday, September 21, 2010

समर्थांचा उत्तम पुरुष

ज्ञानी पुरुषाने कोणत्या गुणांचा अभ्यास करावा ?
आपण यथेष्ट जेवणेउरले ते अन्न वाटणे । परंतु वाया दवडणे । हा धर्म नव्हे । । १२-१०-१
तैसे ज्ञाने तृप्त व्हावे । तेची ज्ञान जनास सांगावे । तरतेन बूडो नेदावे । बुडतयासी १२-१० -२
जसे आपण जेवल्यावर उरलेले अन्न दुस-याला देतो तसे आपण आत्मज्ञानाने तृप्त झालो तर तेच ज्ञान दुस-याला द्यावे ,दुस -याला शिकवावे ,जो स्वत : उत्तम पोहोतो व तरतो त्याने बुडणा-याला वाचवावे ,तारावे .समर्थ म्हणतात :
उत्तम गुण स्वये घ्यावे । ते बहुतांस सांगावे । वर्तल्याविण बोलावे । हे शब्द मिथ्या । । १२-१०-३
शरीर परोपकारी लावावे । बहुतांच्या कार्यास यावे । उणे पडो नेदावे । कोणियेकासी । । १२-१०-५
दुस-याच्या दु:खे दुखावावे । परसंतोषे सुखी व्हावे । प्राणी मात्रास मेळवून घ्यावे । ब-या शब्दे । । १२-१०-७
स्वत : उत्तम गुण घ्यावे ,नंतर अनेकांना सांगावे ,पण स्वत : तसे वागल्याशिवाय सांगू नये .कारण नुसत्या शब्दांना अर्थ नसतो .शरीर दस -यावर परोपकार करण्या साठी वापरावे .खूप लोकांच्या उपयोगी पडावे .कोणाला काही मदत कमी पडत असेल तर त्याला मदत करावी .दुस-याचे दु :ख बघून दु :खी व्हावे ,पण दुस-याचे सुख पाहून सुखी व्हावे .खूप लोकांना त्यांनी केलेल्या अन्यायाची क्षमा करावी .दुस-याच्या मनात काय चालले आहे ते ओळखून वागावे .आपल्या भोवतालच्या माणसांची सतत परीक्षा करत असावे .योग्य तेव्हढेच बोलावे ,ताबडतोब उत्तर द्यावे ,रागावू नये ,आळस सोडून खूप प्रयत्न करावा .कोणाचा राग येऊ देऊ नये . दुस-याला नेहमी उत्तम द्यावे .शब्द निवडून बोलावा .आपला संसार सावध करावा .समर्थ म्हणतात :
मरणाचे स्मरण असावे । हरिभक्तीस सादर व्हावे । मरोन कीर्तीस उरवावे । येणे प्रकारे । । १२-१०-१३
आपण एक दिवस मरणार आहोत याची जाणीव ठेवावी .म्हणून हरीभक्तीला सावध असावे ,तयार असावे .त्यामुळे मेल्यावरही आपली किर्ती मागे राहते .
त्तउम गुणी शृंघारला । ज्ञान वैराग्ये शोभला । तोचि एक जाणता भला । भूमंडली । । १२-१०-१७
कीर्ती पाहों जाता सुख नाही । सुख पाहातां कीर्ती नाही । विचारे विण कोठेच नाही । समाधान । । १२-१०-१९
परांतरास न लावावा ढका । कदापि न पडो नेदावा चुका । क्ष्मासीळ तयांच्या तुका । हानी नाही । । १२-१०-२०
उत्तम गुणात प्रामुख्याने आत्मज्ञान ,प्रखर वैराग्य ,गोड भाषण ,पुष्कळांना सुखी करणे या चार गोष्टींचा समावेश होतो .म्हणून नेहमी गोड बोलावे ,दुस -याला आपल्या सारखे मानावे .म्हणजे आपल्याला ज्या गोष्टींनी आनंद होतो ,त्या गोष्टी दुस -यासाठी कराव्या .आपण जसे बोलावे तसे उत्तर येते .म्हणून कठोर व कटू शब्द बोलू नयेत ।
दंभ दर्प अभिमान । क्रोध आणि कठीण वचन । हे अज्ञानाचे लक्षण । भगवतगीतेत बोलिले । । १२-१०-२८
दंभ दर्प अभिमान क्रोध व कठीण वाणी ही अज्ञानाची लक्षणे आहेत असे भगवत गीतेत म्हटले आहे .उत्तम गुणांनी जो शोभून दिसतो तो उत्तम पुरुष असतो .अशा उत्तम ,थोर पुरुषाने लोक संग्रह करावा असे समर्थ सांगतात
आपण आवचिते मरोन जावे । मग भजन कोणे करावे । याकारणे भजनास लावावे । बहुत लोक । । १२-१०-३३
आपण अकस्मात् मरून गेल्यावर भगवंताची भक्ती करणारा कोणी राहणार नाही .म्हणून पुष्कळ लोकांना भजनास लावायला समर्थ सांगतात .लोकसंग्रह करण्या साठी पुढा-याच्या अंगी दोन लक्षणे असावी असे समर्थ सांगतात :
१ रोकड़ी प्रबोधन शक्ती २.पुष्कळ लोकांचे मनोगत हाती घेणे .त्यासाठी महंत कसा हवा ते समर्थ सांगतात :
जे जे जनास मानेना । ते ते जनही मानेना । आपण येकला जन नामा । सृष्टी मध्ये । । १२-१०-४०
परन्तु हे विवेकाची कामे । विवेके करील नेमे । इतर ते बापुडे भ्रमे । भांडोच लागले । । १२-१०-४१
माझेच म्हणणे खरे असे न मानता क्रमाक्रमाने लोकांना शिकवून शेवटच्या पायरीवर नेणे हे लोक संग्रह करणा-या पुढा-याने करावे असे समर्थ सांगतात

Sunday, September 19, 2010

समर्थांचा प्रयत्न वाद

दुर्बल नाचारी वोडग्रस्त । आळसी खादाड रिणग्रस्त । मूर्खपणे अवघे वेस्त । काहीच नाही । । १२-९-१
खाया नाही जेवाया नाही । लेया नाही नेसाया नाही । अंथराया नाही पांघराया नाही । कोंपट नाही अभागी । । १२-९-२
सोयरे नाही धोयरे नाही । इष्ट नाही मित्र नाही । पाहातां कोठे वोळखी नाही । आश्रयेविण परदेशी । । १२-९-३
तेणे कैसे करावे । काये जीवेसी धरावे । वाचावेँ की मरावे । कोण्या प्रकारे । । १२-९-४
एक दुर्दैवी माणूस व करंटा माणूस जो आळशी व खादाड होता ,कर्जबाजारी होता ,धड खायला नव्हते ,जेवायला नव्हते ,अंगावर घ्यायला वस्त्र नव्हते ,अंथरायला नव्हते ,पांघरायला नव्हते ,राहयाला झोपडी नव्हती ,सोयरे धायरे इष्ट मित्र नव्हते .स्वदेशातच परदेशीपणे रहात होता .तो विचारतो :समर्था ,मी काय करू ?कोणती आशा जीवाशी धरू ?कसे जगू ?की मरू ?
त्याला उत्तर देताना समर्थ म्हणतात :
लहान थोर काम काही । केल्यावेग़ळे होत नाही । करंट्या सावध पाही । सदेव होसी । । १२-९-६
अंतरी नाही सावधानता । यत्न ठाकेना पुरता । सुखसंतोषाची वार्ता । तेथे कैची । । १२-९-७
म्हणोंन आळस सोडावा । यत्न साक्षेपे जोडावा । दुश्चित्त पणाचा मोडावा । थारा बळे । । १२-९-८
समर्थ सांगतात की काम कोणतेही असो ,लहान किंवा मोठे ,ते करावे लागते .ते काम चांगले होण्यासाठी प्रयत्न करावा लागतो .त्यासाठी मनात दक्षता घ्यावी लागते ,सावधानता ठेवावी लागते ,सावधानता नसेल तर शेवटपर्यंत प्रयत्न होत नाहीत .दीर्घ प्रयत्न झाला नाही ,तर सुख संतोष होत नाही .म्हणून माणसाने आळस सोडावा ,चिकाटीने प्रयत्न करावा ,मन निराश होऊ देऊ नये ,मन मागे फिरू देऊ नये .त्यासाठी जीवन पध्दती कशी असावी ते समर्थ सांगतात :
प्रात :काळी उठत जावे । प्रात:स्मरामि करावे । नित्य नेमे स्मरावे । पाठांतर । । १२-९-९
सकाळी लवकर उठावे ,उठल्यावर भगवंताचे स्मरण करावे ,पूर्वी पाठ केलेल्याची उजळणी करावी ,नवीन पाठ करण्याचा नियम करावा ,निर्मळ होऊन देवपूजा करावी ,मग फलाहार करावा ,आपला व्यवहार करावा .आपला कोण ,आपला कोण नाही ,ते ओळखावे ,सुंदर अक्षर लिहावे ,वाचताना स्पष्ट वाचावे ,मनन चिंतन करावे .कोणाला काही विचारायचे असल्यास थोडक्यात पण नेमकेपणाने विचारावे ,सांगताना पाल्हाळ लावू नये ,कोणतेही काम दुस-याला पसंत पडेल असे करावे ,आपल्याकडे येणा-याचे समाधान करावे ,बुध्दी चे सामर्थ्य वाढवावे ,ब्रह्मांडाहून मोठे ,विशाल व्हावे असा बुधीचा विस्तार करावा असे समर्थ म्हणतात .

Wednesday, September 15, 2010

प्रापंचिकाचा विषय त्याग कोणता ?

न्याय निष्ठुर बोलणे । बहुतांस वाटे कंटाळवाणे । मळमळ करिता जेवणे विहित नव्हे । । १२-७-१
बहुतीं विषय निंदिले । आणि तेचि सेवित गेले । विषय त्यागे देह चाले । हे तो घडेना । । १२-७-२
श्रोते शंका विचारतात की शास्त्रकार विषयाची निंदा करतात .त्याचा त्याग केल्या शिवाय परमार्थ साधत नाही असे सांगतात .मग प्रापंचिक माणूस व पारमार्थिक माणूस यांच्यात फरक कसा आढळत नाही ?खूप लोक विषयाची व देह्सुखाची निंदा करतात .पण स्वत : विषयाचे सेवन करतात .विषयाचा त्याग केला तर देह चालणार नाही .विषयाचा त्याग केल्याशिवाय परमार्थ होत नाही .मग प्रपंच करणारे खातात ,पितात आणि परमार्थ करणारे उपाशी राहतात का ? माणूस जिवंत राहण्यासाठी विषय त्यागणे शक्य नाही.देह जिवंत आहे तोपर्यंत विषय सोडून जगणारा कोणी या जगात आहे का ?

समर्थ उत्तर देतात :
वैराग्ये करावा त्याग । तरीच परमार्थ योग । प्रपंच त्यागे सर्व सांग । परमार्थ घड़े । । १२-७-९
वैराग्यापरते नाही भाग्य । वैराग्य नाही ते अभाग्य । वैराग्य नस्तां योग्य । परमार्थ नव्हे । । १२-७-१७
प्रत्यये ज्ञानी वीतरागी । विवेकबळे सकळ त्यागी । तो जाणिजे महायोगी । ईश्वरी पुरुष । । १२-७--१८
वैराग्याच्या आधारावर विषयांचा त्याग केला तरच परमार्थ साधतो .त्यामुळे वैराग्यासारखे दुसरे भाग्य नाही .ज्याच्याजवळ अनुभवाचे ज्ञान असते ,आसक्ती सुटलेली असते ,विवेकाने सर्वस्वाचा त्याग केलेला असतो ,तो महापुरुष ईश्वरी पुरुष असतो ।
जो विवेक व वैराग्य या दोंहीनी संपन्न असतो त्याच्या कड़े जाणते लोक ओढले जातात .ज्यांच्या कड़े विवेक व वैराग्य नसते ते निस्तेज ठरतात ,मनात आशा असल्याने मागे पडतात ,वैराग्य भ्रष्ट झाल्याने त्यांचे ज्ञान मिंधे पड़ते ।
प्रापंचिकाने विवेक व वैराग्य कसे जोपासावे ते समर्थ सांगतात :
सबळ विषय त्यागणे । शुध्द कार्याकारण घेणे । विषय त्यागाची लक्षणे । वोळखा ऐसी । । १२-७-२७
सकळ काही कर्ता देव । नाही प्रकृतीचा ठाव । विवेकाचा अभिप्राव । विवेकी जाणती । । १२-७-२८
मर्यादा सोडून असणारे ,प्रमाणाबाहेर जाणारे देहसुख सोडावे ,शरीराचे धारण करण्यास आवश्यक तेच देहसुख सेवावे .असा विषय त्याग प्रापंचिकांनी करावा ।
प्रापंचिकांनी विवेक कसा करावा ?
जे जे घडते त्याचा कर्ता ईश्वर आहे ,प्रकृतीच्या पसा-याला खरे अस्तित्व नाही .असा निश्चय अन्तर्यामी स्थिर करावा .कशाचा त्याग करावा व कशाचा करू नये ते जाणणे म्हणजे प्रापंचिकांचा विवेक !

Monday, September 13, 2010

आत्मनिवेदन

परब्रह्माचा अनुभव येण्यासाठी सर्वात शेवटची भक्ती आहे आत्मनिवेदन !आत्मनिवेदन भक्तीचे तीन प्रकार समर्थांनी सांगितले आहेत .१ .जड़ आत्मनिवेदन २ .चंचल आत्मनिवेदन ३ .निश्चल आत्मनिवेदन .समर्थ म्हणतात :
नाना तत्वे लहान थोरे । मिळोन अष्टही शरीरे । अष्टधा प्रकृतीचे वारे । निघोन जाते । । १२-५-१२
वारे नस्तां जे गगन । तैसे परब्रह्म सघन । अष्ट देहाचे निर्शन । करून पहावे । । १२-५-१३
ब्रह्मपिंड उभार । पिंडब्रह्मांड संहार । दोहि वेगळे सारासार । विमळब्रह्म । । १२-५-१४
निरनिराळी तत्वे एकत्र मिसळतात व पिंडाचे चार व ब्रह्मांडाचे चार असे आठ देह तैयार होतात .पाच महाभूते व त्रिगुण मिळून अष्टधा प्रकृती बनते .अष्टधा प्रकृतीत जाणीव रूपी वायू असतो .ज्याप्रमाणे वारा वहात नसताना आकाश आकाशाच राहते त्याप्रमाणे आठ देहांचा निरास झाला असता फक्त परब्रह्म उरते .पिंड ब्रह्मांडाची उभारणी
व संहारणी कळली की या सर्वाचे सार ,जे कायम शाश्वत असते ,असे शुध्द ,निर्मळ परब्रह्म अनुभवास येते .असे निर्मळ परब्रह्म अनुभवास येण्यासाठी काय करायला हवे असे विचारल्यावर समर्थ आत्मनिवेदन करायला सांगतात .आत्मनिवेदनाचे तीन प्रकार सांगतात :
पदार्थे मने काया वाचा । मी हा अवघाच देवाचा । जड आत्मनिवेदनाचा । विचार ऐसा । । १२-५-१६
चंचळ कर्ता तो जगदीश । प्राणीमात्र त्याचा अंश । त्याचा तोचि आपणास । ठाव नाही । । १२-५-१७
ठावचि नाही चंचळाचा । तेथे आधी आपण कैचा । निश्चळ आत्मनिवेदनाचा । विवेक ऐसा । । १२-५-२०
मी ,माझे सगळे ,माझ्या मालकीच्या सर्व वस्तू ,माझे मन ,काया ,वाचा ,प्रपंच सर्व देवाच्या मालकीचे ही भावना ठेवून जगायाचे ,म्हणजे जड आत्मनिवेदन !
देव कर्ता आहे ,मी कर्ता नाही ,देव माझ्या कडून करवून घेतो आहे अशा विचाराने जगणे म्हणजे चंचळ आत्मनिवेदन !
चंचल मिथ्या आहे त्यामुळे मी पणे वावरणारा चंचळ असल्याने मी माझे नाही ,फक्त परब्रह्म आहे ,असा अनुभव घेणे म्हणजे निश्चळ आत्मनिवेदन ! अशा आत्मनिवेदनाच्या पाय-या चढ़ता चढ़ता निश्चळ परब्रह्माचा अनुभव मिळतो .तेव्हा मनाची धडपड थांबते .सगळे शांत होते .बोलणे थंड पड़ते .

Sunday, September 12, 2010

विवेक आणि वैराग्य

प्रा.के .वि ,बेलसरे विवेक व वैराग्याची व्याख्या करताना म्हणतात :आपले धेय कोणते आपली साधना कोणती ,प्रपंचाचे स्वरुप काय ,जगाचा स्वभाव कसा ,स्वरूपानुभावाची लक्षणे कोणती या प्रश्नांची उत्तरे बुध्दीने आकलन होणे म्हणजे विवेक !तर आपल्या देहासकट सर्व दृश्यांची किंमत आत्मज्ञाना पेक्षा कमी वाटणे,देहातून सुख घेण्याची प्रवृती क्षीण होणे ,हवे नकोपण शांत होणे ,मनाने कोठेही कशातही गुंतून न पडणे म्हणजे वैराग्य !
प्रपंचातील कष्ट ,दु:ख ऐकले ,पाहिले ,अनुभवले की वैराग्य उत्पन्न होते .अनेक संकटे ,अडचणी सोसाव्या लागल्या की त्रासून जाऊन माणूस देशांताराला जातो .प्रपंच सोडून गेलेला माणूस स्वैराचारी ,नष्ट ,भ्रष्ट ,चावट,मोकाट जनावराप्रमाणे होऊ शकतो .म्हणून वैराग्याची आवश्यकता असते .नाहीतर काय होते त्याचे वर्णन समर्थ करतात :
ना प्रपंच ना परमार्थ । अवघे जिणेची जाले व्यर्थ । अविवेक अनर्थ । ऐसा केला । । १२-४-७
हे येके विण येक । तेणे उगाच वाढे शोक । आता वैराग्य आणि विवेक । योग ऐका । । १२-४-११
जर विवेक आणि वैराग्य एकत्र नसेल तर धड प्रपंच साधत नाही व धड परमार्थ ही साधत नाही .त्याचे जीवन वाया जाते .म्हणजेच विवेका शिवाय वैराग्य आणि वैराग्या शिवाय विवेक वाया जातो ,दु ;ख वाढते .विवेक व वैराग्य दोन्ही हातात हात घालून जातात तेव्हा काय होते ते समर्थ सांगतात :
विवेके अंतरी सुटला । वैराग्ये प्रपंच तुटला । अंतर्बाह्य मोकळा जाला । नि :संग योगी । । १२-४-१२
जैसे मुखे ज्ञान बोले । तैसीचि सर्व क्रिया चाले । दीक्षा देखोनी चकित जाले । सुचिश्मंत । । १२-४-१३
आस्था नाही त्रैलोक्याची । स्थिती बाणली वैराग्याची । यत्न विवेक धारणेचि । सीमा नाही । । १२-४-१४
विवेकाने माणसाचा मीपणा सुटतो .वैराग्याने प्रपंचाची आसक्ती सुटते .त्यामुळे असा माणूस आतून बाहेरून मोकळा होतो .बंधन रहित होतो .नि :संग योगी होतो .मग तो बोलतो तशी कृती करतो .त्याची वर्तणूक बघून माणसे चकित होतात .त्याला त्रैलोक्याची सुध्दा आसक्ती रहात नाही .असे त्याचे धगधगीत वैराग्य असते .तो प्रयत्न ,विवेक ,अचाट धारणा अशा गुणांनी युक्त होतो .मग प्रेमरसाने युक्त असे भगवंताचे भजन करतो .ते ऐकून त्याच्या सानिध्यात आलेली माणसे सन्मार्गाला लागतात .कारण त्याच्या अंगी असतो प्रखर विवेक !
प्रखर वैराग्य उदासीन । प्रत्ययाचे ब्रह्मज्ञान । स्नान संध्या भगवत भजन । पुण्यमार्ग । । १२-४-१८
विवेकवैराग्य ते ऐसे । नुस्ते वैराग्य हेकांडपिसे । शब्द ज्ञान येळीलसे । आपणचि वाटे । । १२-४-१९
म्हणौन विवेक आणि वैराग्य । तेचि जाणिजे महदभाग्य । रामदास म्हणे योग्य । साधू जाणती । । १२-४-२०
कसलीही आस नसलेले जळजळीत वैराग्य ,स्वानुभवाचे ब्रह्मज्ञान ,भगवंताचे भजन ,ह्या सर्व गोष्टी विवेक व वैराग्याचे सुंदर जोड़ असताना घडतात .म्हणून विवेक व वैराग्य यांचा संगम होणे थोर भाग्य समजावे असे समर्थ रामदास स्वामी म्हणतात .

Thursday, September 2, 2010

देव कोण ?मी कोण ?

ज्याप्रमाणे संसारात जाणत्याची आवश्यकता असते त्याप्रमाणे परमार्थात सद्गुरुंची आवश्यकता असते .सद्गुरु भेटल्यावर त्यांना काय विचारावे ते समर्थ सांगतात :
सद्गुरुसी काय पुसावे । हेही कळेना स्वभावे । अनन्यभावे येकभावे । दोनी गोष्टी पुसाव्या । । १२ -३ -३
दोनी गोष्टी त्या कोण । देव कोण आपण कोण । या गोष्टीचे विवरण । केलेची करावे । । १२-३-४
समर्थ सांगतात की सद्गुरूंना दोन गोष्टी विचाराव्या .श्रोते विचारतात : त्या कोणत्या ?
समर्थ उत्तर देतात :
मुख्य देव तो कोण । मग आपण भक्त तो कोण । पंचीकर्ण माहावाक्यविवरण । केलेचि करावे । । १२-३-५ या प्रश्नाचे उत्तर देताना समर्थ म्हणतात की यासाठी पंचीकरण व महावाक्यांचा पुन्हा पुन्हा विचार करावा .कारण शाश्वत परब्रह्माचा प्रत्यक्ष अनुभव घेणे हे परमार्थाचे रहस्य आहे .शाश्वत व निश्चळ परब्रह्म परब्रह्म ओळखणे हे परमार्थाचे फळ आहे ।
सारासार विचार केल्यावर असे समजते की दृश्य विश्वातली कोणतीही वस्तू शाश्वत नाही .या सर्वांचे आदिकारण जो परमात्मा त्याला ओळखणे जरूर आहे .या विश्वात निश्चळ ,चंचल असा भेद आढळतो .विश्व मायेचा पसारा आहे ,शाश्वत परब्रह्म या मायेच्या पसा-या पलिकडे आहे .परब्रह्माच्या ओळखीसाठी समर्थ विवेक करायला सांगतात .ते कसे ते सांगताना समर्थ म्हणतात :
पंचभूतिक हे माया । माईक जाये विलया । पिंड ब्रह्मांड अष्ट काया । नासिवंत । । १२-३-११
दिसेल तितुके नासेल । उपजेल तितुके मरेल । रचेल तितुके खचेल । रूप मायेचे १२-३-१२
वाढेल तितुके मोडेल । येईल तितुके जाईल । भूतास भूत खाईल । कल्पांत काळी । । १२-३-१३
मायेचा पसारा पंचभूताचा आहे ,पंचभूतांनी बनलेल्या वस्तू नाशिवंत असतात .त्या दृष्टीने पिंड ब्रह्मांड ,अष्ट देह नाशिवंत असतात .जे जे दिसते ते नाश पावते ,जे जे निर्माण होते ते मरते .जे जे रचले जाते ते खचते .जेव्हा कल्पांत होतो तेव्हा एक एक भूत दुस-या भूतात विलीन होते .शेवटी परब्रह्म शिल्लक उरते .यानंतर समर्थ खरा देव कोण ते सांगताना म्हणतात :
निर्विकार जे निर्गुण । तेचि शाश्वताची खूण । अष्टधा प्रकृती संपूर्ण । नाशिवंत । । १२-३-१९
निर्गुण निर्विकार ही शाश्वताची खूण आहे .दृश्य नाशिवंत आहे असे ओळखले की ते असून नसल्या सारखे होते .सूक्ष्म विचार करत गेले की सार कोणते ,असार कोणते याचा निश्चय होतो .आत्मानात्म विचार मनात ठसायला लागतो .विचारात सूक्ष्मता येते .सूक्ष्मता वाढली की अशाश्वतेचे कवच भेदून शाश्वता पर्यंत पोहोचता येते ।
शाश्वत देव तो निर्गुण । ऐसी अंतरी बाणली खूण । देव कळला मी कोण । कळले पाहिजे । । १२ -३ -२२
देव शाश्वत आहे ,निर्गुण आहे हे अनुभवाने पटते .आता मी कोण याचे उत्तर समर्थ देतात :
मी कोण पाहिजे कळले । देह्तत्व तितुके शोधिले । मनोवृत्तीचा ठाई आले । मी तूं पण । ।१२-३- २३
सकळ देहाचा शोध घेता । मीपणा दिसेना पाहता । मी तू पण हे तत्वता । तत्वी मावळले १२-३-२४
दृश्य पदार्थचि वोसरे । तत्वे तत्व तेव्हा । मी तू पण हे कैंचे उरे । तत्वता वस्तू । । १२-३-२५
मी कोण हे कळण्यासाठी देहातील तत्वांचा शोध घेतला तर उत्पन्न होणा-या वृत्तीत मी तू पणाचे मूळ असते .मी तू पणा पंचतत्वात लीन होतो .एक तत्व दुस-यात लय पावते .शेवटी ब्रह्मवस्तू उरते .समर्थ सांगतात की पंचीकरण ,तत्व विवरण ,महावाक्य चिंतन ,या सर्वांतून एकच अर्थ निघतो की आपण सर्व परमात्म स्वरुप आहोत .समर्थ म्हणतात :
मीपण ते बुडाले । विवेके वेगळेपण गेले । निवृत्ती पदास प्राप्त झाले । उन्मनी पद । । १२-३-२८
विज्ञानी राहिले ज्ञान ।ध्येये राहिले ध्यान । सकळ काही कार्याकारण । पाहोन सांडिले । । १२-३-२९
मीपण नाहीसे होते ,आत्माआत्म विवेकाने वेगळेपण नाहीसे होते ,वृत्तीरहित अवस्था येऊन उन्मनी पद मिळते .ज्ञानाचे विज्ञानात रूपान्तर होते .ध्यान ध्येयमय होते .द्वैत असलेले दृश्य बाजूला सारले जाते .जन्म मरणाचे चक्र थांबते .पाप नाहीसे होते .यम यातनेतून सुटका होते .समर्थ म्हणतात :
जन्म मरणाचे चुकले । पाप अवघेची बुडाले । यमयातनेचे जाले । नि :संतान । । १२-३-३०