Monday, March 14, 2011

देहात्म योग

देह आत्म्याच्या संयोगाने आत्म्याला काय भोगावे लागते ?

आत्मा देहामध्ये असतो | नाना सुख दु:खे भोगतो | सेवटी शरीर सांडून जातो | येकायेकी || १७-६-१ ||

आत्मा देहात रहातो .अनेक सुख दु:खे त्याला भोगावी लागतात .एकाएकी देह सोडून जातो .तरुणपणी देहात ताकद असते तेव्हा अनेक सुख भोगण्याची शक्ती त्याच्यात असते .पण म्हातारपणी शक्ती क्षीण होते ,तेव्हा अनेक दु:खे त्याला भोगावी लागतात .शेवटी हातपाय झाडून प्राण त्यागतो .

देहात्म्याची संगती | काही येक दु:ख भोगिती | चर्फडचर्फडूनि जाती |देहांतकाळी ||१७-६-४ ||

ऐसा दो दिवसांचा भ्रम | त्यास म्हणती परब्रह्म | देहांतकाळी ||१७-६-६ ||

देह आणि आत्म्याची संगती कशी असते ते सांगताना समर्थ म्हणतात :---देह आत्म्याची संगत झाली की काही सुख भागता येते .पण देह सुटताना त्यालाच जीव च्राफाडून मरतो .मनुष्याचे जीवन म्हणजे दोन दिवसांचा भ्रम आहे .त्यालाच लोक परब्रह्म समजतात .दु:खाच्या पसा-याला गोड मानून घेतात देहात्म योगाने अनेक दु:खे भोगावी लागतात ।आयुष्याच्या शेवटी सगळे प्राणी दीनवाणे होउन मरतात. प्रत्येकाच्या आयुष्यात सुख जवाएव्हडे व दु:ख पर्वताएवढे असते .मना विरुध्द गोष्टी घडतात .जिवलगांची ताटातूट होते .झोपेच्या वेळेस ढेकूण ,पिसवा त्रास देतात .जेवताना माश्या पदार्थावर बसतात .उंदीर धान्याची नासाडी करतात .उवा ,चामवा असे आंगच्या कातड्यात शिरणारे प्राणी असतात .किडे ,गोचीड गांधील माशा कानटे सर्प अशा अनेक प्राण्यात एकमेकांविषयी वैर असते . सर्वांना दु:ख भोगावे लागते .चौर्याशी लक्ष जीवयोनी असलेले प्राणी एकमेकांना खाउन आपली उपजीविका करतात .

अंतरात्मा जीवात रहायला आला की त्याला सगळी सुख दु:खे भोगावी लागतात .माणूस जीवनात सतत चरफडतो ,रडतो ,दु:खाने विव्ह्ळून प्राण देतो .सामान्य माणूस या जीवात्म्याला परब्रह्म मानतो .पण परब्रह्म शास्वत असल्याने ते कधी जात नाही ,येत नाही . ते कोणाला दु:ख देत नाही .निंदा स्तुती त्याला स्पर्श करू शकत नाही .

अंतकाळी माणसाची अवस्था कशी असते ?

कठीण दु:ख सोसवेना | प्राण शरीर सोडिना | मृत्य दु;ख सगट जना | कासावीस करी || १७-६-२७ ||

नाना अवेवहीन जाले | तैसेची पाहिजे वर्तले | प्राणी अंतकाळी गेले | कासावीस होउनी ||१७-६-२८ ||

रूप लावण्य अवघे जाते |शरीर सामर्थ्य अवघे राहते |कोणी नस्तां मरते | आपद आपदो ||१७-६-२९||

अंतकाळ आहे कठीण | शरीर सोडिना प्राण | बराद्यासारखे लक्षण | अंतकाळी || १७-६-३२ ||

माणसाला कठीण दु:ख सोसवत नाही .प्राण जाता जात नाही .मरण काळाचे दुख सर्वांनाच सारखेच कासावीस करते .कोणाचे रोगाने अथवा अपघाताने अवयव निकामी होतात .अशा अवयव हीन अवस्थेत माणसाला व्यवहार करावे लागतात .माणसाचे रूप ,सौंदर्य ,सामर्थ्य नाहीसे होते .जवळ कोणी नसताना अनेक यातना भोगाव्या लागतात .त्याची अवस्था दीनवाणी बनते .अंतकाळ काठीन असतो कारण जीव वासनेत गुंतलेला असतो .प्राण शरीर सोडत नाही .म्हणूनच समर्थ साधक कोण हे सांगताना म्हणतात :

भोगून अभोक्ता म्हणती | हे तों अवघेची फजिती | लोक उगेच बोलीती |पाहिल्याविण || १७-६-३१ ||

भोग भोगताना त्यापासून अलिप्त राहणे ही सामान्य गोष्ट नाही .देहदु:ख आणि दारिद्र भोगताना त्यापासून मनाने अलिप्त रहाणे ,भगवंताला दोष न देता आपले अनुसंधान सांभाळतो तो खरा साधक !

अजपा जप

अजपा जप म्हणजे काय ?

कोणतेही ईद्रीय किंवा माला वगैरे स्थूल साधनांचा वापर न करता नैसर्गिक श्वासोश्वासावरजे जपाचे मानसिक अनुसंधान राहते त्याला अजपा गायत्री म्हणतात .अजपा म्हणजे जपच परंतु तो अ जप = यत्न न करता स्वाभाविकतेने आपोआप झालेला जप . त्यास गायत्री म्हणतात .हंस: किंवा हंसो या मंत्राला अजपा म्हणतात .जेव्हा आपण श्वास घेतो ,बाहेरची हवा आंत घेतो तेव्हा सो कार होतो .जेव्हा श्वास बाहेर सोडतो तेव्हा हं कार होतो .सो कार शक्ती रूप तर हंकार शिवरूप होतो .सोहं ,ओंकार दोन्ही एकच ,एकरूप असतात .सोहं प्रणव रूप असतो सर्व देहाला ,सर्व अवयवांना तो व्यापून असतो .ह्रदयात असतो .स्वरसाधना करताना कुंभक करून अजपा जपता येतो .अखंड नामस्मरण करणा-यांना अजपा साधता येते .समर्थ म्हणतात :

येकवीस सहस्र सासें जपा |नेमून गेली ते अजपा |विचार पाहता सोपा | सकळ काही ||१७-५-१ ||

आपण एका दिवसात म्हणजे २४ तासात २१६०० श्वास प्रश्वास घेतो .त्या श्वास प्रश्वासाबरोबर सोहं असा सूक्ष्म ध्वनी सहज निघतो .त्याचा उच्चार करावा लागत नाही .धरिता सो सोडिता हं म्हणजे श्वास आत घेताना सो [तो ] श्वास सोडताना हं [ अहं ] असा अति सूक्ष्म ध्वनी सहज होतो त्याचे सतत अनुसंधान ठेवणे म्हणजे अजपाजप !

अजपाची उपासना कशी करायची ?

येकांती उगेच बैसावे | तेथे हे समजोन पहावे |अखंड ध्यावे सांडावे |प्रभंजनासी ||१७-५-६ ||

येकांती मौन्य धरून बैसे | सावध पाहाता कैसे भासे |सोहं सोहं ऐसे |शब्द होती ||१७-६-७ ||

उच्चारावीण जे शब्द | ते जाणावे सहज शब्द | प्रत्याय येती परंतु नाद | कांहीच नाही || १७-५-८ ||

एखाद्या निवांत ठिकाणी बसून ,मन स्वास्थ ठेवून ,कोणतेही विचार येउ नं देता विचार पूर्वक पहावे .प्रभंजन म्हणजे सोसाट्याचा वारा .येथे अर्थ श्वास प्रश्वास .मनातील सर्व कल्पना बाजूला सारून फक्त अखंड येणा-या जाणा-या वायूवर लक्ष ठेवावे .

एकांतात मौन धरून बसावे असे सांगितले.अजपाचा अभ्यास समर्थांना सत्पुरुषाच्या सहवासात राहून करणे अपेक्षित आहे .तेथेच पूर्ण एकांत ,मौन ,सावधपणे पाहण्याचे तीन टप्पे पार पाडता येतात .

पूर्ण एकांतात मौन धरून श्वासोच्छवासाकडे एकाग्रतेने पाहिले तर श्वासाच्या जाण्यायेण्यातून सोहं असा स्पष्ट शब्द कोणताही प्रयत्न न करता ऐकू येणे हा सहजशब्द

आपल्या जन्मापासून सोहं हा सहज शब्द आपल्या बरोबर असतो .त्या शब्दांचा उच्चार झालेला समजतो पण त्याला नाद नसतो .नाद कंठापासून निघून काही वेळ टीकतो .

तो शब्द सांडूनी बैसला | तो मौनी म्हणावा भला | योगाभ्यासाचा गल्बला |याकारणे || १७-५-९ ||

येकांती मौन्य धरून बैसला | तेथे कोण शब्द आला | सोहं ऐसा भासला |अंतर्यामी ||१७-५-१० ||

ज्याला सोहं सोहं हे सहज शब्द थांबवता येतात तो खरा मौनी असतो .बसला या शब्दात आसनास्थित जो होउन बसतो तो उत्तम मौनी असतो .सोहं : स: म्हणजे तो ,अहं आत्मा हा जप सहज होत असताना कुंभक होतो .कुंभक होता होता साधक निर्विकल्प समाधीत जातो .म्हणून तो मौनी असतो .सोहं सोहं शब्द मन संकल्प शून्य स्थितीत ऐकू येतो .तो कल्पनेचा खेळ नाही .कल्पना विरहित स्थितीतील शब्द आहे .

सर्व सजीवांमध्ये श्वास प्रश्वासा बरोबर अजपा चालतो .ही विनासायास चालणारी अजपा जाणत्यांना कळते .नेणात्यांना कळत नाही .


अध्यात्म सांगणारा वक्ता

अध्यात्म सांगणारा वक्ता कसा असावा ? कसा असू नये?

अध्यात्म सांगणारा वक्ता स्वच्छ बुद्धीचा असावा .त्याच्या विचारात घोटाळा असू नये .अध्यात्म ग्रंथात येणा-या कोणत्याही शब्दाच्या अर्थाविषयी त्याने साशंक असू नये .त्याला त्या शब्दांची संकल्पना स्वच्छ असावी .त्यासाठी त्याच्या बुद्धीची तयारी चांगली असावी .त्याला स्वत:ची प्रचीती आलेली असावी .

जेव्हा अनाधिकारी व्यक्ती अध्यात्म सांगू लागते तेव्हा काय होते ते समर्थ सांगतात :

पुढे धरिता मागे पेंचला | मागे धरिता पुढे उडाला | ऐसा सांपडतचि गेला | ठाई ठाई || १७-४-३ ||

आपणची बोलिला संव्हार | आपणची बोलिजे सर्वसार | दुस्तर मायेचा पार | टाकीला पाहिजे || १७-४-५ ||

अनाधिकारी व्यक्तीने अध्यात्म सांगणे सुरु केले तर तो परस्पर विरोधी विधाने करतो .नंतर तो त्यानेच केलेल्या विधानांनी अडचणीत येतो .

तो एकीकडे म्हणतो सर्व नाशवंत आहे .दुसरी कडे म्हणतो सर्व काही सार आहे .अशा परस्पर विरोधी विधानांनी श्रोत्यांचा गोधळ उडतो .

अधिकारी व्यक्तीचे विवरण असे असते की तरून जाण्यास कठीण असलेली मायानदी माणसाला पार करून जाता येईल ।त्यासाठी त्याला सूक्ष्म तत्वांचे स्वरूप स्पष्टपणे समजलेले असते .समर्थ सांगतात :

ब्रह्म कसे मूळमाया कैसी | अष्टधा प्रकृती शिवशक्ती कैसी | षडगुणैश्वराची स्थिती कैसी |गुणसाम्याची||१७-४-७ ||

अर्धनारी नटेश्वर |प्रकृती पुरुषाचा विचार | गुणक्षोभिणी तदनंतर | त्रिगुण कैसे || १७-४-८ ||

ब्रह्म कसे आहे ,मूळमाया कशी आहे ? अष्टधा प्रकृती म्हणजे काय ?शिवशक्ती कशी आहे ? गुणक्षोभिणी ,त्रिगुण कसे असतात ? वाच्यांश आणि लक्ष्याश यांचे प्रकार कोणते ?

अशा अनेक प्रश्नांचा सूक्ष्म विचार जो करतो ,तो खरा वक्ता ! खरा वक्ता पाल्हाळ लावत नाही .बोललेले पून्हा बोलत नाही .पण ज्या परब्रह्म प्राप्तीने वाणी कुंठीत होते ,त्या परब्रह्माची कल्पना हा वक्ता श्रोत्यांपर्यंत पोहोचवतो .

अध्यात्म सांगणारा वक्ता कसा असू नये ?

अनाधिकारी व्यक्ती परस्पर विरोधी विधाने करतो .त्यामुळे तो स्वत: अडचणीत येतो .त्याचे बोलणे प्रचीतीचे नसते त्यामुळे तो निर्भय पणे सत्य सांगू शकत नाही .सार असाराची निवड करू शकत नाही त्यामुळे श्रोत्यांची समजूत तो पटवू शकत नाही .आपण ज्ञानी असा अभिमान तो धरतो .भ्रमाला परब्रह्म ,व परब्रह्माला भ्रम म्हणतो ..असा वक्ता असू नये .

आत्मज्ञान साध्य करण्याचा चार पाय-या

आत्मज्ञान साध्य करण्याच्या चार पाय-या कोणत्या ?

आत्मज्ञान साध्य करण्याच्या चार पाय-या आहेत : श्रवण ,मनन ,निदिध्यासन आणि रोकडा

आत्मसाक्षात्कार ! समर्थ म्हणतात :

श्रवण मननाचा विचार | निजध्यासे साक्षात्कार | रोकडा मोक्षाचा उधार | बोलोची नये ||१७-३-३ ||

जे श्रवण केले ते मनन करून विचार वाढवावा .त्यानंतर जे मिळवायचे आहे [माणसाचे सर्वश्रेष्ठ ध्येय परब्रह्माची प्राप्ती ] त्याचा निदिध्यास धरून साक्षात्कार करून घ्यावा .ह्याची देही ह्याची डोळा ,ह्याची जन्मात मोक्षप्राप्ती करून घ्यावी .आत्मसाक्षात्काराने रोकडी प्रचीती घ्यावी असे समर्थ सांगतात .पुढील जन्मात मोक्षप्राप्ती करून घेउ अशी उधाराची भाषा बोलू नये असे समर्थांचे सांगणे आहे ,कारण पुढचा जन्म कोणता मिळेल ते सांगता येत नाही .

समर्थ पोथी सांगायला आरंभ करत आहेत हे पाहून शिष्य ही पोथ्यांची वेष्टणे काढू लागले , तेव्हा समर्थ सांगतात :

थांबा थांबा ऐका ऐका | आधीच ग्रंथ सोडू नका | सागितले ते ऐका | सावधपणे ||१७-३-१||

श्रवणामध्ये सार श्रवण | ते हे अध्यात्म निरुपण | सूचित करुनी अंत:करण | ग्रंथामध्ये विवरावे ||१७-३-२ ||

समर्थ सावधपणे ग्रंथ वाचायला सांगत आहेत .

श्रवण मनन निदिध्यास व साक्षात्कार हा मोक्षाचा रोकडा उपाय आहे .उधारीचा नाही .हा विचार जेव्हा कळतो तेव्हा अनुमान उरत नाही .मूळमायेच्या पलीकडे हरीसंकल्प [स्फुरण ] असते .तेथे आपल्याला उपासनेने पोचायचे असते .तेथे पोचल्यावर म्हणजे ब्रह्मप्राप्ती झाल्यावर ग्रंथ बाजूला सारा असे समर्थ सांगतात .ग्रंथ वाचून ऐकून त्याप्रमाणे आचरण करायला सांगतात .श्रवण आणि श्रावणाचे मनन केले तर अंत:कर्ण शुध्द होते .सारासार विचाराने तत्वझाडा करता येतो .तत्वझाडा केल्यावर मी कोण ?

देव कोण ? ते कळते .आत्मसाक्षात्कार होतो .परब्रह्माची प्राप्ती होते .

शिवशक्ती स्वरुप

शिवशक्ती चे स्वरुप कसे आहे ?

मूळ परब्रह्म जे शाश्वत आहे ,निर्विकार ,संत ,निर्मळ ,अचल ,निश्चल आहे ,त्यात स्फुरण स्फुरले .त्या स्फुराणाला च चैतन्य म्हणतात .तेथे गुणसाम्य असते .म्हणजे त्रिगुण समान प्रमाणात ,सूक्ष्म रूपात विभागलेले असतात .

निश्चळी स्मरण चेतले | त्यास चैतन्य ऐसे कल्पिले | गुणसमानत्वे जाले |गुणसाम्य ऐसे ||१७-२-६ ||

त्या स्फुरणालाच अर्धनारी नटेश्वर ,षडगुणेश्वर ,आदिशक्ती ,शिवशक्ती म्हणतात .

गगनी आली अभ्रछाया | तैसी जाणिजे मूळमाया | उद्भव आणि विलया | वेळ नाही ||१७-२-७ ||

निर्गुणी गुणविकारू | तोचि षड्गुणैश्वरू | अर्धनारीनटेश्वरू | त्यास म्हणिजे ||१७-२-८ ||

आदिशक्ती शिवशक्ती | मुळी आहे सर्वशक्ती | तेथून पुढे नाना वेक्ती | निर्माण जाल्या ||१७-२-९ ||

तेथून पुढे शुध्द सत्व | रजतमाचे गूढत्व | तयास म्हणिजे महततत्व | गुणक्षोभिणी ||१७-२-१० ||

आकाशात ज्याप्रमाणे अभ्र म्हणजे ढग येतात ,ते आकाश झाकतात .त्याप्रमाणे परब्रह्मात स्मरण रूपाने ,स्फुरण रूपाने मूळमाया निर्माण झाली .ती निर्माण होण्यास ,लयाला जाण्यास वेळ लागत नाही .

निर्गुणात जो मी एकटा आहे ,बहु व्हावे या संकल्प रूपाने गुणविकार निर्माण झाले .त्याला षडगुणैश्वर किंवा अर्धनारीनटेश्वर म्हणतात .त्यालाच आदिशक्ती ,शिवशक्ती सर्वशक्ती म्हणतात .त्यांच्यातूनच अनेक दृश्य पदार्थ निर्माण होतात .

मूळमायेतून शुद्धसत्व निर्माण होते .त्यात रजोगुण ,तमोगुण गुप्तपणे असतात .त्यामुळे तेव्हा त्याला महत् तत्व किंवा गुणक्षोभिणी म्हणतात .प्रश्न असा येतो की मूळमायेत व्यक्ती आकार नसतो .मग शिवशक्ती कसे म्हटले जाते ?

ही गोष्ट स्पष्ट करण्यासाठी समर्थांनी बी व फळाचे उदाहरण दिले आहे .फळामध्ये बी असते . बी फोडली तर बी मध्ये फळ नसते .पण बी पेरले ,ते उगवले ,तर बी पासून तयार झालेल्या वृक्षाला फळे लागतात .तसे पिंडा मध्ये नर नारी असा भेद असतो म्हणजे मूळामध्ये भेद असला पाहिजे .मूळमायेत असा भेद असला पाहिजे .म्हणून मूळमायेला शिवशक्ती म्हटले आहे .

देहसंबंधाने आपल्याला स्त्री व पुरुष असा भेद दिसतो .देहाचा संबंध संपला की हा भेद नाहीसा होतो .समर्थ म्हणतात :

पुरुषास स्त्रीचा विश्वास |स्त्रीस पुरुषाचा संतोष | परस्परे वासनेस | बांधोन टाकिले || १७-२-२९ ||

ऐसी परस्परे आवडी | स्त्री पुरुषाची माहां गोडी | हे मुळीहून चालली रोकडी | विवेके पहावी ||१७-२-३१ ||

पुरुषाला स्त्रीचा विश्वास वाटतो .स्त्रीला पुरुषाचा संतोष असतो .अशा रीतीने स्त्री पुरुष एकमेकांना बांधून हे ठेवतात . परस्परांमध्ये असलेले आकर्षण मूळमायेपासून ,शिवशक्ती पासून चालत आले आहे .असे सूक्ष्म विवेकाने कळते .

मुळी शिवशक्ती खरे |पुढे झाली वधुवरे |चौ-यांशी लक्ष विस्तारे | विस्तारलीजे ||१७-२-३३ ||

आरंभी मुळात असलेली शिवशक्ती नवरा बायको झाली .वं ८४ लक्ष जीव योनिं चा विस्तार त्यांनी घडवून आणला .



देव बलात्कार म्हणजे काय ?


समर्थांनी १७ . ला देव बलात्कार असे नाव का दिले ?

सर्व देहांच्या अंतर्यामी राहणारा ,वास करणारा अंतरात्मा म्हणजे देव .तो निर्गुण ,सुख दु:खाचा स्पर्श

न होणारा ,साक्षीपणे पाहणारा ,असा आहे .जेव्हा तो देहात रहायला येतो ,तेव्हा ,समर्थ म्हणतात :

देह देउळामध्ये बैसला | न भजता मारितो देहाला | म्हणौनि त्याच्या भेणे तयाला | भजती लोक ||१७-१-६ ||

जे वेळेसी भजन चुकले |तें तें तेव्हा पछ्याडीले | आवडीने भजू लागले | सकळ लोक ||१७-१-७ ||

जे जे जेव्हा आक्षेपिले | ते ते तत्काळचि दिधले | त्रैलोक्य भजों लागले | येणे प्रकारे ||१७-१-८ ||

पाचा विषयांचा नैवेद्य | जेव्हा पाहिजे तेव्हा सिद्ध | ऐसे न करितां सद्य \ रोग होती ||१७-१-९ ||

जेणे काळे नैवेद्य पावेना | तेणे काळे देव राहेना | भाग्य वैभव पदार्थ नाना | सांडून जाते ||१७-१-१० ||

देहात रहायला आल्यावर देहाच्या सहवासाने मूळचा संगरहित असलेला आत्मा संगसहित बनतो । पांच विषयांचा नैवेद्य ग्रहण करून पांच विषयांचा नैवेद्य ग्रहण करून तो सुख भोगतो ।पांच विषयांचा नैवेद्य मिळाला नाही तर दु:ख भोगतो ।म्हणजे संगरहित असलेला अंतरात्मा संगसहित बनतो ।सुख दु:खे

त्याला जबरदस्तीने भोगावी लागतात .हाच देवावर झालेला बलात्कार आहे असे समर्थ या समासात समजावून सांगतात म्हणून समर्थांनी ह्या समासाला देव बलात्कार असे नाव दिले आहे .


Tuesday, March 8, 2011

पंचभूते गेल्यावर काय उरते ?

पंचभूते गेल्यावर काय उरते ?

पंचभूते चाले जग |पंचभूतांची लगबग | पंचभूते गेलिया मग |काय आहे ||१६-१०-१ ||

श्रोता वक्तयास बोले | भूताचे महिमे वाढविले | आणि त्रिगुण कोठे गेले | सांगा स्वामी ||१६-१०-२ ||

श्रोता विचारतो ,पंचभूते विकारी आहेत .ती गेल्यावर काय शिल्लक राहते ? त्रिगुण कोठे गेले ?

अशी शंका विचारल्यावर. समर्थ उत्तर देतात :

अंतरात्मा पाचवे भूत | त्रिगुण त्याचे अंगभूत |सावध करूनिया चित्त |बरे पाहें ||१६-१०-३ ||

स्वामी समर्थ सांगतात की अंतरात्म्याला पाचवे भूत समजावे .त्यातच त्रिगुण असतात .अंतरात्म्या पासून

वायू झाला .वायू पासून अग्नी प्रगट झाला .अग्नी पासून पाणी ,पाणी अळून पृथ्वी झाली .

पंचाभूतांमध्ये समतोल कसा राखला जातो ?

जीवन आवघे डबाबिले | ते रविमंडळे आळले | वन्ही वायोचेनि जाले | भूमंडळ || १६-१०-७ ||

वन्ही वायो रवी नस्तां |तरी होते उदंड सीतळता |ते सीतळते मध्ये उष्णता | येणे न्याये ||१६-१०-८ ||

आवघे सीतळचि असते |तरी प्राणी मात्र मरोन जाते | आवघ्या उष्णेचि करपते | सकळ काही ||१६-१०-१०||

भूमंडळ आळोन गोठले | ते रविकिर्णे वाळोन गेले | मग सहजची देवे रचिले | उपायासी ||१६-१०-११ ||

म्हणोनि केला पर्जन्य काळ |थंड जाले भूमंडळ |पुढे उष्ण काही सीतळ | सीतकाळ जाणावा ||१६-१०-१२ ||

सीतकाळे कष्टले लोक | कर्पोन गेले वृक्षादिक | म्हणोन पुढे कौतुक |उष्म काळाचे ||१६-१०-१३ ||

त्याही मध्ये प्रात:काळ |माध्यान्हकाळ सायंकाळ |सीतकाळ उष्णकाळ |निर्माण केले ||१६-१०-१४ ||

जिकडे तिकडे पसरलेले पाणी सूर्याच्या उष्णतेने घट्ट झाले .व पृथ्वी तयार झाली . वायू ,अग्नी ,

सूर्य नसते तर पृथ्वी थंड राहिली असती .म्हणून सूर्याने उष्णता निर्माण केली .अग्नीने निर्माण

केलेली उष्णता पाण्यात सौम्य होते ..पाण्याने निर्माण केलेला गारठा सूर्य सौम्य करतो .त्यामुळेच

जिवंत पिंड तयार होतो .नुसता गारठा असता प्राणी जीबंत राहिले नसते .नुसती उष्णता असती

तर पृथ्वी शुष्क झाली असती .म्हणून पावसाळा निर्माण केला .थंडीने लोकांना कष्ट होतात

म्हणून उन्हाळा निर्माण केला .रोज सकाळ ,दुपार ,संध्याकाळ असे थंड ,गरम ,थंड असे काळ

निर्माण झाले ।जेव्हा कल्पांत होतो तेव्हा पंचमहाभूते अंतरात्म्यात विलीन होतात .

अंतरात्म्याचे स्तवन का केले आहे ?

वायूचे मूळ अंतरात्मा आहे .अंतरात्मा म्हणजे परब्रह्माला झालेले प्रथम स्फुरण मूळमाया ! झालेल्या सर्व

वस्तूंमध्ये अंतरात्मा सर्वात वडील किंवा मोठा आहे . म्हणून तो महदभूत आहे .

निश्चळामध्ये बदलण्याचा आरंभ प्रथम स्फुरणाने झाला .तो स्फुरण रूप संकल्प हे अंतरात्म्याचे

शुध्द रूप आहे .मूळ पराब्र्ह्मात अगदी पहिले झालेले स्फुरण हे अंतरात्म्याचे लक्षण आहे .

सर्व भूतांमध्ये परम श्रेष्ठ असणारा अंतरात्मा पिंड ब्रह्मांडा चा कारभार घडवून आणतो ..तोच विश्वाला

जीवन देणारे चैतन्य असतो .तो अतिशय चपळ ,सूक्ष्म आहे ,गतिमान आहे ,तोच सर्वांत कोणतेही कार्य

घडवतो .पण तो स्वत: कोठेही दिसत नाही ,आढळत नाही ,पिंडात ब्रह्मांडात तो व्यापून आहे ,

अनेक प्रकारांच्या देहात तो आढळतो .

अंतरात्मा कोणते कार्य करतो ?

शब्द ऐकोन समजतो | समजोन प्रत्योत्तर देतो | कठीण मृद सीतोष्ण जाणतो | त्वचेमध्ये || १६-७ -१३ ||

नेत्रीं भरोन पदार्थ पाहाणे | नाना पदार्थ परीक्षणे | उच नीच समजणे | मनामध्ये ||१६-७-१७ ||

क्रूर दृष्टी सौम्य दृष्टी | कपटदृष्टी कृपा दृष्टी | नाना प्रकारच्या दृष्टी |भेद जाणे ||१६-७-१८ ||

जिव्हे मध्ये नाना स्वाद | निवडू जाणे भेदाभेद | जे जे जाणे ते ते विषद | करूनी बोले ||१६-७-१९ ||

उत्तम अन्नाचे परिमळ | नाना सुगंध परिमळ | नाना फळांचे परिमळ |घ्राणेद्रीय जाणे ||१६-७-२० ||

जिव्हेने स्वाद घेणे बोलणे | पाणी ईद्रीय देणे घेणे | पाद ईद्रीये येणे जाणे |सर्वकाळ ||१६-७-२१ ||

शिस्न ईद्रीय सुरतभोग |गुदईद्रीय मलोत्सर्ग | मने करूनी सकल संग | कल्पून आहे ||१६-७-२२ ||

शब्द ऐकला की आत्म्याला त्याचा अर्थ समजतो ,अर्थ समजून तो प्रश्नाचे उत्तर देतो .त्वचेने आत्म्याला

मऊ ,कठीण ,थंड ,गरम कळते . आत्मा डोळ्याने पदार्थ पाहातो .त्याची परीक्षा करतो .कोणती

वस्तू कशी आहे ते मनाने समजतो .नाकाने उत्तम वासाचे सुगंध जाणतो ., सुगंधी फळांचे सुगंध

नाकाने जाणतो .जिभेने स्वाद घेणे ,बोलणे ,हातांनी देणे ,घेणे ,पायांनी जाणे येणे ,जननेद्रीयानी

काम सुख घेणे ,गुदाने मलोत्सर्ग करणे ,मनाने सर्व सांग कल्पना करून पाहाणे या आणि अशा

प्रकाराचे व्यापार एकटा अंतरात्मा करतो .

१४ विद्या ,६४ कला ,चतुर पणाच्या कला ,वेद शास्त्र पुराणाचे रहस्य अंतरात्म्या मुळेच शक्य होतात .

जगातील आचार ,परमार्थातील सारासार विचार ,प्रपंच व परमार्थ यांचे निश्चित ज्ञान अंतरात्माच

करून देतो .अनेक प्रकारची मते ,त्यांच्यातील भेद ,अनेक प्रकारचे वाद ,संवाद ,अनेक प्रकारचे

निश्चित निर्णय ,अनेक प्रकारचे .भेदाभेद अंतरात्माच करतो .या चंचल विश्वाचे मुख्य तत्व

अंतरात्मा आहे .त्याचा एकट्याचा विस्तार झाला . त्याची अनेक व्यक्त रूपे झाली .लिहिणे ,

वाचणे ,पाठांतर करणे ,विचारणे ,सांगणे या सगळ्या गोष्टी अंतरात्म्याच्या प्रेरणेने होतात .

अंतरात्मा सुखाने आनंदतो ,दु:खाने कष्टी होतो .तो अनेक प्रकारचे देह धरतो ,सोडतो .असा हा

अंतरात्मा सर्व देहांना चालवणारा ,जीवन देणारा आहे .

श्री मारुती स्तवन

वायू नंदन मारुती रायाचे स्तवन समर्थ का करतात ?

मारुती राय म्हणजे हनुमान ! वायूचा मुलगा . श्रीरामाचा सर्वश्रेष्ठ भक्त ! श्रीरामाच्या स्मरणामध्ये त्यांचे

तन आणि मन अखंड गुंतलेले होते .समर्थ म्हणतात :

हनुमंतास बोलिजे प्राणनाथ |येणे गुणे हा समर्थ | प्राणेवीण सकळ व्यर्थ | होत जाते ||१६-६-२६ ||

मागे मृत्य आला हनुमंता | तेव्हा वायो रोधला होता | सकल देवास आवस्ता | प्राणांत मांडले ||१६-६-२७ ||

सकल देवे मिळोन | केले वायोचे स्तवन | वायो प्रसन्न होउन | मोकळे केले ||१६-६-२८ ||

म्हणोनि प्रतापी थोर | हनुमंत ईश्वरी अवतार | त्याचा पुरुषार्थ सुरवर | पाहातचि राहिले ||१६-६-२९ ||

देव कारागृही होते | हनुमते देखे अवचिते | संव्हार करूनी लंकेभोवते | विटंबुनि पाडिले ||१६-६-३० ||

उसिणे घेतले देवांचे | मूळ शोधिले राक्षसांचे |मोठे कौतुक पछ्यकेताचे |आश्चर्य वाटे ||१६-६-३१ ||

रावण होता सिंहासनावारी | पुढे जाउन ठोसरे मारी | लंकेमध्ये निरोध करी | उदक कैंचे ||१६-६-३२ ||

देवास आधार वाटला | मोठा पुरुषार्थ देखिला | मनामध्ये रघुनाथाला | करुणा करिती ||१६-६-३३ ||

दैत्य आवघे सहारिले | देव तात्काळ सोडिले | प्राणीमात्र सुखी जाले | त्रैलोक्य वासी ||१६-६-३४ ||

हनुमंताला प्राणनाथ म्हणतात ।त्यावरून त्याचे किती सामर्थ्य आहे ते श्री समर्थ लक्षात आणून

देतात ।मागे हनुमंत फळ आहे असे वाटून सूर्याच्या दिशेने झेपावला ,तेव्हा ईद्राला भयं वाटले .

त्याने हनुमंतावर वज्र फेकले .हनुमंत बेशुध्द झाला .ते बघून त्याचा पिता वायू रागावला .वायूने

सर्वांचे प्राण आकर्षून धरले .देव घाबरे झाले .देवांनी एकत्र येउन वायूची स्तुती केली .वायू प्रसन्न

झाला .सर्वांचा प्राण मोकळा झाला .असा मोठा प्रतापी हनुमंत लंकेत गेला असता त्याने देवांना

तेथे पाहिले .त्याने राक्षसांची विटंबना केली .त्यांना मारून लंकेभोवती टाकले .राक्षसांची पाळेमुळे

खणून काढली .रावण सिंहासनावर बसला होता .मारुती तेथे गेला .त्याला ठोसे मारले .लंकेत

निरोध केला .पाणी मिळेनासे झाले .देवांनी श्री रामाची करुणा भाकली .सगळे दैत्य मारून

देवांना सोडविले .

म्हणून समर्थ मारुती रायाचे स्तवन करतात .

अग्नी स्तवन

श्री समर्थ अग्नीचे स्तवन का करतात ?

भारतीय संस्कृतीत अग्नीला देवांचा प्रतिनिधी मानतात .अग्नीला दिलेले देवांना पोहोचते असा विश्वास

लोकांना वाटतो .अग्नीने माणसाच्या शरीरातील क्रिया चालतात .अग्नी अत्यंत पवित्र आहे .तो सर्वांचा

संहार करतो .अग्नी रामाचा सासरा ,जानकीचा पिता आहे .तो विश्व व्यापतो ,विश्वाचे पोषण करतो

.अग्नीच्या मुखाने सर्व देवांना यज्ञातील हविर्भाग पोहोचतो .शिंच्या तप:श्चर्येला तो फळ देतो .अंधाराचे

थंडीचे,रोगाचे तो निवारण करतो .सर्व जीवांना सांभाळतो ,पोसतो .अग्नी सर्वांना म्हणजे ब्रह्मादिकांना

अभेद असतो .तो अत्यंत शुध्द असतो .

अग्निकरिता सृष्टी चाले | अग्नीकरिता लोक धाले | अग्नीकरितां सकळ जाले |लहान थोर ||१६-५-४ ||

अग्नीने जाळले भूमंडळ | लोकांस राहाण्या जाले स्थळ | दीप दीपिका नाना ज्वाळ | जेथे तेथे||१६-५-५ ||

पोटामध्ये जठराग्नी | तेणे क्षुधा लागे जनी | अग्नी करितां भोजनी |रुची येते ||१६-५-६ ||

अग्नी सर्वांगी व्यापक | उष्णे राहे कोणी येक | उष्ण नस्तां सकळ लोक | मरोन जाती ||१६-५-७ ||

अग्नीमुळे सृष्टी चालते .अग्नीमुळे लोक तृप्त होतात .अग्नी मुळे लहान मोठे प्राणी जिवंत राहतात

.अग्नीमुळे पाणी आटून पृथ्वी झाली .प्राणीमात्र राहण्यासाठी जागा मिळाली .दिवे ,पणत्या ,

अनेक प्रकाराचे जाळ अग्नी मुळे आढळतात .पोटातील जठराग्नी मुळे सजीवांना भूक लागते .

अन्न शिजवून अन्नाला चव आणता येते ।अग्नी माणसाच्या अंगभर व्यापून असतो .त्याच्या

उष्णतेने प्राणी जिवंत राहतो ।अंगातील उष्णता नाहीशी झाली की प्राणी मरतो .शरीरातील अग्नी

मंद होतो तेव्हा तब्येत बिघडते .अग्नीचे म्हणजे युध्द सामुग्रीचे बळ जेव्हा जास्त असते तेव्हा

शत्रूला जिंकता येते . समारंभाच्या प्रसगी झालेले दारूकाम अग्नीचाच प्रकार असतो .

अग्नी अतिशय पवित्र असतो ,मग तो शूद्राच्या घरातील असला तरी सुध्दा! उष्ण औषधांनी रोगी

बरे होतात.तोही अग्नीचाच परिणाम असतो .

लोकांच्या अंगात जठरानळ असतो .सागरात वडवानल ,भूगोलाच्या बाहेर आवरणानल असतो .शंकराच्या

डोळ्यात वीज रूपी अनल असतो .काचेतून अग्नी प्रगट होतो ,लाकडावर लाकूड घासून .चकमकीने अग्नी

प्रगट होतो ..जगातील सर्व लहान थोरांना अग्नीचा आधार असतो .अग्नीच्या मुखाने परमेश्वराचा संतोष

वाढतो .अग्नी जसा उपाय कारक आहे तसा तो अपायकारक ही असतो .माणूस जिवंत असताना

अग्नी त्याला सुख देतो .मेल्यावर त्याला भस्म करतो .अग्नी सर्व भक्षक आहे .प्रलय काळी अग्नी

सर्व सृष्टीचा संहार करतो..अग्नीने अनेक होम करता येतात .घरोघर वैश्वदेव करता येतात .

देवाजवळ दिवे उजळता येतात .दिपाराधाने व निरांजने अग्नीने पेटवून देवाला ओवाळतात .

अष्टधा प्रकृती लोक तिन्ही | सकळ व्यापून राहिला वन्ही | अगाध महिमा वदनी | किती म्हणोन वर्णावा

||१६-५-२८ ||

च्यारी शिंगे त्रिपदी जात | दोन शिरे सप्त हात | ऐसा बोलिला शास्त्रार्थ | प्रचीतीविण ||१६-५-२९ ||

तीन लोक व अष्टधा प्रकृती या सर्वांना अग्नीने व्यापले आहे .त्याचे रूप वर्णन करताना म्हटले आहे की

त्याला चार शिंगे ,तीन पाय ,दोन डोकी ,सात हात आहेत . असा हा अग्नी उष्ण मूर्ती आहे .

श्री समर्थ वायूचे स्तवन का करतात ?

हे दृश्य विश्व शक्तीने कार्यरत आहे .वायू हे शक्तीचे दृश्य रूप आहे . तो दृश्य जगात वा-याच्या रूपाने

असतो .त्याच्या मुळेच पंचमहाभूते एकमेकांत मिसळतात .तो अत्यंत व्यापक असतो . प्राण्यांच्या देहात तो

प्राणरूपाने असतो .त्या रूपानेच तो सर्व प्राण्यांना सर्व क्रियांसाठी लागणारी शक्ती देतो .

वायो करितां श्वासोश्वास | नाना विद्यांचा अभ्यास | वायोकरितां शरीरास | चाळण घडे ||१६-६-२ ||

चळण वळण प्रसारण | निरोधन आणि आकोचन | प्राण अपान व्यान उदान |समान वायो ||१६-६-३ ||

नाग कूर्म कर्कश वायो | देवदत्त धनंजयो |ऐसे हे वायोचे स्वभावो | उदंड असती ||१६-६-४ ||

वायो ब्रह्मांडी प्रगटला | ब्रह्मांड देवतांस पुरवला | तेथूनि पिंडी प्रगटला | नाना गुणे || १६-६-५ ||

वायू मुळेच श्वासोश्वास करता येतो .अनेक विद्यांचा अभ्यास करता येतो .शरीराचे चलन वलन करता

येते ।चलन वलन प्रसारण ,निरोधन,आकुंचन या गोष्टी वायू घडवून आणतो ।माणसाच्या

शरीरात प्राण,अपान व्यान ,उदान आणि समान या पाच मुख्य प्राणांच्या रूपाने शरीरात वावरतो .

नाग ,कूर्म कृकल ,देवदत्त ,धनंजय या पाच उपप्राणांच्या रूपात विविध कार्य करतो .वायू

प्रथम ब्रह्मांडात प्रगट झाला .त्याने अनेक ब्रह्मांड देवता निर्माण केल्या .अनेक प्रकारे पिंडात

प्रगट झाला .वायू अनेक कार्य करतो .

समर्थ म्हणतात वायू जसा कारभारी दुसरा कोणी नाही ।तो आकाशात मेघ भरतो ।त्यांना

झाडून दूर करतो लोकांना पाणी मिळावं म्हणून आकाशात तोच ढग जमा करतो .विजा

चमकतात ,ढगांचा गडगडाट होतो .पाउस पडतो ,ह्या सर्व गोष्टी वायूच्या शक्तीनेच होतात .चंद्र ,

सूर्य ,नक्षत्रमाला ,ग्रहमंडळ ,मेघमाला ह्या सर्व उत्तम गोष्टी विश्वात आढळतात त्या वायूमुळेच !

ज्या सूक्ष्म कमळामध्ये ब्रह्मदेव राहतो ,तो कमलकोष वायूरूप आहे .पाण्याला त्याचाच आधार आहे .

पाण्याच्या आधाराने शेषाने स्वत:च्या डोक्यावर भूगोल धरला आहे .वायू शेषाचा आहार आहे .

वायूने शेषाचे शरीर फुगते .तो पृथ्वीचा भार तोलून धरतो .महाकूर्म [भगवंताचा अवतार ] कासवाचे

शरीर इतके प्रचंड आहे की त्याचे वरचे कवच पाहून ब्रह्मांड पालथे घातले आहे असे वाटते .ते

प्रचंड शरीर वायू मुळेच आहे .वराह अवतारात वाराहाने आपल्या दातावर पृथ्वी तोलून धरली .

ती शक्तीही वायू मुळेच !

ब्रह्मा ,विष्णू ,महेश जगदीश्वर ,अंतरात्मा हे सर्व वायू स्वरूपीच असतात .३३ कोटी कात्यायनी ,५६ कोटी

चामुंडा ,साडे तीन कोटी भुते सगळी वायूरूपच आहेत .पिंड ब्रह्मांडात वायू आहेच ,पण कंचुका

पर्यंत त्याचा व्याप आहे .तो सर्वांना पुरून उरणारा सामर्थ्यवान आहे .

म्हणूनच त्याचे स्तवन समर्थ करतात .