Monday, August 30, 2010

अचूक यत्न कोणता ?

बरे खावे बरे जेवावे । बरे ल्यावे बरे नसावे । मनासारिखे असावे । सर्व काही । । १२-२-३
ऐसे आहे मनोगत । तरी ते काहीच न होत । बरे करिता अकस्मात । वाईट होते । । १२-२-४
येक सुखी येक दु:खी । प्रत्यक्ष वर्तते लोकी । कष्टी होऊनिया सेखी । प्रारब्धा वरी घालिती । । १२ -२- ५
अचूक यत्न करवेना । म्हणौनि केले ते सजेना । आपला अवगुण सजेना । कांही केल्या । । १२ -२ -६
संसारी स्त्री पुरुषांना सर्वांना असे वाटते की आपल्या मना सारखे सगळे चांगले असावे .परन्तु असे असत नाही .जे दु :खी असतात ते कष्टी होतात .आपल्या दु :खाचे खापर प्राराब्धावर सोडतात .प्रारब्धामुळे असे भोगावे लागते असे मानतात .परन्तु समर्थ म्हणतात की ते तसे नसते .माणूस नीट प्रयत्न करत नाही .तो जे जे करतो त्याचे त्याला अपेक्षित फळ मिळत नाही .दोष आपल्या कड़े आहे ,आपला अवगुण त्याला कळत नाही .मग त्याचा मार्ग चुकतो आणि त्याला दैन्यवाणे जीवन जगावे लागते .समर्थ म्हणतात :
लोकांचे मनोगत कलेना । लोकांसारिखे वर्तावेना । मूर्खपणे लोकी नाना । कळह उठती । । १२-२-८
मग ते कळो वाढती । परस्परे कष्टी होती । प्रेत्न राहता अंती । श्रमची होये । । १२-२-९
लोकांच्या मनात काय आहे ,लोकांना काय आवडेल ते जेव्हा समजत नाही तेव्हा भांडणे होतात .भांडणे वाढत जातात .त्यामुळे त्याला व इतरांना दु :खी व्हावे लागते .योग्य प्रयत्न थांबतो .फक्त विनाकारण श्रम होतात ।
बोलतो खरे चालतो खरे । त्यास मानिती लहान थोरे । न्यायेअन्याये परस्परे । सहजची कळे । । १२-२-१५
लोकांस कळेना तंवरी ।विवेके क्षमा जो न करी । तेणेकरिता बरोबरी । होत जाते । । १२-२- १६
ज्यांचे बोलणे खरे व वागणे खरे ,त्याला लहान थोर मानतात .बरोबर काय ,चूक काय योग्य काय ,अयोग्य काय हे लोकांना कळत नाही ,तोपर्यंत अशा पुरुषाने विवेकाने क्षमा केली पाहिजे .समर्थ म्हणतात :
परिले ते उगवते । उसिणे द्यावे घ्यावे लागते। वर्म काढिता भंगते । परांतर । । १२-२-२१
लोकिकी बरेपण केले । तेणे सौख्य वाढिले ।उत्तरा सारिखे आले । प्रत्योत्तर । । १२-२--२२
हे आवघे आपणापासी । येथे बोल नाही जनासी । सिकवावे आपल्या मनासी । क्षणक्षणा । । १२-२-२३
आपण जे परतो तेच उगवत .आपण उसने घेतले तर ते फेडावे लागते .कोणाचे गुप्त रहस्य उघड केले तर त्याचे अंत :करण दुखावले जाते .आपण लोकांशी चांगले वागलो तर जीवनात सुख वाढते .उत्तरा सारखे उत्तर येते असा नियम आहे .जीवनात सुख भोगायाचे की दु :ख ते आपल्याच हाती आहे .दूसरा कोणी यासाठी दोषी नसतो .ही गोष्ट सतत मनाला पटवायला समर्थ सांगतात .त्यासाठी मरणाचे स्मरण ठेवून विवेक जागा ठेवावा असे समर्थ सांगतात ।
लोक नाना परीक्षा जाणती । अंतर परीक्षा नेणती । तेणे प्राणी करंटे होती । संदेह नाही । । १२-२-२५
आपणास आहे मरण । म्हणौनि राखावे बरेपण । कठीण आहे लक्षण । विवेकाचे । । १२-२ -२६
माणसांच्या बाह्य लक्षणांवरून आपण त्यांची परीक्षा करतो .पण त्यांच्या अंतरंगाची परीक्षा आपल्याला करता येत नाही .त्यामुळे ती माणसे भाग्यवान होत नाहीत .आपण एक दिवस मरणार आहोत हे लक्षात ठेवून लोकांशी प्रेमाने संबंध ठेवावेत .माणूस खुप शिकला ,पण प्रसंगाला अनुरूप वागला नाही तर त्याची विद्या वाया जाते .

Friday, August 27, 2010

प्रपंच आणि परमार्थ म्हणजे काय ?

माणूस इंद्रिय गोचर दृश्य विश्वात रमतो ,तसा तो अतिंद्रिय अदृश्य विश्वातही रमतो .त्याचे इंद्रिय गोचर दृश्य विश्वात रमणे म्हणजे प्रपंच आणि अतिंद्रिय अदृश्य विश्वात रमणे म्हणजे परमार्थ !असे श्री के .वि .बेलसरे म्हणतात .अतिंद्रिय अदृश्य जग हे संकल्पनांचे बनलेले असते .ह्या संकल्पनाचे जगत माणसाच्या विवेक शक्तीतून निर्माण होते ।
विवेक शक्ती व वैराग्य या दोन्ही गोष्टींवर समर्थ जोर देतात .समर्थ म्हणतात ;
आधी प्रपंच करावा नेटका । मग घ्यावे परमार्थ विवेका । येथे आळस करू नका । विवेकी हो । । १२ -१-१
प्रपंच सांडून परमार्थ कराल।तेणे तुम्ही कष्टी व्हाल । प्रपंच परमार्थ चालवाल । तरी तुम्ही विवेकी । । १२-१-२
प्रपंच सांडून परमार्थ केला । तरी अन्न मिलना खायाला । मग तया करंट्याला । परमार्थ कैचा । । १२-१-३
समर्थ आधी प्रपंच नीट करायला सांगतात ,मग परमार्थाकड़े वळायला सांगतात .कारण ते म्हणतात की प्रपंच सोडून परमार्थ केला तर तुम्ही कष्टी व्हाल कारण तुमच लक्ष सगळ प्रपंचाकड़े राहणार आहे .प्रपंचा पासून दूर जाऊन ही परमार्थ साधणार नाही .परमार्थ सोडून प्रपंच केलास तरी तू दु:खी होशील ,यमयातना भोगशील .म्हणून भगवंताची भक्ती करावी ,परमार्थाचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा .कारण :
संसारी असता मुक्त । तोचि जाणावा संयुक्त । अखंड पाहे युक्तायुक्त । विचारणा हे । । १२-१-८
संसारामध्ये राहून जो मुक्त दशा अनुभवतो तो खरा योगी असतो .कारण योग्य काय आणि योग्य काय याचा सारासार विचार त्याच्या मनात अखंड जागा असतो .म्हणून समर्थ सांगतात :
म्हणौन सावधानपणे । प्रपंच परमार्थ चालवणे । ऐसे न करता भोगणे । नाना दुखे । । १२-१ -१०
पर्णाळी पाहोन उचले । जीवसृष्टी विवेके चाले । आणि पुरुष होऊनी भ्रमले । त्यासी काय म्हणावे । । १२-१-११ झाडाच्या पानावरील अळी सुध्दा आधार बघून पाय उचलते ,क्षुद्र कीटक ही आधार बघून पाय उचलतो ,विचार पूर्वक कर्मे करतो ,मग बुध्दीमान असलेला माणूस अविवेकाने भलतेच करतो ।
म्हणून समर्थ अखंड चाळणा करायला सांगतात .
म्हणौन असावी दीर्घ सूचना । अखंड करावी चाळणा । पुढील होणार अनुमाना । आणून सोडावे । । १२-१-१२
समर्थ दूरदृष्टी विकसित करायला सांगतात .त्यामुळे सर्व बाजूंनी सावधपणा राखता येतो त्याला थोर पण मिळते आणि स्वत :चे व दस-याचे समाधान टिकवता येते .

Wednesday, August 25, 2010

निस्पृह कसा असतो ?

समर्थांचा महंत हाच त्यांचा निस्पृह ! समर्थ म्हणतात :
तोचि अंतरात्मा महंत । तो का होइल संकोचित । प्रशस्त जाणता समस्त । विख्यात योगी । । ११-१०-२
कर्ता भोक्ता तत्वता । भूमंडळी सर्व सत्ता । त्यावेगळा त्यास ज्ञाता । पाहेसा कवणू ११-१०-३
ऐसे महंते असावे ।सर्व सार शोधून घ्यावे । पाहों जाता न सांपडावे । येकायेकी । । ११-१०-४
महंताने अंतरात्म्याचे ज्ञान करून त्याच्याशी एकरूप ,विशाल व्हावे .कारण अंतरात्मा हा खरा महंत आहे .महान ,थोर ,विशाल आहे .सगळे जाणणारा ,योगी आहे .जगात खरा कर्ता व भोक्ता अंतरात्माच आहे .सर्व जगावर त्याची सत्ता चालते .महंताने अंतरात्म्यासारखे बनून जेव्हडे सार आहे तेव्हडेच घ्यावे ।
कोणी शोधायला आल्यास नये .महंताला समर्थ लोकसंग्रह करायला सांगतात तो ही गुप्तपणे !
किर्ती रूपे उदंड ख्यात । जाणती लहान थोर समस्त । वेश पाहाता शाश्वत । येकही नाही । । ११-१०-५
प्रगट कीर्ती ते ढळेनाबहुत जनास कळेना । पाहो जाता आढळेना । काय कैसे । । ११-१०-६

वेषभूषण ते दूषण । कीर्ती भूषण ते भूषण । चाळणेविण येक क्षण । जाऊंच नेदी । । ११-१०-७
महंताची कीर्ती सगळीकड़े पसरलेली असते .पण तो एक वेष घालून फिरत नाही .लोकांना त्याची प्रत्यक्ष माहिती नसते .त्याला लोक शोधायला गेले तर तो सापडत नाही .तो सतत समाजामधील समस्यांवर चिंतन करत असतो .महंत लोकसंग्रह कसा करतात ते समर्थ सांगतात :
त्यागी वोळखिचे जन । सर्वकाळ नित्यनूतन । लोक शोधून पाहती मन । परि इच्छा दिसेना । । ११-१०-८
पुर्ते कोणाकडे पाहिना । पुर्ते कोणासी बोलेना । पुर्ते येके स्थली राहिना । उठोन जातो । । ११-१०-९
जाते स्थळ ते सांगेना । सांगितले तेथे तरी जायेना । आपुली स्थिती अनुमाना । येवोंच नेदी । । ११-१०-१०
खरा महंत ओळखिच्या लोकांकडे कामाचे बीज पेरतो .तेथून निघून जातो .लोक त्याची परीक्षा घेतात .त्याचे अंतरंग शोधतात .पण त्याच्या अन्तर्यामी कोणत्याही वासना त्यांना दिसत नाहीत .तो अघळपघळ बोलत नाही .एका ठिकाणी राहत नाही .आपल्या स्थितीची तो कोणालाही कल्पना येऊ देत नाही .त्यासाठी महंताने काय करावे ते समर्थ म्हणतात :
अखंड येकांत सेवावा । अभ्यासचि करीत जावा । काळ सार्थकची करावा । जनासाहित । । 11-10-17
उत्तम गुण तितुके घ्यावे । घेऊन जनास शिकवावे । उदंड समुदाये करावे । परी गुप्तरूपे । । ११-१० -१८
आधी कष्ट मग फळ । कष्टची नाही ते निर्फळ । साक्षेपेविण केवळ । वृथापृष्ठ । । ११-१०-२०
समर्थ म्हणतात महंताने अखंड एकांत सेवावा .अभ्यास करावा .उत्तम गुण घेऊन जनाला शिकवावे .आधी कष्ट करून मग त्याचे फळ मिळते म्हणून समर्थ महंताला अचूक कष्ट करण्याची शिकवण देतात .महंताने आपल्या सारखे महंत तयार करावे असे समर्थ सांगतात ।
महंते महंत करावे । युक्तीबुध्दीने भरावे । जाणते करून विखरावे । नाना देसी । । ११-१०-२५

Tuesday, August 17, 2010

परमात्मा कसा आहे ?

नाना देवांच्या नाना प्रतिमा । लोका पूजा धरुनी प्रेमा । ज्याच्या प्रतिमा तो परमात्मा । कैसा आहे । । ११-९-६
ज्या देवाच्या प्रतिमेची आपण पूजा करतो तो देव कसा आहे ? असा प्रश्न श्रोते विचारतात तेव्हा समर्थ म्हणतात :
प्रतिमेची पूजा करून आपल्या अंतरातील अंतरात्मा प्रगट होतो .अवतारी पुरुषांमध्ये अंतरात्मा प्रगट होतो .आपल्या अंतरातील अंतरात्मा प्रगट करणे ,जागा करणे हे काम देवपूजा करते .प्रतिमा हे मनाचे आलंबन ,किंवा आधार असतो .समर्थ म्हणतात :
देह्पुरामध्ये ईश । म्हणोन तया नाव पुरुष । जगामध्ये जगदीश । तैसा ओळखावा । । ११-९-१२
जाणीवरूपे जगदांतारे । प्रस्तुत वर्तती शरीरे । अंत :करण विष्णू येणे प्रकारे । वोळखावा । । ११-९-१३
तो विष्णू आहे जगदांतरी । तोचि आपुले अंतरी । कर्ता भोक्ता चतुरी । अंतरात्मा वोळखावा । । ११-९-१४
अंतरात्मा या देहरूपी नगरीत राहतो .म्हणून त्याला पुरुष म्हणतात .तसेच जगात राहणारा आत्मा तो जगदीश
असतो .जगात शुध्द जाणीव असते .ती सर्व शरीरांना हालाचालींची ,स्वसंरक्षणाची , शरीर पोषणाची प्रेरणा देते .ती जाणीव म्हणजेच विष्णू ,म्हणजेच विश्वाचे अंत :करण असते .जगात असलेली शुध्द जाणीव आपल्या अंत :करणात असते .हा अंतरात्माच खरा भोक्ता व कर्ता असतो .समर्थ म्हणतात :
येकची जगाचा जिव्हाळा । परी देह्लोभाचा अदाताळा । देहामध्ये वेगळा । अभिमान धरी । । ११-९-१६
जगाचे अंत :करण एकच आहे पण देहाच्या आसक्ती मुळे आपल्या तसे अनुभवास येत नाही .देहाच्या सबंधाने माणूस स्वत :ला वेगळा मानतो ,त्याचा अभिमान धरतो .मी देह आहे या अभिमानाने वेगळेपणाचे जीवन जगतो .जशा सागरावर लाटा येतात ,तशा जाणीव रूपी सागरावर देहाच्या अनंत लाटा येतात व जातात .प्राण्याचा देह उपजतो ,वाढतो ,मरतो .तशी अंतरात्म्याच्या सागरात पुष्कळ विश्वे निर्माण होतात व लय पावतात .समर्थ पुढे सांगतात :
त्रैलोका वर्तावितो येक । म्हणौन त्रैलोक्य नायेक । ऐसा प्रत्ययाचा विवेक । पाहाना कैसा । । ११-९-१८
या प्रचंड त्रैलोक्याला चालवतो म्हणून अंतरात्म्याला त्रैलोक्य नायक म्हणतात .असा हा अंतरात्मा अचाट असला तरी मायेच्या कक्षात येतो ,त्यासाठी देहामधील त्याचे स्वरुप ओळखावे ,मग जगातील स्वरुप जाणावे , मग शेवटी निर्मल ,निर्विकार परब्रह्म जाणावे व अनुभवावे असे समर्थ सांगतात .त्यासाठी समर्थ एक उपाय सांगतात :
अष्टदेह थानमान । जाणोंन जालिया नीर्शन । पुढे उरे निरंजन । निर्मळ ब्रह्म । । ११-९-२३
विचारेचि अनन्य जाला । पाहाणाराविण प्रत्यय आला । तेही वृत्ती निवृत्तीला । बरे पहा । । ११-९-२४
पिंड ब्रम्हांडाच्या आठ देहांचा व स्थल कालांनी व्यापलेल्या दृश्य विश्वाचा लय केला की निरंजन व शुध्द ब्रह्म मिळते .त्यासाठी समर्थ सांगतात की साधक जर अखंड चिंतनाने अंतरात्म्याशी अनन्य झाला तर त्याचा मीपणा नाहीसा होतो .त्याला आत्मस्वरूपाचा साक्षात अनुभव येतो .अनुभव येणे ही सुध्दा वृत्तीच असते .अनुभव घेण्याच्या वृत्तीचाही लय होतो .वृत्ती नाहीशी होते .स्वरूपाचा अनुभव येतो .

Monday, August 16, 2010

अंतरात्मा

परमात्म वस्तू चा विचार तीन पाय-यांनी करता येते .आपल्या देहात वास करणारा आत्मा ,विश्वात चराचरात वास करणारा विश्वात्मा ,विश्वाला पुरून उरणारा परमात्मा !
तेणेविण कार्य न चले । पडिले पर्ण तेही न हाले । अवघे त्रैलोक्यचि चाले । जयाचेनि । । ११-८-२
तो अंतरात्मा सकळांचा । देवदानव मानवांचा । चत्वार वाणी चत्वार खाणींचा । प्रवर्तक । । ११-८-३
तो येकलाचि सकळां घटी । करी भिन्न भिन्न राहटी । सकळ सृष्टीची गोष्टी । किती म्हणौन सांगावी । । ११-८-४
सर्व घटनांचा कर्ता ,देवांचा मालक तो अंतरात्मा ! अंतरात्म्याशिवाय कोणतेही कार्य घडून येत नाही .त्याच्या सत्ते वाचून पडलेले पानही हालत नाही .देव ,दानव ,मानव ,चार खाणी ,चार वाणी या सर्वांचा तो प्रवर्तक आहे .सर्व प्राण्यांच्या शरीरात तो वास करतो .वागायला प्रेरणा देतो ,तोच इश्वर !
ऐसा जेणे वोळखला । तो विश्वंभरची जाला । समाधी सहजस्थितीला । कोण पुसे । । ११-८ -६
अशा अंतरात्म्याचे ज्ञान ज्याला होते ,तो विश्वव्यापी बनतो .त्याचे मन इतके सूक्ष्म होते व विशाल होते की तो 'हे विश्वची माझे घर असे म्हणू लागतो .अंतरात्मा देहात असला तरी सामान्य माणसाला अनंत आणि अपार असलेला अंतरामा जाणता येत नाही .त्यासाठी काय करावे असे श्रोत्यांनी विचारल्यावर समर्थ म्हणतात :
अंतरी ठेवणे चुकले । दारोदारी धुंडू लागले । तैसे अज्ञानास झाले । देव न कळे । । ११-८-१८
एखाद्या घरात संपत्ती ठेवलेली असते पण ती कोठे ठेवली आहे ते तो विसरतो .संपत्ती साठी दारोदार हिंडू लागतो .तशी अज्ञानाची अवस्था असते .त्याच्या अंतरात असणारा अंतरात्मा म्हणजे ईश्वर त्याला कळत नाही .अनेक तीर्थक्षेत्रे हिंडतो पण ईश्वर भेटत नाही .त्यासाठी काय करावे असे विचारल्यावर समर्थ म्हणतात :
आरे हे पाहिलेच पहावे । विवरलेची मागुते विवरावे । वाचिलेच वाचावे । पुन्ह्पुन्हा । । ११-८-९
अंतरात्म्याचे झालेले अल्प ज्ञान वारंवार घ्यावे .पुन्हा पुन्हा त्याचे विवरण करावे ,त्याच्या बद्दल वाचलेले पुन्हा पुन्हा वाचावे .समर्थ म्हणतात :
तत्वे तत्व जेव्हा उड़े । तेव्हा देह्बुध्दी झडे । निर्मळ निश्चळ चहुंकडे । निरंजन । । ११-८-२३
आपण कोण कोठे कैचा । ऐसा मार्ग विवेकाचा । प्राणी जो स्वये काचा । त्यास हे कळेना । । ११-८-२४
एका तत्वाने दस-या तत्वाचा निरास केला की देह्बुध्दीचा क्षय होतो .निर्मळ ,निश्चळ परब्रह्म अनुभवाला येते .माणसाने मी कोण ,मी कोठून आलो या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला तर अंतरात्म्या पर्यंत पोहोचू शकतो .

Tuesday, August 10, 2010

मूळमाया : एक चंचल नदी

श्री समर्थ द ,११ स ७ मध्ये मूळमायेला चंचल नदीचे रूपक देतात .मूळमाया चंचल आहे ,वासनामय आहे .ती वाहत्या नदीसारखी आहे .तिचे मूळ स्वरुप सूक्ष्म ,निर्मळ सर्वव्यापी ,ब्रम्हाइतके पवित्र असते .तिच्या स्मरणाने जग पवित्र होते .समर्थ म्हणतात :
चंचल नदी गुप्त गंगा । स्मरणे पावन करी जगा । प्रचित रोकड़ी पहागा । अन्यथा नव्हे । । ११ -७-१
केवळ अचंचळी निर्माण जाली । अधोमुखे बळे चालिली ।अखंड वाहे परी देखिली । नाहीच कोणी । । ११-७-२
समर्थ सूक्ष्मापासून स्थूलाकड़े जाणारी , ब्रह्मापासून दृश्य विश्वाकडे वाहणारी नदी म्हणतात .ती वाहती असली तरी अदुश्य आहे ,ती दिसत नाही .पण तिचा प्रभाव मात्र जाणवतो .नदी डोंगरात उगम पावून खाली वाहत येते ,त्याप्रमाणे मूळमाया रूपी नदी ब्रह्मरूपी पर्वतावर उगम पावून स्थूल दृश्य विश्वाकडे वाहत येते ।
नदी वाहत येत असताना ज्याप्रमाणे अडथळे पार करून जावे लागते ,त्याप्रमाणे मूळमाया रूपी नदी पार करत असताना अड़थळे पार करावे लागतात .समर्थ म्हणतात :
येक ते वाहतची गेले । येक वळशामध्ये पडिले । येक सांकडीत आडकले । अधोमुख । । ११-७-८
येक आपटोआपटोँच गेली । येक चिराडोचिरडोँचि मेली । कितीयेक ते फुगली । पाणी भरले । । ११-७-९
येक बळाचे निवडिले । ते पोहतची उगमास गेले । उगम दर्शने पवित्र झाले । तीर्थरूप । । ११-७-१०
बरेच जीव मायानदीच्या प्रवाहात वाहात जातात ,नाश पावतात .काहीजण सुखदु:खाच्या भोव -यात सापडतात .अधोगातीला जातात .म्हणजे नीच योनीत जातात ,जन्म मरणाच्या भोव-यात सापडतात .देह्बुध्दीनी स्वार्थी बनून बहिर्मुख होतात .काही जीव दृष्याच्या मागे लागतात .द्वैताने संघर्ष निर्माण होतो .संकटांची परंपरा निर्माण होते ,त्यामुळे ते दडपले जातात .अहंकाराने उन्मत्त होतात .वाया जातात ।
पण काही जीव बलवान असतात ,धारिष्टाचे असतात .प्रवाहाच्या उलट दिशेने पोहून मूळमायेच्या उगमापर्यंत पोहोचतात ,ब्रह्मस्वरूपा पर्यंत पोहोचतात .पवित्र होतात .ब्रह्मात विलीन होतात .समर्थ म्हणतात :
उगमापैलीकडे गेले । तेथे परतोनि पाहिले । तव ते पाणीच आटले । काही नाही । । ११-७-२१ वृत्ती शून्य योगेश्वर । याचा पाहावा विचार । दास म्हणे वारंवार । किती सांगो । । ११-७-२२ जाणते पुरुष जे मायेच्या उगमा पर्यंत पोहोचतात ,त्यांनी मागे वळून पाहिले तर माया नदीचे पाणी आटलेले असते .मायेने निर्माण झालेले दृश्य विश्व नाहीसे झालेले असते .कारण ते ब्रह्मस्वरूप झालेले असतात .माया तेथे नाही अशी अनुभूती त्यांना येते .अशी अनुभूती वृत्ती शून्य केलेल्या योगेश्वराला येते .











महन्त लक्षण

श्री समर्थांचा महंत हा अध्यात्मिक पुढारी आहे .श्रीरामचंद्र महंतांचा आदर्श आहे .जसे एखादे कमल पूर्ण पणे विकसित झाल्यावर सुंदर दिसते ,तसा समर्थांचा महंत असावा ,त्याचे जीवन सर्व बाजूंनी विकसित झालेले असावे अशी समर्थांची महंतांकडून अपेक्षा होती .सर्व बाजूंनी विकसित याचा अर्थ आचार ,विचार ,उच्चार प्रचार ,व्यवहार व परमार्थ या सहाही अंगांनी विकसित असावे .तसेच त्याचे लेखन,वाचन व पाठांतर चांगले असावे .म्हणून महंताने काय काय करावे ते समर्थ सांगतात :
शुध्द नेटके लिहावे । लेहोन शुध्द शोधावे । शोधून शुद्ध वाचावे । चुको नये । । ११-६-१
विश्कळीत मातृका नेमस्त कराव्या । धाट्या जाणोंन शुद्ध कराव्या । रंग राखोन भराव्या । नाना कथा । । ११-६-२
शुद्ध नेटके लिहावे ,लिहून झाले की तापासावे ,शुद्ध वाचावे , कान्हा मात्रा नीट लिहाव्या .लिहिण्याची पध्दत पहिल्या पासून शेवट पर्यंत सारखी ठेवावी .आत्मज्ञानाचा विचार ,जरूर तेव्हडे राजकारण ,चार चौघात कसे वागावे ,याची जाण महंतांना असावी अशी अपेक्षा समर्थांची महन्तांकडून होती .समर्थ म्हणतात ;
पुसो जाणें सांगो जाणें । अर्थांन्तर करो जाणे । सकलिकांचे राखो जाणे । समाधान । । ११-६-५
दीर्घ सूचना आधी कळे । सावधपणे तर्क प्रबळे । जाणजाणोनि निवळे । यथायोग्य । । ११-६-6 । ।
ऐसा जाणे जो समस्त । तोचि महंत बुध्दीमंत । यावेगळे अन्तवंत । सकल काही । । ११-६-७
कोणाला काय विचारायचे ,काय सांगायचे ,ग्रंथाचा अर्थ बरोबर कसा काढायचा ,सर्वांचे समाधान कसे राखायाचे ,हे ज्याला कळते ,पुढे काय घडेल याचा अंदाज जो बरोबर बांधतो ,तो खरा महंत ! काळ वेळ ,तानमान प्रबंध ,कविता ,महत्वाची वचने ,सभाधीटपणा ज्याला वेळेवर सुचतात ,त्याला एकांत
आवडतो .तो आधी पाठांतर करतो ,ग्रंथाच्या अंतरंगात शिरतो ,खोल अर्थ शोधतो ,तोच खरा महंत !
आधिच सीकोन जो सिकवी । तोचि पावे श्रेष्ठ पदवी । गुंतल्या लोकांस उगवी । विवेकबळे । । ११-६-१०
जो आधी शिकतो ,मग लोकांना शिकवतो ,तो श्रेष्ठ पदवी पावतो ।

त्याची वर्तणुक कशी असते ?
अक्षर सुंदर वाचणे सुंदर । बोलणे सुंदर चालणे सुंदर । भक्ती ज्ञान वैराग्य सुंदर । करून दावी । । ११-६-११
सांकडी मध्ये वर्तो जाणे । उपाधी मध्ये मिळों जाणे । अलिप्त पणे राखो जाणे । आपणासी । । ११-६-१३
आहे तरी सर्वां ठाईं । पाहों जाता कोठेच नाही । जैसा अंतरात्मा ठाईंचा ठाई । गुप्त जाला । । ११-६-१४
महंताचे अक्षर सुंदर असते ,वाचणे सुंदर असते ,बोलणे सुंदर असते .चालणे सुंदर असते .भक्ती ज्ञान ,वैराग्य सुंदर असते .कोणत्याही प्रसंगाला धैर्याने तोंड देतो .संकटात कसे वागावे ते तो जाणतो ,व्यापा मध्ये कसे समरस व्हावे ,हे सुध्दा त्याला समजते .या सर्व व्यापांतून अलिप्त कसे रहायचे ती कलाही त्याच्या जवळ असते .अंतरात्मा ज्याप्रमाणे सर्वत्र असतो ,सर्वां मध्ये वास करतो ,पण कोठेच दिसत नाही ,पहायला गेले तर सापडत नाही ,तसा महंत सर्वां मध्ये मिसळतो पण शोधायला गेले तर कोठेच सापडत नाही .एकदम नाहीसा होतो .एकांकात जातो .ज्याप्रमाणे अंतरात्मा सर्व जीवांना प्रेरणा देणारा आहे ,पण तो दिसत नाही .तसा महंत सामाजिक चळवळ सुरु करून देतो पण स्वत : अलिप्त राहतो ।
तो नीति न्याय यांचे रक्षण करतो .स्वत : अन्याय ,अनीती करत नाही .इतरांना करू देत नाही .कठीण प्रसंगातून पार पडण्यासाठी प्रयत्न करतो ।
ऐसा पुरुष धारणेचा । तोचि आधार बहुतांचा । दास म्हणे रघुनाथाचा । गुण घ्यावा । । ११-६-१९
समर्थांचा महंत मनोबलाचा पुरुष आहे .तो पुष्कळ लोकांचा आधार आहे .अत्यंत मनोबल व पुष्कळांचा आधार असणे हा श्रीरामांचा गुण आहे .तो महंताने घ्यावा असे समर्थ म्हणतात .

Sunday, August 8, 2010

सार विवेक म्हणजे काय ?

ज्याप्रमाणे आपण केळीचे साल सोलून आतील गर खातों ,राजहंस ज्याप्रमाणे नीरक्षीर विवेक करतो ,दूध पाणी एकत्र केलेले असेल तर दूध घेतो ,त्याप्रमाणे श्री समर्थांनी ग्रंथराज दासबोधात मूर्ख लक्षण [द .२ स.१ ] ,कुविद्या लक्षण [द.२ स .३ ] ,रजोगुण लक्षण [द २ स ५ ] ,तमोगुण लक्षण [द २ स ६ ] ,पढ़त मूर्ख लक्षण [द २ स १० ] अशा सारखे असाराचे समास [त्याग करण्यास योग्य ] समास दिले आहेत .त्यातील लक्षणे आपल्या अंगी असतील ती काढून टाकायची आहेत .तर उत्तम लक्षण [द २ स २ ] ,सद्विद्या निरूपण [द २ स ८ ] ,विरक्त लक्षण [द २ स ९ ] अशा सारखी ग्रहणाची लक्षणे आहेत .सार लक्षणे सांगितली आहेत .त्याप्रमाणे सारविवेक करायचा म्हणजे काय करायचे ?
खरा देव कोणता याविषयी सांगताना समर्थ द ११ स ४ या समासात सांगतात :
ब्रह्म म्हणिजे निराकार । गगनासारिखा विचार । विकार नाही निर्विकार । तेचि ब्रह्म । । ११-४-१
अत्यंत निराकार व निर्विकार असे ब्रह्म आहे .ब्रह्म शाश्वत आहे पण तो दृष्टा व केवळ साक्षी आहे .तो सर्व जीवांच्या अंतर्यामी राहतो व त्यांचे पालन करतो ।
देव या सकळांचे मूळ । देवास मूळ ना डाळ । परब्रह्म ते निश्चळ । निर्विकारी । । ११-४-८
अंतरात्मा कर्माचे व दृष्याचे मूळ आहे .प्रकृतीमुळे अस्तित्वात आलेल्या आत्म्याला खरे अस्तित्व नाही .कारण अंतरात्मा चंचळ आहे म्हणून समर्थ म्हणतात :
निर्विकारी आणि विकारी । येक म्हणेल तो भिकारी । विचाराची होते वारी । देखत देखतां । । ११ -४ -९
म्हणून निर्विकारी व विकारी अंतरात्मा एकच आहे .असे जो म्हणतो त्याला समर्थ भिकारी म्हणतात .कारण त्याने सारविवेक केला नाही ।
जो येकची विस्तारीला । तो अंतरात्मा बोलिला । नाना विकारी विकारला । निर्विकारी नव्हे । । ११-४-१५
एकच अंतरात्मा विश्वरूपाने विस्तारला अशा प्रकारच्या भेदांनी ,बदलांनी विलसणारा अंतरात्मा निर्विकारी ब्रह्म नव्हे .म्हणजे थोरल्या देवाची निवड हाच सार विवेक आहे .समर्थांनी ज्ञानाची व्याख्या केली आहे :
घेव ये तेचि घ्यावे । घेव न ये ते सोडावे । उंच नीच वोळखावे । त्या नाव ज्ञान । । ११-४-२४
जे घेण्यास योग्य आहे ते घ्यावे ,घेण्यास योग्य नाही ते सोडून द्यावे .म्हणून आपल्या कल्याणाचे जे आहे ते घेऊन सार घ्यावे असार टाकावे .

Saturday, August 7, 2010

सामान्य माणसाने त्याचे जीवन सुंदर कसे बनवावे ?

बहुतां जन्माचा सेवट । नरदेह सांपडे अवचट । तेथे वर्तावे चोखट । नीतिन्याये । । ११-३-१
प्रपंच करावा नेमक । पाहावा परमार्थ विवेक । जेणेकरितां उभय लोक । संतुष्ट होती । । ११-३-२
अचानक पणे जेव्हा अनेक योनी फिरून आल्यावर नरदेह मिळतो ,तेव्हा जीवन सुंदर कसे जगावे ते समर्थ सांगतात की प्रपंच नीट व्यवस्थित करावा ,परमर्थाचाही अभ्यास करावा ,म्हणजे इहलोक व परलोक दोन्हीकडे यश मिळते ,नाहीतर :
पुण्यमार्ग अवघा बुडाला । पापसंग्रह उदंड जाला । येमयातनेचा झोला । कठीण आहे । । ११-३-८
तरी आता ऐसे न करावे । बहुत विवेके वर्तावे । इहलोक परत्र साधावे । दोहींकडे । । ११-३-९
नरदेह मिळूनही जीवनात पुण्य केले नाही ,फक्त पापांची साठवण झाली ,तर यमयातनांचा हिसका बसतो तो खूप कठीण असतो .म्हणून जीवनात विवेकाने वागून प्रपंच आणि परमार्थ दोन्ही साधावा असे समर्थ म्हणतात .म्हणून समर्थांची पहिली शिकवण आहे :आळस सोडावा .आळसाचे भयंकर स्वरुप समर्थांनी वर्णन केले आहे ।
आळसाचे फळ रोकडे । जांभया देउन निद्रा पड़े । सुख म्ह्णौन आवडे । आळसी लोकां । । ११-३-१०
आळस उदास नागवाणा । आळस प्रेत्न बुडवणा । आळसे करंटपणाच्या खुणा । प्रगट होती । । ११-३-१२
जीवनात आळस असेल तर माणूस सुस्त होतो ,निद्राधीन होतो .माणसांना झोप सुखाची वाटते .पण आळसाने झोप
उत्साह वाटत नाही ,आळसाने नुकसान होते .माणूस प्रयत्न करेनासा होतो .आळस माणसाच्या दुर्भाग्याची खूण असते म्हणून समर्थांनी आग्रह पूर्वक सांगितले आहे की :
म्ह्णौन आळस नसावा । तरीच पावीजे वैभवा । अरत्री परत्री जीवा । समाधान । । ११-३-१३
मग जीवन समृध्द ,सुंदर होण्यासाठी समर्थांनी १५ मण्यांची माळ वापरायला सांगितले आहे .हे १५ मणी म्हणजे दिनक्रमाची रूपरेषा आहे ।
१ आळस टाकून प्रयत्न करावा ।
२ .सकाळी लवकर उठावे .काही तरी पाठांतर करावे ,भगवंताचे स्मरण करावे
३.शौचास जावे ,हातपाय स्वच्छ धुवावे ,आचमन करावे .
४.दात घासावे ,प्रात:स्नान करावे ,संध्या करावी ,देवाची पूजा करावी ,वैश्वदेवाची पूजा करावी .
5थोड़े खावे ।
६.प्रपंचातला उद्योग करावा .गोड शब्दांनी संबंधी माणसांना खुश ठेवावे ।
७.व्यवसायात खबरदारीने वागावे .बेसावाधपणे वागू नये।
८.माणूस चुकतो ,फसतो ,वस्तू विसरतो ,आठवण झाली की तळमळतो ,यशस्वी होत नाही ,कारण आळस आणि बेसावधपणा!
९.व्यवसायात मन एकाग्रतेने गुंतवावे .उत्तम व्यवसाय करावा ।
१० .जेवण झाल्यावर थोड़े वाचन ,मनन ,चिंतन करावे ।
११.दुस-या साठी थोडेतरी कष्टवावे ,भगवंताने भरंवसा ठेवून वागावे ।
१२.प्रपंचात पोटापुरता पैसा मिळवावा ।
१३ .परमार्थात आपला आपण शोध घ्यावा .मी कोण याचा शोध घ्यावा ।
१४.भगवंताचे आपण विश्वस्त आहोत या भावनेने प्रपंच करावा ।
१५ .जीवन यशस्वी करण्यासाठी प्रपंच व परमार्थ दोन्ही करावी ।
ही १५ मण्यांची माळ सांगून झाल्यावर श्री समर्थ म्हणतात :
प्रपंची पाहिजे सुवर्ण । परमार्थी पंचिकर्ण । महावाक्याचे विवरण । करिता सुटे । । ११-३-२९
प्रपंच व्यवस्थित चालण्यासाठी पेशाची आवश्यकता असते .तर परमार्थ उत्तम होण्यासाठी विश्वातील तत्वांचे ज्ञान असायला हवे ।
कर्म उपासना आणि ज्ञान । येणे राहे समाधान । परमार्थाचे जे साधन । तेंची ऐकत जावे । ११-३-३०


Wednesday, August 4, 2010

परमात्मा

सकळ उपाधी वेगळा । तो परमात्मा निराळा जळी असोनि नातळे जळा । आकाश जैसे । । ६-५-२४
दृश्य विश्वाच्या सगळ्या बंधनाच्या पलिकडे निराळेपणाने परमात्मा असतो .आकाशाचे प्रतिबिंब पाण्यात पडले तरी आकाश पाण्यापासून अलिप्त असते ,तसा परमात्मा सर्वत्र व्यापून असून अलिप्त असतो ,गुप्त असतो .समर्थ म्हणतात :
दिसेना जे गुप्त धन । तयासी करणे लागे अंजन । गुप्त परमात्मा सज्जन । संगती शोधावा । । ६-९-१९
म्हणुनी हे दृश्यजात । आवघेची आहे अशाश्वत । परमात्मा अच्युत अनंत । तो या दृश्या वेगळा । । ६-९-२२
दृश्या वेगळा दृश्या अंतरी । सर्वात्मा तो सचराचरी । विचार पाहता अंतरी । निश्चय बाणे । । ६-९-२३
जसे गुप्त धन नुसत्या डोळ्यानी दिसत नाही ,अंजन घालावे लागते ,त्याच प्रमाणे गुप्त असलेला परमात्मा चर्मदृष्टीला दिसत नाही .त्यासाठी ज्ञानदृष्टी लागते .ती संतांच्या जवळ असते .म्हणून सत्संगतीत राहून परमात्मा शोधावा लागतो .परमात्मा दृश्याहून वेगळा असतो पण दृष्याच्या अंतरी वास करतो .सगळ्या चराचरात भरून राहिलेला असल्यामुळे तो सर्वांचा आत्मा असतो .विचाराने कळते की तो सर्वान्तर्यामी असतो .तो मिळवण्यासाठी संसार सोडावा लागत नाही ,प्रपंच टाकावा लागत नाही .विचारांच्या सहाय्याने संसारात राहून आत्मज्ञान होते .जन्माचे सार्थक होते ।
जन्माचे सार्थक कसे होते ?
याची जन्मे येणेची काळे । संसारी होईजे निराळे । मोक्ष पाविजे निश्चळे । स्वरूपाकारे । । ६-९-२९
याच जन्मात याच जमान्यात मनाने संसारातून बाजूला साराव़े ,स्वरूपाशी एकाकार व्हावे .मोक्ष प्राप्त करून घ्यावा .सर्वत्र तोच भरला आहे असा अनुभव घेणे ,हीच परमात्म्याची उपासना !
असा हा परमात्मा आत्मनिवेदन भक्तीने प्राप्त होतो .परमात्म्याला शरण जावून त्याच्याशी अनन्य होणे हीच आत्मनिवेदन भक्ती !भक्त देवाशी अनन्य झाला की तो देवस्वरूपाच होतो ।
देवाच्या चरणी समर्पण कसे व्हायचे ?
त्यासाठी आधी मी कोण याचा शोध घ्यायचा ,नंतर निर्गुण परमात्मा कसा आहे ते जाणून घ्यायचे ,देव भक्त संबंध कसा असतो ते जाणून घ्यायचे ,म्हणजे देव भक्ताशी तद्रूप होतो .त्यांच्यातील वेगळेपण संपते .त्यांच्यात भेद उरत नाही .आत्मसमर्पण होते आणि अभेद भक्तीची अवस्था प्राप्त होते

Tuesday, August 3, 2010

अंतरात्मा

मुमुक्षु साधकावस्थेत जातो तेव्हा तो अंतरात्म्याचे पूजन करायला लागतो .अंतरात्म्याचे पूजन साधक का करायला लागतो ते समर्थ सांगतात :
सकळ चाळीता येक । अंतरात्मा वर्तवी अनेक । मुंगीपासून ब्रह्मादिक । तेणेचि चालती । । १०-१०-३५ । ।
मुंगी सारख्या प्राण्यापासून ते ब्रह्मादिका पर्यंत सर्वांमध्ये अंतरात्मा असतो .तो अंतरात्मा आहे तरी कसा ते समर्थ सांगतात :
तो कळतो परि दिसेना । प्रचित येते परी भासेना । शरीरी असे परी वसेना ।येक़े ठाई । । १०-१०-३७
श्रोती बैसू न ऐकतो । घ्राणेंद्रिये वास घेतो । त्वचंद्रिये जाणतो । सीतोष्णादिक । । १०-१०-४१
तो चालवी सकळ देहासी । करून अकर्ता म्हणती त्यासी । तो क्षेत्रज्ञक्षेत्रवासी । देही कूटस्थ बोलिजे । ।
एकच अंतरात्मा सर्वांना चालवतो .सर्वांमध्ये हालचाल करवतो ,कार्य करवतो ,पण तो वेगळेपणाने भासत नाही .शरीरात तो राहतो ,पण एकाच ठिकाणी तो राहत नाही ,कधी तो आकाशभर पसरतो .तर कधी मोठ्या सरोवरात पसरतो .तो सर्वत्र पसरतो .दृष्टीने पहातो ,कानाने ऐकतो ,नाकाने वास घेतो ,जिभेने चाखतो, नाकाने वास घेतो ,त्वचेने थंडगरम ओळखतो,सर्वांमध्ये असून सर्वांपासून निराळा आहे .तो सर्व देहांना चालवतो पण सर्व देहांपासून निराळा आहे
सूक्ष्मरूपे स्थूल रक्षी । नाना सुखदुखे परीक्षी । त्यास म्हणती अंतरसाक्षी अंतरात्मा । । ११-४-१५
प्राण्यांचे देह वेगळे असले तरी सर्वांचे अंत :करण एकच असते .त्या सगळयांना वागवणारी जीवनकला एकच असते .तिलाच जगज्जोती म्हणतात .ती कर्मेंद्रियाद्वारे अनेक प्रकाराची सुखदुखे घेते .ती स्वत :सूक्ष्मरूपे आहे पण स्थूल देहाचे रक्षण करते .अन्तर्यामी राहणा-या सूक्ष्म जाणीव कलेलाच अंतरात्मा म्हणतात .अंतरात्मा सर्व दृष्याचे व कर्माचे मूळ आहे .प्रकृतीने अस्तित्वात येणा-या अंतरात्म्याला ओळखले की प्रकृतीचा पालटतो .असा मनुष्य व्यवहार करत राहिला तरी त्याचे अनुसंधान सुटत नाही .त्याचा अंतरात्मा जागा होतो .अंतरात्म्याची उपासना विश्वव्यापी बनते.तीच उपासकाला परब्रह्मात विलीन करते .म्हणून श्रेष्ठ अशा अंतरात्म्याशी अनन्य व्हावे .त्या अंतरात्मारूपी नारायणाला अखंड ध्यानी मनी आठवावे .अंतरात्मा विश्वात व्यापून आहे .त्याची पूजा करत जावी .त्यासाठी कोणीतरी जीव संतुष्ट करावा .देहासाठी केलेले अंतरात्मा ग्रहण करतो .त्याच्या पर्यंत ते पोहोचते .म्हणून कोणत्याही देहाची मनापासून सेवा करावी ।
जे जे भेटेल भूत । ते ते मानिजे भगवंत । असा दृष्टीकोन ठेवून भेटेल त्याला आपला समजून गरजू माणसाला मदत करावी .ती अंतरात्म्याची उपासनाच असते ,अशी उपासना करता करता निरंजना पर्यंत पोहोचता येते .त्यावेळेस साधक सिध्द अवस्थेला पोहोचतो .आणि परमात्म्याची ज्ञानोत्तर भक्ती करू लागतो .