Tuesday, March 8, 2011

अग्नी स्तवन

श्री समर्थ अग्नीचे स्तवन का करतात ?

भारतीय संस्कृतीत अग्नीला देवांचा प्रतिनिधी मानतात .अग्नीला दिलेले देवांना पोहोचते असा विश्वास

लोकांना वाटतो .अग्नीने माणसाच्या शरीरातील क्रिया चालतात .अग्नी अत्यंत पवित्र आहे .तो सर्वांचा

संहार करतो .अग्नी रामाचा सासरा ,जानकीचा पिता आहे .तो विश्व व्यापतो ,विश्वाचे पोषण करतो

.अग्नीच्या मुखाने सर्व देवांना यज्ञातील हविर्भाग पोहोचतो .शिंच्या तप:श्चर्येला तो फळ देतो .अंधाराचे

थंडीचे,रोगाचे तो निवारण करतो .सर्व जीवांना सांभाळतो ,पोसतो .अग्नी सर्वांना म्हणजे ब्रह्मादिकांना

अभेद असतो .तो अत्यंत शुध्द असतो .

अग्निकरिता सृष्टी चाले | अग्नीकरिता लोक धाले | अग्नीकरितां सकळ जाले |लहान थोर ||१६-५-४ ||

अग्नीने जाळले भूमंडळ | लोकांस राहाण्या जाले स्थळ | दीप दीपिका नाना ज्वाळ | जेथे तेथे||१६-५-५ ||

पोटामध्ये जठराग्नी | तेणे क्षुधा लागे जनी | अग्नी करितां भोजनी |रुची येते ||१६-५-६ ||

अग्नी सर्वांगी व्यापक | उष्णे राहे कोणी येक | उष्ण नस्तां सकळ लोक | मरोन जाती ||१६-५-७ ||

अग्नीमुळे सृष्टी चालते .अग्नीमुळे लोक तृप्त होतात .अग्नी मुळे लहान मोठे प्राणी जिवंत राहतात

.अग्नीमुळे पाणी आटून पृथ्वी झाली .प्राणीमात्र राहण्यासाठी जागा मिळाली .दिवे ,पणत्या ,

अनेक प्रकाराचे जाळ अग्नी मुळे आढळतात .पोटातील जठराग्नी मुळे सजीवांना भूक लागते .

अन्न शिजवून अन्नाला चव आणता येते ।अग्नी माणसाच्या अंगभर व्यापून असतो .त्याच्या

उष्णतेने प्राणी जिवंत राहतो ।अंगातील उष्णता नाहीशी झाली की प्राणी मरतो .शरीरातील अग्नी

मंद होतो तेव्हा तब्येत बिघडते .अग्नीचे म्हणजे युध्द सामुग्रीचे बळ जेव्हा जास्त असते तेव्हा

शत्रूला जिंकता येते . समारंभाच्या प्रसगी झालेले दारूकाम अग्नीचाच प्रकार असतो .

अग्नी अतिशय पवित्र असतो ,मग तो शूद्राच्या घरातील असला तरी सुध्दा! उष्ण औषधांनी रोगी

बरे होतात.तोही अग्नीचाच परिणाम असतो .

लोकांच्या अंगात जठरानळ असतो .सागरात वडवानल ,भूगोलाच्या बाहेर आवरणानल असतो .शंकराच्या

डोळ्यात वीज रूपी अनल असतो .काचेतून अग्नी प्रगट होतो ,लाकडावर लाकूड घासून .चकमकीने अग्नी

प्रगट होतो ..जगातील सर्व लहान थोरांना अग्नीचा आधार असतो .अग्नीच्या मुखाने परमेश्वराचा संतोष

वाढतो .अग्नी जसा उपाय कारक आहे तसा तो अपायकारक ही असतो .माणूस जिवंत असताना

अग्नी त्याला सुख देतो .मेल्यावर त्याला भस्म करतो .अग्नी सर्व भक्षक आहे .प्रलय काळी अग्नी

सर्व सृष्टीचा संहार करतो..अग्नीने अनेक होम करता येतात .घरोघर वैश्वदेव करता येतात .

देवाजवळ दिवे उजळता येतात .दिपाराधाने व निरांजने अग्नीने पेटवून देवाला ओवाळतात .

अष्टधा प्रकृती लोक तिन्ही | सकळ व्यापून राहिला वन्ही | अगाध महिमा वदनी | किती म्हणोन वर्णावा

||१६-५-२८ ||

च्यारी शिंगे त्रिपदी जात | दोन शिरे सप्त हात | ऐसा बोलिला शास्त्रार्थ | प्रचीतीविण ||१६-५-२९ ||

तीन लोक व अष्टधा प्रकृती या सर्वांना अग्नीने व्यापले आहे .त्याचे रूप वर्णन करताना म्हटले आहे की

त्याला चार शिंगे ,तीन पाय ,दोन डोकी ,सात हात आहेत . असा हा अग्नी उष्ण मूर्ती आहे .

No comments: