Monday, March 14, 2011

शिवशक्ती स्वरुप

शिवशक्ती चे स्वरुप कसे आहे ?

मूळ परब्रह्म जे शाश्वत आहे ,निर्विकार ,संत ,निर्मळ ,अचल ,निश्चल आहे ,त्यात स्फुरण स्फुरले .त्या स्फुराणाला च चैतन्य म्हणतात .तेथे गुणसाम्य असते .म्हणजे त्रिगुण समान प्रमाणात ,सूक्ष्म रूपात विभागलेले असतात .

निश्चळी स्मरण चेतले | त्यास चैतन्य ऐसे कल्पिले | गुणसमानत्वे जाले |गुणसाम्य ऐसे ||१७-२-६ ||

त्या स्फुरणालाच अर्धनारी नटेश्वर ,षडगुणेश्वर ,आदिशक्ती ,शिवशक्ती म्हणतात .

गगनी आली अभ्रछाया | तैसी जाणिजे मूळमाया | उद्भव आणि विलया | वेळ नाही ||१७-२-७ ||

निर्गुणी गुणविकारू | तोचि षड्गुणैश्वरू | अर्धनारीनटेश्वरू | त्यास म्हणिजे ||१७-२-८ ||

आदिशक्ती शिवशक्ती | मुळी आहे सर्वशक्ती | तेथून पुढे नाना वेक्ती | निर्माण जाल्या ||१७-२-९ ||

तेथून पुढे शुध्द सत्व | रजतमाचे गूढत्व | तयास म्हणिजे महततत्व | गुणक्षोभिणी ||१७-२-१० ||

आकाशात ज्याप्रमाणे अभ्र म्हणजे ढग येतात ,ते आकाश झाकतात .त्याप्रमाणे परब्रह्मात स्मरण रूपाने ,स्फुरण रूपाने मूळमाया निर्माण झाली .ती निर्माण होण्यास ,लयाला जाण्यास वेळ लागत नाही .

निर्गुणात जो मी एकटा आहे ,बहु व्हावे या संकल्प रूपाने गुणविकार निर्माण झाले .त्याला षडगुणैश्वर किंवा अर्धनारीनटेश्वर म्हणतात .त्यालाच आदिशक्ती ,शिवशक्ती सर्वशक्ती म्हणतात .त्यांच्यातूनच अनेक दृश्य पदार्थ निर्माण होतात .

मूळमायेतून शुद्धसत्व निर्माण होते .त्यात रजोगुण ,तमोगुण गुप्तपणे असतात .त्यामुळे तेव्हा त्याला महत् तत्व किंवा गुणक्षोभिणी म्हणतात .प्रश्न असा येतो की मूळमायेत व्यक्ती आकार नसतो .मग शिवशक्ती कसे म्हटले जाते ?

ही गोष्ट स्पष्ट करण्यासाठी समर्थांनी बी व फळाचे उदाहरण दिले आहे .फळामध्ये बी असते . बी फोडली तर बी मध्ये फळ नसते .पण बी पेरले ,ते उगवले ,तर बी पासून तयार झालेल्या वृक्षाला फळे लागतात .तसे पिंडा मध्ये नर नारी असा भेद असतो म्हणजे मूळामध्ये भेद असला पाहिजे .मूळमायेत असा भेद असला पाहिजे .म्हणून मूळमायेला शिवशक्ती म्हटले आहे .

देहसंबंधाने आपल्याला स्त्री व पुरुष असा भेद दिसतो .देहाचा संबंध संपला की हा भेद नाहीसा होतो .समर्थ म्हणतात :

पुरुषास स्त्रीचा विश्वास |स्त्रीस पुरुषाचा संतोष | परस्परे वासनेस | बांधोन टाकिले || १७-२-२९ ||

ऐसी परस्परे आवडी | स्त्री पुरुषाची माहां गोडी | हे मुळीहून चालली रोकडी | विवेके पहावी ||१७-२-३१ ||

पुरुषाला स्त्रीचा विश्वास वाटतो .स्त्रीला पुरुषाचा संतोष असतो .अशा रीतीने स्त्री पुरुष एकमेकांना बांधून हे ठेवतात . परस्परांमध्ये असलेले आकर्षण मूळमायेपासून ,शिवशक्ती पासून चालत आले आहे .असे सूक्ष्म विवेकाने कळते .

मुळी शिवशक्ती खरे |पुढे झाली वधुवरे |चौ-यांशी लक्ष विस्तारे | विस्तारलीजे ||१७-२-३३ ||

आरंभी मुळात असलेली शिवशक्ती नवरा बायको झाली .वं ८४ लक्ष जीव योनिं चा विस्तार त्यांनी घडवून आणला .



No comments: