Monday, March 14, 2011

अध्यात्म सांगणारा वक्ता

अध्यात्म सांगणारा वक्ता कसा असावा ? कसा असू नये?

अध्यात्म सांगणारा वक्ता स्वच्छ बुद्धीचा असावा .त्याच्या विचारात घोटाळा असू नये .अध्यात्म ग्रंथात येणा-या कोणत्याही शब्दाच्या अर्थाविषयी त्याने साशंक असू नये .त्याला त्या शब्दांची संकल्पना स्वच्छ असावी .त्यासाठी त्याच्या बुद्धीची तयारी चांगली असावी .त्याला स्वत:ची प्रचीती आलेली असावी .

जेव्हा अनाधिकारी व्यक्ती अध्यात्म सांगू लागते तेव्हा काय होते ते समर्थ सांगतात :

पुढे धरिता मागे पेंचला | मागे धरिता पुढे उडाला | ऐसा सांपडतचि गेला | ठाई ठाई || १७-४-३ ||

आपणची बोलिला संव्हार | आपणची बोलिजे सर्वसार | दुस्तर मायेचा पार | टाकीला पाहिजे || १७-४-५ ||

अनाधिकारी व्यक्तीने अध्यात्म सांगणे सुरु केले तर तो परस्पर विरोधी विधाने करतो .नंतर तो त्यानेच केलेल्या विधानांनी अडचणीत येतो .

तो एकीकडे म्हणतो सर्व नाशवंत आहे .दुसरी कडे म्हणतो सर्व काही सार आहे .अशा परस्पर विरोधी विधानांनी श्रोत्यांचा गोधळ उडतो .

अधिकारी व्यक्तीचे विवरण असे असते की तरून जाण्यास कठीण असलेली मायानदी माणसाला पार करून जाता येईल ।त्यासाठी त्याला सूक्ष्म तत्वांचे स्वरूप स्पष्टपणे समजलेले असते .समर्थ सांगतात :

ब्रह्म कसे मूळमाया कैसी | अष्टधा प्रकृती शिवशक्ती कैसी | षडगुणैश्वराची स्थिती कैसी |गुणसाम्याची||१७-४-७ ||

अर्धनारी नटेश्वर |प्रकृती पुरुषाचा विचार | गुणक्षोभिणी तदनंतर | त्रिगुण कैसे || १७-४-८ ||

ब्रह्म कसे आहे ,मूळमाया कशी आहे ? अष्टधा प्रकृती म्हणजे काय ?शिवशक्ती कशी आहे ? गुणक्षोभिणी ,त्रिगुण कसे असतात ? वाच्यांश आणि लक्ष्याश यांचे प्रकार कोणते ?

अशा अनेक प्रश्नांचा सूक्ष्म विचार जो करतो ,तो खरा वक्ता ! खरा वक्ता पाल्हाळ लावत नाही .बोललेले पून्हा बोलत नाही .पण ज्या परब्रह्म प्राप्तीने वाणी कुंठीत होते ,त्या परब्रह्माची कल्पना हा वक्ता श्रोत्यांपर्यंत पोहोचवतो .

अध्यात्म सांगणारा वक्ता कसा असू नये ?

अनाधिकारी व्यक्ती परस्पर विरोधी विधाने करतो .त्यामुळे तो स्वत: अडचणीत येतो .त्याचे बोलणे प्रचीतीचे नसते त्यामुळे तो निर्भय पणे सत्य सांगू शकत नाही .सार असाराची निवड करू शकत नाही त्यामुळे श्रोत्यांची समजूत तो पटवू शकत नाही .आपण ज्ञानी असा अभिमान तो धरतो .भ्रमाला परब्रह्म ,व परब्रह्माला भ्रम म्हणतो ..असा वक्ता असू नये .

No comments: