Saturday, January 8, 2011

भारतीय समाजाची स्थिती

समर्थ कालीन भारतीय समाजाची स्थिती कशी होती ?

श्रोते प्रश्न विचारतात ,महाराज ,आपण देशभर पर्यटन केलेत ,तेव्हा समाज स्थिती कशी आहे ते कृपा करून आम्हाला सांगा .समर्थ सांगतात :

जितुक्या मूर्ती तितुक्या प्रकृती | सारिख्या नस्ती आदी अंती | नेमची नाही पाहावे किती | काये म्हणोनि | | १५-२-२ | |

म-हाष्ट देश थोडा उरला | राजकारणे लोक रुधिला | अवकाश नाही जेवायला | उदंड कामे | | १५-२-३ | |

कित्येक युध्दप्रसंगी गुंतले | तेणे गुणे उन्मत्त जाले | रात्र दिवस करू लागले |युद्धचर्चा | |१५-२-५ | |

उदिम्यास व्यासंग लागला | अवकाश नाहीसा जाला | अवघा पोटधंदाच लागला | निरंतर | |१५-२-६ | |

व्यक्ती तितुक्या प्रकृती असतात .प्रत्येक जण वेगळा असतो .त्यामुळे माणसांच्या वेगवेगळ्या तऱ्हा असतात .पुष्कळ लोक बाटले ,पोर्तुगीज राज्यात नाहीसे झाले ,जाती ,धर्म ,भाषा ,प्रांत यामुळे एकमेकांना दुरावले .सगळा समाज सुस्त ,कोणतेही चैतन्य नसलेला गलितगात्र होता .फक्त महाराष्ट्रात थोडे चैतन्य आहे .तेथे राजकारणाला वाव आहे .पण तेथे माणसांना जेवायला फुरसद नाही .युध्दात वेगवेगळ्या कामात गुंतलेली असतात . त्यांच्या बोलण्याचा विषय असतो फक्त युध्द !

षडदर्शने नाना मते | पाषांडे वाढली बहुते | पृथ्वी मध्ये जेथ तेथे | उपदेसती | | १५-२-७ | |

स्मार्थी अथवा वैष्णवी | उरली सुरली नेली आघवी | ऐसी पाहता गथागोवी | उदंड जाली | |१५-२-८ | |

कित्येक कामनेचे भक्त | ठाईं ठाईं जाले आसक्त | युक्त अथवा अयुक्त | पहातो कोण | |१५-२-९ | |

या गल्बल्या मध्ये गल्बला | कोणीं कोणीं वाढवला | देखो सकेनासा जाला | वैदिक लोक | | १५-२-१० | |

त्याही मध्ये हरिकीर्तन | तेथे वोढले कित्येक जन | प्रत्ययाचे ब्रह्मज्ञान |कोण पाही | |१५-२-११ | |

या कारणे ज्ञान दुर्लभ | पुण्येघडे अलभ्य लाभ | विचारवंता सुल्लभ | सर्व काही | | १५-२-१२ | |

बुद्धीच्या क्षेत्रात षड्दर्शने ,इतर अनेक मते ,समाजघातक मतांची वाढ झाली .उरलेल्या लोकांना स्मार्त आणि वैष्णव लोकांनी आपल्या मध्ये ओढून नेले .सकाम भक्त आसक्त असतात .ते योग्य अयोग्याचा विचार करत नाहीत .काही लोक हरिकीर्तनाकडे ओढली जातात ,प्रत्यक्ष अनुभवाचे ब्रह्मज्ञान कोणाकडे नसते . खरे ज्ञान दुर्लभ झाले .

No comments: