Tuesday, January 11, 2011

शाश्वत ब्रह्म कसे ओळ्खावे?

शाश्वत ब्रह्म कसे ओळखावे ?

शाश्वत परब्रह्म ओळखण्यासाठी मायेने निर्माण झालेल्या या दृश्य विश्वाचे निरसन करावे लागते .त्यासाठी समर्थ विश्वाची उभारणी सांगतात .त्या आधी जे जे या दृश्य विश्वात निर्माण होते ते ते पृथ्वीमध्ये सामावते असे सांगून मग पंचभूतांचे निरसन सांगितले .

पृथ्वीपासून जाली झाडे | झाडापासून होती लाकडे | लांकडे भस्मोन पुढे | पृथ्वीच होये | |१५-४-१ | |

दृश्य जगच मुळात जडद्रव्यापासून निर्माण झाले .या जगात असलेले सर्व जीव शरीरात राहतात .शरीर पंचमहाभूतांपासून निर्माण झाले , जडद्रव्यापासून बनते .त्यामुळे पृथ्वी विश्वाला आधार असते .

पृथ्वीवर झाडे निर्माण होतात .झाडांपासून लाकडे निर्माण होतात .लाकडे जाळून त्याची राख होते .राख म्हणजे माती ,म्हणजेच पृथ्वी ! झाडावर येणारी पाने ,फुले ,फळे वाळतात ,कुजतात शेवटी त्यांची राख होते .म्हणजेच माती होते .

निरनिराळी धान्ये तयार होतात .त्यापासून अन्न तयार होते .माणसे अन्न खातात .त्याची विष्ठा होते .विष्ठा वाळून भुगा झाला की माती बनते .पशु पक्षी अन्न खातात .त्याची विष्ठा होते .ति वाळून भुगा झाला की माती होते .पृथ्वीत मिसळते .सर्व सजीव मरतात .त्यांना जाळतात ,पुरतात ,त्यांची माती होते .ते मातीत मिसळतात .जे जे निर्माण होते ते काही काळ टिकते ,अखेर नाश पावते .ही गोष्ट झाली सजीवांची .तसेच निर्जीव धातूं बद्दल समर्थ सांगतात :

मातीचे होते सुवर्ण | आणि मृत्तिकेचे होती पाषाण | माहां अग्निसंगे भस्मोन | पृथ्वीच होये | |१५-४-१२ ||

मातीचे सोने बनते .मातीचाच पाषाण होतो .अग्नीने पाषाणाची राख होते .शेवटी मातीच होते .सोन्यापासून जर तयार होते .,ति कुजते ,तिला वितळवून रस होतो .पुन्हा मातीच होते .पृथ्वी पासून तयार झालेले पदार्थ उत्पन्न होतात व पृथ्वीत मिसळतात .तसे विश्व मूळमायेतून प्रगट होते व तिच्यातच मिसळते .

पंचभूतांचे हे विश्व मूळमायेत कसे विलीन होते ते समर्थ सांगतात :

आप आळोनि पृथ्वी जाली | पून्हा आपीच विराली | अग्नी योगे भस्म जाली |म्हणोनिया || १५-४-१९ ||

आप जाले तेजापासून | पुढे तेजे घेतले सोखून |ते तेज जाले वायोचेनी |पुढे वायो झडपी ||१५-४-२० ||

वायो गगनी निर्माण जाला |पुढे गगनीच विराला |ऐसे खांजणीभांजणीला बरे पहा || १५-४-२१ ||

पाणी आटून पृथ्वी झाली .अग्नीने पृथ्वीला जाळले ,भस्म केले की पृथ्वी पाण्यात विरते .पाणी तेजापासून निर्माण होते .पाण्याला तेज शोषून घेते .तेज वायू पासून निर्माण होते .वायू तेजाला विझवते .वायू आकाशापासून निर्माण होतो ,तो आकाशात लीन होतो .असा पंचभूतांचा नाश होतो .

भूत म्हणिजे निर्माण जाले | पून्हा मागुते निमाले | पुढे शाश्वत उरले | परब्रह्म ते || १५-४-२३ ||

जे जे निर्माण झाले ते ते सर्व भूत .पंचमहाभूते ही निर्माण झाली आहेत ,म्हणजे त्यांचा नाश आहेच .मग जे उरते ते परब्रह्म ! म्हणजेच मायेने निर्माण झालेल्या या दृश्य विश्वाचा निरास झाला की प्रत्यक्ष अनुभव येतो निर्गुण ,निराकार परब्रह्माचा !

No comments: