Monday, January 31, 2011

लोकसंग्रह करणा-याची चातुर्य लक्षणे

लोकसंग्रह करणा-याची चातुर्य लक्षणे

जो लोकसंग्रह करतो ,तो अनेक लोकांच्या संपर्कात येतो ।तेव्हा तो कसे चातुर्य दाखवतो त्यावर त्याचे लहानपण थोरपण ठरते . समर्थ म्हणतात ;

बहुतांचे बोलीं लागले | ते प्राणी अनुमानी बुडाले | मुख्य निश्चये चुकले | प्रत्ययाचा ||१५-६-१०||

उदंदांचे उदंड ऐकावे |परी ते प्रत्यये पहावे |खरे खोटे निवडावे | अंतर्यामीं ||१५-६-११||

जेव्हा एखादा लोकसग्रह करू इच्छितो ,तेव्हा त्याला पुष्कळ लोकांचे ऐकावे लागते .अनेकांची अनेक मते ऐकून त्याचा गोधळ उडतो ,,तो अनुमान काढतो ,.समर्थांचा प्रत्यक्ष प्रत्यायावर विश्वास आहे .म्हणून ते सांगतात की प्रत्यक्ष अनुभवाने एखाद्या गोष्टीचा खरे खोटेपणा ठरवता येतो .

त्याला सगळ्यांचे सगळे ऐकावे लागते .कोणालाही तो नाही म्हणू शकत नाही .पण एखादी गोष्ट करताना त्या गोष्टी मुळे काय चागले वा काय वाईट होईल हे प्रत्यक्ष प्रत्ययाने समजावून घ्यावे असे समर्थ म्हणतात .जरी एखादा माणूस हेकट असला ,कमअक्कल असला तरी प्रसंग पाहून त्याचे म्हणणे त्याला ऐकावे लागते .

अंतरी पीळ पेच वळसा | तोचि वाढवी बहुवसा | तरी मग शहाणा कैसा | निववू नेणे ||१५-६-१४ ||

माणसाने पीळ पेच वाकडेपणा ठेवला तर तो वाढत जातो .अशा माणसाला शहाणा तरी कसे म्हणावे ? कारण वाकडेपणा धरून लोकांचे अंत:करण त्याला निवविता येत नाही .म्हणून लोकांत वाद वाढवणारा मूर्ख असतो .जो वेड्यांनाही शहाणे करतो तो प्रशंसनीय असतो .

अत्यंत महत्वाची गोष्ट [दुस-याला वश करून घेण्यासाठी ]समर्थ सांगतात :

दुस-याचे चालणी चालावे | दुस-याचे बोलणी बोलावे | दुस-याचे मनोगते जावे |मिळोनिया ||१५-६-१७||

दुस-याच्या मनासारखे वागून त्याचे मन वश करून घेण्यास समर्थ सांगतात .मग त्याची हळू हळू उकल करायला सांगतात .म्हणजे त्याचे प्रश्न ,त्याचे अंतरंग हळू हळू समजून घ्यायला सांगतात .दुसरा वागेल तसे वागावे ,तो बोलेल तसे बोलावे ,की मग दुस-याचा मनोगतात समरस होउन जाता येते .त्यासाठी तो दुस-याचे हित पहातो ,त्याच्या हिताविरूध्द तो काही करत नाही .त्याला शिकवता शिकवता त्याचे अंतरंग सुधारतो .त्यासाठी दुस-याचे मन वश करून घेतो त्याच्या मनातील गुंतागुंत उकलतो. त्याला परमार्थ मार्गाला लावतो

उगीच करिती बडबड | परी करून दाखवणे हे अवघड |.परस्थळ साधणे जड |अवघड आहे ||१५-६-२१||

वायफळ बडबड करणे सहज जमते ,पण प्रत्यक्ष कृती करणे अवघड असते .म्हणून लोकसंग्रही पुरुषाने वायफळ बडबड नं करता प्रत्यक्ष कृती करावी .त्यासाठी प्रसंग पाहून बोलावे ,पण जाणतेपणा आपल्याकडे घेउ नये .मी खूप ज्ञानी आहे ,अशी भावना लोकांमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये .

लोकसग्रह करणे फार कठीण गोष्ट आहे .कारण अनेक प्रकाराचे लोक भेटतात ,कोणी मार्गात संकटे निर्माण करतात .कोणी अपशब्द बोलतात .अपशब्द बोलले तर ते गिळावे लागतात .सर्वत्र संचार करताना शहरे ,गावे हिडावी लागतात .माणसे सूक्ष्म पणे पारखावी लागतात .त्यांच्यातील घेण्यासारखे गुण घ्यायचे असतात .सावधपणा ठेउन सगळी कडील बातमी घ्यावी असे समर्थ सांगतात .

नाना जिनस पाठांतरे | निवली सकळांची अंतरे | लेहोन देर्ता परोपकारे | सामी सांडावी ||१५-६-२७ ||

ज्याचे पुष्कळ विषयांचे ज्ञान पाठ असते ,ते दुस-याला सागितले ,तर दुस-याला समाधान होते ,समोरच्या माणसाला जे हवे ते दिले तर माणसाला श्रेष्ठत्व येते .अनेक लोक अशा माणसाच्या भजनी लागतो .तोच माणूस लोक संग्रह करू शकतो

No comments: