Thursday, February 24, 2011

पिंडाची उत्पत्ती कशी होते ?

पिंडाची उत्पत्ती कशी होते ?

तत्वांचे शरीर जाले | अंतरात्म्यासगट वळले | त्यांचे मूळ जो शोधिले |तो उदकरूप ||१५-९-२ ||

शरत्काळींची शरीरे |पिळेपिळो झिरपती नीरे | उभये रेतें येकत्रे |मिसळती नेत्री ||१५-९-३ ||

अन्नरस देहरस | रक्तरेते बांधे मूस | रसद्वये सावकाश | वाढो लागे ||१५-९-४ ||

वाढता वाढता वाढले | कोमळाचे कठीण जाले | पुढे उदक पैसावले | नाना अवेवी ||१५-९-५ ||

आदिजीवाची [प्रथम सजीवाची ] उत्पत्ती पाण्यातच झाली .मानवी शरीर त्रिगुण ,पंचभूते व अंतरात्मा मिळून बनलेले आहे .सर्वांच्या मुळाशी पाणीच असते .मानवी शरीर स्त्री पुरुषाची रेते रक्तात एकत्र मिसळून तयार होते .रक्त रेताच्या संयोगाने अन्नरस व देह रस मिळून मूस म्हणजे पिंड तयार होते .पिंड हळूहळू वाढू लागतो .

सर्व सजीवांचे मूळ कोण ?

झाडाचे उदाहरण घेतले तर असे दिसते की फळाहून फुल वडील आहे .फुलाहून पान ,पानाहून लाकडे वडील आहेत .लाकडाहून बारीक मुळ्या ,मुळ्याहून पाणी वडील आहे ,पाणी घट्ट बनते .आणि पृथ्वीवर अनेक पिंड आढळतात .पृथ्वीपेक्षा आप ,पाण्यापेक्षा अग्नी ,अग्नी पेक्षा वायू ,वायू पेक्षा अंतरात्मा श्रेष्ठ आहे .म्हणजेच सर्व सजीवांचे मूळ अंतरात्मा आहे .

अंतरात्म्याची उपासना केल्यावर काय होते ?

म्हणौन सकळा वडील देव | त्यासी होता अनन्यभाव | मग हे प्रकृतीचा स्वभाव | पालटों लागे ||१५-९-२०||

करी आपुला व्यासंग | कदापी नव्हे ध्यान भंग | बोलणे चालणे वेग |पडोची नेदी ||१५-९-२१ ||

तो वडील जेथे चेतला | तोचि भाग्यपुरुष जाला | अल्प चेतने तयाला |अल्पभाग्य ||१५-९-२२ ||

तया नारायेणाला मनी | अखंड आठवावे ध्यानी | मग ते लक्ष्मी तयापासूनि || जाईल कोठे ||१५-९-२३ ||

नारायेण असे विश्वी | त्याची पूजा करीत जावी | याकारणे तोषवावी | कोणी तरी काया ||१५-९-२४ ||

अंतरात्मा प्रत्येकाच्या जवळ असतो .,तरीही कोणीही त्याला ओळखण्याचा प्रयत्न करत नाही .त्याचा अनुभव घेण्याची तहान कोणाला नसते .म्हणून सगळ्यात जो श्रेष्ठ त्या अंतरात्म्याशी अनन्य व्हावे .असे समर्थ सांगतात .अंतरात्म्याशी अनन्यपण साधलेला पुरुष त्याचा नित्याचा व्यवसाय करतो ,पण व्यवसाय करत असताना त्याचा ध्यानभंग होत नाही .त्याचे अनुसंधान चुकत नाही .त्याच्या बोलण्या वागण्यात ही काहीही दोष ,कमीपणा ,विपरीत पणा दिसत नाही .जेव्हा तो वडील अंतरात्मा अंत :करणात जागा होतो ,तेव्हा तो भाग्यपुरुष बनतो .म्हणून त्या अंतरात्मा रूपी नारायणाला मनात अखंड आठवावे .त्यामुळे लक्ष्मी त्याच्या पासून दूर जात नाही .अंतरात्मा विश्वात व्यापून असल्याने त्याच्याशी अनन्य होताना आपले मन विश्वरूप होते .

त्या अंतरात्म्याची उपासना कोणती ते पाहू गेल्यास असे दिसते की आपण एखादा जीव संतुष्ट केला तर देहाला केलेले अंतरात्म्याला पोहोचते .अंतरात्मा संतुष्ट होतो .कोणाचेही अंत:करण नं दुखावता ,भेटेल त्याला आपलेसे करणे ,आपलेसे म्हणणे ही उपासनेची दोन चिन्हे आहेत .

अंतरात्माच अंतरात्म्याचा खेळ पाहू शकतो .जेव्हा आपण अंतरात्म्याशी तदाकार होतो ,तेव्हा आपण विश्वाशी तदाकार होतो .ही उपासना उपासकाला मूळमायेच्या पलीकडे निरंजना पर्यंत पोहोचवतो .

उपासना करून अंतरात्म्याचा शोध करून सारे अशाश्वत शाश्वत रूप दिसू लागते .उपासक व उपास्य हां भेदभाव मावळतो .अज्ञान ,ज्ञान या अवस्था जावून वृत्तीशून्यता येते .चंचळाच्या अंमलातून मुक्तता मिळते .

शक्तीपात म्हणजे काय ? तो कोण करतो ?

अज्ञान शक्ती निरसली | ज्ञान शक्ती मावळली | वृत्ती सुन्ये कैसी जाली |स्थिती पहा ||१५-१०-१२ ||

मुख्य शक्तीपात तो ऐसा | नाही चंचळाचा वळसा | निवांती निवांत कैसा |निर्विकारी ||१५-१०-१३ ||

चंचळाची विकार बालटे | ते चंचळचि जेथे आटे | चंचळ निश्चळ धनवटे | हे तो घडेना ||१५-१०-१४ ||

जेथे अंतरात्म्याचा अनुभव येतो ,तेथे दृश्य पदार्थ मुळीच नसतात .अज्ञान ,त्याचे भ्रम नाश पावतात .याचे

ज्ञान ,परिणाम नाश पावतात .वृत्ती शून्य होउन केवलपणा उरतो .म्हणजेच जीव चंचळाच्या चक्रातून बाहेर

येतो .यालाच शक्तीपात म्हणतात .

चंचळाच्या चक्रातून सुटून जीव परमात्मस्वरूप स्वरूप होतो ,निर्विकारी स्वरूपात स्थिर होतो .हे काम फक्त

सद्गुरुच करू शकतात .सद्गुरू म्हणजे प्रचंड अध्यात्मिक शक्ती असलेले एक केंद्रच असते .सद्गुरू आपली

शक्ती शिष्याला दर्शन ,स्पर्शन ,भाषण ,स्मरण ,संकल्प ,आज्ञा ,स्वप्न अशा अनेक मार्गांपैकी एका मार्गाने

देतो . कोणत्या साधकाला कोणत्या मार्गाने शक्तीपात करावा ते सद्गुरुच जाणतो .परमात्म स्वरूपात विलीन

झालेला संत सद्गुरू साधकाच्या अंतरात्म्यास पेटवतो ,जागवतो .जागा करतो .सद्गुरुने शक्तीपात केल्यावर

ती शक्ती वाढवणे हे साधकाचे काम असते .

ते तो अखंडचि आहे | मन उपाधी लक्षून पाहे | उपाधी निरासे साहे | शब्द कैसा || १५-१०-२१ ||

शब्दपर कल्पनेपर | मनबुद्धी अगोचर | विचारे पहावा विचार | अंतर्यामी ||१५-१०-२२ ||

पाहातां पाहातां कळो येते | कळले तितुके व्यर्थ जाते | अवघड कैसे बोलावे ते | कोण्या प्रकारे |\१५-१०-२३ ||

मुळात सारा अवकाश एकच आहे ,अखंड आहे .उपाधी कडे पाहून मन त्यात खंड पाडते .,भेद निर्माण करते

.त्यामुळे अखंड असणारे ,शब्दांच्या पलीकडे असणारे ,कल्पनेच्या पलीकडे असणारे ,मनाच्या बुद्धीच्या पलीकडे

असणारे ,परब्रह्म पहाण्यासाठी विवेक करावा लागतो .विवेकाने पाहू गेल्यास उपाधी नाहीशी होते ,मायीकाता

नाहीशी होते ,भेद निर्माण करणारे शब्दही नाहीसे होतात .

त्या परब्रह्माचे अखंड चिंतन केल्यास साधक निर्विकार होतो ,ज्ञानी बनतो .त्याचा देह प्रारब्धाने वावरतो

,म्हणजे त्याच्या पूर्वसंचिता नुसार ,पूर्व कर्मा नुसार त्याला भोग भोगावे लागतात ,दु:ख सहन करावे लागते

पण .त्याच्या वासना जळालेल्या असतात .त्याच्या मनात ब्रह्मविचार स्थिर झालेला असतो .

शाश्वतास शोधीत गेला | तेणे ज्ञानी साच झाला | विकार सांडूनी मिळाला | निर्विकारी ||१५-१०-२५ ||

मग तो साधक मी ब्रह्म आहे याचेच सतत चिंतन ,मनन करतो .सतत त्याचेच अनुसंधान ठेवतो

.त्यामुळे त्याचे मन स्वस्वरूपात रमते .

ध्यान करता करता मनही नाहीसे होते .वृत्ती शून्यता येते .अनुभव घेणारा ,बोलणारा ,सांगणारा सर्व लय

पावते. विकार रूपी चंचळ मागे टाकून निर्विकार पराब्र्ह्माशी मन तदाकार होते .साधक अंतरनिष्ठ होतो

No comments: