Saturday, September 5, 2009

ब्रह्माचे स्वरुप

ब्रह्म
श्री समर्थ रामदासांनी ब्रह्माचे स्वरूप दासबोधात अनेक समासांतून विस्तृत पणे सांगितले आहे .ब्रह्मालाच परमात्मस्वरूप असेही म्हणतात .समर्थ परब्रह्माचे वर्णन करताना परमात्मवस्तू दुर्लभ आहे असे
म्हणतात .परमात्मवस्तू मिळणे म्हणजे अलभ्य लाभ आहे असे म्हणतात .ती केवळ संतसंगतीने मिळते .ती अगदी उघड आहे ,म्हणजे सर्व व्यापी आहे पण देहबुध्दीने तिला पाहता येत नाही .ती दिव्याच्या किंवा कोणत्याही प्रकाशाने दिसत नाही .पौर्णिमेचा चंद्रप्रकाश तिला दाखवू शकत नाही .तेजोमय सूर्य तिला दाखवू शकत नाही .कारण परमात्म वस्तू वाणी ,मन ,बुध्दी च्या पलिकडे आहे .तिचे स्वरूपच असे आहे की हजार तोंडाचा शेष ही परमात्मवस्तूचे वर्णन करू शकत नाही .मायेच्या अंगी असणा-या कला व शक्तीही परमात्मवस्तूची ओळख करून देवू शकत नाही .
परब्रह्म ते हालवेना अथवा ठावही चुकेना काळांतरी चळेना जेथीचा तेथ - -
परब्रह्म जागेवरून उचलता येत नाही .स्थानावरुन ढळत नाही .ते जसेच्या जसे स्थीर रहाते.त्याच्यात कधी पालट होत नाही .कितीही काळ गेला तरी कमीजास्त पणा होत नाही .ते झिजत नाही .पण सद्गुरू च्या ज्ञान रूपी अंजनानेच ते दिसते .
आदि अंत ब्रह्म निर्गुण तेचि शाश्वताची खूण - -
विश्व निर्माण होण्याआधी व निर्वाण पावल्या नंतर गुणातीत ब्रह्म जसेच्या तसे राहते .तीच त्याची शाश्वतपणाची खूण आहे .विश्व आले आणि गेले तरी ज्यात यत्किंचितही फरक पडत नाही तीच सदवस्तू ! परब्रह्म इतका थोर आहे की ब्रह्मादिकांना ही तो कळत नाही .
जे शस्त्रे तोडिता तुटेना जे पावके जाळिता जळेना कालविता कालवेना आपेकरूनि - -१६
ब्रह्म शस्त्राने तोडू म्हटले तर तुटत नाही .विस्तवाने जळत नाही ,पाण्यात कालवले जात नाही .वा -याने उडत
नाही ,पडत नाही ,झडत नाही ,घडवता येत नाही ,त्याला रंग नाही .ते सदा सर्व काळ टिकते ,निरंतर टिकते .ते दिसत नसले तरी सगळीकडे भरून आहे .सूक्ष्मपणे सर्वत्र व्यापून आहे .
जे सन्मुखचि सर्वकाळ। जे नि :कळंक आणि निखळ। सर्वांतर आकाशपाताळ। व्यापूनि असे । । ६ -३ -५ । ।
जे अखंड आहे ,अति विशाल आहे ,इंद्रियांना जे दिसत नाही ,मनाला भासत नाही ,ते उत्पन्न होत नाही ,नाश पावत नाही ,त्यात बदल होत नाही ,त्यात विभाग नाहीत ,त्यामुळे त्याची रचना करता येत नाही ,.ते सदा सर्वकाळ समोर असते ,आकाश पाताळ व्यापून असते त्यामुळे सर्वांच्या अंतर्यामी असते .
ब्रह्म प्रळयावेगळे ब्रह्म नावारूपा निराळे ब्रह्म कोणी येक्या काळे जैसे तैसे - -२३
परब्रह्माला प्रळय स्पर्श करू शकत नाही .ते नामारूपा च्या पलिकडे आहे .कोणत्याही काळी ब्रह्म जसेच्या तसे आहे त्यात पालट घडत नाही .
ब्रह्म निर्गुण निराकार ब्रह्म नि :संग निर्विकार ब्रह्मासि नाही पारावार बोलती साधू - -
ब्रह्म गुणरहित ,आकार रहित ,संगरहित ,विकार रहित ,मर्यादा रहित ,आहे .सर्वव्यापक ,अनेकात एकपणाने
आहे ,शाश्वत अंत नसणारे ,सदा सर्वकाळ स्थिर असणारे आहे .ते कल्पने पलिकडे आहे ,दृश्याहून वेगळे
आहे .अतींद्रिय आहे ,सर्व इंद्रियांनी मिळून जाणण्याचा प्रयत्न केला तरी न कळणारे आहे .
ते परेहून पर मनोबुध्दी अगोचर संग सोडिता सत्वर पाविजेते - -१८
ब्रह्म देहाच्या अनुभवा पलिकडे आहे .त्या मुळे ते मन बुध्दी च्या पलिकडे आहे ब्रह्म नवे नाही ,जुने नाही ,नवे जुने हा
कालभेद ब्रह्माच्या ठिकाणी नाही .जेथे विश्रांतीला विसावा मिळतो असा आदि पुरूष आत्माराम आहे .
ब्रह्म आकाशाहून मलरहित आहे ,आकाशा सारखे पोकळ,अवकाशमय,रूप नसलेले व अति विशाल आहे .एकवीस स्वर्ग व सप्त पाताळांचा मिळून एक ब्रह्मगोल होतो .अशा अनंत ब्रह्मगोलाला ब्रह्माने व्यापले आहे .अनंत ब्रह्मांडाच्या वर व खाली सर्वत्र ब्रह्म पसरलेले आहे ते जळी स्थळी काष्ठी ,पाषाणी सर्वत्र ब्रह्म आहे .
परब्रह्माला परमात्मा हां शब्द समर्थ द.८ स .८ मध्ये वापरतात .
जन्म नाही मृत्यु नाहीयेणे नाही जाणे नाही
बध्द मोक्ष दोनी नाहीतया परमात्मयासी । । - - । ।
परब्रह्माला जन्म मृत्यु नाही बध्दता ,मोक्ष नाही .तो निर्गुण निराकार ,अनंत ,अपार ,नित्य ,निरंतर आहे .
द .९ स २ मध्ये समर्थ ब्रह्माला स्वस्वरूप म्हणतात .त्यासाठी आकाशाचा दृष्टांत देतात .जेव्हा आपण आकाश पाहतो त्यावेळेस आपल्याला आकाश दिसले असा भास होतो ,आकाश आपल्याला वेगळेपणाने दिसत नाही .तसे स्वस्वरूप सर्व वस्तूंना आतून बाहेरून व्याप्त असते .ते पाण्यात व्यापलेले असते पण भिजत नाही ,पृथ्वीमध्ये व्यापलेले असते पण झिजत नाही ,अग्नीत व्यापलेले असते पण जळत नाही चिखलात व्यापून आहे पण बुडत नाही वा -यात व्यापून असते पण उडत नाही .असे हे स्वरुप घनदाट पणे भरलेले असते पण त्याचा अनुभव घेता येत नाही कारण असते आपली अहंता ! आकाश आणि परब्रह्म यांची तुलना नेहमी केली जाते .पण आकाश म्हणजे परब्रह्म नाही कारण आपण आकाशाला वेगळे पणाने पाहू शकतो .,त्याची आपण कल्पना करू शकतो .पण ब्रहम निर्विकल्प व निर्विकार आहे .
ब्रह्म निर्मळ निश्चळशाश्वत सार अमळ विमळआकाश घन पोकळगगना ऐसे । । १२ - - । ।

No comments: