Tuesday, July 27, 2010

चत्वार देव

३३ कोटी देव मानणा-या या हिंदू धर्मात मतामतांचा गलबला आहे .प्रत्येकाला आपला देव खरा वाटतो .जोपर्यंत त्या देवाकडे मागितालेल्या मागण्या पूर्ण होतात तोपर्यंत तोच देव खरा असे मानले जाते .पण मागण्या पूर्ण होत नाहीत तेव्हा त्या देवाचा प्रभाव संपला असे लोक मानतात .श्रीसमर्थांनी खरा देव कोणता हे सांगताना चार प्रकारचे देव मानले आहेत .१}प्रतिमा २}अवतार ३}अंतरात्मा ४ }परमात्मा
चत्वार देव सांगताना समर्थ म्हणतात :
येक नाना प्रतिमा दुसरा अवतार महिमा तिसरा तो अंतरात्मा चौथा तो निर्विकारी ११-२-३३
पहिल्या प्रकाराचा देव असतो प्रतिमेच्या रूपात !प्रतिमा सगुण असते पण जडरूपात असते .प्रतिमा आपल्या ईष्ट देवतेची मूर्ती असते .ती अलंकारांनी युक्त ,शस्त्र धारण करणारी ,प्रत्येक अलंकाराला,शस्त्राला विशिष्ट अर्थ असणारी अशी असते .आपण तिची पूजा करतो .प्रतिमा माती,धातू ,पाषाण या वस्तूंपासून केलेल्या असतात .या प्रतिमा म्हणजे देव अशी लोकांची कल्पना असते .त्या कल्पनेतून काय होते ते समर्थ सांगतात :
कल्पनेचा केला देव तेथे जाला दृढ़ भाव देवालागी येता खेव भक्त दु;खे दुखावला 6-६-३२
अज्ञानी माणूस कल्पनेने सगुण देव निर्माण करतो .त्याची मनापासून ,श्रद्धेने त्याची पूजा करतो .त्या देवाच्या मूर्तीला अपाय झाला तर त्याला दु ;ख होते .असा कल्पनेचा देव हरवतो ,दुष्ट माणसे त्याला फोडतात ,तुड़वतात।
तेव्हा लोक दु ;खी होतात .बाण , तांदले नाणी यांची पूजा देवघरात लोक पूजा करतात .हाच देव संकटकाळी आम्हाला पावतो ,आमच्या इच्छा पूर्ण करतो असा गैरसमज असतो .समर्थ म्हणतात :
धातु पाषाण मृत्तिका चित्रलेप काष्ठ देखा तेथे देव कैचा मूर्खा भ्रांति पडली ६-६-४४
धातू पाषाण माती चित्रे लाकूड यात देव मानणे हा भ्रम आहे .असे आहे तरी सामान्य अज्ञानी जीवांनी प्रतिमा पूजन करायलाच हवे .मानव देहात परब्रह्माची प्राप्ती हे सर्वश्रेष्ठ ध्येय मानले आहे .समर्थ म्हणतात :सगुणाचेनी योगे निर्गुण पाविजे निर्धारे सगुण प्रतिमेची भाव ठेवून पूजा अर्चा केली तर ती प्रतिमा ज्या देवतेची आहे तिच्या बद्दल प्रेमभाव निर्माण होतो .सर्व कर्ता ,करविता हाच देव आहे अशी भावना निर्माण होते ..मीपणा अहंकार नाहीसा होण्यास मदत होते .मग सामान्य माणूस एक पायरी वर चढतो .आणि अज्ञानाला वाटू लागते की मला परमेश्वर भेटायला हवा .मला काहीतरी साधना करायला हवी.सद्गुरु भेटायला हवा .तेव्हा तो मुमुक्षु होतो .तेव्हा त्याचा देव होतो 'अवतार '

No comments: