Monday, July 26, 2010

जगज्जोती

जसा अकाशामध्ये वायू तशी ब्रह्मामध्ये मूळमाया !त्या मूळमायेत पांच भूते व त्रिगुण सामावलेले असतात पण ते सूक्ष्म रूपात असतात निश्चल परब्रह्मात जी हालचाल होते ,जे स्फुरण असते तो वायू असतो .मूळमाया असते ।
तयामध्ये जाणीवकळा जगज्जोतीचा जिव्हाळा वायो जाणीव मिळोन मेळा मूळमाया बोलिजे १०-९-५
त्या वायू मध्ये शुध्द जाणीव असते .ती जाणीव म्हणजे जगज्जोती !म्हणून वायू आणि शुध्द जाणीव म्हणजे मूळमाया ।
वायो जाणीव जगज्जोती तयास मूळमाया म्हणती पुरुष आणि प्रकृती याचेच नाव १०-९-७
वायोस म्हणती प्रकृती आणि पुरुष म्हणती जगज्जोती पुरुष प्रकृती शिवशक्ती याचेच नाव १०-९-८
येक जाणीव वांटली प्राणीमात्रांस विभागली जाणजाणों वाचविली सर्वत्र काया १०-९-१४
तयेचे नाव जगज्जोती प्राणीमात्र तिचेनी जगती याची रोकड़ी प्रचिती प्रत्यक्ष पहावी १०-९-१५
पक्षी श्वापद किडा मुंगी कोणी येक प्राणी जगी जाणीव खेळे त्याचे अंगी निरंतर १०-९-१६
जाणोन काय पळविती तेणे गुणे वांचती दडपी आणि लपती जाणजाणों १०-९-१७
आवघ्या जगास वांचविती म्हणोनी नाम जगज्जोती ते गेलिया प्राणी मरती जेथील तेथे १०-९-१८
वायू ,जाणीव व जगज्जोती यांच्या मेळयाला मूळमाया म्हणतात .प्रकृती व पुरुष ही मूळमायेचीच नावे.पुरुष प्रकृतीला शिवशक्तीच म्हणतात .वायूमध्ये जी विशेष जाणीव आढ़ळते तोच प्रकृतीतला पुरुष होय .ज्या जाणीवेचा विष्णू झाला आहे ती जाणीव सर्व प्राणीमात्रात विभागली आहे .तिच्या प्रेरणेने प्रत्येक प्राणी समजून आपल्या देहाचे रक्षण करतो .तिला जगज्जोती म्हणतात .प्रत्येक प्राणी तिच्या मुळे जिवंत रहातो .पक्षी ,जनावरे ,किडे ,मुंग्या अशा अनेक प्राण्यात जाणीव निरंतर खेळत असते .कोणताही कठीण प्रसंग आला तर प्राणी जाणीवेने ओळखतात .तेथून पळतात,आपला जीव वाचवतात.अशा प्रकारे जाणीव निरंतर सगळ्या जगाला खेळवते ,
सांभाळते .म्हणून तिला जगज्जोती म्हणतात .ती शरीरातून बाहेर पडली की प्राणी जेथल्या तेथे मरतो .

No comments: