Tuesday, March 8, 2011

श्री समर्थ वायूचे स्तवन का करतात ?

हे दृश्य विश्व शक्तीने कार्यरत आहे .वायू हे शक्तीचे दृश्य रूप आहे . तो दृश्य जगात वा-याच्या रूपाने

असतो .त्याच्या मुळेच पंचमहाभूते एकमेकांत मिसळतात .तो अत्यंत व्यापक असतो . प्राण्यांच्या देहात तो

प्राणरूपाने असतो .त्या रूपानेच तो सर्व प्राण्यांना सर्व क्रियांसाठी लागणारी शक्ती देतो .

वायो करितां श्वासोश्वास | नाना विद्यांचा अभ्यास | वायोकरितां शरीरास | चाळण घडे ||१६-६-२ ||

चळण वळण प्रसारण | निरोधन आणि आकोचन | प्राण अपान व्यान उदान |समान वायो ||१६-६-३ ||

नाग कूर्म कर्कश वायो | देवदत्त धनंजयो |ऐसे हे वायोचे स्वभावो | उदंड असती ||१६-६-४ ||

वायो ब्रह्मांडी प्रगटला | ब्रह्मांड देवतांस पुरवला | तेथूनि पिंडी प्रगटला | नाना गुणे || १६-६-५ ||

वायू मुळेच श्वासोश्वास करता येतो .अनेक विद्यांचा अभ्यास करता येतो .शरीराचे चलन वलन करता

येते ।चलन वलन प्रसारण ,निरोधन,आकुंचन या गोष्टी वायू घडवून आणतो ।माणसाच्या

शरीरात प्राण,अपान व्यान ,उदान आणि समान या पाच मुख्य प्राणांच्या रूपाने शरीरात वावरतो .

नाग ,कूर्म कृकल ,देवदत्त ,धनंजय या पाच उपप्राणांच्या रूपात विविध कार्य करतो .वायू

प्रथम ब्रह्मांडात प्रगट झाला .त्याने अनेक ब्रह्मांड देवता निर्माण केल्या .अनेक प्रकारे पिंडात

प्रगट झाला .वायू अनेक कार्य करतो .

समर्थ म्हणतात वायू जसा कारभारी दुसरा कोणी नाही ।तो आकाशात मेघ भरतो ।त्यांना

झाडून दूर करतो लोकांना पाणी मिळावं म्हणून आकाशात तोच ढग जमा करतो .विजा

चमकतात ,ढगांचा गडगडाट होतो .पाउस पडतो ,ह्या सर्व गोष्टी वायूच्या शक्तीनेच होतात .चंद्र ,

सूर्य ,नक्षत्रमाला ,ग्रहमंडळ ,मेघमाला ह्या सर्व उत्तम गोष्टी विश्वात आढळतात त्या वायूमुळेच !

ज्या सूक्ष्म कमळामध्ये ब्रह्मदेव राहतो ,तो कमलकोष वायूरूप आहे .पाण्याला त्याचाच आधार आहे .

पाण्याच्या आधाराने शेषाने स्वत:च्या डोक्यावर भूगोल धरला आहे .वायू शेषाचा आहार आहे .

वायूने शेषाचे शरीर फुगते .तो पृथ्वीचा भार तोलून धरतो .महाकूर्म [भगवंताचा अवतार ] कासवाचे

शरीर इतके प्रचंड आहे की त्याचे वरचे कवच पाहून ब्रह्मांड पालथे घातले आहे असे वाटते .ते

प्रचंड शरीर वायू मुळेच आहे .वराह अवतारात वाराहाने आपल्या दातावर पृथ्वी तोलून धरली .

ती शक्तीही वायू मुळेच !

ब्रह्मा ,विष्णू ,महेश जगदीश्वर ,अंतरात्मा हे सर्व वायू स्वरूपीच असतात .३३ कोटी कात्यायनी ,५६ कोटी

चामुंडा ,साडे तीन कोटी भुते सगळी वायूरूपच आहेत .पिंड ब्रह्मांडात वायू आहेच ,पण कंचुका

पर्यंत त्याचा व्याप आहे .तो सर्वांना पुरून उरणारा सामर्थ्यवान आहे .

म्हणूनच त्याचे स्तवन समर्थ करतात .

No comments: