Friday, September 9, 2011

नवीन लोकसंग्रह करणारा नेता कसा असावा ?

नवीन लोकसंग्रह करणा-या नेत्याने कसे वागावे ?

श्री समर्थांनी प्रयत्नांना फार महत्व दिले आहे .समाजातील अज्ञानी लोक आसक्तीमुळे जी दु:खे भोगतात ,ती दु:खे कमी करण्यासाठी महंताने कसे प्रयत्न करायला हवेत ते १९-७ यत्न निरुपण या समासात समर्थ सांगतात :

कथेचे घमंड भरून द्यावे | आणि निरूपणी विवरावे | उणे पडोची नेदावे | कोणीयेकविषी || १९-७-१ ||

कोण कोण राजी राखिले | कोण कोण मनी भंगिले | क्षणक्षना परिक्षिले |पाहिजे लोक ||१९-७-६ ||

जिकडे तिकडे कीर्ती माजे | सगट लोकांस हव्यास उपजे | लोक राजी राखोन कीजे | सकळ काही ||१९-७ -१० ||

महंताने धडाक्याने कथा करावी .,सगळे वातावरण कथेने भरून टाकावे .कथेत निरुपणामध्ये अध्यात्माचे ही विवरण असावे .त्यापैकी कशातही उणीव पडू देऊ नये .त्यासाठी महंताचे चौफेर वाचन असावे .मनन चिंतन असावे .तरच श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची महंत लगेच उत्तर देऊ शकेल .नाहीतर श्रोते वक्त्याची किंमत ओळखतात .त्याचे महत्व कमी होते .

महंताला एकांत वासाची जरुरी का आहे ते सांगताना समर्थ सांगतात .: एकांतात गेल्यावरच आपल्यावर कोण प्रसन्न आहे ,आपण कोणाचा मनोभंग केला आहे का ? आपण कोणाला दुखावले आहे का ? याचा विचार करता येतो .लोकांची परीक्षा करता येते .

महान्ताने असे वागावे की सर्वत्र त्याची कीर्ती पसरावी .लोकांना त्याची आवड उत्पन्न व्हावी . काय करावे म्हणजे लोक संतुष्ट राहतील याची चाळणाही करावी .

महंत लोकांमध्ये मिसळत असला ,अज्ञानी लोकांची दु:खे ,त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करता असला

तरी त्याचे आत्मानुसंधान ढळता कामा नये ,तरच तो उत्कट व भव्य कार्य करू शकतो .

लोकसंग्रह कोणी करावा ?

लोकांमध्ये मिसळताना ,ज्याला आपले स्वरूपानुसंधान टिकवता येईल त्यानेच लोकसंग्रह करावा ,त्यानेच महंती मिरवावी .असे समर्थ म्हणतात .

ही धकाधकीची कामे | तीक्ष्ण बुद्धीची वर्मे | भोळ्या भावार्थे संभ्रमे | कैसे घडे || १९-७ - १९ |

लोकसंग्रह करणे सोपी गोष्ट नाही .त्यासाठी विलक्षण बुद्धीचे सामर्थ्य लागते .तीक्ष्ण बुद्धीने वर्मे ओळखून कामे करावी लागतात .समर्थ म्हणतात की लोकसंग्रह सुखासुखी करण्याची गोष्ट नाही .जसे शेत पिकवले पण पीक बाजारात नेले नाही तर वाया जाते .जवाहीर विकण्याचा व्यापार केला पण हिंडले नाही तर नुकसान होते .तसे महंताने लोकसंग्रह केला पण लोकांचे अंत:करण सांभाळले नाही तर महंती फसते ,फजिती होते .

जरी चढती चढती आवडी उठे | तरी परमार्थ प्रगटे | धसधस करता विटे |सगट लोक ||१९ -७ -२१ ||

आपले लोकांस मानेना | लोकांचे आपणास मानेना |अवघा विकल्पचि मना | समाधान कैसे || १९-७-२२ ||

लोकांना महंताचे विचार पटले तर त्यांना महंत आवडू लागतो .त्याच्या विचारा प्रमाणे लोक वागू लागतात .लोकांमध्ये भगवद भक्ती वाढू लागते ,परमार्थ प्रगट होऊ लागतो .याउलट लोकांशी वादविवाद झाले ,संघर्ष झाला ,तर लोक त्या महंताला विटतात ,कंटाळतात . तो त्यांना नकोसा होतो .लोकसंग्रह निर्माण करूनही ,महंताला सर्वांना संतुष्ट ठेवता आले नाही ,समुहाचे अंत:करण सांभाळता आले नाही तर समूह विस्कटतो .,श्रम वाया जातात .म्हणून समर्थ सांगतात :

बहुत दिवस श्रम केला | सेवटी अवघाचि व्यर्थ गेला | आपणास ठाकेना गल्बला | कोणे करावा || १९-७-२४ ||

महंताची महंती किती अवघड आहे ते सांगताना समर्थ सांगतात :

मूर्ख मूर्खपणे भरंगळती | ज्ञाते ज्ञातेपणें कळहो करिती | होते दोहींकडे फजिती | लोकांमध्ये ||१९-७-२६ ||

कारबार आटोपेना करवेना | आणि उगेही राहेना | याकारणे सकळ जना | काय म्हणावे || १९-७-२७ ||

नासक उपाधीस सोडावे | वय सार्थकी घालावे | परिभ्रमणे कंठावे | कोठे तरी || १९-७-२८ ||

समाजातील मूर्ख लोक मूर्खपणे भलतेच वागतात तर शहाणी माणसे शहाणपणाच्या अभिमानाने भांडतात .महंत दोन्हीकडून कात्रीत सापडतो .अशा वेळेस त्याला कारभार झेपत नाही.स्वस्थ ही बसवत नाही ,लोकसंग्रह केला पण त्याला सांभाळणे त्याला जमत नाही .अशा वेळेस परमार्थ साधना करून आपले वय सार्थकी लावावे ,देशात परिभ्रमण करावे ,असा उपदेश श्री समर्थ अशा महंताला करतात .

परिभ्रमण करीना | दुस-याचे कांहीच सोसेना | तरी मग उदंड यातना | विकल्पाची || १९-७ -२९ ||

जो महंत परिभ्रमण करत नाही ,दुस-यासाठी झीज सोसत नाही ,त्याची देहबुद्धी बळकट राहते ,आणि संशयाच्या ,देहबुद्धीच्या यातना त्याला भोगाव्या लागतात .

No comments: