Friday, September 9, 2011

समर्थांच्या महंताचे वागणे कसे असायचे ?

महंताने कसे वागावे ?

द १९ स ५ मध्ये समर्थांनी सांगितले की सद्गुरू मिळाला तर त्याच्या कृपेने संगत्याग व निदिध्यास घडतो .श्री समर्थांचा प्रत्येक महंत सद्गुरूच्या तोडीचा होता .त्यांच्यापैकी कित्येक जणांना त्यांनी अनुग्रह देण्याची परवानगी दिली होती .त्यामुळे प्रत्येक महंताने कसे वागावे ,कसे असावे असा प्रश्न महंताने केल्यावर समर्थ म्हणतात :

परमार्थी आणि विवेकी | त्याचे करणे माने लोकी | कां जे विवरविवरो चुकी | पडोचीं नेदी ||१९-६-१ ||

जो जो संदेह वाटे जना | तो तो कदापी करीना | आदि अंत अनुमाना | आणून सोडी ||१९-६-२ ||

श्री समर्थांचा महंत लोकसंग्रह करत असतो .लोकांना देशप्रेम ,भगवदभक्ती शिकवून त्यांची लौकिक व पारमार्थिक उन्नति करण्याचा प्रयत्न करत असे .असा महंत स्वत: कसा असावा हे सांगताना श्री समर्थ सांगतात की महंत पारमार्थि व विवेकी असावा .तो स्वत: भगवदभजनात रममाण होऊन निस्पृतेने ,विवेकाने वागणारा असावा .तरच त्याचे बोलणे ,वागणे लोकांना पटणारे होते .कारण अशा महंतांवर लोकांचे पूर्ण लक्ष असते .त्यामुळे लोकांच्या मनात कोणताही संदेह निर्माण होईल अशी वर्तणूक महंताची नसावी .त्यांमुळे त्याने विचार करूनच ,चूक घडणार नाही असेच वागणे ठेवायला हवे .

महंताने कसे असावे ते समर्थ सांगतात :

कोण्हास कांहीच न मागावे | भगवदभजन वाढवावे | विवेकबळे जन लावावे |भजनाकडे || १९-६-११ ||

परांतर रक्षायाची कामे | बहुत कठीण विवेकवर्मे | स्वईच्छेने स्वधर्मे | लोकराहाटी ||१९-६-१२ ||

महंताने कोणाकडे काही मागू नये .त्याने भगवंताचे भजन वाढवावे .अनेक लोकांना भगवंताच्या भजनाकडे विवेकाने वागून वळवावे .त्यासाठी आधी महंताचे चारित्र्य शुध्द हवे . सदाचारी हवे . तरच तो हे काम करू शकेल .

प्रत्येक व्यक्ती तिच्या स्वभावानुसार वागत असते . प्रत्येकाची मते भिन्न असतात .प्रत्येकाचा स्वभाव त्याच्या सत्व ,रज ,तम यापैकी जो गुण प्रभावी असेल त्याप्रमाणे ठरत असतो .,म्हणूनच प्रत्येक व्यक्तीला खुश ठेवणे ही महंता साठी एक कला आहे . अशी कला साधणे महंताला शक्य झाले तर तर तो लोकसंग्रह करू शकतो .

लोकांचा समूह एकत्र आणून ,त्यांच्या कडून कार्य घडवून आणण्यासाठी तो नेता एकजिनसी ,ध्येय निष्ठ असायला हवा .तसा तो नसेल तर समुहात अंतर्गत विरोध उत्पन्न होतो .आणि कार्याची हानी होते .

उत्कट भव्य तेचि घ्यावे | मळमळीत अवघेची टाकावे | निस्पृहपणे विख्यात व्हावे | भूमंडळी ||१९-६-१५ ||

दीक्षा बरी मित्री बरी | तीक्ष्ण बुद्धी राजकारणी बरी | आपणास राखे नाना परी | अलिप्तपणे || १९-६-१७||

अखंड हरीकथेचा छंदु | सकळांस लागे नामवेदू | प्रगट जयाचा प्रबोधु | सूर्य जैसा || १९-६-१८ ||

दुर्जनासी राखो जाणे | सज्जनासी निववू जाणे | सकळांचे मनीचे जाणे | ज्याचे परी ||१९-६-१९ ||

महंताची दीक्षा चांगली असते ,मैत्री सुरेख असते . राजकारणातही त्याची तीक्ष्ण बुद्धी चांगली असते .असा समाज जीवनाच्या सर्व क्षेत्रात तो उत्तम असायला हवा .तरच तो अलिप्तपणे वागून लोकसंग्रह करू शकतो .करून तो कशातही नसावा .असा महंत हवा .

त्याला हरिकथेचा छंद हवा .हरीकाठेतून नामाची गोडी त्याने लोकांना लावायला हवी .त्याचे ज्ञान सूर्याप्रमाणे तेजस्वी असल्यानेच तो लोकांना नामाला लावण्याचे पवित्र कार्य करू शकतो .त्याच्या अंगी सर्व प्रकारच्या लोकांचे समाधान करण्याचे सामर्थ्य असावे .त्यामुळे दुर्जनाला कसे सांभाळायचे ते त्याला माहिती असायला हवे .प्रत्येकाच्या मनात काय चालले आहे ते त्याला कळायला हवे व योग्य तऱ्हेने त्याने वागायला हवे . त्याने खरे अलिप्त ,निस्पृह ,दयाशील असायला हवे .

त्याच्या संगतीत आलेली माणसे अंतर्बाह्य बदलायला हवीत .महंताच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीच्या ठिकाणी उत्तम गुणांची जोपासना व्हायला हवी .महंताने त्याला हवा तसा चांगला बदल लोकांमध्ये लोकांमध्ये घडवून आणणे हेच महंताचे खरे सामर्थ्य असते .

जेथे तेथे नित्य नवा | जनासी वाटे हा असावा | परंतु लालची चा गोवा |पडोंचि नेदी || १९-६-२१ ||

उत्कट भक्ती उत्कट ज्ञान | उत्कट चातुर्य उत्कट भजन | उत्कट योग अनुष्ठान |ठाई ठाई ||१९-६-२२ ||

काही येक उत्कटेवीण |कीर्ती कदापी नव्हे जाण | उगाच वणवण फिरोन | काय होते ||१९-६-२४ ||

श्री समर्थांनी महंताने एके जागी जास्त काळ राहू नये असेही सांगितले आहे .एखाद्या येता ठिकाणाचे काम झाले की तेथून निघून जावे असे समर्थ सांगतात .कारण एकां ठिकाणी जास्त काळ राहले तर त्या लोकांविषयी ,जागेविषयी ,कामाविषयी आसक्ती निर्माण होण्याची शक्यता असते .म्हणून समर्थांचे महंत फिरत असत .नव्या जोमाने ,नव्या स्फूर्ती ने ! त्यामुळे लोकांना तो सतत हवाहवासा वाटे .पण कोणाकडून काही घ्यावे अशी लालसा त्याच्या मनात कधीही येता कामा नये .

लोकांना तो हवाहवासा वाटायला हवा कारण त्याची भक्ती ,ज्ञान ,भजन योग ,अनुष्ठान सर्वच उत्कट असायला हवी .सर्वांना तो स्फुर्ती देणारा हवा .त्याची उत्कट निस्पृहता हवी .तरच तो कीर्ती संपादन करू शकेल . उत्कटता म्हणजे मनाची तळमळ ,मनाची तीव्रता .मनाची तळमळ व मनाची तीव्रता असल्याने त्याच्या प्रत्येक कार्यात जिवंतपणा ,तरतरीतपणा लगबग अनुभवायला मिळायला हवी .

No comments: