Friday, September 9, 2011

महंताची वागणूक

श्री समर्थांचा महंत वागतो कसा ?

श्रीसमर्थांच्या महंताभोवती एक वातावरण असे .त्यात अध्यात्म ,उपासना ,राजकारण या तिन्हींचा समावेश असतो .

जेथे अखंड नाना चाळणा | जेथे अखंड नाना धारणा | जेथे अखंड राजकारणा | मनासी आणती || १९-१०-१ ||

चर्चा आशंका प्रत्योत्तरे | कोण खोटे कोण खरे | नाना वग्तृत्वे शास्त्राधारी | नाना चर्चा || १९-१०-३ ||

भक्तीमार्ग विशद कळे | उपासनामार्ग आकळे | ज्ञानविचार निवळे | अंतर्यामी ||१९-१०-४ ||

श्रीसमर्थांचा महंत जेथे असतो ,तेथे अनेक विषयांवर विचारविनिमय चालतो .अनेक गोष्टी मनात वागवल्या जातात .अनेक राजकीय समस्यांवर चर्चा चालत . उत्तम गुणांचा अंगीकार कसा करावा ,याची चर्चा चालत .सतत भगवद निरुपण चाले .अनेक शंकांचे निरसन होत असे .शास्त्राधारे चर्चा होत असे .त्यामुळे सर्वांना भक्तीमार्ग सांगितला जात असे .त्यामुळे प्रत्येक जण मनात निवत असे ,शांत होत असे .मीपणा लय होण्यासाठी कोणती साधना करावी लागते ते चर्चेने कळत असे .

असे भक्तीज्ञानवैराग्य निर्माण करणारा महंत कसा वागतो ?

श्री समर्थ सांगतात :

वैराग्याची बहु आवडी | उदास वृत्तीची गोडी | उदंड उपाधी तरी सोडी | लागोंची नेदी || १९-१०-५ ||

प्रबंदाची पाठांतारे |उत्तरासी संगीत उत्तरे |नेमक बोलता अंतरे |निववी सकळांसी ||१०९-१०-६ ||

आवडी लागली बहु जना | तेथे कोणाचे काही चालेना | दळवट पडिला अनुमाना | येईल कैसा ||१९-१०-७ ||

लोकसंग्रह करणा-या श्रीसमर्थांच्या महंताला वैराग्याची आवड असते .,त्याच्यात अलिप्तपणा भरलेला असतो .तो अनेक कार्ये लोकांकडून करवून घेत असतो .पण त्यात तो कधीच अडकत नाही .त्याचे वाचन पाठांतर खूप मोठे असल्याने लोकांच्या शंकांची त्याला व्यवस्थित उत्तरे देता येतात .त्याचे बोलणे योग्य अ नेमके असते .त्यामुळेच सर्वांचे समाधान होते .

श्रीसमर्थांच्या महंतावर लोक खूप प्रेम करतात ,आदर करतात .त्यामुळे त्याच्या पुढे कोणी बोलत नाही .परंतु लोकांना त्याच्या मनाची स्थिती कळत नाही .त्याचे अनुसंधान लोकांना कळत नाही .तो स्वत: उपासना करतोच ,त्याबरोबर उपासनेचा प्रसार करतो .तो लोकांना फारसा दिसत नाही कारण तो मधूनच एकांताचे सेवन करतो .तो कोठे जातो ,काय करतो ते लोकांना समजत नाही ..

त्याला भेटायला आलेल्या लोकांचे अंत:करण विचाराने ,विवेकाने भरून टाकतो .एकांतिक वृत्तीचे लोक त्याच्या सानिध्यात समतोल बनतात .तो लोकांना श्रवण मनन करायला लावतो .तो सतत सावध असतो .सतत विवेकाने चालतो .

जितुके आपणास ठावे | तितुके हळूहळू सिकवावे | शाहाणे करून सोडावे | बहुत जन || १९ -१०-१४ ||

परोपरी सिकवणे | आडणुका सांगत जाणे | निवळ करुनी सोडणे | निस्पृहासी ||१९-१०-१५ ||

होईल ते आपण करावे | न होता जनाकरवी करवावे | भगवदभजन राहावे | हा धर्म नव्हे ||१९-१०-१६ ||

आपण करावे करवावे | आपण विवरावे विवरवावे |आपण धरावे धरवावे |भजनमार्गासी ||१९-१०-१७ ||

श्रीसमर्थांचे सांगणे असे की आपल्याला जेव्हडी माहिती आहे तेव्हडे सगळे ,हाती काहीही न ठेवता दुस-याला शिकवावे लोक शहाणे कसे होतील याचा सतत विचार करावा लोकांना समजे पर्यंत शिकवावे .त्यांच्या अडचणी अडवणूका यांचा निरास करावा .लोकांना नि:संदेह करावे .लोककार्यात जेव्हडे शक्य आहे तेव्हडे करावे .जे शक्य नाही ते लोकांकडून करवून घ्यावे .पण भगवद भजन सोडू नये .

उपाधीत सापडों नये | उपाधीस कंटाळो नये | निसुगपण कामा नये | कोणीयेकाविषी || १९-१०-२० ||

काम नासणार नासते | आपण वेडे उगेच पाहाते | आळसी हृद्यशून्य ते |काये करू जाणे || १९-१०-२१ ||

उपाधीपासून सुटला | तो निस्पृहपणे बळावला | जिकडे अनुकूल तिकडे चालला | सावकाश ||१९-१०-२४ ||

महान्ताने उपाधीत सापडू नये ,तिच्यात अडकू नये ,पण त्याने उपाधीला कंटाळू नये .कोणत्याही कामाचा आळस करू नये .असा उपदेश श्रीसमर्थ महंताला करतात .कारण आळसाने हाती घेतलेल्या कार्याचा नाश होतो .समर्थ पुढे सांगतात की महंताचे जीवन धकाधकीचे असल्याने आपल्या सारखा महंत तयार करण्यासाठी मनाने व शरीराने जो बलवान आहे ,त्याला अनेक प्रकारच्या युक्त्या ,अनेक कौशल्य शिकवून ,अनेक विचार देऊन तयार करावे,त्यामुळे तो महंती करू शकेल .

समर्थ पुढे सांगतात की जोपर्यंत लोकसंग्रहाचा व्याप आपण सांभाळू शकतो तोपर्यंत लोकसमुदायात राहावे .जेव्हा जमणार नाही तेव्हा तेथून निघून जाऊन आनंदाने परिभ्रमण करावे .जितके उपाधी पासून मोकळे व्हावे तितके मोकळे होत जातो .

कीर्ती पाहाता सुख नाही | सुख पाहाता कीर्ती नाही | केल्याविण कांहीच नाही | कोठे तऱ्ही ||१९-१०-२५ ||

संसार मुळीच नासका | विवेके करावा नेटका | नेटका करितां फिका |होत जातो || १९-१०-२८ ||

दोन महत्वाच्या गोष्टी श्रीसमर्थ केवळ महंतालाच नव्हे तर सामान्य माणसालाही सांगतात :

कीर्ती हवी असेल तर सुख आराम चालत नाही आराम हवा असेल तर कीर्ती मिळत नाही ..कीर्ती फक्त कष्ट केल्यानेच मिळते .साम्मान्य माणसाने संसार करताना ,महंताने महंती करताना मध्यचं उत्साह सोडू नये .,धीर सोडू नये .

संसार मुळातच नासका ,नाशिवंत ,अशाश्वत असतो .म्हणून संसार विवेकाने व्यवस्थित करावा .असे समर्थ सांगतात .विवेकाने संसार व्यवस्थित केला की त्यातला रस हळूहळू कमी कमी होत जातो ,आसक्ती क्षीण होत जाते .

No comments: