Friday, September 9, 2011

आत्मा कसा आहे ? सगुण की निर्गुण ?

आत्मा सगुण की निर्गुण ?

श्रोते प्रश्न विचारतात :

आत्मा आणि निरंजन | येणेही वाटतो अनुमान | आत्मा सगुण की निर्गुण | आणि निरंजन ||२०-१-३ ||

आत्मा आणि निरंजन याविषयी शंका आहे आत्मा सगुण आहे की निर्गुण निरंजन आहे ?

श्रीसमर्थ उत्तर देतात :

आत्मा आणि निरंजन | हे दोहींकडे नामाभिधान | अर्थान्वये समजोन | बोलणे करावे ||२०-१-११ ||

आत्मा मन अत्यंत चपळ | परी ते व्यापक नव्हेचि केवळ | सुचित अंत:करण निवळ | करुनी पहावे || २०-१-१२ ||

अंतराळी पाहाता पाताळी नाही | पाताळी पाहांता अंतराळी नाही | पूर्णपणे वसत नाही | चहुंकडे ||२०-१-१३ ||

आत्मा हा शब्द जीवात्मा व निरंजन ब्रह्म या दोन्ही अर्थाने वापरतात .आत्मा म्हणजे जीवात्मा हा अर्थ घेतला तर आत्मा व मन चपळ ,चंचळ आहेत . जीवात्मा जेव्हा अंतराळात असतो तेव्हा तो पाताळात नसतो .म्हणून एकां वेळेस तो सगळी कडे व्यापून नसतो .तो पुढे असेल तर मागे नसतो .डावीकडे ,उजवीकडे एकाच वेळी नसतो .एकाच वेळेस तो दाही दिशा व्यापात नाही .माणूस एकाच वेळी चार दिशांना लावलेल्या निशाणांना स्पर्श करू शकत नाही .

सूर्य उगवल्यावर सूर्याचे पाण्यात पडलेले प्रतिबिंब म्हणजे सूर्य नसतो .माणसाच्या जाणीवेत ब्रह्माचे जे प्रतिबिंब असते त्याला जीवात्मा म्हणतात .म्हणजे जीवात्मा परब्रह्म होऊ शकत नाही .सूर्याला उदय अस्त असतो .म्हणून सूर्य व परब्रह्म एक होऊ शकत नाही .

घटाकाश व मठाकाश यांचा दृष्टांत निर्गुणासाठी योग्य ठरतो ,कारण आकाशाचे निर्गुणाशी साम्य आहे .मूळ आकाश व्यापक आहे .निर्गुण परब्रह्म व्यापक आहे .पिंड व ब्रह्मांड यांच्या उपाधीमुळे जीव व शिव असा भेद परब्रह्मात दिसतो .जसे घट मोडला की आकाश जसेच्या तसे दिसते तसेच जीव आणि शिव नाहीसे झाले की मूळ परब्रह्म जसेच्या तसे राहते .

गगन आणि हे मन | कैसे होती समान | मननसीळ महाजन |सकळहि जाणती || २०-१-१९ ||

मन हे पुढे वावडे | मागे अवघेचि रिते पाडे | पूर्ण गगनास साम्यता घडे |कोणे प्रकारे ||२०-१-२० ||

आकाश आणि मन यांची बरोबरी होऊ शकत नाही ,कारण मन जीवात्म्याला धरून राहते .आकाश नेहमी व्यक्तीनिरपेक्ष असते .मन मागे पुढे भरकटते .ते एकदेशी असते .आकाश मात्र सर्वदेशी असते ,सर्व व्यापक असते .परब्रह्म अचल आहे ,पर्वतही अचल आहे ,परब्रह्म पूर्ण निश्चल व अविनाशी असते पर्वत निश्चल असला तरी नाशिवंत असतो .

या सर्व विवेचना वरून असे दिसते की जीव अज्ञानी असतो ,सगुण असतो ,ईश्वर ज्ञानी असतो तरीही सगुण असतो .परब्रह्म मात्र गुणरहित असतो .

No comments: