Wednesday, September 21, 2011

गुणक्षोभिणी

ब्रह्मी मूळमाया जाली | तिच्या पोटी माया आली | मग ते गुणा प्रसवली | म्हणून गुणक्षोभिणी |८-४-२||

परब्रह्मामध्ये चंचळ निर्माण झाले .संकल्प निर्माण झाला .ती मूळमाया .तिच्या पोटी माया जन्माला आली .तिने सत्व ,रज ,तम हे त्रिगुण निर्माण केले म्हणून तिला गुणक्षोभिणी म्हणतात .गुणमाया प्रगट झाली की त्या गुणांची साम्यावस्था भंगते व ती व्यक्त दशेला येतात .मूळमायेत गुणांचा विकार आढळतात की तिला गुणक्षोभिणी म्हणतात .नंतर तिच्यात सत्व ,रज ,तम यांच्या मिश्रणाने विश्व निर्माण होण्याची क्रिया चालते .त्यात प्रथम साडेतीन मात्रांचा ओंकार तयार झाला .त्यालाच हिरण्यगर्भ ,शब्दब्रह्म ,किंवा लोगास म्हणतात .संतांचे नाम हेच .

ऐलीकडे गुणक्षोभिणी | तेथे जन्म घेतला त्रिगुणी | मूळ वोंकाराची मांडणी | तेथून जाणावी ||१३-३-६ ||

अष्टधा प्रकृतीची निर्मिती होण्याआधी गुणक्षोभिणी ,तिच्यातून सत्व ,रज ,तम हे तीन गुण जन्म पावतात .मूळ ओंकार तेथूनच निर्माण होतो .अकार ,उकार ,मकार या तीनही चा मिळून ओंकार निर्माण होतो . तोच षडगुणैश्वर ,ईश्वर !

निर्गुणा मध्ये जो संकल्प रूप गुणविकार निर्माण झाला तोच षडगुणैश्वर ,अर्धनारीनटेश्वर ,आदिशक्ती ,शिवशक्ती .त्यांच्यातून पुढे व्यक्त दृश्य विश्व निर्माण झाले .मूळमायेतून पुढे शुद्धतत्व निर्माण झाले .त्यात रजोगुण ,तमोगुण ,गुप्तपणे वास करतात .त्यास महत्तत्व किंवा गुणक्षोभिणी म्हणतात .

त्रिगुण गुणक्षोभिणी माया |माईक जाईल विलया | अपूर्ण येकदेसी तया | पूर्ण व्यापकता न घडे || २०-१-१० ||
त्रिगुण आणि गुणक्षोभिणी माया मायिक आहेत म्हणूनच नाशिवंत आहेत .म्हणून अपूर्ण एकदेशी आहेत .त्यांना पूर्ण व्यापकता नाही .

त्रिगुणांची रूपे ऐसी | कळो लागली अपैसी | गुणापुढील कर्दमासी | गुणक्षोभिणी बोलिजे || २०-३-८ ||

त्रिगुणांचा मूळस्वभाव कसा आहे हे कळले की त्रिगुणांचा जो काला आहे त्याला गुणक्षोभिणी म्हणतात हे कळते

शुध्दसत्व गुणांची मांडणी |अर्धमात्रा गुणक्षोभिणी |पुढे तीही गुणांची करणी | प्रगट जाली || २०-५-९ ||
शुध्दसत्व गुणाची कल्पना ,अर्धमात्रा असलेली गुणक्षोभिणी ,तिच्यातून प्रगट होणारे सत्व ,रज ,तम हे तीन गुण सर्व मूळमायेची नावे आहेत .

षडगुणैश्वर

मूळमाया जगदेश्वर |त्यासीच म्हणिजे षडगुणैश्वर | अष्टधा प्रकृतीचा विचार | तेथे पहा ||१३-३-४ ||

परब्रह्म निश्चलपणे असतो .त्यात चंचळ संकल्प उठला ,त्यास आदिनारायण म्हणतात .मूळमाया ,जगदीश्वर ,यांनाच षडगुणैश्वर म्हणतात .अष्टधा प्रकृतीचा विचार तेथेच आरंभतो .यश ,श्री ,औदार्य ,ज्ञान ,वैराग्य ,ऐश्वर्य हे सहाही गुण ज्याच्यापाशी आहेत ,तो षडगुणैश्वर गणेश गुणाधीश आहे .

गुणसाम्य

गुप्तरूपे गुणसौम्य | म्हणौन बोलिजे गुणसाम्य | सूक्ष्म संकेत अगम्य | बहुतांस कैचा || २०-२-२५ ||

गुण हे गुप्त रूपाने म्हणजे अव्यक्त दशेमध्ये समान असतात ,म्हणून गुणक्षोभिणीला गुणसाम्य म्हणतात .

चैतन्य

जड पदार्थ चेतविते ते | म्हणौन चैतन्य बोलिजेते | सूक्ष्म रूपे संकेते ते | समजोन घ्यावी ||२०-२ -२१ ||

निश्चळी चंचळ घेतले | म्हणौनी चैतन्य बोलिले | गुणसमानत्वे जाले |गुणसाम्य ऐसे || २०-५-७ ||

जड पदार्थांना ती चेतना देते ,म्हणून तिला चैतन्य असे नाव आहे .निश्चळ परब्रह्मात चैतन्य जागे झाले म्हणून त्याला चैतन्य म्हणतात .तेथे गुणांचे प्रमाण सम असते म्हणून त्याला गुणसाम्य म्हणतात .तोच अर्धनारीनटेश्वर ,तोच षडगुणैश्वर म्हणतात .

शुध्दसत्व

तत्वांमध्ये मुख्य तत्व | ते जाणावे शुध्दतत्व | अर्धमात्रा महत्तत्व |मूळमाया || १२-५-११ ||

शुध्दतत्व हे सर्व तत्वांमध्ये मुख्य तत्व आहे .त्यालाच अर्धमात्रा म्हणजेच गुणक्षोभिणी ,महत्तत्व म्हणतात .मूळमाया असेही म्हणतात .

प्रकृती पुरुष

वायो जाणीव जगज्जोती | तयास मूळमाया म्हणती | पुरुष आणि प्रकृती |याचेच नाव || १०-९-७ ||

वायोस म्हणती प्रकृती |आणि पुरुष म्हणती जगज्जोती | पुरुष प्रकृती शिवशक्ती |याचेच नाव ||१०-९-८||

वायू जाणीव आणि जगज्जोती यांच्या मेळ्यास मूळमाया म्हणतात .प्रकृती पुरुष हे मूळमायेचे नाव आहे .वायूला प्रकृती व जगज्जोतीलापुरुष म्हणतात .पुरुष प्रकृतीलाच शिवशक्ती असेही म्हणतात .

पुरुष इच्छेत प्रकृतीची व प्रकृतीच्या विकासात पुरुषाची अभिव्यक्ती असा परस्पर अभेद्य संबंध असतो ,त्याला प्रकृती पुरुष म्हणतात .श्री समर्थांनी ११-१-७ मध्ये प्रकृतीची व्याख्या केली आहे .

पांच भूते तीन गुण | आठ जाली दोनी मिळून | म्हणौन अष्टधा प्रकृती जाण | बोलिजेती ||११-१-७ ||

पांच भूते आणि तीन गुण मिळून आठ तत्वे होतात तिला अष्टधा प्रकृती म्हणतात

शिवशक्ती

वायोस म्हणती प्रकृती | आणि पुरुष म्हणती जगज्जोती | पुरुष प्रकृती शिवशक्ती | याचेच नांव || १०-९-८ ||

वायो ,जाणीव जगज्जोती यांच्या मेळाव्याला मूळमाया म्हणतात .पुरुष आणि प्रकृती असे मूळमायेचे नाव आहे .वायूला प्रकृती व जगज्जोतीला पुरुष म्हणतात .पुरुष प्रकृतीला शिवशक्ती असे ही म्हणतात .

आदिशक्ती शिवशक्ती |मुळी आहे सर्वशक्ती | तेथून पुढे नाना वेक्ती | निर्माण जाल्या ||१७-२-९ ||

तेथून पुढे शुध्दतत्व | रजतमाचे गूढत्व | तयासी म्हणिजे महत्तत्व | गुणक्षोभिणी || १७-२-१०||

मुळी असेचिना वेक्ती | तेथे कैंची शिवशक्ती | ऐसे म्हणाल तरी चिती | सावधान असावे ||१७-२-११ ||

आदिशक्ती ,शिवशक्ती या सर्व शक्ती मूळमायेतच असतात .त्यातून अनेक पदार्थ निर्माण होतात .मूळमायेतून नंतर शुध्द तत्व निर्माण होते त्यात रजोगुण तमोगुण गुप्त पणे वास करतात .

ज्याप्रमाणे फळात बी असते ,पण बी फोडले तर फळ दिसत नाही .त्याप्रमाणे पिंडामध्ये नर नारी असा भेद दिसतो .मुळातच म्हणजे मूळमायेत हा भेद असला पाहिजे .म्हणून मूळमायेला शिवशक्ती किंवा अर्धनारी नटेश्वर म्हणतात

मुळी शिवशक्ती खरे |पुढे जाली वधुवरे | चौ-यांशी लक्ष विस्तारे | विस्तारिली जे ||१७-२-३३ ||

अगदी मुळात स्त्रीपुरुष हा सूक्ष्म भेद निर्माण होतो .नंतर तो भेद स्पष्ट दिसू लागतो .तसे आरंभी मुळात शिवशक्ती ही खरी .तीच पुढे नवरा बायको झाली .त्यांच्या पासून ८४ लक्ष योनिंचा विस्तार झाला .

अर्धनारीनटेश्वरु |तोचि षडगुणैश्वरु | प्रकृतीचा विचारू | श्व्शाक्ती ||२०-५-८ ||

परब्रह्माच्या ठिकाणी जे मूळ स्फुरण झाले त्याला मूळमाया म्हणतात .त्या मुळच्या संकल्पाला हरिसंकल्प म्हणतात .सर्वांच्या अंतर्यामी वसणारा आत्माराम किंवा अंतरात्मा तो हाच आहे . अर्धनारीनटेश्वर ,षडगुणैश्वर ,शिवशक्ती ,प्रकृती पुरुष तो हाच !

No comments: