Wednesday, September 21, 2011

सृष्टीचे तीन वर्ग

सृष्टीचे तीन वर्ग कोणते ?

श्रोत्यांनी श्रीसमर्थांना प्रश्न केला ,’’सृष्टीरचनेतील महत्वाच्या गोष्टी कोणत्या ? तिची विविध लक्षणे कोणती ?

श्रीसमर्थ उत्तर देतात :

कल्पनेची सृष्टी झाली | त्रिविध प्रकारे भासली | तिक्ष्ण बुद्धीने आणिली |पाहिजे मना || २०-२-१५ ||

मूळमायेपासून त्रिगुण |अवघे येकदेसी लक्षण | पांचा भूतांचा ढोबळ गुण | दिसत आहे || २०-२-१६ ||

पृथ्वी पासून च्यारी खाणी | चत्वार वेगळाली करणी | सकळ सृष्टीची चाली येथूनी | पुढे नाही || २०-२-१७ ||

मुळात सृष्टी कल्पनेपासून झाली .ती तीन प्रकारे आपल्या अनुभवास येते .मूळमायेपासून त्रिगुणापर्यंत हा पहिला वर्ग ,पण तो एकदेशी आहे .एकाच ठिकाणी असणारा आहे .स्पष्ट दशा पावलेली स्थूल पंचभूते हा दुसरा वर्ग आहे ,पृथ्वी पासून उत्पन्न होणारे चार प्रकारचे प्राणी हा तिसरा वर्ग .[जारज ,स्वेदज ,अंडज ,उद्भिज ]

प्रकृती पुरुषाचा विचार |अर्धनारीनटेश्वर | अष्टधा प्रकृतीचा विचार |सकळ काही ||२०-२-२२ ||

गुप्त त्रिगुणाचे गूढत्व | म्हणौन संकेत महत्तत्व | गुप्तरूपे शुध्दतत्व | तेथेची वसे ||२०-२-२३ ||

जेथून गुण प्रगटती | तीस गुणक्षोभिणी म्हणती | त्रिगुणाची रूपे समजती | धन्य ते साधू || २०-२-२४ ||

मूळमायेपासून त्रिगुण | चंचळ येकदेसी लक्षण | प्रत्यये पाहांता खूण | अंतरी येते ||२०-२-२६ ||

पुढे पंचभूतांची बंडे | वाढली विशाळ उदंडे | सप्तद्वीप नवखंडे | वसुंधरा हे ||२०-२-२७ ||

पृथ्वी नाना जीनसाचे बीज | अंडज जारज श्वेतज उद्भिज | च्यारी खाणी ||२०-२-२९ ||

खाणी वाणी होती जाती | परंतु तैसीच आहे जगती | ऐसी होती आणि जाती | उदंड प्राणी ||२०-२-३० ||

प्रकृती पुरुष ,अर्धनारीनटेश्वर ,अष्टधा प्रकृती ,या तीनही गोष्टींचा विचार केला तर मूळमाया हेच तीनही गोष्टींचे मूळ सापडते .मूळमायेतच त्रिगुण गुप्त रूपाने वास करतात .त्यामुळे मूळमायेलाच महत्तत्व म्हणतात .शुध्द सत्वगुण ही मूळमायेत गुप्त रूपाने वास करतो .त्रिगुण व्यक्त दशेला येतात तेव्हा मूळमायेला गुणक्षोभिणी म्हणतात .

जेव्हा त्रिगुण गुप्तरूपात ,अव्यक्त दशेत समान असतात ,तेव्हा गुणक्षोभिणीला गुणसाम्य म्हणतात .मूळमाये पासून त्रिगुणा पर्यंत असणारी तत्वे चंचळ ,एकदेशी असतात .सर्व व्यापी नसतात .

पंचमहाभूतांचा अवाढव्य व अपार विस्तार होतो .सात बेटांची ,नऊ खंडांची असलेली पृथ्वी पंचमहाभूतांपासून बनलेली आहे .त्रिगुणांपासून पृथ्वी पर्यंत चंचळां चा दुसरा वर्ग .पृथ्वीवर अनेक वस्तूंचे बीज असते .अंडज ,जारज ,स्वेदज ,उद्भिज असे जीवांचे चार प्रकार ,चार वाणी पृथ्वी तत्वातून उत्पन्न झाल्या .खाणी ,वाणी उत्पन्न होतात ,नाश पावतात . अनेक जीव जन्मास येतात ,मृत्यू पावतात .पृथ्वी जशीच्या तशी रहाते .चराचर सृष्टी उत्पन्न होते .नाश पावते .पण परब्रह्म जसेच्या तसे राहाते .

No comments: