Monday, March 14, 2011

अजपा जप

अजपा जप म्हणजे काय ?

कोणतेही ईद्रीय किंवा माला वगैरे स्थूल साधनांचा वापर न करता नैसर्गिक श्वासोश्वासावरजे जपाचे मानसिक अनुसंधान राहते त्याला अजपा गायत्री म्हणतात .अजपा म्हणजे जपच परंतु तो अ जप = यत्न न करता स्वाभाविकतेने आपोआप झालेला जप . त्यास गायत्री म्हणतात .हंस: किंवा हंसो या मंत्राला अजपा म्हणतात .जेव्हा आपण श्वास घेतो ,बाहेरची हवा आंत घेतो तेव्हा सो कार होतो .जेव्हा श्वास बाहेर सोडतो तेव्हा हं कार होतो .सो कार शक्ती रूप तर हंकार शिवरूप होतो .सोहं ,ओंकार दोन्ही एकच ,एकरूप असतात .सोहं प्रणव रूप असतो सर्व देहाला ,सर्व अवयवांना तो व्यापून असतो .ह्रदयात असतो .स्वरसाधना करताना कुंभक करून अजपा जपता येतो .अखंड नामस्मरण करणा-यांना अजपा साधता येते .समर्थ म्हणतात :

येकवीस सहस्र सासें जपा |नेमून गेली ते अजपा |विचार पाहता सोपा | सकळ काही ||१७-५-१ ||

आपण एका दिवसात म्हणजे २४ तासात २१६०० श्वास प्रश्वास घेतो .त्या श्वास प्रश्वासाबरोबर सोहं असा सूक्ष्म ध्वनी सहज निघतो .त्याचा उच्चार करावा लागत नाही .धरिता सो सोडिता हं म्हणजे श्वास आत घेताना सो [तो ] श्वास सोडताना हं [ अहं ] असा अति सूक्ष्म ध्वनी सहज होतो त्याचे सतत अनुसंधान ठेवणे म्हणजे अजपाजप !

अजपाची उपासना कशी करायची ?

येकांती उगेच बैसावे | तेथे हे समजोन पहावे |अखंड ध्यावे सांडावे |प्रभंजनासी ||१७-५-६ ||

येकांती मौन्य धरून बैसे | सावध पाहाता कैसे भासे |सोहं सोहं ऐसे |शब्द होती ||१७-६-७ ||

उच्चारावीण जे शब्द | ते जाणावे सहज शब्द | प्रत्याय येती परंतु नाद | कांहीच नाही || १७-५-८ ||

एखाद्या निवांत ठिकाणी बसून ,मन स्वास्थ ठेवून ,कोणतेही विचार येउ नं देता विचार पूर्वक पहावे .प्रभंजन म्हणजे सोसाट्याचा वारा .येथे अर्थ श्वास प्रश्वास .मनातील सर्व कल्पना बाजूला सारून फक्त अखंड येणा-या जाणा-या वायूवर लक्ष ठेवावे .

एकांतात मौन धरून बसावे असे सांगितले.अजपाचा अभ्यास समर्थांना सत्पुरुषाच्या सहवासात राहून करणे अपेक्षित आहे .तेथेच पूर्ण एकांत ,मौन ,सावधपणे पाहण्याचे तीन टप्पे पार पाडता येतात .

पूर्ण एकांतात मौन धरून श्वासोच्छवासाकडे एकाग्रतेने पाहिले तर श्वासाच्या जाण्यायेण्यातून सोहं असा स्पष्ट शब्द कोणताही प्रयत्न न करता ऐकू येणे हा सहजशब्द

आपल्या जन्मापासून सोहं हा सहज शब्द आपल्या बरोबर असतो .त्या शब्दांचा उच्चार झालेला समजतो पण त्याला नाद नसतो .नाद कंठापासून निघून काही वेळ टीकतो .

तो शब्द सांडूनी बैसला | तो मौनी म्हणावा भला | योगाभ्यासाचा गल्बला |याकारणे || १७-५-९ ||

येकांती मौन्य धरून बैसला | तेथे कोण शब्द आला | सोहं ऐसा भासला |अंतर्यामी ||१७-५-१० ||

ज्याला सोहं सोहं हे सहज शब्द थांबवता येतात तो खरा मौनी असतो .बसला या शब्दात आसनास्थित जो होउन बसतो तो उत्तम मौनी असतो .सोहं : स: म्हणजे तो ,अहं आत्मा हा जप सहज होत असताना कुंभक होतो .कुंभक होता होता साधक निर्विकल्प समाधीत जातो .म्हणून तो मौनी असतो .सोहं सोहं शब्द मन संकल्प शून्य स्थितीत ऐकू येतो .तो कल्पनेचा खेळ नाही .कल्पना विरहित स्थितीतील शब्द आहे .

सर्व सजीवांमध्ये श्वास प्रश्वासा बरोबर अजपा चालतो .ही विनासायास चालणारी अजपा जाणत्यांना कळते .नेणात्यांना कळत नाही .