Thursday, September 2, 2010

देव कोण ?मी कोण ?

ज्याप्रमाणे संसारात जाणत्याची आवश्यकता असते त्याप्रमाणे परमार्थात सद्गुरुंची आवश्यकता असते .सद्गुरु भेटल्यावर त्यांना काय विचारावे ते समर्थ सांगतात :
सद्गुरुसी काय पुसावे । हेही कळेना स्वभावे । अनन्यभावे येकभावे । दोनी गोष्टी पुसाव्या । । १२ -३ -३
दोनी गोष्टी त्या कोण । देव कोण आपण कोण । या गोष्टीचे विवरण । केलेची करावे । । १२-३-४
समर्थ सांगतात की सद्गुरूंना दोन गोष्टी विचाराव्या .श्रोते विचारतात : त्या कोणत्या ?
समर्थ उत्तर देतात :
मुख्य देव तो कोण । मग आपण भक्त तो कोण । पंचीकर्ण माहावाक्यविवरण । केलेचि करावे । । १२-३-५ या प्रश्नाचे उत्तर देताना समर्थ म्हणतात की यासाठी पंचीकरण व महावाक्यांचा पुन्हा पुन्हा विचार करावा .कारण शाश्वत परब्रह्माचा प्रत्यक्ष अनुभव घेणे हे परमार्थाचे रहस्य आहे .शाश्वत व निश्चळ परब्रह्म परब्रह्म ओळखणे हे परमार्थाचे फळ आहे ।
सारासार विचार केल्यावर असे समजते की दृश्य विश्वातली कोणतीही वस्तू शाश्वत नाही .या सर्वांचे आदिकारण जो परमात्मा त्याला ओळखणे जरूर आहे .या विश्वात निश्चळ ,चंचल असा भेद आढळतो .विश्व मायेचा पसारा आहे ,शाश्वत परब्रह्म या मायेच्या पसा-या पलिकडे आहे .परब्रह्माच्या ओळखीसाठी समर्थ विवेक करायला सांगतात .ते कसे ते सांगताना समर्थ म्हणतात :
पंचभूतिक हे माया । माईक जाये विलया । पिंड ब्रह्मांड अष्ट काया । नासिवंत । । १२-३-११
दिसेल तितुके नासेल । उपजेल तितुके मरेल । रचेल तितुके खचेल । रूप मायेचे १२-३-१२
वाढेल तितुके मोडेल । येईल तितुके जाईल । भूतास भूत खाईल । कल्पांत काळी । । १२-३-१३
मायेचा पसारा पंचभूताचा आहे ,पंचभूतांनी बनलेल्या वस्तू नाशिवंत असतात .त्या दृष्टीने पिंड ब्रह्मांड ,अष्ट देह नाशिवंत असतात .जे जे दिसते ते नाश पावते ,जे जे निर्माण होते ते मरते .जे जे रचले जाते ते खचते .जेव्हा कल्पांत होतो तेव्हा एक एक भूत दुस-या भूतात विलीन होते .शेवटी परब्रह्म शिल्लक उरते .यानंतर समर्थ खरा देव कोण ते सांगताना म्हणतात :
निर्विकार जे निर्गुण । तेचि शाश्वताची खूण । अष्टधा प्रकृती संपूर्ण । नाशिवंत । । १२-३-१९
निर्गुण निर्विकार ही शाश्वताची खूण आहे .दृश्य नाशिवंत आहे असे ओळखले की ते असून नसल्या सारखे होते .सूक्ष्म विचार करत गेले की सार कोणते ,असार कोणते याचा निश्चय होतो .आत्मानात्म विचार मनात ठसायला लागतो .विचारात सूक्ष्मता येते .सूक्ष्मता वाढली की अशाश्वतेचे कवच भेदून शाश्वता पर्यंत पोहोचता येते ।
शाश्वत देव तो निर्गुण । ऐसी अंतरी बाणली खूण । देव कळला मी कोण । कळले पाहिजे । । १२ -३ -२२
देव शाश्वत आहे ,निर्गुण आहे हे अनुभवाने पटते .आता मी कोण याचे उत्तर समर्थ देतात :
मी कोण पाहिजे कळले । देह्तत्व तितुके शोधिले । मनोवृत्तीचा ठाई आले । मी तूं पण । ।१२-३- २३
सकळ देहाचा शोध घेता । मीपणा दिसेना पाहता । मी तू पण हे तत्वता । तत्वी मावळले १२-३-२४
दृश्य पदार्थचि वोसरे । तत्वे तत्व तेव्हा । मी तू पण हे कैंचे उरे । तत्वता वस्तू । । १२-३-२५
मी कोण हे कळण्यासाठी देहातील तत्वांचा शोध घेतला तर उत्पन्न होणा-या वृत्तीत मी तू पणाचे मूळ असते .मी तू पणा पंचतत्वात लीन होतो .एक तत्व दुस-यात लय पावते .शेवटी ब्रह्मवस्तू उरते .समर्थ सांगतात की पंचीकरण ,तत्व विवरण ,महावाक्य चिंतन ,या सर्वांतून एकच अर्थ निघतो की आपण सर्व परमात्म स्वरुप आहोत .समर्थ म्हणतात :
मीपण ते बुडाले । विवेके वेगळेपण गेले । निवृत्ती पदास प्राप्त झाले । उन्मनी पद । । १२-३-२८
विज्ञानी राहिले ज्ञान ।ध्येये राहिले ध्यान । सकळ काही कार्याकारण । पाहोन सांडिले । । १२-३-२९
मीपण नाहीसे होते ,आत्माआत्म विवेकाने वेगळेपण नाहीसे होते ,वृत्तीरहित अवस्था येऊन उन्मनी पद मिळते .ज्ञानाचे विज्ञानात रूपान्तर होते .ध्यान ध्येयमय होते .द्वैत असलेले दृश्य बाजूला सारले जाते .जन्म मरणाचे चक्र थांबते .पाप नाहीसे होते .यम यातनेतून सुटका होते .समर्थ म्हणतात :
जन्म मरणाचे चुकले । पाप अवघेची बुडाले । यमयातनेचे जाले । नि :संतान । । १२-३-३०

No comments: