Sunday, September 19, 2010

समर्थांचा प्रयत्न वाद

दुर्बल नाचारी वोडग्रस्त । आळसी खादाड रिणग्रस्त । मूर्खपणे अवघे वेस्त । काहीच नाही । । १२-९-१
खाया नाही जेवाया नाही । लेया नाही नेसाया नाही । अंथराया नाही पांघराया नाही । कोंपट नाही अभागी । । १२-९-२
सोयरे नाही धोयरे नाही । इष्ट नाही मित्र नाही । पाहातां कोठे वोळखी नाही । आश्रयेविण परदेशी । । १२-९-३
तेणे कैसे करावे । काये जीवेसी धरावे । वाचावेँ की मरावे । कोण्या प्रकारे । । १२-९-४
एक दुर्दैवी माणूस व करंटा माणूस जो आळशी व खादाड होता ,कर्जबाजारी होता ,धड खायला नव्हते ,जेवायला नव्हते ,अंगावर घ्यायला वस्त्र नव्हते ,अंथरायला नव्हते ,पांघरायला नव्हते ,राहयाला झोपडी नव्हती ,सोयरे धायरे इष्ट मित्र नव्हते .स्वदेशातच परदेशीपणे रहात होता .तो विचारतो :समर्था ,मी काय करू ?कोणती आशा जीवाशी धरू ?कसे जगू ?की मरू ?
त्याला उत्तर देताना समर्थ म्हणतात :
लहान थोर काम काही । केल्यावेग़ळे होत नाही । करंट्या सावध पाही । सदेव होसी । । १२-९-६
अंतरी नाही सावधानता । यत्न ठाकेना पुरता । सुखसंतोषाची वार्ता । तेथे कैची । । १२-९-७
म्हणोंन आळस सोडावा । यत्न साक्षेपे जोडावा । दुश्चित्त पणाचा मोडावा । थारा बळे । । १२-९-८
समर्थ सांगतात की काम कोणतेही असो ,लहान किंवा मोठे ,ते करावे लागते .ते काम चांगले होण्यासाठी प्रयत्न करावा लागतो .त्यासाठी मनात दक्षता घ्यावी लागते ,सावधानता ठेवावी लागते ,सावधानता नसेल तर शेवटपर्यंत प्रयत्न होत नाहीत .दीर्घ प्रयत्न झाला नाही ,तर सुख संतोष होत नाही .म्हणून माणसाने आळस सोडावा ,चिकाटीने प्रयत्न करावा ,मन निराश होऊ देऊ नये ,मन मागे फिरू देऊ नये .त्यासाठी जीवन पध्दती कशी असावी ते समर्थ सांगतात :
प्रात :काळी उठत जावे । प्रात:स्मरामि करावे । नित्य नेमे स्मरावे । पाठांतर । । १२-९-९
सकाळी लवकर उठावे ,उठल्यावर भगवंताचे स्मरण करावे ,पूर्वी पाठ केलेल्याची उजळणी करावी ,नवीन पाठ करण्याचा नियम करावा ,निर्मळ होऊन देवपूजा करावी ,मग फलाहार करावा ,आपला व्यवहार करावा .आपला कोण ,आपला कोण नाही ,ते ओळखावे ,सुंदर अक्षर लिहावे ,वाचताना स्पष्ट वाचावे ,मनन चिंतन करावे .कोणाला काही विचारायचे असल्यास थोडक्यात पण नेमकेपणाने विचारावे ,सांगताना पाल्हाळ लावू नये ,कोणतेही काम दुस-याला पसंत पडेल असे करावे ,आपल्याकडे येणा-याचे समाधान करावे ,बुध्दी चे सामर्थ्य वाढवावे ,ब्रह्मांडाहून मोठे ,विशाल व्हावे असा बुधीचा विस्तार करावा असे समर्थ म्हणतात .

No comments: