Monday, September 13, 2010

आत्मनिवेदन

परब्रह्माचा अनुभव येण्यासाठी सर्वात शेवटची भक्ती आहे आत्मनिवेदन !आत्मनिवेदन भक्तीचे तीन प्रकार समर्थांनी सांगितले आहेत .१ .जड़ आत्मनिवेदन २ .चंचल आत्मनिवेदन ३ .निश्चल आत्मनिवेदन .समर्थ म्हणतात :
नाना तत्वे लहान थोरे । मिळोन अष्टही शरीरे । अष्टधा प्रकृतीचे वारे । निघोन जाते । । १२-५-१२
वारे नस्तां जे गगन । तैसे परब्रह्म सघन । अष्ट देहाचे निर्शन । करून पहावे । । १२-५-१३
ब्रह्मपिंड उभार । पिंडब्रह्मांड संहार । दोहि वेगळे सारासार । विमळब्रह्म । । १२-५-१४
निरनिराळी तत्वे एकत्र मिसळतात व पिंडाचे चार व ब्रह्मांडाचे चार असे आठ देह तैयार होतात .पाच महाभूते व त्रिगुण मिळून अष्टधा प्रकृती बनते .अष्टधा प्रकृतीत जाणीव रूपी वायू असतो .ज्याप्रमाणे वारा वहात नसताना आकाश आकाशाच राहते त्याप्रमाणे आठ देहांचा निरास झाला असता फक्त परब्रह्म उरते .पिंड ब्रह्मांडाची उभारणी
व संहारणी कळली की या सर्वाचे सार ,जे कायम शाश्वत असते ,असे शुध्द ,निर्मळ परब्रह्म अनुभवास येते .असे निर्मळ परब्रह्म अनुभवास येण्यासाठी काय करायला हवे असे विचारल्यावर समर्थ आत्मनिवेदन करायला सांगतात .आत्मनिवेदनाचे तीन प्रकार सांगतात :
पदार्थे मने काया वाचा । मी हा अवघाच देवाचा । जड आत्मनिवेदनाचा । विचार ऐसा । । १२-५-१६
चंचळ कर्ता तो जगदीश । प्राणीमात्र त्याचा अंश । त्याचा तोचि आपणास । ठाव नाही । । १२-५-१७
ठावचि नाही चंचळाचा । तेथे आधी आपण कैचा । निश्चळ आत्मनिवेदनाचा । विवेक ऐसा । । १२-५-२०
मी ,माझे सगळे ,माझ्या मालकीच्या सर्व वस्तू ,माझे मन ,काया ,वाचा ,प्रपंच सर्व देवाच्या मालकीचे ही भावना ठेवून जगायाचे ,म्हणजे जड आत्मनिवेदन !
देव कर्ता आहे ,मी कर्ता नाही ,देव माझ्या कडून करवून घेतो आहे अशा विचाराने जगणे म्हणजे चंचळ आत्मनिवेदन !
चंचल मिथ्या आहे त्यामुळे मी पणे वावरणारा चंचळ असल्याने मी माझे नाही ,फक्त परब्रह्म आहे ,असा अनुभव घेणे म्हणजे निश्चळ आत्मनिवेदन ! अशा आत्मनिवेदनाच्या पाय-या चढ़ता चढ़ता निश्चळ परब्रह्माचा अनुभव मिळतो .तेव्हा मनाची धडपड थांबते .सगळे शांत होते .बोलणे थंड पड़ते .

No comments: