Sunday, September 12, 2010

विवेक आणि वैराग्य

प्रा.के .वि ,बेलसरे विवेक व वैराग्याची व्याख्या करताना म्हणतात :आपले धेय कोणते आपली साधना कोणती ,प्रपंचाचे स्वरुप काय ,जगाचा स्वभाव कसा ,स्वरूपानुभावाची लक्षणे कोणती या प्रश्नांची उत्तरे बुध्दीने आकलन होणे म्हणजे विवेक !तर आपल्या देहासकट सर्व दृश्यांची किंमत आत्मज्ञाना पेक्षा कमी वाटणे,देहातून सुख घेण्याची प्रवृती क्षीण होणे ,हवे नकोपण शांत होणे ,मनाने कोठेही कशातही गुंतून न पडणे म्हणजे वैराग्य !
प्रपंचातील कष्ट ,दु:ख ऐकले ,पाहिले ,अनुभवले की वैराग्य उत्पन्न होते .अनेक संकटे ,अडचणी सोसाव्या लागल्या की त्रासून जाऊन माणूस देशांताराला जातो .प्रपंच सोडून गेलेला माणूस स्वैराचारी ,नष्ट ,भ्रष्ट ,चावट,मोकाट जनावराप्रमाणे होऊ शकतो .म्हणून वैराग्याची आवश्यकता असते .नाहीतर काय होते त्याचे वर्णन समर्थ करतात :
ना प्रपंच ना परमार्थ । अवघे जिणेची जाले व्यर्थ । अविवेक अनर्थ । ऐसा केला । । १२-४-७
हे येके विण येक । तेणे उगाच वाढे शोक । आता वैराग्य आणि विवेक । योग ऐका । । १२-४-११
जर विवेक आणि वैराग्य एकत्र नसेल तर धड प्रपंच साधत नाही व धड परमार्थ ही साधत नाही .त्याचे जीवन वाया जाते .म्हणजेच विवेका शिवाय वैराग्य आणि वैराग्या शिवाय विवेक वाया जातो ,दु ;ख वाढते .विवेक व वैराग्य दोन्ही हातात हात घालून जातात तेव्हा काय होते ते समर्थ सांगतात :
विवेके अंतरी सुटला । वैराग्ये प्रपंच तुटला । अंतर्बाह्य मोकळा जाला । नि :संग योगी । । १२-४-१२
जैसे मुखे ज्ञान बोले । तैसीचि सर्व क्रिया चाले । दीक्षा देखोनी चकित जाले । सुचिश्मंत । । १२-४-१३
आस्था नाही त्रैलोक्याची । स्थिती बाणली वैराग्याची । यत्न विवेक धारणेचि । सीमा नाही । । १२-४-१४
विवेकाने माणसाचा मीपणा सुटतो .वैराग्याने प्रपंचाची आसक्ती सुटते .त्यामुळे असा माणूस आतून बाहेरून मोकळा होतो .बंधन रहित होतो .नि :संग योगी होतो .मग तो बोलतो तशी कृती करतो .त्याची वर्तणूक बघून माणसे चकित होतात .त्याला त्रैलोक्याची सुध्दा आसक्ती रहात नाही .असे त्याचे धगधगीत वैराग्य असते .तो प्रयत्न ,विवेक ,अचाट धारणा अशा गुणांनी युक्त होतो .मग प्रेमरसाने युक्त असे भगवंताचे भजन करतो .ते ऐकून त्याच्या सानिध्यात आलेली माणसे सन्मार्गाला लागतात .कारण त्याच्या अंगी असतो प्रखर विवेक !
प्रखर वैराग्य उदासीन । प्रत्ययाचे ब्रह्मज्ञान । स्नान संध्या भगवत भजन । पुण्यमार्ग । । १२-४-१८
विवेकवैराग्य ते ऐसे । नुस्ते वैराग्य हेकांडपिसे । शब्द ज्ञान येळीलसे । आपणचि वाटे । । १२-४-१९
म्हणौन विवेक आणि वैराग्य । तेचि जाणिजे महदभाग्य । रामदास म्हणे योग्य । साधू जाणती । । १२-४-२०
कसलीही आस नसलेले जळजळीत वैराग्य ,स्वानुभवाचे ब्रह्मज्ञान ,भगवंताचे भजन ,ह्या सर्व गोष्टी विवेक व वैराग्याचे सुंदर जोड़ असताना घडतात .म्हणून विवेक व वैराग्य यांचा संगम होणे थोर भाग्य समजावे असे समर्थ रामदास स्वामी म्हणतात .

No comments: