Thursday, September 23, 2010

आत्मानात्म विवेक

आत्मा कोण अनात्मा कोण । त्याचे करावे विवरण । तेचि आता निरूपण । सावध ऐका । । १३ -१-२
च्यारी खाणी च्यारी वाणी । चौ-यासी लक्ष जीवप्राणी । संख्या बोलिली पुराणी । वर्तती आता । । १३-१-३
चार खाणी ,चार वाणी ,चौ-यांशी प्रकारच्या जीव प्राण्यात श्री समर्थ आत्मा पहायला सांगतात :
दृष्टी मध्ये पाहातो । श्रवणामध्ये ऐकतो । रसने मध्ये स्वाद घेतो । प्रत्यक्ष आता । । १३-१-५
घ्राणामध्ये वास घेतो । सर्वांगी तो स्पर्शतो । वाचेमध्ये बोलवितो । जाणोनी शब्द । । १३-१-६
पाये चालवी हात चालवी । भृकुटी पालवी डोळा घालवी । संकेत खुणा बोलवी । तोचि आत्मा । । १३-१-७
धिटाई लाजवी खाजवी । खोकवी वोकवी थुंकवी। अन्न जेवूनी उदक सेवी । तोचि आत्मा । । १३-१-८
मळमूत्र त्याग करी । शरीर मात्र सावरी । प्रवृती निवृत्ती विवरी । तोचि आत्मा । । १३-१ -९
ऐके देखे हुंगे चाखे । नाना प्रकारे वोळखे । संतोष पावे आणि धाके । तोचि आत्मा । । १३-१ -१०
प्रा.प्र .के .बेलसरे म्हणतात :शरीराला जीवंत ठेवणारी ,ईंद्रियांना चेतना देणारी ,मनाच्या व्यापारांना चालना देणारी ,बुध्दीला विचार करायला लावणारी ,जीवपणे नाना दु:ख भोगणारी ,उद्वेग ,चिंता ,माया ,ममता अनुभवणारी ,जी सूक्ष्म चित्कला ती आत्मा !
जो देहात राहून डोळ्यातून पहातो ,कानाने ऐकतो ,जीभेने स्वाद घेतो ,नाकाने वास घेतो ,त्वचेने स्पर्श ओळखतो ,वाणीने बोलतो ,पायाला चालवतो ,हात हालवतो ,भुवया खाली वर करवतो ,डोळे मिटतो ,खोकायला,हुंगायला,थुंकायला लावतो ,संकेत खुणा करून आपले हेतू स्पष्ट करतो .तोच धीट होतो ,तोच लाजवतो ,मळमूत्राचा त्याग करवतो ,शरीराला सावरतो ,प्रवृती निवृती यांचे विवरण करतो ,तोच आत्मा ! तोच आत्मा ऐकतो ,पाहतो ,हुंगतो ,चाखतो ,आनंद घेतो ,घाबरतो .आनंद ,उद्वेग ,चिंता या सर्वांचा अनुभव घेतो .देहाबद्दल
खरे पणाचा भ्रम निर्माण करतो ।
अनेक पदार्थांबद्दल आसक्ती धरतो ,बरी वाईट कामे देहाकडून करवून घेतो ,तो आत्मा देहात येतो ,राहतो ,देहातून जातो .तोच हसतो ,रडतो ,पश्चात्ताप पावतो ,शेवटी कर्मानुसार तोच भाग्यवान किंवा भाग्यहीन ठरतो .तोच आत्मा धीर ,उदार ,वेडा,शहाणा ,सहनशील होतो ।
आत्मा नस्ता देहांतरी । मग ते प्रेत सचराचरी । देह्संगे आत्मा करी । सर्व काही । । १३-१-२१
येकेविण येक काये । कामा नये वाया जाये । म्हणोनी हा उपाये । देह्योगे । । १३-१-२२
देहात आत्मा नसेल तर देह प्रेत बनते.देहाच्या माध्यमातून आत्मा सर्व काही करतो .दोन्ही पैकी एक नसेल तर दोन्ही वाया जाते .आत्म्या शिवाय देह चालत नाही तर देहा शिवाय आत्मा काही करू शकत नाही .समर्थ म्हणतात :
देह अनित्य आत्मा नित्य । हाचि विवेक नित्यानित्य । । १३-१-२३
पिंडी देह्धर्ता जीव । ब्रह्मांडी देह्धर्ता शिव । ईश्वर तनुचतुष्टये सर्व । ईश्वर धर्ता । । १३-१-२४
त्रिगुणापर्ता जो ईश्वर । अर्धनारी नटेश्वर । सकळ स्रृष्टीचा विचार । तेथून जाला । । १३-१-२५
पिंडाच्या दृष्टीने देह धारण करणारा आत्मा जीव असतो .तर ब्रह्मांडाच्या दृष्टीने विश्व धारण करणारा आत्मा शिव असतो .निर्विकार ब्रह्मात संकल्प उठला,तो स्फुरण रूप असतो ,त्याचे पंचभूतात्मक ,त्रिगुणात्मक अंग ती मूलप्रकृती ,तिच्यातील शुध्द जाणीव तो अंतरात्मा ! यावरून असा निष्कर्ष असा निघतो की :
जड़ तितुके अनित्य । आणि सूक्ष्म तितुके आनित्य । । १३-१-२८

No comments: