Saturday, September 25, 2010

सारासार विवेक

सारासार विवेक म्हणजे काय ?
दिसेल ते नासेल । आणि येइल ते जाईल । जे असतचि असेल । तेचि सार । । १३-२-२
जे दिसते ते नासते ,जे येते ते जाते ,ते असार असते .तर जे सदैव असतेच ,ते सार असते ।
आत्मानात्म विवेकात अनात्मा बाजूला सारून आत्मा जाणता येतो .त्यासाठी मूळारंभा पर्यंत म्हणजे मूळमाये पर्यंत जाता येते .त्यासाठी वृत्ती निवृत्त व्हावी लागते .त्यासाठी सारासार विचार करावा लागतो ।
नित्यानित्य विवेक केला । आत्मा नित्यसा निवडला । निवृत्ती रूपे हेत उरला । निराकारी । । १३-२-५
हेत म्हणिजे तो चंचळ । निर्गुण म्हणिजे निश्चळ । सारासार विचारे चंचळ । होऊन जाते । । १३-२-६
नित्यानित्य विवेकाने अंतरात्मा नित्य आहे अशी निवड होते .पण अंतरात्मा चंचळ आहे ,त्या पलिकडेही आपल्याला जायचे आहे अशी जाणीव आपल्याला होते तेव्हा निर्गुण निराकारात जाण्याचा हेतू शिल्लक रहातो .पण हेतू अशाश्वत असतो ,निर्गुण स्वरुप शाश्वत असते .तेव्हा सारासार विचारानेच ते समजते .समर्थ म्हणतात :
चळे म्हणोनि ते चंचळ । न चळे म्हणोनि ते निश्चळ । निश्चळीं उडे चंचळ । निश्चयेसी । । १३-२-७
ज्ञान आणि उपासना । दोनी एकेचि पहाना । उपासनेकरिता जना । जगोध्दार । । १३-२-८
चळते म्हणोनि ते चंचळ असते .चळत नाही म्हणून त्याला निश्चळ म्हणतात .निश्चळात चंचळाला वाव नसतो .अंतरात्म्याचा अनुभव आला तरी तेथे मी म्हणजे चंचळ असतो .त्यामुळे त्याला जरी ज्ञान झाले तरी ते पक्के नसते ,कारण त्या ज्ञानाचे विज्ञान झालेले नसते .विज्ञान होणे म्हणजे संपूर्ण वृत्ती रहित अवस्था येऊन सर्व जाणतेपण विरते .सगळे चंचळ नाहीसे होते तेव्हा ज्ञानाचे विज्ञान होते ।
निर्शता अवघेचि निर्शले । चंचळ तितुके निघोन गेले । निश्चळ परब्रह्म उरले । तेचि सार । । १३-२-१८
असाराचे निरसन करताना असार बाजूला सारले,तर जेवढे अशाश्वत होते तेव्हडे नाहीसे झाले .फक्त निश्चळ परब्रह्म उरते तेच सार असते .जेव्हा मूळप्रकृतीच्या चार पिंडांच्या चार व ब्रह्मांडाच्या चार देहांचा पसारा बाजूला होतो ,तेव्हा शून्य पुढे येते .आणि तेव्हा :
सोहं हंसा तत्वमसी । ते ब्रह्म तूं आहेसी । विचार पाहता स्थिती ऐसी । सहजचि येते । । १३-२-२०
सोहं म्हणजे मी तो आहे .हंसा म्हणजे मी तो आहे .तत्वमसी म्हणजे ते तूच आहेस .अशी स्थिती सारासार विचाराने अनुभवास येते .समर्थ म्हणतात :
साधक असोन ब्रह्म उरले । तेणे वृत्तीसुन्य जाले । सारासार विचारले । येणे प्रकारे । । १३-२-२१
साधकपणे राहून संपूर्ण संगत्याग केला की केवल ब्रह्म उरते .साधकाची अवस्था वृत्तीशून्य होते .सारासार विचाराने हेच साधते .

No comments: