Tuesday, August 30, 2011

देहाचे महत्व

देहाचे महत्व काय ?

शिष्य चर्चा करत होते की माणसाचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन कसा असावा ? प्रवृत्तिपर किंवा निवृत्तिपर .प्रवृत्तिपर दृष्टीकोन असणारे शिष्य देहाला ,या दृश्य विश्वाला महत्व देत होते .देह सर्वस्व आहे असे म्हणत होते .तर निवृत्तिपर विचाराचे शिष्य शुध्द जाणीव असणारा आत्मा महत्वाचा मानत होते .त्यांच्या दृष्टीने देह क:पदार्थ होता .अंतरात्मा परमार्थ साधनेचा प्राण आहे ,त्याची साधना आवश्यक आहे असे मानत होते . ही चर्चा चालू असताना श्री समर्थ रामदास स्वामी तेथे येतात आणि सांगू लागतात .

परी त्या सकळांचे हि कारण | मुळी पहावे स्मरण | तया स्मरणाचे अंश जाण | नाना देवते || १९-५-५ ||

दगड माती ,सोने ,अनेक धातूंचे देव असतात .शालीग्राम ,,स्फटिकाचे देव ,सूर्यकांत ,सोमकांत ,,तांदळे ,नर्मदे ,चक्रांकित दगड सर्वच देव मानले जातात .पण या सगळ्या देवांचे कारण हे मुळात झालेले स्मरण रूप संकल्प आहेत .मूळ संकल्प म्हणजे मूळमाया .,तिने त्रिगुण निर्माण केले .त्रिगुणांचे स्वामी ब्रह्मा ,विष्णू ,महेश हे देव निर्माण झाले .त्यांची प्रतीके आपण बनवतो .त्यांची पूजा करतो .

देवांची भक्ती ,पूजा करण्यासाठी देहाची आवश्यकता असते

.देह्यावेगळी भक्ती फावेना | देह्यावेगळा देव पावेना | याकारणे मूळ भजना | देहचि आहे || १९-५-७ ||

देहाशिवाय ,देहाने केलेल्या साधनेशिवाय देव पावत नाही .देह नसेल तर भजन ,पूजन ,देवाचा महोत्सव कसा करणार ? देवाच्या पूजेतील गंध ,अत्तर ,प्पात्र ,पुष्प ,फळ तांबूल ,धूप ,दीप असे पूजेचे सोपस्कार कसे करणार ? म्हणजेच देहानेच देवाचे भजन पूजन होऊ शकते .

हिंदू धर्मात ३३ कोटी देव मानले आहेत .त्या प्रत्येक देवतेचे सामर्थ्य वेगवेगळे असते .मूळ अंतरात्म्याचे सामर्थ्य कमी अधिक प्रमाणात ह्या देवतांमध्ये प्रगट होते .कोणत्याही देवाचे केलेले भजन हे मूळ अंतरात्म्याला च जाऊन पोहोचते .

नाना देवी भजन केले | ते मूळ पुरुषासी पावले | याकारणे सन्मानिले | पाहिजे सकळ काही || १९-५-१४ ||

ज्याप्रमाणे आकाशातून पडलेले पाणी सागराला जाऊन मिळते ,त्याप्रमाणे कोणत्याही देवाचे केलेले भजन मूळ पुरुषाला जाऊन मिळते . त्यांमुळे सर्व देवदेवतांना योग्य तो मान द्यावा .तसेच अंतरात्म्यामध्ये असलेली जाणीव अंश रूपाने प्रत्येक देहात प्रगट झालेली असते .म्हणूनच समर्थ म्हणतात

म्हणोनी येळील न करावे | पाहाणे ते येथेची पाहावे | ताळां पडता राहावे |समाधाने || १९-५-१६ ||

अंतरात्मा पहायचा असेल तर याच देहात पहाता यावा यासाठी प्रयत्न करायला हवा .माणसे देवाला शोधण्यासाठी नाना तीर्थयात्रा करतात ,कोणी अवतारांना मानतात . क्षेत्रातील देव ,अवतार हे ,ब्रह्मा ,विष्णू ,महेश या त्रिमूर्तीची प्रतीकात्मक रूपे असतात .सर्व अवतार आपली कार्ये संपवून त्रिगुणातीत असलेल्या परमात्म्यात विलीन झालेली असतात .म्हणून मुख्य देव जो परमात्मा त्याच्या पर्यंत जाऊन पोचायला हवे ,हा विचार मांडताना श्रीसमर्थ म्हणतात :

भूमंडळी देव नाना | त्यांची भीड उलंघेना | मुख्य देव तो कळेना | काहीं केल्या || १९-५-२३ ||

अनेक प्रकारचे देव मानव निर्मित आहेत .त्यांना निर्भय पणे जो बाजूला सारतो व खं-या देवाचा शोध घेतो ,त्यालाच त्रिगुणातीत देव सापडतो .

खरा देव कसा शोधावा याचे मार्गदर्शन करताना समर्थ म्हणतात :

कर्तुत्व वेगळे करावे | मग त्या देवासी पाहावे | तरीच काही येक पडे ठावे | गौप्यगुह्य ||१९-५-२४ ||

ते दिसेना ना भासेना |कल्पांतीही नासेना | सुकृतावेगळे विश्वासेना | तेथे मन || १९-५-२५ ||

म्हणोनि कल्पनारहित | तेचि वस्तू शाश्वत | अंत नाही म्हणोनी अनंत | बोलिजे तया ||१९-५-२७ ||

हे ज्ञान दृष्टीने पहावे | पाहोनी तेथेची राहावे | निजध्यासे तद्रूप व्हावे | संगत्यागे || १९-५ २८ ||

नाना लीळा नाना लाघवे | ते काय जाणिजे बापुड्या जीवे | संतसंगे स्वानुभावे | स्थिती बाणे || १९-५-२९ ||

ऐसी सूक्ष्म स्थिती गती | कळतां चुके अधोगती | सद्गुरुचेनी सद्गती | तत्काळ होते ||१९-५-३० ||

समर्थ सांगतात : माणसात देहबुद्धीचे प्राबल्य असल्याने मी कर्ता ,मी भोक्ता अशी धारणा असते ,त्यामुळे खं-या देवा पर्यंत माणूस पोहोचू शकत नाही .जेव्हा तो त्याची देहबुद्धी बाजूला सारतो ,मी कर्ता ही भावना ,,हा अहंकार दूर सारतो ,तेव्हाच तो खं-या देवाला जाणण्यास योग्य होतो .

खरा देव म्हणजे परमात्मा ,परब्रह्म ! तो कल्पनातीत आहे .कल्पना तेथे पोहोचू शकत नाही ,मायेन त्याचे वर्णन करता येत नाही .त्याला बघण्यासाठी ज्ञान दृष्टीच हवी ,निदिध्यास हवा .तरच त्याला पाहाता येते .आपले मन जोपर्यंत आहे ,त्यातून विचार येत आहेत ,कल्पना स्फुरत आहेत ,तोपर्यंत आपण अंतरात्म्याला जाणू शकत नाही .कर्तेपण दूर सारले तरच अंतरात्म्याचे गुप्त रहस्य जाणता येते .

कल्पना रहित असलेले तत्व ,अंत नसलेले तत्व ,तीच शाश्वत वस्तू असते .तिला जाण तद्रूप ण्यासाठी नि:संग व्हावे लागते .संगत्याग घडावा लागतो .संगत्याग म्हणजे देहबुद्धीचा त्याग ,देहबुद्धीचा ,कर्तेपणाचा त्याग केला तरच त्या शाश्वत सद्वस्तूशी होता येते .त्यासाठी संतसंग हवा . सत्संगाने व स्वत:च्या अनुभवाने त्रिगुणातीत ,शाश्वत सद्वस्तूशी तादात्म्य पावता येते .सद्गुरूची कृपा झाली तर ही अवस्था लवकर येते .


No comments: