Wednesday, August 10, 2011

जानता कोण ?

जाणता कोण ? त्याच्या कडून काय शिकावे ?

जाणता येक अंतरात्मा | त्याचा काये सांगावा महिमा | विद्या कळागुणसीमा |कोणे करावी ||१८-२-२३ ||

अंतरात्मा खरा जाणता असतो ।त्याला जो ओळखतो तो जाणता होतो .तोच आत्मज्ञानी असतो .जाणता पुरुष होतो .त्याच्या कडून काही शिकण्यासाठी त्याची संगत धरावी .त्याची सेवा करावी .त्याची सद्बुद्धी घ्यावी .सद्बुद्धी म्हणजे ज्ञान दृष्टीने अंतरात्मा पाहण्याची बुद्धीची स्थिती . बुद्धीची ही स्थिती येण्यासाठी जाणता विचार कसा करतो ते पाहावे ,त्याच्या संगतीत भजन करून ,दुस-यासाठी झिजून श्रवण ,मनन करून मनाला प्रसन्न करावे । समर्थ म्हणतात :

जाणता बोलेल तसे बोलावे | जाणता सांगेल तैसे चालावे | जाणत्याचे ध्यान घ्यावे | नाना प्रकारी || १८-२-९ ||

जाणता बोलतो तसे बोलायला शिकावे ।तो ध्यान करतो तसे ध्यान करायला शिकावे ।जाणत्यावर जसे प्रसंग येतात तेव्हा तो कसा वागतो ते पहावे .जाणता कशा युक्तीने वागतो ते पहावे .तो पेच कसे घालतो ते पहावे .तो लोकांना कसे खुश ठेवतो ते पहावे .

जाणत्याचा साक्षेप घ्यावा | जाणत्याचा तर्क जाणावा | जाणत्याचा उल्लेख समजावा | न बोलतांचि || १८-२ १३ ||

जाणत्याचा प्रयत्न करण्याचा स्वभाव घ्यावा .त्याची विचारपध्दती समजावून घ्यावी .त्याच्या शब्दांवरून त्याच्या बोलण्याचा मतितार्थ समजावून घ्यावा .त्याचे धूर्तपण ,राजकारण ,निरूपण ऐकावे .त्याची मधुर वचने लक्षात ठेवावी .

जाणत्याची तीक्षणता | जाणत्याची सहिष्णता | जाणत्याची उदारता | समजोन घ्यावी ||१८-२-१७ ||

जाणत्याची तीक्ष्णबुद्धी ,त्याची सहनशीलता ,त्याची उदारता समजावून घ्यावी .त्यातून आपल्याला त्याच्या अनेक कल्पना ,त्याची दीर्घ सूचना ,विवंचना समजतात .तो आपला काळ सार्थकी कसा लावतो ,अध्यात्माचा विवेक कसा करतो ,तो भक्तीमार्गाने कसा जातो ,तो त्याचे वैराग्य कसे जपतो ,ते समजावून घेता येते .

जाणत्याचे पाहावे ज्ञान | जाणत्याचे सिकावे ध्यान | जाणत्याचे सूक्ष्म चिन्ह | समजोन घ्यावे || १८-२-२१ ||

जाणत्याचे अलिप्तपण | जाणत्याचे विदेहलक्षण | जाणत्याचे ब्रह्मविवरण | समजोन घ्यावे || १८-२-२२ ||

जाणत्याचे ज्ञान पहावे ,तो ध्यान कसे करतो ते शिकावे ,त्याच्या ज्या सूक्ष्म खुणा आहेत त्या समजावून घ्याव्या .त्याचा अलिप्तपणा कसा आहे, त्याचा विदेहीपणा कसा आहे ,म्हणजे त्याची देहबुद्धी नष्ट झालेली कशी दिसते याचे निरीक्षण करावे .

खरा जाणता कोण याचे उत्तर समर्थ आत्ता देतात ।

जाणता येक अंतरात्मा | त्याचा काये सांगावा महिमा | विद्याकळागुणसीमा | कोणे करावी ||१८-२-२३ ||

अंतरात्मा खरा जाणता आहे .त्याचा महिमा सांगता येत नाही .तो सत्य ,ज्ञानमय ,अनंत आहे त्याच्या सत्तेनेच जग चालते .त्याला जो ओळखतो तोच जाणता होतो .

ध्यान धरीना तो अभक्त | ध्यान करील तो भक्त | संसारापासुनी मुक्त | भक्तांस करी || १८-२२९ ||

उपासने सेवटी | देवां भक्तां अखंड भेटी | अनुभवी जाणेल गोष्टी |प्रत्ययाची ||१८-२-३० ||

अंतरात्मा जाणून घेउन जाणता बनायचे असेल तर अंतरात्म्याचे अखंड ध्यान लावावे लागते .त्याचे अखंड ध्यान लागले तरच साधक भक्त होतो नाहीतर अभक्त होतो .भक्ताला अंतरात्मा संसारापासून मोकळा करतो .आणि देवाची आणि भक्ताची अखंड भेटी होते .

No comments: