Tuesday, August 30, 2011

श्रवण का करावे ?

श्रवणाचे महत्व काय ?

दृश्याचे किंवा अदृश्य सूक्ष्म आत्म्याचे ज्ञान प्राप्त करून घ्यायचे असेल तर श्रवण करावे लागते .श्रवणासाठी मन व शरीर दोन्ही तयार लागतात .मनाची एकाग्रता व शरीराचे स्वास्थ्य दोन्ही लागते .या दोन्ही गोष्टी नसतील तर श्रवण नीट होत नाही .

एकाग्र चित्ताने होणारे श्रवण व त्यावरील चिंतन परमार्थ साधना होते .पण यात कसा अडथळा येतो ते द १८-१० या समासात समर्थ सांगतात .

श्रवण म्हणिजे ऐकावे | मनन म्हणिजे मनी धरावे | येणे उपाये स्वभावे | त्रैलोक्य चाले ||१८-१०-८ ||

श्रवण म्हणजे ऐकणे .मनन म्हणजे मनात धरणे .मनन म्हणजे धारणा .श्रवण व मननानेच या त्रेलोक्यामध्येच ज्ञान व्यवहार चालला आहे .उत्तम श्रवण घडण्यासाठी शरीर व मन तत्पर नसतील तर कोणत्या अडचणी येतात त्याचे वर्णन समर्थ करतात .

श्रवणी लोक बैसले | बोलतां बोलतां येकाग्र जाले | त्याउपरी जे नूतन आले | ते येकाग्र नव्हेती ||१८-१०-१० ||

मनुष्य बाहेर हिंडोनी आले | नाना प्रकारीचे ऐकिले | उदंड गलबलू लागले | उगे असेना ||१८-१० -११ ||

जेव्हा वक्ता बोलत असतो तेव्हा श्रोते रंगून जातात,एकाग्र होतात ,पण उशीरा येणारे श्रोते एकाग्रतेचा भंग करतात .लोकांनी अनेकांची प्रवचने ऐकलेली असतात .फार ऐकल्याने श्रोता गोंधळतो .नक्की खरे कोणते याचा संभ्रम होतो .एकां जागी बसून ,दाटीवाटीत बसून शरीर अवघडते .झोप यायला लागते .,जांभया यायला लागतात .

एखादा मन एकाग्र करून श्रवणाला बसला ,तरी त्याने ऐकलेलेच वक्ता सांगत असतो .त्यामुळे त्याचे लक्ष उडते .

तत्पर केले शरीर | परी मनामध्ये आणिक विचार | कल्पना कल्पि तो विस्तार |किती म्हणून सांगावा ||१८-१०-१५ ||

जे जे काही श्रवणी पडिले | तितुके समजोन विवरले | तरीच काही सार्थक जाले | निरूपणी ||१८-१०-१६ ||

शरीर आवरून श्रवणाला बसले तरी श्रवणात मन लागत नाही .दुसरेच विचार मनात येतात .एकामागून एक कल्पना येत असतात .जे जे काही आपण ऐकतो ,त्याचे आपण मनन केले तरच निरुपणाने सार्थक झाले असे म्हणावे लागते ..

निरूपणी येउन बैसला | परी तो उदंड जेऊनि आला | बैसताच कासावीस जाला |तृषाकांत ||१८-१०-१८ ||

आधी उदक आणविले | घळघळा उदंड घेतले |तेणे मळमळू लागले | उठोन गेला || १८-१०-१९ ||

कर्पट ढेंकर उचक्या देती | वारा सरतां मोठी फजिती | क्षणक्षण उठोनी जाती | लघुशंकेसी || १८-१०-२० ||

दिशेने कासावीस केला | आवघेची सांडून धाविला | निरुपण प्रसंगी निघोन गेला | अखंड ऐसा || १८-१०-२१ ||

खूप जेउन माणसे निरुपणाला बसतात .मग त्यांना तहान लागते ,मळमळते .मग उठून जावे लागते .कर्पट ढेकरा येतात .उचक्या येतात .मोठ्याने वारा सुटून फजिती होते ।मग तो निरुपण चालू झाले की उठून जातो ।मध्येच शौच्यास लागल्याने अस्वस्थ होतो ,श्रवण होत नाही .सगळे सोडून निघून जातो .पोटात कळ येते ,पाठीत उसण भरते सांधे धरतात .,पायाच्या बोटात चिखल्या होतात .बसायच्या जागी पुळी होते .अशा अनेक गोष्टींनी माणूस निरुपणाला बसू शकत नाही .काम वासनेने लडबडलेले लोक स्त्रीयांकडेच बघत बसतात .एखादा चोर श्रोत्यांची पादत्राणे चोरून नेतो .

काही लोक श्रावणाला बसून आपापसात बोलतात .वक्त्याला कमीपणा देउन आपले श्रेष्ठत्व दाखविण्यासाठी विद्वान श्रोते बोलत राहतात .

ह्या सर्व गोष्टींनी श्रवण साधत नाही .म्हणून समर्थ सांगतात : आपले मन आपणच आवरायला हवे .कारण एकाग्र चित्ताने श्रवण आणि त्यावरील चिंतन हाच परमार्थ साधण्याचा राजमार्ग आहे .

No comments: