Tuesday, August 30, 2011

ग्रंथ कसा लिहावा ?

श्री समर्थांचे मठ म्हणजे विद्यापीठेच होती .त्यांच्या या मठांमध्ये अनेक ग्रंथाच्या नकली शिष्य करत असत .त्यांना समर्थांनी द १९ स १ मध्ये ग्रंथ कसा लिहावा या विषयी मार्गदर्शन केले आहे .ते आजही उपयोगी पडणारे आहे .

ब्राह्मणे बाळबोध अक्षर | घडसून करावे सुंदर | ते देखताची चतुर | समाधान पावती ||१९-१-१ ||

वाटोळे सरळे मोकळे | वोतले मसीचे काळे | कुळकुळीत वळी चालिल्या ढाले | मुक्तमाळा जैशा || १९-१-२ ||

अक्षरमात्र तितुके नीट | नेमस्त पैस काणे नीट | आडव्या मात्रा त्या हि नीट | आर्कुली वेलांट्या ||१९-१-३ ||

पहिले अक्षर जे काढिले | ग्रंथ संपेतो पाहात गेले | एका टाकेची लिहिले | ऐसे वाटे ||१९-१-४ ||

अक्षराचे काळेपण | टाकांचे ठोसरपण |तैसेची वळण वांकाण | सारखेची ||१९-१-५ ||

वोळीस वोळ लागेना | आर्कुली मात्रा भेदिना | खालीले वोळीस स्पर्षेना | अथवा लम्बाक्षर ||१९-१-६ ||

पान शिशाने रेखाटावे | त्यावरी नेमकचि लिहावे | दुरी जवळी न व्हावे | अंतर वोळीचे ||१९-१७ ||

कोठे शोधासी अडेना | चुकी पाहातां सापडेना | गरज केली हे घडेना | लेखकापासूनी ||१९-१-८ ||

श्रीसमर्थ म्हणतात :ब्राम्ह्णाने बाळबोध अक्षर घोटून सुंदर करावे .ते अक्षर पाहून सर्वांना आनंद व्हावा .अक्षर वाटोळे ,मोकळे ,सरळ असावे . काळ्या शाईने काळे कुळकुळीत असावे .मोत्यांच्या माळांसारख्या ओळी असाव्या ,प्रत्येक अक्षर नीट लिहिलेले असावे .प्रत्येक शब्दातील अंतर सारखे असावे .काने ,आडव्या मात्रा ,नीट असाव्या .रफार व वेलांट्या नीट असाव्या .ग्रंथ आरंभ करताना जे अक्षराचे वळण असेल तेच ग्रंथाच्या शेवटी असावे .ग्रंथ जणू काही एकाच टाकाने लिहिला आहे असे वाटावे .

ग्रंथाच्या अक्षरांचा काळेपणा ,टाकाचा टणकपणा ,अक्षरांची वळणे ,वाकणे आरंभापासून शेवट पर्यंत सारखी असावी .ओळीला ओळ लागू नये .रफाराने मात्रे छेदू नयेत .अक्षरांचा खालच्या ओळीला स्पर्श करू नये .अक्षर लांबट असू नये .शिसाने पानावर रेघा मारून त्यावर ठरलेली शब्द संख्या लिहावी .सर्व ओळीतले अंतर सारखे असावे .लिहिण्यात चूक सापडू नये .लहान वयात जपून लिहावे .आपण लिहिलेले पाहण्याचा लोकांना मोह होईल असे लिहावे ..अक्षर मध्यम आकाराचे असावे .लिहिलेल्या मजकुराच्या भोवती मोकळी जागा ठेवावी . मध्ये छान ,स्पष्ट ,ठसठशीत लिहावे .कालांतराने कागद झडला तरी अक्षरे सुरक्षित राहतील .ग्रंथ जपून लिहावा . कोणी लिहिला आहे ,त्याला पाहण्याची लोकांना उत्सुकता वाटावी ,असा सुंदर ग्रंथ लिहावा .

1 comment:

आनंदवन said...

लहानपणी शाळेत हे कवितेच्या रुपात पाठ केलेल नेहमी अशाच हस्ताक्षराचा प्रयत्न केला.तुमचे खुप आभार आठवणींना उजळा मिळाला.