Tuesday, August 30, 2011

समाजनेता कसा असावा ?

समाजनेत्याच्या अंगी कोणते गुण असावे ?

समाजनेता विद्वान असायला हवा .त्याने वेगवेगळ्या ग्रंथांचा अभ्यास केलेला असावा .ग्रंथातील शब्द ,शब्दांचा वाच्यार्थ ,लक्षणार्थ ,गूढार्थ हे सर्व माहिती असायला हवे . त्याला काव्यांचे प्रकार ,निरनिराळ्या शब्दांचे निरनिराळे अर्थ माहिती असायला हवेत .त्याला वेगवेगळ्या शंका ,त्यांची उत्तरे माहिती असायला हवी .

नाना पूर्वपक्ष सिध्दांत |प्रत्ययो पहावा नेमस्त | अनुमानाचे खस्तवेस्त |बोलोची नये || १९-२-४ ||

प्रवृत्ती अथवा निवृत्ती | प्रचीतीविण अवघी भ्रांति | गळग्यामधील जगज्जोती |चेतेल कोठे ||१९-२-५ ||

त्याला अनेक प्रकारच्या पूर्वपक्ष व सिध्दांतांचा अनुभव असावा .अनुभव नसेल तर लोकांना ठासून सांगता येत नाही .अनुमानाने बोलले तर त्यात सत्य असत नाही .समाज नेत्याने अनुमानाने बोलू नये .

प्रवृत्ती ,निवृत्ती ,प्रपंच ,परमार्थ सर्वत्र अनुभवाच्या समाजनेत्याने सांगाव्या .नाहीतर सर्वत्र भ्रम होतो .लोकांना अनुभवाविण सांगितले तर लोकांचे समाधान होत नाही .श्रोत्यांच्या अंत:करणाला जाऊन ते भिडत नाही .लोकांच्या अंत:करणातील जगज्जोती चेतणार नाही .लोकांचा अंतरात्मा जागा होत नाही .म्हणून समाज नेत्याचे बोलणे प्रत्ययाचे अनुभवाचे असावे .

समाज नेत्याचे अंगी वक्तृत्वकला असावी .कारण त्याशिवाय लोकांच्या मनाची पकड त्याला घेता येत नाही .त्याने आपल्याकडे लीनता घेऊन वागायला हवे .दुस-याचे मन ओळखून बोलायला हवे .लोकांच्या मनातले ओळखायला हवे .त्याने अजाणतेपण सोडू नये .जाणतेपणा चा ताठा धरू नये .

प्रसंग जाणावा नेटका | बहुतांसी जाझू घेऊ नका | खरे असतांची नासका |फड होतो || १९-२-११ ||

उत्तम गुण प्रगटवावे | मग भलत्यासी बोलतां फावे | भले पाहोन करावे | शोधून मित्र ||१९-२-१५ ||

उपासनेसारीखे बोलावे | सर्व जनासी तोषवावे | सगट बरेपण राखावे | कोण्हीयेकासी ||१९-२-१६ ||

जगामध्ये जगमित्र | जिव्हेपाशी आहे सूत्र | कोठेतर्ही सत्पात्र | शोधून काढावे ||१९-२-१९ ||

धूर्तपणे सकळ जाणावे | अंतरी अंतर बाणावे | समजल्याविण सिणावे | कासयासी ||१९-२-२० ||

प्रसंग ओळखावा ,त्यामुळे फार लोकांशी हुज्जत घालू नये,कारण आपले म्हणणे खरे असूनही लोकांना पटत नाही .समाजात बदनामी होते . भ्रष्ट लोकांमध्ये बसू नये ,कोणावर खोटे आरोप करू नये .दु:खी लोकांचे दु:ख दूर करावे .सभेत बसू नये .यात्रा अनुश्ठानांच्या उद्यापनांना जाउ नये कारण त्याने जीवनात मिंधेपणा येतो .

आपल्या अंगचे उत्तम गुण प्रगट करावे .सज्जन लोकांशी स्नेह जोडून आपल्या उपासनेला शोभेल असे बोलावे .सरसगट सगळ्या लोकांशी चांगले संबंध ठेवावे .आपल्याकडे आलेल्या लोकांमध्ये श्रेष्ठ कनिष्ठ असे भेद करू नये .सगळ्यांचे अंत:करण शांत करावे . सूर्यास्त झाल्यावर उगाच कोठेतरी जाउ नये .

जगात जगमित्र बनायचे असेल तर त्याचे वर्म आपल्या जिभेजवळ आहे .आपले बोलणे जितके गोड ,तितके लोक आपल्या जवळ येतात .कोठेही गेले तरी उत्तम माणसे शोधून काढावी .कथा होत असेल तर सामान्य माणसासारखे दूर् बसावे .

श्रवण सर्वात उत्तम .श्रवणा पेक्षा मनन श्रेष्ठ असते .मननाने लोकांचे समाधान करता येते .दुस-याचे अंत:करण समजून असावे .असे अनेक गुण लोकनेत्यात असावे असे श्री समर्थ १९-२ या समासात सांगतात .

No comments: