Thursday, August 18, 2011

खरा देव कोणता ?

३३ कोटी देव मानणा-या हिंदू धर्मात खरा देव कोणता ,त्याला कसे शोधायचे याविषयी संभ्रम आहेत .श्रीसमर्थ या विषयी मार्गदर्शन करतात .

देवाचा ठावचि लागेना | येक देव नेमस्त कळेना | बहुत देवी अनुमानेना | येक देव ||१८-८-१ ||

देव कोणता ते नक्की कळत नाही .अनेक देवांमधून मुख्य देव कोणता ते कळत नाही .तीर्थक्षेत्रात देवाची मूर्ती पाहिली की तशीच मूर्ती पाषाणाची ,धातूची ,चित्ररूपाने केली जाते .तीर्थक्षेत्रातील मूर्ती कोठून आली असा विचार केला तर आपण अवतारांपर्यंत पोहोचतो .प्रभू श्रीराम ,भगवान श्रीकृष्ण हे देवांचे अवतार ! त्यांनी देह धारण केले .कार्य केले आणि निजाधामाने गेले .पण अवतारांची मूळ शोधू लागलो तर ब्रह्मा ,विष्णू ,महेश या त्रिगुणांचे स्वामी असलेल्या देवांपर्यंत विचार करावा लागतो .ह्या देवांना कोणी निर्माण केले याचा विचार केला ,तर लक्षात येते की या देवांवर अंतरात्म्याची सत्ता चालते .तो खरा कर्ता व भोक्ता असतो .

तींही देवांस ज्याची सत्ता | तो अंतरात्माचि तत्वता | कर्ता भोक्ता तत्वता |प्रत्यक्ष आहे || १८-८-८ ||

अंतरात्मा कोण ? याचा विचार केला तर माणसातले चैतन्य ,माणसातील शुध्द जाणीव म्हणजे अंतरात्मा ! परब्रह्माचा विचार केला तर तीन पाया-यां मध्ये करावा लागतो .आत्मा ,अंतरात्मा ,परमात्मा .आपल्या देहात जो वास करतो तो आत्मा ,विश्वात ,चराचरात वास करतो तो अंतरात्मा ,विश्वाला पुरून उरतो तो परमात्मा .विश्वात असणा-या असंख्य जीवप्राण्यांना चालवतो तो अंतरात्मा ..

तो अंतरात्मा सकळांचा | देवदानव मानवांचा | चत्वार खाणी चत्वार वाणींचा | प्रवर्तकु || ११-८-३ ||

सर्व प्राण्यांच्या देहात तोच वास करतो .देव दानव मानव चारी खाणी ,चारी वाणी ,या सर्वांचा प्रवर्तक अंतरात्मा आहे .तोच प्राण्यांच्या देहात वास करतो .निरनिराळ्या तऱ्हेने वागायला प्रेरणा देतो .

तो अंतर्देव चुकती | धावा घेउन तीर्था जाती | प्राणी बापुडे कष्टती | देवास नेणता || १८-८-१० ||

अशा आंतर्देवाला लोक मुकतात ,तीर्थाकडे धाव घेतात .खरा देव त्यांना भेटत नाही .मग कळते की तीर्थात धोंडा पाणी याशिवाय दुसरे कांहीच नाही . वणवण हिंडून काही उपयोग नाही .मग सत्संगाकडे वळतात .

मग विचारती अंत:करणी | जेथे तेथे धोंडा पाणी | उगेची वणवण हिंडोनी | काय होते || १८-८-१२ ||

ऐसा ज्यासी विचार कळला | तेणे सत्संग धरिला | सत्संगे देव सापडला | बहुत जनासी ||१८-८-१३ ||

ऐसी हे विचाराची कामे | विवेके जाणतील नेमे | अविवेकी भुलले भ्रमे | त्यांसी हे कळेना || १८-८-१४ ||

सत्संग करताना ज्यांच्याशी संग करायचा आहे त्यांच्या मनाचा वेध घेणे आवश्यक ज्यांना आपण सद्गुरू मानणार आहोत तो खरोखरच सद्गुरू आहे का हे तपासून पाहाणे आवश्यक आहे. विवेक न पाहता श्रद्धा ठेवली जाते ती एक प्रकारे अश्रध्दाच असते असे समर्थ म्हणतात .सद्गुरुवचन पाळणे हाच परमार्थ असतो .त्यामुळे सद्गुरू विवेकाने अंतर्यामी पाहायला शिकतात .आणि निर्मळ अशा ब्रह्मापर्यंत पोहोचवतात .

सगुणाची उपासना कशासाठी ?

परब्रह्मापर्यंत पोचायचे म्हणजे दृश्य ,सगुण ओलांडून सूक्ष्मात जायचे .आपल्याला देहबुद्धी असते .म्हणजे आपण सगुण असतो .सगुण सगुणाचीच उपासना करू शकतो .

कर्मावेगळे न व्हावे | तरी देवास कासया भजावे | विवेकी जाणती स्वभावे | मूर्ख नेणे || १८-८-२१ ||

काही अनुमानले विचारे | देव आहे जगदांतरे | सगुणाकरितां निर्धारे | निर्गुण पाविजे || १८-८ २२ ||

सगुण पाहातां मुळास गेला | सहजची निर्गुण पावला | संगत्यागे मोकळा जाला | वस्तुरूप || १८-८-२३ ||

परमेश्वरी अनुसंधान | लाविता होईजे पावन | मुख्य ज्ञानेचि विज्ञान | पाविजेते ||१८-८ -२४ ||

सगुणोपासना करून मी पणा क्षीण होतो .मी पणा क्षीण झाला की निर्गुणात प्रवेश करता येतो .निर्गुणाची प्राप्ती निश्चित होते .नामरूपात्मक सगुणाचा शोध घेत गेले की उपासकाला मूळमायेपर्यंत पोहोचता येते .उपासनेने मी पणा संपूर्ण नाहीसा होतो .मी पणा नाहीसा होणे म्हणजे संगत्याग ! संगत्यागाने तो मोकळा होतो ,ब्रह्मरूप होतो .म्हणून अंतरात्म्याचे अखंड अनुसंधान लावायला समर्थ सांगतात .अखंड अनुसंधानाने मनुष्य पावन होतो .आत्मज्ञानी होतो .अनुसंधान म्हणजे भगवंतावाचून अन्य स्मरण न उरणे .त्यासाठी अंत:करण एकाग्र करून विवेक करायला हवा .नित्यानित्यविवेकाचे श्रवण करायला हवे म्हणूनच सगुणोपासना हवी .




No comments: