Thursday, August 18, 2011

उत्तम पुरुष

शिवरायांचे शब्दचित्र रेखाटणारा समास : उत्तमपुरुष निरुपण [१८-६ ]

शिवरायांचे बहुजन हिताय बहुजन सुखाय असे ब्रीद होते .त्यांनी समाजाच्या जीवन पद्धतीत अमुलाग्र बदल केला .नवीन मूल्ये ,नवीन ध्येये ,नवे कर्तुत्व ,नवे साहस उदयास आणले .समाज गतीमान केला .यालाच श्रीसमर्थ धर्मस्थापना म्हणतात .शिवरायांचे शब्द वर्णनच त्यांनी या १८ -६ या समासात केले आहे .

बरे ईश्वर आहे साभिमानी | विशेष तुळजाभवानी | परंतु विचार पाहोनी | कार्य करणे || १८-६-९ ||

नाना वस्त्रे नाना भूषणे |येणे शरीर श्रुंघारणे | विवेके विचारे राजकारणे | अंतर शृंघारीजे || १८-६-१ ||

वस्त्र आभूषणांनी शरीर शोभिवंत होते .शरीर नुसते शोभिवंत असून चालत नाही .तर विवेक ,विचार ,राजकारण यांनी अंतर्याम शोभिवंत करावे लागते . अंतर्मन शुध्द असावे लागते ,विवेकी विचारी असावे लागते तरच ती व्यक्ती न्यायाने राजकारण करू शकते .म्हणून उत्तम पुरुषाने काय करावे ते श्रीसमर्थ सांगतात :

सकळ कर्ता तो ईश्वरू | तेणे केला अंगीकारू | तया पुरुषाचा विचारू | विरुळा जाणे || १८-६-१३ ||

न्याय नीती विवेक विचार |नाना प्रसंगप्रकार | परीक्षिणे परांतर |देणे ईश्वराचे || १८-६-१४ ||

माहायेत्न सावधपणे | समईं धारिष्ट धरणे |अद्भूतचि कार्य करणे |देणे ईश्वराचे ||१८-६-१५ ||

येश कीर्ती प्रताप महिमा | उत्तम गुणांसी नाही सीमा | नाही दुसरी उपमा |देणे ईश्वराचे ||१८-६-१६ ||

देव ब्राह्मण आचार विचार | कितेक जनासी आधार | सदा घडे परोपकार | देणे ईश्वराचे ||१८-६-१७ ||

येहलोक परलोक पाहाणे |अखंड सावधपणे राहाणे \बहुत जनाचे साहाणे | देणे ईश्वराचे || १८-६-१८ ||

देवाचा कैपक्ष घेणे | ब्राम्हणाची चिंता वाहाणे | बहु जनासी पाळणे |देणे ईश्वराचे ||१८-६-१९ ||

उत्तम गुणांचा ग्राहिक | तर्क तीक्ष्ण विवेक |धर्मवासना पुण्यश्लोक | देणे ईश्वराचे || १८-६-२१ ||

या सर्व ओव्या श्रीसमर्थांनी शिवारायांसाठीच लिहिल्या आहेत .शिवारायांचेच वर्णन या ओव्यांमध्ये लिहिले आहे असे वाटते .

श्रीसमर्थ म्हणतात : एक गोष्ट चांगली आहे की परमेश्वराला आपला अभिमान आहे .त्याने आपल्याला आपले म्हटले आहे .तुळजाभवानीची आपल्यावर विशेष कृपा आहे .ईश्वर खरा कर्ता आहे .ईश्वर ज्याचा अंगीकार करतो ,ज्याच्यावर कृपा करतो ,त्या पुरुषाचे जीवन एखाद्याला कळते .न्याय ,नीती ,विवेक ,विवेक ,अनेक प्रसंगांना तोंड देणे ,दुस-याच्या अंत:करणाची बरोबर परीक्षा होणे या गोष्टी ज्या पुरुषाच्या ठिकाणी आढळतात ,त्याच्यावर ईश्वराची कृपा झालेली असते .खबरदारीने केलेला मोठा प्रयत्न ,कठीण प्रसंगी धरलेला मोठा धीर ,अद्भूत कार्ये घडवून आणणे ही ईश्वरी कृपेची लक्षणे आहेत .ज्याच्या यश कीर्ती ,प्रताप महिमा ,उत्तम गुणांना सीमा राहत नाही त्याच्यावर ईश्वरी कृपा झालेली असते .

जो देव ब्राह्मण यांना मानतो ,आचार विचार सांभाळतो ,पुष्कळ लोकांना आधार देतो ,ज्यांच्या हातून परोपकार घडतो ,त्याच्यावर ईश्वरी कृपा झालेली असते .

ज्याचे प्रपंच व परमार्थाकडे योग्य लक्ष असते ,जो सावधपणे राहतो ,पुष्कळांचे पुष्कळ सोसतो , त्याच्यावर ईश्वराची कृपा असते .

धर्मस्थापना करणारे पुरुष ईश्वराचे अवतार असतात .

उत्तम गुणांचा चाहता असणारा ,तीव्र बुद्धी असणारा ,विवेकशक्ती असणारा ,शुभवासना असणारा ,अमाप पुण्यकर्म करणारा ,ईश्वरी कृपेचे फळ असतो .

हे सर्व वर्णन शिवरायांना तंतोतंत लागू पडते .समासाच्या शेवटी समर्थ म्हणतात :

सकळ गुणांमध्ये सार | तजविजा विवेक विचार | जेणे पाविजे पैलपार | अरत्रपरत्रींचा ||१८-६-२२ ||

विवेक ,विचार ,योजना या सर्व गुणांचे सार आहे .त्यानेच प्रपंच व परमार्थ [अरत्र व परत्र ] दोन्ही नीट पार पडतात .

No comments: